बेबी…

एक गर्भश्रीमंत घरातली देखणी मुलगी… आईवडिलांनी लाडाकोडात वाढवली… शिक्षणासाठी महाबळेश्वर सारख्या ठिकाणी पाठवली..!

साधारण १९५० चा तो काळ असावा…

सातवीपर्यंत छान शिक्षण झालं… पोरगी उत्कृष्ट इंग्लिश देखील बोलायला लागली…

मुलगी देखणी… मनात स्त्री सुलभ लज्जा आणि मुलांबद्दल वाटणारे एक नैसर्गिक आकर्षण… कुणाचा धाक नाही… शाळेबाहेर गेटवर तीच्यासाठी थांबणा-या, तीच्यापेक्षा मोठ्या वयाच्या तरुणानं हिला मोहिनी घातली… वयात अंतर खुप होतं… पण, प्रेम वेडं असतं, आणि सांगायला कुणी नव्हतं ! त्या काळात ही त्याच्यासह पुण्यात पळुन आली.

याने तीला सांगितलं होतं, “मी एके ठिकाणी जॉब करतोय, पगार कमी आहे, पगार वाढेलच, तेव्हा लग्न करु… शिवाय नोकरीनिमित्त फिरती असते, मी २४ तास तुझ्याबरोबर राहु शकत नाही… जावुन येवुन करेन…”

“आपण घर घेवुच, पण जरा कळ काढ, पगार वाढला की लग्न पण करु त्यानंतर बंगल्यातच राणी सारखं ठेवतो तुला…” असं सांगुन या “राणीला” त्यानं एका झोपडपट्टीत शेड घेवुन दिलं…

आता बीनलग्नाची हि राणी झोपडीत राहु लागली… लग्नाची वाट पाहु लागली… हा पठ्ठ्या आठवड्यातनं दोन चकरा मारायचा हिच्याकडे… दरवेळी नविन आमिष आणि नविन आश्वासन..!

भोळसट राणी वेड्या प्रेमावर विश्वास ठेवत गेली… या काळात एकापाठोपाठ दोन मुलं झाली… अजुन लग्नाचा पत्ता नाही…

यानंतरही तो एकदा आला या राणीला भेटायला आणि त्यानंतर पुन्हा कधीही भेटला नाही… गेला सोडुन तो कायमचाच…

या माणसाचं लग्न झालं होतं, आणि मुलींना फसवुन मजा मारणे हा त्याचा छंद होता… हे सत्य समजेपर्यंत हिच्या पदरी दोन मुलं होती लहानगी…

मधल्या काळात हिचे वडील वारले, तीच्या आईनं शेवटी हिला शोधलंच… आणि गळ घातली घरी परत येण्याची…

आयुष्यातला गेलेला काळ परत येणार नव्हता, आणि घरी पण तोंड दाखवायला जागा नव्हती… या स्वाभिमानी मुलीने आपल्या आईबरोबर जायला नकार दिला.

तीच्या आईने मग नाईलाजाने, त्यातल्या त्यात कळत्या पोराला उचललं आणि म्हणाली, “तु नाही येत तर नाही… मी नातवाला घेवुन जाते माझ्या, मी त्याला या झोपडपट्टीत राहु देणार नाही..!”

आजीने मग या मुलाला महाबळेश्वरलाच शिकायला ठेवलं, पालन पोषण केलं, जगण्यायोग्य बळ दिलं…

एक बाळ हिच्याकडेच राहु दिलं… कारण दुध पिणा-या बाळाची आईपासुन ताटातुट करणं त्या माउलीला बरं वाटलं नाही… पण जाताना वचन घेतलं की, कळत्या वयात याही मुलाला माझ्याकडं सोड, मी याचाही सांभाळ करेन…

हे वाचतांना सोपं वाटतंय इतकं सोपं नाही. १९७० – ७२ च्या काळात घडणारी ही सत्यकथा… पुर्वीच्या सनातनी वातावरणात एका मुलीने लग्न न करताही मुलांना पोटात मारायचं नाही म्हणुन जन्माला घालण्याचा घेतलेला निर्णय… आणि केवळ मुलीवरच्या प्रेमापोटी अनौरस नातवांचा सांभाळ करण्याचा घेतलेला तीच्या आईचा त्या काळातला निर्णय, या दोन्ही मातांच्या जिद्दीला सलाम…

समाजाच्या चष्म्यातुन पाहिलं तर त्या चुकल्या असतीलही, पण दोघींनी आपलं आईपण मात्र जपलं होतं…

या राणीनं मग मिळेल ते काम करायला सुरुवात केली. कधी स्वयंपाकीण, कधी मोलकरीण आणि त्यानंतर पुण्यातल्या एका हॉस्पिटल मध्ये मावशी म्हणुन… !

दुस-या मुलाला तीने आपल्याबरोबरच ठेवलं होतं… तीनं त्याला इथं चांगल्या शाळेत घातलं होतं… सुट्टी च्या दिवशी आई जीथं काम करेल तीथं खेळत रहायचा… आई कौतुकानं पहात रहायची…

असाच खेळता खेळता गच्चीत गेला… आईला तोंड वेंगाडुन दाखवुन हसु लागला… दोघंही हसत होते… हसता हसता… मुलाचा तोल गेला… दुस-या मजल्यावरुन तो खाली पडला… त्याचं ते हसु शेवटचंच ठरलं..! एक करुण अंत..!!!

यावेळी या मुलाचं वय होतं १५ … एक आधार तुटला..!

मग ही गेली, महाबळेश्वरला थोरल्या मुलाला भेटायला… पण मधल्या काळात या मुलाच्या मनात आईबद्दल प्रचंड घृणा निर्माण झाली होती. त्याच्यामते, तीनं पाप केलं होतं, आणि या पापाचं तो फळ होता… स्वतःविषयी सुद्धा त्याला भयानक तिरस्कार होता… अत्यंत निराशेनं ग्रासला होता.

होस्टेलला आलेल्या आईला भेटायला त्याने नकार दिला. आईनं खुप समजावुन सांगितलं, डोकं फोडुन घेतलं… त्याने मात्र निक्षुन सांगितलं, “तु माझी आई नव्हेस… आजपासुन तु मला दिसायचं नाहीस… जर पुन्हा मला साधा भेटण्याचा प्रयत्न जरी केलास तर मी आत्महत्या करेन..!”

आधीच एक पोरगं गमावलेली ही आई, दुसरं पोरगंही गमावण्याच्या भितीनं गुपचुप चालती झाली…

जातांना पोराच्या बंद दाराकडं पाहुन मनभरुन रडली… दाराबाहेर त्याच्यासाठी आणलेला खाऊ ठेवला… आणि रडत रडत “सुखी रहा बेटा तु”, असा आशिर्वाद देवुन निघाली. पुन्हा परत कधीही न येण्याची शपथ घेवुन.

परत आली पुण्यात, पण काम कुणासाठी करायचं आता ? धाकटा मुलगा सोडुन गेला… देवाघरी… थोरल्यानं सर्व पाश तोडले…

हिने ठरवलं, आपलाही जीव आता ठेवायचा नाही, प्रत्यक्ष जीव सोडायची वेळ आली तेव्हा मात्र वाटलं, पोराला आज राग आहे म्हणुन असं वागला, उद्या कधीतरी कळेल त्याला, आयुष्यात आईची गरज भासेलच त्याला… आज न् उद्या येईलच…आई आई करत… केवळ या एका आशेवर आत्महत्येचा विचार काढला…

पुन्हा एकवार मातृत्वाचा पान्हा फुटला… याच पान्ह्याने, मुलावरच्या प्रेमानं रस्त्यावर का होईना पण ही जगायला शिकली..!

हा काळ असावा साधारण १९८० चा… कुणाचा विश्वास बसायचा नाही कदाचीत, पण सत्य कल्पनेपेक्षा विदारक असतं..!

तेव्हापासुन आजतागायत ती रस्त्यावर आहे… मुलगा “आई” म्हणत कधीतरी येईल भेटायला ही तीची भाबडी आशा…

एक नाही दोन नाही आज तब्बल ३८ वर्षे झाली, ती वाट पाहत्येय मुलाची… पण मुलाचं मन अजुन द्रवलेलं नाही.

हा मुलगा पुण्यात आहे. गाडी, बंगला, उच्चशिक्षित पत्नी आणि मुलांसोबत तो राहतो…

ही माउली मुलाच्या नकळत, त्याच्या बंगल्याच्या बाहेर उभी राहुन त्याला पोटभर पाहते… घरात जायची हिंमत होत नाही, न जाणो, त्यानं खरंच आत्महत्या केली तर..?

बंगल्याचं भलं मोठं गेट सर्वांना आत घेतं… पण या आईला मात्र आत प्रवेश नाही…

असुदे, बंगल्याचं गेटच जर खुजं असेल तर एवढ्या मोठ्या उंचीच्या आईला आत कसं घेवु शकेल… बंगल्याच्या गेटलाच आता आपली उंची वाढवावी लागेल..!

माझ्या एका मित्राने हिला माझ्या संपर्कात आणलं… एक महिन्यापुर्वी… एका डोळ्याने दिसत नाही… ऑपरेशन करावं लागेल… सगळ्या तपासण्या केल्या.

गुरुवारी दि. जुलै ला लेले हॉस्पिटल, शनिवारवाड्या जवळ, पुणे इथे ऑपरेशन करणार आहोत या मावशीचं.

हिची सोय शुक्रवारी दि. ६ जुलै रोजी एका वृद्धाश्रमात करणार आहोत.

वृद्धाश्रमात नेण्याआधी तीची अजुन गाढ भेट घ्यावी म्हणुन असाच तीला भेटायला गेलो होतो, तीच्या फुटपाथवरच्या घरी… मला म्हणाली… “Yessss, welcome my boy to home..!”

मी दबकत तीच्या जवळ बसलो… आजचं हीचं वय ७८ – ८० असावं…

म्हणाली, “काय घेशील ? चहा, कॉफी, ज्युस ?”

“नाही थांब, आलाच आहेस तर जेवणच करते… पनीर कोफ्ता, मलई मेथी, नवरतन कुर्मा, रशिअन सॅलड करते… आवडतं ना तुला ?”

मी हसण्याचा प्रयत्न केला, पण डोळ्यांनी दगा दिलाच… तीला कळलं असावं … तीच जवळ आली म्हणाली, “अरे आनंद मिळवायला प्रत्येकवेळी ती गोष्टच हवी असते असं काही नाही,… काही गोष्टी अशा असतात त्यांच्या आठवणीनं पण आनंद होतो…ती शुन्यात बघत म्हणाली, मला तीचा रोख कळला..!”

शेजारच्या टपरीतनं मग चहा मागवला…

चहा पिताना म्हणाली, “अहाहा… मस्त पाउस, गरमागरम चहा आणि सोबतीला माझा लेक… तो पण तुझ्याच वयाचा आहे…” ती पुन्हा मुलाच्याच विषयावर घसरत होती…

तशा ३८ वर्षांच्या काळानं वेदनांची धार आता कमी झाली होती, मुलगा येणार नाही हे तीनं स्विकारलं होतं… आणि खोटं का होईना पण आनंदात जगायचं हे तीनं ठरवलं होतं…

मला म्हटली… “Oh… I am mad… इतका वेळ आला आहेस आणि मी माझा बंगला दाखवायलाच तुला विसरले…”

“Come… Come with me… ही माझी बेडरुम…” फुटपाथवरच्या सुलभ शौचालयाजवळच्या आडोशाकडे तीनं बोट दाखवलं… बाजुलाच एक कमान आहे… तिथुन भर्र् वारं येत होतं… तिकडं बोट दाखवुन म्हणाली, “एकदा हा एअर कंडिशनर चालु केला ना की, अंगावरनं गाडी गेलेली पण कळायची नाही अश्शी मस्त झोप येते… अहाहा..!”

“चल दिवाणखाना तर तु पाहीलाच आहेस… आपण तिथंच चहा घेतला आत्ता…”

“See, this is my kitchen…” बाजुच्या वडापाव आणि भेळीच्या गाड्यांकडे बोट दाखवलं तीनं… “अरे बघ, माझ्या किचन मध्ये मी कित्ती कुक कामाला ठेवलेत..? सकाळी १० ला येतात आणि रात्री १२ पर्यंत असतात… मी सांगितलंय, कामात हयगय नाही… कित्ती पाहुण्यांचा राबता असतो माझ्याकडे… वेळेत यायचं आणि वेळेत जायचं…!”

“चल, तुला टेरेस दाखवते”, माझा हात तीनं पुन्हा धरला…नव्या उत्साहानं ती मला मागं येण्यासाठी ओढत होती, आणि कधी नव्हे ते माझी पावलं जड झाली होती…

ती पुलाखाली राहते, आडोशाला, त्या आडोशाच्या बाहेर ती मला हाताला धरुन गेली…

अंगावर पावसाच्या सरी कोसळत होत्या, अंगावर येतील अशी वाहनं भरधाव जात होती… हे कुठं जातात इतक्या भरधाव स्पीडने मला अज्जुन कळलं नाही… वाहनांचा स्पीड जर एव्हढा असतो तर आज ३८ वर्षे झाली, मग या मावशीच्या मुलाला यायला का वेळ व्हावा ? कुठल्या स्पीड ब्रेकरने त्याला अडवलं असावं..?

“हे बघ माझं टेरेस”, ती म्हणाली… मी भानावर आलो…

“हे बघ… आत्ता पाउस आहे, नाहीतर मी इथं Sunbath घेते नेहमी..! हरकत नाही, पावसाळ्यात मी Shower चा आनंद इथंच घेते…”

मला सहन होईना… मी हात हातातुन काढुन घेत डोळे पुसायला लागलो…

ती मिश्किल पणे म्हणाली…”You Jealous… माझा self-contained flat बघुन तुलाही हेवा वाटला ना..?”

मी काय बोलु ? रडतांना मला बोलताच येत नाही..! माझा काय दोष..?

ती तीकडनं म्हणत होती… “Tell… Tell… What happened?” आणि बोलायला माझ्याकडं शब्दच नव्हते… तीच्या त्या self-contained flat मध्ये माझ्याही नकळत ते केव्हाच हरवले होते..!

कसं असतं ना ? माणसं सगळं मिळुनही दुःखी असतात… भुक भागते; पण हाव मरत नाही…

ज्यांना काहीच मिळत नाही ते असं सुख शोधतात… पण हेच वास्तव आहे, बाकी सारं झुठ..!

वेळेनं या मावशीला सुखानं जगायला शिकवलं… नव्हे, मजबुर केलं, अगतिक केलं..!

जे चाललंय डोळ्यासमोर त्याला छान म्हणु ? की स्वप्न म्हणुन सोडुन देवु ?

मी नकळत मनिषाला फोन लावला… म्हटलं, “बोल या मावशीशी…”

मावशी फोनवर तीला म्हणाली, “काय गं सुनबाई… आम्हाला आमचा self-contained flat आता सोडायला लागणार, तुझा नवरा आता माझी वरात काढणार आहे परवा… वृद्धाश्रमात … ये की भेटायला…”

मनिषा तिकडनं हो म्हणाली असावी… !

फोन ठेवतांना हळुच म्हणाली, “चला मुलगा भेटला, सुनबाई पण येणार..!”

मी म्हटलं, “मावशी मला एक सांग, तुझ्या आईकडे इतकं सगळं चांगलं होतं… तीकडं का नाही गेलीस ? का बरं स्वतःच्या जीवाची परवड केलीस ?”

ती म्हणाली, “कशी जाणार होते बेटा ? त्या जमान्यात पळुन गेले, माझ्या घरच्यांना समाजानं, नातेवाईकांनी त्यावेळी फाडुन खाल्लं… माझ्यामुळं खचुन वडिल गेले…”

“इतका त्रास देवुन अजुन निर्लज्जासारखं दोन अनौरस मुलं घेवुन जायचं होतं का मी? म्हणजे माझ्या म्हाता-या आईला पण लोकांनी टोचुन मारलं असतं..!”

“माझी जवानीत एकच भुल झाली रे बेटा… या एका भुलीपायी कित्ती जीव मला गमवावे लागले…”

“वडील गेले, एक मुलगा गेला, आई गेली… जो जीवंत आहे मुलगा त्याला माझ्यामुळं जीवंतपणी मरणयातना मी देत्येय… माझ्यासारख्या बाईला हीच शिक्षा योग्य आहे… मी स्वतः माझ्या हातानं माझं घरदार उध्वस्त केलं… एकच भुल रे …एकच भुल… मला केव्हढ्याला पडली..?”

शुन्यातुन तीची नजर हटत नाही…

मी म्हटलं, “फुटपाथवर , रस्त्यावर झोपताना तुला साप विंचु यांची भिती कधी वाटली नाही..?”

माझ्याकडे किती हा बाळबोध… अशा नजरेनं पहात ती म्हणाली, “तुला सांगु ? साप, विंचु, कोल्हे, कुत्रे यांना मी जनावरं समजतच नाही…”

“पस्तीस चाळीस वर्षाची माझ्यासारखी बाई रस्त्यावर रहात होती ना… तेव्हा पुरुषातल्या जनावराची मला जास्त भिती वाटायची… खरं जनावर हे रे…. बाकीचे मुके प्राणी… यांचा डंख परवडला पण या बोलणा-या जनावरांचा डंख फार वाईट..!”

मी मान खाली घातली…

“तुला अजुन गंमत सांगु? आता माझं वय असेल ७० – ८०. मी खरंतर आज्जी झाले… ज्यांना आपण जनावरं म्हणतो ना, ते डंख न मारता बाजुनं जातात… पण काही माणसांना अजुन माझ्यात “बाई” दिसते..!”

मी चेहरा वळवतो… काय उत्तर देणार मी ?

“चल जावु मावशी..?” मी ब-याच वेळानं बोललो…

तर उसळुन म्हणाली, “ऐ अभि, मी तुला सांगते आता… मला मावशी बिवशी असलं काही म्हणायचं नाही हं…!!!”

“मग..? काय म्हणु मी तुला”, माझा रास्त सवाल..!

“मला बेबी म्हणायचं तु आजपासुन…”

मी म्हटलं, “बेबी..???”

तीला गुडघ्याच्या त्रासानं उठता येत नाही, तरी उठली… माझ्या खांद्यावर तीनं हात ठेवला… इतक्या वेळचा उसनवारीनं आणलेला आनंदी मुखवटा गळुन पडला… शुन्यात बघत ती म्हणाली…

“माझा धाकटा जेव्हा लहान होता नं,तेव्हा मी त्याला… बेबीए बेबी अशीच बोलवायची… कामावरची लोकं पण त्याला बेबीच म्हणायचे… सारखं कानावर हीच वाक्य पडुन तो पण मला आई म्हणण्याऐवजी बेबीच म्हणायला लागला…”

“मी त्याला बेबी म्हणायचे आणि तो ही मला बेबीच म्हणायचा… आई कधी म्हटलाच नाही… लोक हसायचे आम्हाला…”

“तो पडला गच्चीतुन तरी पडतांनाही…बे…बी… अशीच हाक मारली त्यानं मला… पुन्हा मला कधीच कुणी बेबी म्हणुन हाक मारली नाही..!”

हे बोलतांना तीने डोळे गच्च मिटले… आणि माझे खांदे इतके घट्ट पकडले.. की मला वाटलं माझे खांदे मोडुन पडतील आता… चुरा होईल माझ्या खांद्यांचा… !

८० वर्षाच्या म्हाता-या हातात इतकी ताकत कशी?

नंतर जाणवलं… साठ एक वर्षांपुर्वीचा प्रसंग तीच्या डोळ्यासमोर आला असावा… आणि माझ्या रुपात तीला तो गच्चीतुन पडणारा तीचा बेबी दिसत असावा, ती पुर्ण ताकदीनीशी त्याने पडु नये म्हणुन त्याच्या खांद्याला धरुन खेचत असावी..!

मी तसाच बसुन राहिलो… माझ्या मस्तकावर अश्रुंचा अभिषेक होत होता…

ती “बेबी… बेबी… माझ्या बाळा, मला सोडुन जावु नको रे” म्हणत होती…

आणि मी मनातुन तीला म्हणत होतो, “नाही गं बेबी कध्धी कध्धीच सोडुन जाणार नाही तुला…!!!”

तीला हे ऐकायला गेलं की नाही माहीती नाही… पण आजपासुन ती माझी बेबी झाली आणि मी ही तीचा बेबी..!!!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*