मुडद्या..!!!

वेळ साधारण सकाळी ११ ची… एक शनिवार… मारुतीचा / शनीदेवाचा वार… भक्त मंडळी शनीला तेल वाहण्यात व्यस्त… आणि बाहेर बसलेला भिक्षेकरी समाज “आमाला बी द्या वो दादा” म्हणत, काही मिळतंय का ते बघण्यात ग्रस्त..!

इथं किमान १५ – २० आज्या तरी असतात… सगळ्या जवळपास पंच्याहत्तरी पुढच्या… दोन लाईन करुन शिस्तीत बसलेल्या… देणारा लाईनने वाटत जातो शिस्तीत, घेणारा आपला नंबर येईपर्यंत वाट पाहतो, गुपचुप… गर्दी नाही गोंधळ नाही… सगळं शिस्तीत… शांततेत..!

आयुष्याच्या उत्तरार्धाने ही शिस्त अंगी बाणवली असेल का? माणुस नेहमी जातांना शांत असतो, यांनाही आपल्या जाण्याची चाहुल लागली असेल का? अनुत्तरीत प्रश्न मनात घोळवत मी कामाला सुरुवात करतो..!

मुळात मी जातो तेच थट्टा मस्करी करत… खरंतर माझा वैयक्तिक स्वभाव थोडा गंभीर आहे… किंवा झाला असेल आयुष्याच्या लढाईत.. पण यांच्यात आलो की माझा मुळ स्वभाव आपोआप बदलतो, मी खोडकर होतो, खेळकर बनतो, थट्टा करतो…

मला आठवतं, मी माझ्या लहानपणी खुप खोडकर आणि हट्टी होतो… आणि मी माझ्या आजीच्या सगळ्यात जवळचाही… तीनं माझे सर्व लाड पुरवले, तीचं नाव लक्ष्मीबाई… मी तीच्याकडे खेड्यात सुट्टीत जात असे…

ही माझी आजी अत्यंत करारी बाई, हिच्यापुढं उभं राहुन बोलतांनाही लोक विचार करुन बोलत… पण आमचं नातंच वेगळं… तीला गावातले लोक आदराने मामी किंवा काकु म्हणायचे… पण मी डायरेक्ट तीला “ए लक्षे” म्हणायचो… हा मान माझाच…

तीचा नवरा, म्हणजे माझ्या आज्ज्याने पण कधी धाडस केलं नाही तीला कधी लक्षे म्हणायचं..! पण मी तीचं सर्वस्व होतो… लहानपणी तीला मी “ए लक्षे, ए म्हातारे” अशी हाक मारायचो. ती चिडायची नाही, उलट अत्यंत प्रेमानं मला म्हणायची, “काय रं ल्येकरा…? काय पायजेन तुला…? आंबा खातु? भाकर खातु? का च्या आन् चपाती खातु?”

त्यावेळी चहात बुडवुन शिळी चपाती खाणं हा माझा आवडता मेन्यु होता… जगातल्या सगळ्या फाईव्ह स्टार हाटेलात जेवलो, पन माज्या म्हातारीच्या हातची “च्या” आन् “चपाती” कुटं मला मिळाली न्हाय… दुर्दैव त्यांचं..!

मी गावात न्हाय न्हाय ती मस्ती करायचो, गावातली लोकं तीच्याकडं तक्रारी घेवुन यायचे… ती लोकांना तोंड द्यायची… तेव्हढ्यापुरतं माझ्यावर चिडायची… माझ्या अती खोडकरपणावर ती चीडली की म्हणायची, “मुडद्या, थांब तुला आता बाजारात न्हिवुन विकते… चार आण्याला..!”

कधी कधी माझ्या उथळपणावर चिडुन स्वतःच रडायची… आणि म्हणायची, “मुडद्या रडवु नको मला, न्हायतर चपलीनं मारीन तुला…”
आणि मी कोडग्यासारखा हसायचो… ही… ही… करत… आणि पुन्हा तीलाच बिलगायचो… पदराखाली घुसळत…
एव्हढ्यानं म्हातारीचा राग शांत व्हायचा…

मग म्हणायची, “माजं सोनं हाय गं बया… गावातली रांडामेली लोकंच लय नासकी… माज्या ल्येकराला नावं ठिवत्यात… हिच लोकं उद्या माज्या ल्येकरावर प्रेम करत्याल…माज्या ल्येकराच्या मागं फिरत्याल…” मग मला ती प्रेमानं जवळ घेवुन म्हणायची, “तु जवा कमवाय लागशील ना, तवा मला येक लुगडं घीवुन दे बरं का आबी..!”

मी म्हणायचो, “म्हातारे, थांब मला मोटा हुंदे, मंग मी तुला एक न्हाय पाच लुगडी घीन…” आणि यावर ती पटापटा मुके घ्यायची…

तीच्या या प्रेमासाठी आसुसलेला मी, कधीकधी बोलण्यात लुगड्यांचा आकडाही वाढवत असे… शंभर हाच मोठा आकडा मला लहानपणी माहीत होता… कधीकधी मी शंभर लुगडी घेईन असंही म्हटल्याचं मला आठवतंय… आणि मी असं म्हटलं कि दरवेळी ती सुरकुतलेल्या, खरबरीत हातानं माझ्या गालावर हात फिरवायची…

आणि मी चिडायचो… म्हणायचो, “लक्षे किती घाण हात हाय तुजा, मला टोचतोय की तुजा हात…” ती यावर फक्त हसायची गालात..!

पण माझ्या या म्हातारीनं, या लक्षीनं मला फसवलं… मला न सांगता एक दिवस सोडुन गेली… एकही लुगडं न घेता… गुपचुप गेली… रडीचा डाव खेळली… आन् मी हितं हुडकत राह्यलो, म्हातारीचा त्यो खरबरीत हात, मळका पदर आणि प्रेमानं मारलेली हाक… “मुडद्या..!”

आणि मी विचार करत रहायचो, “आता मला कोण बाजारात विकणार चार आण्याला..?”
आज त्या टोचणा-या हातांना मी शोधतोय… मळक्या त्या पदराला शोधतोय… कुठुनतरी “ए मुडद्या” म्हणुन आवाज येईल, त्या आवाजाला शोधतोय..!

मी चिडल्यावर रागानं, गंमतीनं तीला, “जा मर तु म्हातारे…” असं म्हणायचो… मला या शब्दांचा अर्थही तेव्हा कळायचा नाही…
पण ती म्हणायची, “आजुन मरणार न्हाय मी, जीव तुज्यात आडकलाय आबी…”

कदाचीत म्हाता-या या भिक्षेक-यांसाठी काम करण्याचं मुळ यांतच असावं… कोण जाणे..! मी माझी लक्षी शोधतोय यांच्यात..! या सगळ्या म्हाता-या माणसांत मला माझी लक्षी दिसते… मला फसवुन देवाघरी गेलेली… मी कधीच माफ नाय करणार तीला…

असो…

तर मी कामाला सुरुवात करतो, अगदी खंगलेल्या म्हातारीला म्हणतो,.. “म्हातारे, म्हागल्या आटवड्यात दिसली न्हाईस, मला वाटलं, मेलीस तु…”
ती म्हणते, “येवड्यात न्हाय मरायची मी, आजुन लय हिशेब राहल्यात…”
मी म्हणतो, “जा की आता वर, देव वाट बगतोय तुजी वर… बास की..!”
तर ती म्हणते, “गेले आस्ते रे पन जीव तुज्यात आडकलाय ना बाबा…” ती हसत बोलुन जाते…
आणि… हितं मला माजी लक्षी आटवते..!

खरंच माजी लक्षी बोलत आसंल का यांच्या तोंडातुन वरनं… आयला डॉक्टर झालो पण… प्रेम खरंच आंधळं असतं… श्रद्धा अंधच असते… सायन्स इथं झक्क मारतं… आठवतो तो माझ्या आजीचा मळका पदर आणि दात नसलेल्या तोंडातुन प्रेमानं आलेली हाक… “मुडद्या..!!!”

एका आजीला तपासतांना अशीच तीची थट्टा करत होतो… गळ्यात पिवळ्या मण्यांची माळ… मी गंमतीनं म्हटलं, “ऐ म्हातारे, सोन्याची माळ घालती आन् हितं मागायला बसती…” म्हातारीच्या डोळ्यांत अश्रु आले, म्हणाली, “सोन्याची माळ न्हाय वो, पिवळी माळ हाय मण्यांची डाक्टर, सोन्याची माळ पोरानं काडुन घेतली, सुनंनं घर घेतलं नावावर करुन… आन् मला बशीवलं हितं रस्त्यावर … “येका” लुगड्यावरच घर सोडलं मी डाक्टर…”
मला पुन्हा ती लुगडी आठवली… ते शंभर लुगडी घेण्याचं वचन मला आठवलं… माजी लक्षी मला पुन्हा आठवली…
हा योगायोग आहे? की कुणी माझ्यासमोर हे प्रसंग मुद्दाम पुन्हा पुन्हा उभं करत आहे?

का? कशासाठी?

कि ही माझी लक्षी, तीच्या अपुर्ण इच्छा माझ्याकडुन पुर्ण करवुन घेत आहे… या लोकांमार्फत..?

भानावर येवुन मी म्हटलं, “आज्जी मी तुझी सोय करु का कुठल्या तरी वृद्धाश्रमात? आनंदात रहा तिथं… इथं भिक मागु नकोस…”
आज्जी म्हटली, “नको डाक्टर, माजा लांबचा चुलत भाउ आस्तो हितं, ७० वर्षाचा हाय, हमाली करतो, पन त्याच्या घरीच मी राहते… त्यो सांबाळतो मला… सख्ख्या लेकानं, मुडद्यानं सोडलं… पन लांबचा ह्यो भाउ सांबाळतो मला,..”

खुप वर्षांनी पुन्हा “मुडद्या” शब्द ऐकला मी… मला माझ्या म्हातारीची आठवण आली…
कधी वाटतं माझी ही लक्षीच माझ्याकडनं हे सगळं करवुन घेत्येय का..?

मनात विचार आला की, म्हातारा हमाल आपल्या लांबच्या बहिणीचं ओझं वाहतो,.. आणि तरुण पोराला आई जड झाली?
म्हातारं कोण? तरुण कोण? श्रीमंत कोण? गरीब कोण?

मी तीचा हात हातात घेतो… आणि ती तीचा खरबरीत हात माझ्या गालांवर फिरवते…
तोच हा हात मला टोचणारा… तरी हवाहवासा वाटणारा… हा हात माझ्या लक्षीचा तर नसेल?

अशातच पाउस सुरु होतो…
धो… धो..!

हे त्या आजीच्या डोळ्यातले अश्रु असावेत की माझ्या डोळ्यातले..?
की, वरनं माझी लक्षी रडत म्हणत आसेल, “मुडद्या… मला रडवु नगो… न्हायतर चपलीनं मारीन..!”

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*