नमस्कार,
साठाव्या वर्षांनंतर प्रत्येक वयस्कर व्यक्ती, ही शक्यतो रक्तात हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी असणे, हार्ट अटॅक, किडनीशी संबंधीत आजार, लिव्हरशी संबंधीत आजार, डायबेटीस यांसारख्या आजारांच्या छायेत वावरत असते.
कोणतेही डॉक्टर या वयातील व्यक्तींना ट्रीटमेंट देतांना वेगवेगळ्या तपासण्या करुन, वरील आजारांची पडताळणी करुन, मगच औषधे सुचवतात.
रस्त्यात औषधे देतांना, मलाही त्यांच्या या तपासण्या करणे गरजेचे वाटते. परंतु एकेका व्यक्तीला लॅबोरेटरीमध्ये नेणे, आणणे, तपासण्या करणे ही सर्वच बाबतीत किचकट प्रक्रिया आहे.
आणि शेवटी म्हणुनच, घोड्याला नदीवर नेण्यापेक्षा नदीलाच घोड्याकडे न्यायचं ठरवलंय…
आजपासुन अत्यंत नामांकित अशा पॅथॉलॉजी लॅबमधील टेक्निशिअन्सना, मी माझ्यासह घेवुन फिरायला सुरुवात केली आहे.
- ऍनिमिया (अत्यंत कमी हिमोग्लोबीन)
- किडनीशी संबंधीत आजार
- डायबेटीस
- लिव्हरशी संबंधीत आजार
- हृदयाशी संबंधीत आजार
वरील सर्व आजारांच्या तपासण्या; भिक्षेकरी जीथे बसतात, तीथे त्यांच्या जागेवर जावुन करण्यास आजपासुन सुरुवात केली आहे.
पुण्यात साधारण ७५० भिक्षेकरी माझ्याकडे नोंदणी झालेले आहेत, येणा-या काही दिवसांत यातील एक न् एक भिक्षेक-यांच्या वरील सर्व तपासण्या करण्याचे ठरवले आहे.
त्यापैकी आपल्या आशिर्वादाने आजचा पहिला दिवस यशस्वीपणे पार पडला
काहीवेळा समाजाकडे बघण्याचा आपला हेतु नकारात्मक होवुन जातो… खासकरुन डॉक्टर, रक्तलघवी तपासण्या करणा-या लॅबोरेटरी वैगेरे… परंतु या ठिकाणी मला मुद्दाम सांगावसं वाटतं की – रु. ४५०० – रु. ५००० प्रति व्यक्ती किंमतीच्या या सर्व तपासण्या, ही लॅबोरेटरी मला फक्त रु. १२५०/- मध्ये करुन देणार आहे! केवळ त्यांनी मनाने स्विकारलेली सामाजीक बांधीलकीची जाणिव म्हणुन…
कोणत्याही लॅबोरेटरीचे टेक्निशिअन्स असे रस्त्यावर येवुन काम करायला तयार होत नाहीत. भिक्षेक-यांना हात लावायलाही कुणी तयार नसतं. या परिस्थितीत लॅबोरेटरी च्या टेक्निशिअन्सनी मी सांगेल तीथे यायची तयारी दाखवली असुन याबद्दल एकही रुपया मानधन अथवा भत्ता घेण्याचं त्यांनी नाकारलंय…
मी ब-याच गोष्टी या माध्यमांतुन सर्वांशी शेअर करत असतो, हेतु हा की, सगळंच जग वाईट नाहीय, खुप चांगलंही या जगात भरलंय… आणि जे चांगलं आहे ते या निमित्तानं लोकांपुढं यावं…
असो, या तपासण्या मला भविष्यातील धोके टाळण्यासाठी मदत करतील, सावध करतीलच…
तपासण्यांमध्ये आजार कळतील, पण तपासण्या करता करता माणसांतला चांगुलपणाही आपोआप कळायला लागला हा केव्हढा मोठ्ठा फायदा…!!!
Leave a Reply