फुटक्या काचा…!!!

मागच्या आठवड्यापासुन भिक्षेक-यांच्या रक्ततपासण्या करणे सुरु केले, हेतु हा की अंतस्थ काही आजार असतील तर कळावे, हॉस्पिटलमध्ये त्यांना वेळीच योग्य उपचार मिळावेत. (जे रस्त्यावर करणं मला शक्य नाही…)

झालंही तसंच, एक सत्तरीची आजी आणि पन्नास पंच्चावन्नची मावशी, दोघींच्या तपासण्यांत अनेक आजार दिसुन येत होते. तातडीने नव्हे अती तातडीने त्यांना ऍडमिट करणे गरजेचे होते…

रिपोर्टस् माझ्याकडे आल्यावर, दोघींना महत्प्रयासाने गाठुन शनीवारी सकाळी ९:३० ला ऍडमिट व्हायला जायचंय असं सांगुन तयार रहायला सांगितलं…

आज शनीवारी, दोघींना रिक्षात बसवलं… भुवड बाबा आणि ताई दोघांनी हॉस्पिटलमधील ऍडमिशनची माझ्या आधीच जावुन तयारी केलीच होती…

झालं… रिक्षा पुढे आणि मी मागे मोटरसायकलवर…

हॉस्पिटलच्या गेटवर थांबलो…

रिक्षाचे पैसे देईपर्यंत पन्नाशीच्या मावशीला भयानक धाप लागली, छातीत डावीकडं कळा सुरु झाल्या… चेहरा वेडावाकडा झाला… डावा हात उचलता येईना…

हे हार्ट अटॅक चे लक्षण… मी हादरलो… हिला उचलुन हॉस्पिटलमध्ये आणलं… ट्रिटमेंट सुरु झाली…

हे इंजेक्शन आणा… फट्टकन्, त्या गोळ्या आणा… लव्वकर… फास्ट…

मी पळतोय, माझ्याबरोबर भुवड बाबा आणि ताईसुद्धा… तोपर्यंत मावशीची शुद्ध हरपली…

इकडे भुवड बाबा, ताई आणि माझीही शुद्ध हरपायची वेळ आली…

ब-याच वेळानं मावशी शुद्धीवर आली… स्थिरस्थावर झाली… धोका टळला…!

डॉक्टर म्हणाले, ऍडमिट करतो पण २४ तास राहणारी एक महिला अटेंडंट हवीय, नाहीतर आम्ही ऍडमिट करणार नाही…

या मावशीचे यजमान आहेत, पुर्णतः थकलेत… यांनाही अनंत आजार आहेत, यांना स्वतःलाच उपचारांची आत्यंतिक गरज आहे. मी या मावशीला म्हटलं होतं, “आधी तु नीट हो… मग तुझ्या मालकांचं पण करु काहीतरी…”

तीचे यजमान पडेल ते काम करतात कुठंतरी… एकतर काम होत नाही आजारपणामुळे, शिवाय असल्या “खंगलेल्या” माणसाला कोण काम देणार? म्हणुन ही मावशी भीक मागते…

तसा मावशीला एक मुलगा आहे, सुन आहे… पण दोघांनाही यांचं काहीही सोयरसुतक नाही…

मावशीला म्हटलं, “माझ्या फोनवरनं मुलाला आणि सुनेला फोन लाव, काय झालंय ते सांग, इथं यायला सांग… नंतर मी ही बोलतो त्यांच्याशी…”

मुलाने प्रथम फोन उचलला… आई बोलत्येय म्हटल्यावर गुपचुप बायकोकडे दिला… सुनेनेही काहीही न बोलता, फोन ठेवुन दिला. नंतर मी लावुन बघीतला… तर फोन स्विच ऑफ…!!!

मावशीकडं पाहिलं… ती डोळे पुसत होती… मी आणि भुवड ताईंनी एक एक हात हातात घेतला… मावशी म्हणाली, “का वाचवलं मला? मघाशीच मेले असते तर किती बरं झालं असतं!” आणि हमसुन हमसुन, तरीही आतल्या आत रडु लागली… तीचं हे मुक्यानं रडणं आम्हाला कुणालाच पाहवेना…

कसं असतं ना? काचेचं नविन भांडं किती जपतो आपण… किती हळुवार हात लावतो… खाली ठेवतांनाही किती जपुन ठेवतो, जसं काही हृदयाचा तुकडाच…!

कारण ते असतं आकर्षक आणि महागसुद्धा, शिवाय चार चौघांत मिरवण्याच्या लायकीचं… का नाही कुणी जपणार?

पण हेच भांडं फुटुन त्याच्या काचा जमिनीवर पडतात, तेव्हा मात्र या काचांना कुणी हातही लावत नाही… झाडुने टोपल्यात भरायच्या या काचा आणि द्यायच्या उकीरड्यावर फेकुन…

आता या आकर्षक काचेच्या भांड्याच्या तुटक्या काचा घरात कुणीच ठेवायला तयार नसतं…

कारण त्या भांड्याचं आकर्षक असणं आता संपलेलं असतं, त्याची किंमत शुन्य झालेली असते, कोणत्याही कामाला आता या फुटक्या काचा येणार नसतात… आणि हातात धरायला जावं तर हात पण कापणार…

कालचं एक अप्रतिम काचेचं भांडं, ज्याला स्वार्थ असेपर्यंत जपलेलं असतं, आज तेच भांडं “फुटलेल्या काचा” म्हणुन उकीरड्यावर फेकलेलं असतं…

याच तुटक्या फुटक्या काचा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी मग भीक मागायला लागतात…

आपणही कधी सुंदर होतो, आपलाही पुर्वी काही उपयोग होता हे तेही विसरुन जातात! आणि जगाच्या बाजारातली काही शहाणीसुरती माणसं मग याच फुटलेल्या काचांना “भिकारी” असं म्हणतात…!

अशीच एक फुटकी काच आमच्या समोर होती, आणि आम्ही तीला सांधण्याचा प्रयत्न करत होतो…

सहज मनात विचार आला, आज सकाळपासुनच सगळ्या गोष्टी कशा कशा घडत गेल्या…?

मागच्याच आठवड्यात काही एक हेतुने रक्ततपासणी करावी असं मला सुचतं काय… काल रिपोर्टस् मला मिळतात काय… आज यांना मी इतर सर्व कामं सोडुन ऍडमिट करायला घेवुन जातो काय… दवाखान्याच्या दारात हिला अटॅक येतो काय… आधीच माहित असल्यासारखं भुवड कुटुंब माझ्याआधीच दवाखान्यात जावुन बसतं काय…

कुणाची योजना होती ही…? हिला वाचवणारा कर्ता करविता कोण असेल…???

आम्ही नक्कीच नाही!

आज हिला जीवदान मिळालंय, यांत आमचं काहीच कर्तुत्व नाही… आम्ही फक्त माध्यम होतो… कुणीतरी आमच्याकडनं हे करवुन घेतलं होतं, आमच्याही नकळतपणे… बिनबोभाट…!

आज या मावशीला जीवदान मिळालंय याचा अर्थ ती पुर्ण बरी झालीय असा नाही, पुढच्या आठवड्यात 2 D Echo व आणखीही इतर हायटेक तपासण्या लागतील व त्यानंतर खरे उपचार सुरु होतील…

पुढल्या आठवड्यात दुस-या हॉस्पिटलमध्ये आम्ही केवळ माध्यम म्हणुनच मावशीचं हे सर्व करणार आहोतच…

पण, मी विचार करतोय त्या मुलाचा आणि सुनेचा, ज्यांनी मावशीबरोबरचं नातं नाकारलं…

झाली असतील काही भांडणं, असतील काही वाद, पण म्हणुन इतकी कटुता?

परवा एक विचार वाचनात आला, श्रीकृष्णानं एका बोटानं पर्वत उचलला… केव्हढा तो पराक्रम…!

पण ज्या बासरीला सर्वजण प्रेमाचं प्रतीक समजतात, ती इवलीशी बासरी वाजवायला मात्र याच कृष्णाला दहाही बोटांचा वापर करावा लागतो…!

खरंच, एकवेळ पराक्रम करायला कमी ताकत लागते, पण प्रेम करायला त्याहुन दहापट ताकत जास्त लागते…

पराक्रमानं “युद्धं” जिंकली जातात, “माणसं” नाही हेच खरं… माणसाला “गुलाम” बनवताही येईल, पण त्याच्या “मनाला” नाही.. !

जातांना या दुखावलेल्या मावशीचा हात हातात घेतला… तीच्यातली आई जागी झाली असावी… मला म्हटली, “चार वाजत आले बाळा, सकाळी ९:३० पासुन तु माझ्याबरोबरच आहेस… तु काय खाल्लंस का?”

स्वतः मरणाच्या दारात झोपलेल्या या माउलीला इतक्यातुनही माझ्या जेवणाची आठवण व्हावी…? माझे डोळे पाणावले…

मी तीचा हात आणखी घट्ट पकडला… तीनेही माझा तो हात तीच्या कपाळाला लावण्याचा प्रयत्न केला… या सर्वात तीची बांगडी माझ्या हाताला टोचत होती, तीच्याही ते लक्षात आलं असावं…

ती म्हणाली, “बया, माजी बांगडी फुटंल आन् ल्येकराला फुटकी काच टोचंल…” असं म्हणुन झटक्यात तीने माझा हात सोडला…

मी तो हात परत हातात घेतला आणि कानाजवळ जावुन तीला म्हटलं, “मावशे, बाकी कुणाला टोचत असतील या “फुटक्या काचा” पण मला टोचत न्हाईत…”

मी तीच्याकडं पाहिलं, तीला माझ्या बोलण्यातलं काय कळलं मला माहीत नाही… पण डोळ्यात होते अश्रु आणि गालावर होतं गोड हसु…!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*