चपलांचा डॉक्टर…

मागे एकदा असंच फिरत असतांना एक पाटी दिसली… “चपलांचा दवाखाना”.

मी गंमत म्हणुन चौकशी केली, तर चपला दुरुस्त करणारे गृहस्थ म्हणाले, “आवो; डाक्टर मानसं बरी करतो, दुरुस्त करतो, तशा आमी बी चपला दुरुस्त करतो… डाक्टर टाके घालुन जखम शिवतो, आमी बी टाके घालुन चपला शिवतो… म्हणुन ह्यो चप्पलचा दवाखाना, आन् म्या चपलीचा डाक्टर…!”

मागच्या महिन्यात, माझी मोटरसायकल खुपच खराब झाली म्हणुन सर्व्हिसींग ला टाकली. मेकॅनीक ने खुप खर्च सांगितला. मी म्हटलं, “बापरे! इतका खर्च…?” तो मला ओळखत होता, मला कळेल अशा शब्दांत तो म्हणाला, “आवो डॉक्टर, आपलं शरीर आसतंय तशीच ही गाडी… तुमी नीट काळजी नाय घेतली, आता आमाला सुदा हिला ICU मध्ये ठेवायला लागणार… एखाद दुसरं ऑपरेशन करावं लागणार… मग खर्च वाढणार नाय का?” तो हसत बोलुन गेला.

वरच्या दोन्ही प्रसंगात मी मनमुराद हसलो होतो…

पण एकांतात असतांना; या दोन्ही प्रसंगांनी मला विचार करायला लावला… मी अंतर्मुख झालो…

खरंच डॉक्टर फक्त माणसांचाच असतो का? जनावरांचाच असतो का? निर्जीव गोष्टींसाठी डॉक्टर का नसावा…?

मुळात डॉक्टर म्हणजे काय?

मला असं वाटतं, डॉक्टर हे फक्त प्रोफेशन नव्हे, डॉक्टर ही एक “प्रवृत्ती” आहे… दुस-याला बरं वाटेल असं काहीतरी करण्याची…

डॉक्टर असण्यासाठी प्रत्येकवेळी स्टेथोस्कोप बाळगण्याची, सर्व औषधं माहीत असण्याची, ऑपरेशन कला जाणण्याची, रक्तलघवी, एम आर आय, सी.टी. स्कॅन समजुन घेण्याची मुळीच गरज नसते…

कोणत्याही साधनाशिवाय मनाची स्पंदनं ओळखणारा, मायेची फुंकर मारुन दाह विझवणारा, कुठल्याही ऑपरेशन शिवाय जखमा शिवणारा प्रत्येक “माणुस” डॉक्टरच आहे…!

सासुरवाशीण लेकीचा फोनवरचा श्वास ऐकुन; आईला इथ्थं बसुन कळतं, लेक कशी आहे? इथं कुठली तपासणी लागली?

रडणा-या बाळाला आई छातीशी घेते, बाळ शांत होतं, इथं कुठलं औषध कामी आलं…?

नापास झालेलं पोरगं प्रगतीपत्रक घेवुन गुपचुप आईला येवुन बिलगतं, आई प्रगतीपत्रक न बघता म्हणते, “असुदे, पुढच्या वेळी नीट अभ्यास कर…” इथं कुठला एम आर आय लागला…?

नारळवाल्याकडे गेल्यावर तो नारळ फक्त हातात घेवुन पाणीवाला कुठला आणि खोबरंवाला कुठला हे सांगतो… कुठल्याही एक्स रे तपासणीशिवाय… कसं जमतं हे..? ही पॅशन असते, कामावरची श्रद्धा असते…

लहान मुलगी पडते, गुडघ्यावर खरचटतं… बाबांकडे रडत येते… बाबा, ज्या जमीनीवर ती पडली, त्या जमीनीला दोन “फटके” मारतात… “आमच्या छकुलीला तु माल्लं काय… मालशील का पुन्हा… आँ…” असं म्हणेपर्यत इकडे छकुली हसायला लागलेली असते… इथं कुठलं ड्रेसिंग लागलं, कुठलं इंजेक्शन लागलं?

डॉक्टर व्हायला, मनं ओळखायला कोणत्याही साधनांची गरज नसते, किंबहुना कुठल्याही साधनांवाचुन जो मन ओळखतो, सांधतो तो प्रत्येकजण डॉक्टरच आहे…

डॉक्टर नेमकं करतो काय? तर ट्रिटमेंट देतो… ट्रिटमेंट म्हणजे तरी नेमकं काय?

ट्रिटमेंट म्हणजे “संस्कार”!

गोळ्या औषध देवुन ट्रिटमेंट करणं हा झाला एक संस्कार…

वयात आलेल्या लेकीला अडाणी आई, चार व्यवहाराच्या गोष्टी सांगते… स्त्री म्हणुन कसं वागावं शिकवते… हा ही संस्कारच नाही का? ही सुद्धा ट्रिटमेंट नाही का?

खेडेगावातल्या चिंचेच्या पारावर, एखादं म्हातारं खोड, आयुष्यात त्याने केलेल्या चुका सांगुन, पुढं येणा-या खड्ड्यांची जाणिव तरण्या पोरास्नी करुन देवुन त्यांना सावध करतंय ही पण ट्रिटमेंटच नाही का? संस्कारच नाही का?

कुंभारानं मडकं तयार केलं तरी, ते फुटु नये भविष्यात म्हणुन त्याला भट्टीत भाजणं हा सुद्धा ट्रिटमेंटचाच भाग आहे, संस्कारांचा भाग आहे…

शौचालय साफ करणारा भंगी, शौचालय साफ करतो, त्याला वापरण्यायोग्य ठेवतो… हा सुद्धा त्या शौचालयावर केलेला एक संस्कारच असतो…

रस्ता साफ करणारे, उकीरडा साफ करणारे, हे सुद्धा त्या रस्त्यावर आणि उकीरड्यावर संस्कारच करत असतात, आणि म्हणुनच ते वापरण्यायोग्य असतात…

शौचालयाला, उकीरड्याला जर ट्रिटमेंट दिली नसती संस्कारच केले नसते तर यांचा वापर कुणी केला असता का?

आणि म्हणुन गोळ्या औषधं शस्त्रक्रिया यांचा वापर न करता; शौचालय, रस्ता, उकीरडा, चपला अशा ज्या “नीच” / “कनिष्ठ” समजल्या जाणाऱ्या गोष्टींवर जो संस्कार करतो, ट्रिटमेंट करुन उकीरड्याला, शौचालयाला, तुटक्या चपलीला जो प्रतिष्ठा मिळवुन देतो तो माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ डॉक्टर आहे…

आणि इथं कुठल्याही डिग्रीची गरज नाही… डॉक्टर बनायला डिग्री लागते, माणुस बनायला नाही…! आपण नेमकं हेच विसरलोय… डॉक्टरची नाही, इथं माणसाची गरज आहे…!

आज आपण ज्यांना भिकारी / भिक्षेकरी म्हणतो, त्यांचीही अवस्था पायातल्या चपलांसारखीच आहे, शौचालयासारखी आहे, अस्वच्छ रस्त्यांसारखीच आहे, गलिच्छ उकिरड्यासारखी आहे…

पण जर यांना योग्य ती ट्रिटमेंट दिली, संस्कार केले गेले तर ही मंडळी सुद्धा वापरण्यायोग्य होतील… माणसांत येतील… नागरीक होतील…

म्हणुन मला हा अस्वच्छ रस्ता साफ करायचाय, चपला दुरुस्त करणारा डॉक्टर व्हायचाय, उकीरडा साफ करायचाय, भंगी व्हायचंय… माझी डिग्री काहीही असो… मला “चपला” दुरुस्त करण्याचा दवाखाना टाकायचाय…!

मी स्वतःला “डॉक्टर फॉर बेगर्स” म्हणवतो… यातला डॉक्टर हा कुणी डिग्री होल्डर नाही… हा डॉक्टर प्रतिक आहे त्या भंगीकाम करणा-या माणसाचं, ज्यानं स्वतःहुन हे काम स्विकारलंय… मी ही तोच… एक भंगी… आणि मला अभिमान आहे त्या भंगीकामाचा…!!!

मी डॉक्टर आहे त्या निर्जीव तुटक्या चपलांचा… आणि मला अभिमानच आहे त्याचा…!

उद्या सोमवारपासुन फक्त गोळ्याऔषधी देण्यापेक्षा मी भर देणार आहे खालील गोष्टींवर:

  1. ज्यांना आधारकार्ड नाहीत, अशांचे आधारकार्ड बनवुन देणार आहे. जेणेकरुन यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.
  2. ज्यांचे मतदान ओळखपत्र नाही, अशांचे मतदान ओळखपत्र बनवुन देणार आहे, जेणेकरुन हे मतदार बनतील, आणि राज्यकर्त्यांच्या “विकासाच्या” (?) यादीत यांचे नाव येईल…
  3. ज्यांचे आधारकार्ड आहे अशांचे PPF अकाउंट उघडुन देणार आहे, पोस्टात बचतखाते उघडुन देवुन बचतीची सवय लावणार आहे.
  4. आजारपणात उपयोगी पडतील अशा मेडीक्लेम पॉलिसी काढुन देणार आहे…

आणखीही खुप डोक्यात आहे, वेळ होईल तसं सांगेनच…

मी असं ऐकलंय की माकडापासुन माणुस तयार झालाय… खरंखोटं मला माहीती नाही…

पण मी हल्ली बघतोय… माणसांचं पुन्हा माकड बनत चाललंय… आणि हे मात्र खरांय…!

चला ना, आपण पुन्हा माणुस होवुया… मी सांगितला तसा बिना स्टेथोस्कोपचा डॉक्टर होवुया… खरंच काहीच लागत नाही हो, विश्वास ठेवा..!

एक्स रे शिवाय माणसं ओळखु, बीनपैशाचं औषध देवु, बीन टाक्यानं मनं जोडु…

मी तर चपलांचाच डॉक्टर आहे… मला असंच राहुदे…

तुम्ही माणसांचे डॉक्टर व्हाल…? व्हा ना प्लीज… छान वाटतं…!!!

2 Comments

  1. ह्या नि:स्वार्थ उपक्रमास तुम्हास अनेक व्यक्तींचे सहकार्य लाभो हिच सदिच्छा?

Leave a Reply

Your email address will not be published.


*