आधी ठरवल्याप्रमाणे ६ जुलैला बेबी मावशीची सोय माझे जीवलग मित्र डॉ.ज्ञानेश्वर मुंडलीक यांच्या, सुमन लोकसेवा संस्था संचलीत, पोळेगाव, (पानशेत धरणाच्या मागे) ता. वेल्हे, जि. पुणे, ९४०४०१४०५७ या वृद्धाश्रमात केली आहे.
डॉ. मुंडलीक सरांनी वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ घडवलेल्या, पानशेत धरणाच्या अत्यंत निसर्गरम्य भागातल्या या वृद्धाश्रमात माझ्या या बेबी मावशीला सामावुन घेतले… आयुष्यभर मी या बंधुचा ऋणी असेन !
यांच्यासह माझ्यासोबत असणारे
श्री. भुवड बाबा व सौ. भुवड ताई
सौ. सुनीता कुलकर्णी
श्री. भातंब्रेकर
या सर्वांनी पावलोपावली सोबत केली, हरत-हेने मदत केली..!
विशाल यादव आणि ज्योती डोम्बे या आय. टी. क्षेत्रात काम करणा-या जोडीमुळे, माझा आणि बेबीमावशीचा संपर्क झाला. बेबी मावशी माझ्या संपर्कात येण्याआधी या दोघांनीच रस्त्यावर मनोमन तीची काळजी घेतली.
खरंच देव दगडात नसतो, माणसांत असतो, हे अशा लोकांना भेटुन जाणवतं… आणि म्हणुनच मी म्हणतो… मला कुठल्याही मंदिरात देव शोधण्याची गरज पडत नाही..!
तर, काल बेबीमावशीला घेवुन निघायचं होतं… आता तीनं मला मुलगा मानल्यावर मनिषा तीची सुन झाली. अर्थात मनिषा बरोबर होतीच माझ्या ती जातांना…
आम्ही आता निघणार, तेव्हढ्यात बेबीमावशीनं पिशवीतुन एक साडी काढली आणि मनिषाच्या हातावर ठेवली, म्हणाली, “माझ्या आईनं खुप वर्षापुर्वी दिलेली ही माझी साडी… आज तुला देत्येय… जुनीच आहे, पण आईची एकुलती एक आठवण म्हणुन तीचं महत्व जास्त..! जुनी साडी देवु नये म्हणतात… पण यापेक्षा भारी काहीच नाही गं माझ्याकडं… वापर तु… वापरशील ना?”
“अगं… एव्हढी एकच मौल्यवान गोष्ट आहे माझ्याकडं…” हे म्हणत असतांना अश्रु दाटले तीच्या डोळ्यात…
मी शहारलो, मी म्हटलं, “अगं वेडी आहेस का तु ? ठेव एव्हढी मौल्यवान गोष्ट नको आम्हाला…”
तर माझ्यावर फट्टकन् डाफरली…
“आम्हाला..? आम्हाला म्हणजे, काय तुला देत नाही साडी घालायला… सुनेला देत्येय… गप तु..!”
मी चिडिचुप बाजुला जावुन उभा राहिलो…
एव्हाना मनिषाच्या डोळ्यातुन अश्रुंची धार…
मनिषाच्या आईने मनिषाला दिलेली काश्मिरी शाल तीने बेबीमावशीसाठी आणली होती… ती तीच्या तीने खांद्यावर पांघरली…
साडी हातात घेत मनिषा म्हणाली… “आजपर्यंत इतकं मौल्यवान माझ्याकडं काहीच नव्हतं… पण आज मिळालं..! मी जपुन ठेवेन ही साडी आणि माझ्या सुनेला सांगेन आता ही साडी तु जप… माझ्या आईनं दिलेली सर्वात मौल्यवान भेट आज मी तुला देत्येय…!”
बेबीमावशीनं, मनिषाचा हात हातात घेतला, आणि गच्च ओठ मिटले… पुढचा संवाद शब्दांत झालाच नाही..!
आजुबाजुला उभे असणारे लोक हा प्रसंग पाहुन हेलावले…
माझ्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या… बेबीमावशीनं ते पाहिलं…
झट्कन माझ्याकडे आली, म्हणाली, “रडायला काय लहान आहेस का रे तु आता ? रडु नकोस, तुला पण आणलंय मी काहितरी…”
असं म्हणुन लंगडत तीच्या पिशवीकडे निघाली…
जाताजाता इतरांकडं बघुन पुटपुटली, “काय बाई, नुसतंच वयानं आणि उंचीनं वाढलंय हे पोरगं… जरा काही झालं की लागलंच रडायला… रडुबाई आहे नुसती…”
मला तेव्हढ्यातुनही हसु आलं..!
येताना पदरात काहीतरी लपवुन आणलं… आणि माझ्यासमोर हळुच पदराआडुन ती वस्तु दाखवली..! तोंड वेंगाडत म्हणाली… “देवु..? देवु का तुला..? का हे पण देवु मनिषाला..?”
मी काही बोलायच्या आतच म्हणाली… “नक्को गं बाई, घे तुलाच… तुला आणलंय मी हे…!”
मी बघितलं तर तो Deodorant होता…
मी म्हटलं, “हे कशाला मला ?”
तर गोबरे गाल फुगवत म्हणाली… “कशाला मला म्हणे…” घे गुपचुप..!
मी तो deodorant हातात घेतला… म्हटलं, “कशाला करत बसलीस एव्हढं… तु पन येडीच आहेस बरं का..?”
पुन्हा गाल फुगवत म्हणाली, “असु दे मी येडी…”
माझ्या अजुन जवळ येत हातात हात घेत अत्यंत खालच्या आवाजात म्हणाली, “अभि, अरे आज मी खुप आनंदात आहे… आज मला पुन्हा “आई” झाल्यासारखं वाटतंय रे…” तीची ही वाक्यं एका मंदिराच्या गाभा-यातुन आल्यासारखी मला भासली…!
मी ही त्याच खालच्या आवाजात तीच्या कानात म्हटलं… “अगं मी पण आनंदातच आहे खुप… मलाही मी आज “बाळ” झाल्यासारखं वाटतंय…!”
निघतांना म्हणाली, “मी उद्या असेन नसेन पण त्या जुनाट साडीत माझा सहवास तुम्हाला जाणवावा.. जे अत्तर तुला दिलंय त्यात माझा गंध तुला यावा म्हणुन या गोष्टी तुम्हाला देत्येय… यापेक्षा दुसरं मला काही सुचलंच नाही…”
एरव्ही, पावसाच्या सरीत, चालतांना नेहमी भिजु नये म्हणुन अंग चोरुन चालणारा मी, डोळ्यातल्या तीच्या अश्रुंच्या धारा आज मुक्तपणे अंगावर झेलत होतो… मातृत्वाच्या सागरात मनसोक्तपणे भिजत होतो…!
मनात बेबीमावशीचा सहवास आणि गंध भरभरुन साठवत होतो…!!!
सर तुमच्या कामाला सलाम.