भारत माझा देश आहे… (?)

कुणीही मित्रमंडळी कुठल्याही वेळेला एकमेकांना भेटली की विचारतात… “काय, झालं का जेवण..?”

दोन मैत्रीणी एकमेकींना भेटल्या की हमखास विचारतात… “काय गं झाला का स्वयंपाक? काय भाजी बनवलीस?”

बंड्या बाहेरुन खेळुन आला की आजी म्हणते, “बाळा, चल आधी खावुन घे…”

कमावती आई घरात आली की तीचा पोरांना पहिला प्रश्न… “काय रे जेवलात का..?”

कुणी कितीही काहीही करत असो… जेवण आणि भुक या विषयावर एकदा तरी गाडी येतेच..!

आपल्या लेकराला उपाशी झोपवणारी आई कुणी बघीतल्येय? मुळीच नाही…

ती स्वतः उपाशी राहील, पण लेकराला कधीच उपाशी झोपु देणार नाही… उलथापालथ करेल जगाची, पण लेकराला उपाशी राहु देणार नाही…

जी आई आणि जो बाप हा मेसेज वाचत असेल, त्या प्रत्येक आई आणि बापाने आठवुन सांगावे, किती वेळा तुम्ही तुमच्या मुलांना उपाशी झोपु दिलंत… चार चार दिवस अन्नाचा घास पण नाही दिलात..?

मला माहित आहे तुमचं उत्तर..! तुम्ही एकदाही असं होवु दिलेलं नाही आयुष्यात…

धन्य तुमची लेकरं… ज्यांना तुमच्यासारखे आईबाप मिळाले..!

पण, सगळ्याच लेकरांकडे असे तुमच्यासारखे प्रेमळ आईबाप नाहीत… ते जेवले की नाही, हे पाहणारी तुमच्यासारखी प्रेमळ आजी आणि आजोबा नाही..!

तुम्ही तुमचं एक लेकरु एका रात्रीला उपाशी झोपु देत नाही… पण हा मेसेज वाचणा-या माझ्या माय बापांनो… आजी आजोबांनो… तुम्हाला पटणार नाही पण सांगतो… साधारण 20 करोड लहान लेकरं, म्हातारी माणसं, लेकुरवाळ्या आया “रोज उपाशी झोपतात…

कारण… “ये…ना… दोन घास खावुन झोप ना” म्हणणारं तुमच्या सारखं प्रेमळ माणुस त्यांच्याकडं नसतं…

आयांनो… बापांनो… पोटात एकही घास कित्येक दिवस न मिळाल्यामुळं रोज ७००० लेकरं, आज्या आणि आया आपल्या भारतात मरत आहेत…

हा रोजचा आकडा मी सांगतोय… हो… रोजचा… !

काल रात्री २० करोड लेकरं न जेवता झोपली… ७००० लोकं भुकेनं तडफडुन देवाघरी गेली… आज पण रात्री हेच होणार… आणि ऊद्याही..!

हे असं चालतच राहणार, आणि मग आपण नुसतंच भरल्या पोटानं, ढेकर देत, “भारत माझा देश आहे… आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत…” अशी प्रतिज्ञा घेत राहणार… कोरडी..!

खरंच भारत आपला देश आहे? आणि इथले भारतीय आपले बांधव आहेत..? जरा विचारुन बघा स्वतःला…

जर या प्रश्नाचं उत्तर “हो” देणार असलात तर मग सांगा, आपण आपल्या या उपाशी बांधवांसाठी आजपर्यंत काय केलंय किंवा करणार आहात…?

कुणी काही करत असेल या लेकरांच्या भुकेसाठी तर त्यांना माझा साष्टांग दंडवत…

पण कुणी अजुन काही केलं नसेल आणि करायची काही इच्छा असेल त्यांच्यासाठी सांगतोय…

रॉबिनहुड आर्मी नावाची एक संस्था आहे… जी जगभर अशा भुकेल्यांना घास घालते… रोज रात्री…

आपल्या पुण्यात पण ही संस्था कार्यरत आहे… रोज ते भुकेल्या लेकरांना खावु घालतातच… पण येत्या १५ गस्ट ला साधारण ५००० भुकेल्यांना जेवु घालण्याचा त्यांचा मानस आहे…

एक दिवस कुणाला जेवु घालुन हा प्रश्न मिटणार नाही, हे मलाही कळतंय आणि त्यांनाही… पण या एका कृतीमुळे सगळ्यांचं लक्ष तरी वेधलं जाईल… लोकांना कळेल तरी… आपल्या घराबाहेर काय चाललंय ते…

१५ ऑगस्ट निवडलाय, कारण याच दिवशी भारत स्वतंत्र झाला होता… आणि याच स्वतंत्र भारतातली आजची ही समस्या मांडणं गरजेचं आहे..!

चला रॉबिनहुड आर्मीला मदत करुन, त्यांच्या माध्यमांतुन आपणही अशा भुकेल्या लेकरांचे आईबाप होवु… आजीआजोबा होवु..!

ही संस्था पैसे घेत नाही, जी मदत द्यायची ती गव्हाचे पीठ, तांदुळ, डाळ याच स्वरुपात करायची आहे…

१५ गस्ट च्या आधी

हा मेसेज वाचुन आपल्याला प्रश्न पडला असेल की ही मदत कशी, कुठे, कधी, कुणाला करायची..?

तर, या संस्थेचे नेतृत्व करणारे माझे मित्र राजकुमार राठी साहेब यांना तुम्ही बिनदिक्कत फोन करा ९४२२९८७५०८ / ९८२३०७८६३५ या नंबरवर… ते सर्व सांगतील..!

भिक्षेक-यांच्या समस्यांव्यतिरीक्त काहीही न लिहिणारा मी…

भुकेजल्या पोरांची तोंडं बघुन हे लिहायला बसलो… दान मागायला बसलो तुमच्यापुढं… पदर पसरुन आलोय… बाप म्हणुन..!

या माझ्या भुकेल्या पोरांना मदत करा… कारण, तुम्हीच आय न् बाप…

चलो एक मुठ्ठी अनाज आज फिरसे बोया जाय...

बारीश का मौसम है, शायद जल्दी से उग जाय…

किसी मासुम का पेट, आपकी वजह से आज फिर भर जाय…

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*