केवळ माहितीसाठी…

फुटक्या काचा या शीर्षकाखाली मागे लिहीलेल्या मावशींबद्दल खुप विचारणा झाली, म्हणुन हा थोडक्यात आढावा…

आढावा देण्याचं प्रमुख कारण असं की, ज्या गोष्टी मी तुमच्या मदतीवर करत आहे, त्याचं पुढं  काय झालं? की ती गोष्ट अर्धवट वाटेवरच सोडुन दिली? आरंभशुराप्रमाणे सुरुवात तर केली पण ती गोष्ट तडीस नेली का? या सर्व बाबी आपणांस घरबसल्या कळाव्यात हाच यांत प्रामाणिक हेतु आहे…!

कारण एखादी गोष्ट करण्यासाठी कुणीतरी मला पैसे दिलेले असतात देणगीरुपाने, कुणीतरी स्वतः जागेवर येवुन श्रमदान केलेलं असतं, तर कुणी फोनवरुन या कामासाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद दिलेले असतात…

या सर्वांनाच सतत माझ्याबरोबर थांबणं शक्य नसतं. तेव्हा आपण केलेल्या शारीरीक, आर्थिक आणि मानसीक देणगीचा वापर कसा होतोय हे आपल्याला समजणं हा आपला अधिकार आणि माझं कर्तव्य आहे, म्हणुन हा लेखनप्रपंच…!!!

तर या मावशीला, तपासणीअंती हृदयाचा गंभीर आजार असल्याचे निदान झाले  आहे.

डॉ. प्रमोद उमरजी सर, या पुण्यातील अत्यंत नामांकित अशा डॉक्टरांच्या छत्रछाये खाली आज सकाळी मावशीला ऍडमिट केले आहे.

आता सर ज्या तपासण्या आणि पुढील उपचार सांगतील  त्याप्रमाणे आपण आवश्यक त्या सर्व बाबी करुन घेणार आहोत.

आधी सांगितल्याप्रमाणे, मावशीच्या सुन व मुलाने सर्व बाबी ऐकुन न ऐकल्यासारखं केलंय, तीचे यजमान स्वतः आजारी असुन ते दुस-या कुणाची काळजी घेण्यास असमर्थ आहेत, या पार्श्वभुमीवर जवळचा जबाबदार  नातेवाईक म्हणुन सर्व कागदपत्रांवर  माझंच नाव दिलंय…

ऍडमिट असतांना कुणीतरी महिला सतत मावशीबरोबर असणं आवश्यक आहे, यानुसार माझे मित्र मनोज सावंत यांच्या सहकार्याने २४ तास शुश्रुषा करणारी पगारी महिला मावशीच्या मदतीला ठेवली आहे…

भुवड बाबा आणि ताईंबद्दल (फोन – ९४२२५ २३९६५) काय लिहु? माझ्या सावलीसारखे ते माझ्यासह असतात आणि मी जे करतोय त्याच्या दहापट जबाबदाऱ्या ते स्वतःच्या अंगावर घेतात…

मी आपण सर्वचजण आणि वर नामोल्लेख केलेले माझे जवळचे लोक या सर्वांचा ऋणी आहे…

कारण, अशा केसमध्ये योग्य ते उपचार न झाल्यास पेशंट सहा महिन्याच्या आत दगावु शकतो…

पण ही मावशी आता नक्की वाचेल आणि दिर्घायुषी होईल, आणि या सर्वांचं श्रेय मी  आपणांस देवु इच्छितो!!!

मावशी पुर्ण बरी झाल्यावर पुढे काय, याचे साधारण आराखडे डोक्यात आहेत, त्याविषयी सांगेनच नंतर…

आधी हे फुटकं काचेचं भांडं, काचा गोळा करत करत सांधण्याचा प्रयत्न तरी करतो… आणि तुम्ही आहातच की बरोबर…!

1 Comment

  1. खूप छान आपण कार्य करत आहात.
    आणि मला ही आपल्या बरोबर काम करण्याची इच्छा आहे..

Leave a Reply

Your email address will not be published.


*