नमस्कार!
मी भिक्षेकरी समाजासाठी काम करतो. समाजाच्या मुळ प्रवाहापासुन दुर असलेला हा समाज आहे.
या समाजाला मुळ प्रवाहात आणण्यासाठी – गोळ्या औषधी देत – त्यांचे शारीरीक व्याधी दुर करत – त्यांच्या हृदयापर्यंत पोचत, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतोय.
हे सर्व करत असतांना, हा समाज नेमका आहे कसा, ते विचार कसा करतात, त्यांच्या समस्या काय याविषयी मी माझ्या पद्धतीने लिहुन ते आपणांसमोर मांडत आलो आहे.
तुमच्यासारखी सहृदय “माणसं” मला नेहमी विचारतात, “या लोकांसाठी आम्हालाही काहीतरी करायचंय, पण नेमकं काय करु? कुठं करु? कसं करु?”
मी याचीही उत्तरं वेळोवेळी देण्याचा प्रयत्न केला आहे.
तरीही बरेच प्रश्न अनुत्तरीत आहेत, शिवाय या क्षेत्रात २४ तास काम करुनसुद्धा या क्षेत्रातील सगळंच काही मला समजलंय हे म्हणण्याचं माझं अजुनही धाडस होत नाही…
मी ही या क्षेत्रातला अजुन विद्यार्थीच आहे, मी पण शिकतोच आहे… तज्ञ झालो नाही, कारण इथं माणसागणीक, दिवसागणीक परिस्थिती बदलते…
तरीही प्रत्यक्ष कामातुन जे अनुभव मिळत गेले, त्यातुन मी माझ्यापुरते काही ठोकताळे / आडाखे बांधले आहेत…
हे ठोकताळे एका अभ्यास करणा-या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांचे आहेत, तज्ञाचे नव्हेत…
याविषयी व्यापक चर्चा झाल्यास समाज म्हणुन “मी” काय करावं या प्रत्येकाच्या प्रश्नाला एक दिशा तरी मिळेल असं वाटतं…
आणि म्हणुनच “पुणे आकाशवाणीने” उद्या दि. १७ मे रोजी सकाळी ११ वाजता “फोन इन” हा कार्यक्रम आयोजीत केलाय.
Live चालणाऱ्या या कार्यक्रमात लोक प्रश्न विचारतील, मतं मांडतील आणि आजपर्यंतच्या झालेल्या अभ्यासातुन आपली एक चर्चा होईल!
आपल्यालाही या विषयावर काही मत मांडायचं असेल, भिक्षेक-यांना उपयुक्त ठरेल असा विचार आपल्याला मांडायचा असेल तर रेडिओच्या माध्यमांतुन तो हजारो लोकांपर्यंत पोचेल, या हेतुने आपण या कार्यक्रमात खालील नंबरवर फोन करु शकता:
०२० २५५३१७०५ / ०२० २५५३१७०६
१७ मे सकाळी ११ वाजता
आपण मांडलेल्या मतामुळे, विचारामुळे मलाही एक नवी दिशा मिळेल, मी कुठं भरकटतोय का हे मलाही पडताळुन पाहता येईल, मलाही आपल्यापासुन नविन काही शिकता येईल…!
Leave a Reply