“काय गं म्हातारे? आज काय त्रास..?” मी गंमतीनं या आज्जीला विचारलं..!
“मला काय नगो… माज्या पोराला दे, न्हेमीची औशदं…”
ही आज्जी खुप थकलीय… माणसाला होणारे जवळपास सर्व आजार हिला आहेत… पण कधीही आजपर्यंत एकाही आजारावर स्वतःसाठी हिने औषध घेतलं नाही..! कधीही विचारलं तर म्हणायची, “मला काय नगो, माज्या पोराला दे…”
हां… हिला दिसायचं कमी आलं होतं, तेव्हा मात्र माझ्या मागं लागुन, भांडुन डोळ्यांचं ऑपरेशन करवुन घेतलं होतं… इतरांच्या आधी स्वतःचा नंबर आधी लावुन घेतला होता… हट्टानं गोळ्या आणि ड्रॉप्स मागुन घेतले होते…
मी तीला म्हणायचो, “इतर औषधं कधी मागत नाहीस, आता डोळ्याच्या ऑपरेशनसाठी का मागं लागलीस?” ती यावर गप्प राहायची…
आज भिक्षेक-यांची गर्दी कमी म्हणुन तीची थट्टा करायची लहर आली…
“बोल की म्हातारे… काय औषध देवु..?” मी मुद्दाम डिवचलं…
नेहमीसारखंच बोलुन गेली… “मला काय नगो माज्या पोरालाच काय आसंल तर दे…”
मी म्हटलं, “तुज्या पोराला मी दरवेळी न तपासता, तु सांगते म्हणुन औषध देतो… एखादवेळी काही झालं तर? पुढच्यावेळी त्याला इथं आणलंस तरच औषध देईन… नाहीतर नाही…”
म्हातारी हबकली… म्हटली, “खरं म्हणतु का थट्टा करतु माजी?” तीच्या डोळ्यातली भिती स्पष्ट जाणवली…!
म्हटलं, “खरंच म्हणतोय, थट्टा नाही. पुढच्यावेळी त्याला इथं आणायचं…! मी देणार नाही औषधं न तपासता…”
“आसं नगा करु सायेब…” नेहमी अरे तुरे करुन बोलणारी, आज साहेब म्हणायला लागली…
मला गंमत वाटली…
म्हटलं, “पोरगं मोठं आहे ना तुझं? मागच्यावेळी ४० वय सांगीतलं होतंस, त्याला इथं यायला पाय नाहीत का? आईला भीक मागायला लावुन घरात झोपतो… लाज वाटत नाही का त्याला…? कामधंदा कर की म्हणावं…” मी तावात बोलुन गेलो…
म्हातारी… जवळपास ७५ वर्षाची… अंगावर मांस नाही… फक्त हाडं… सुरकुतलेल्या कातड्यानं झाकलेली… कंबर आणि गुडघे कामातुन गेलेले… डोळे खोल गेलेले… नाही म्हणायला, मी दिलेला चष्मा त्या डोळ्यांवर..!
माझ्या या वाक्यांनी ती दुखावली असावी… इकडं तीकडं धरंत, कण्हत मी बसलो होतो तिथं कशीबशी आली, शेजारी बसली… आणि हळुच आवाजात म्हणाली…
“डाक्टर सायेब, त्याचं वय ४० आसंल… खरं हाय, पन त्यो येवु शकत न्हाय कारण त्यो पायानं जनमल्यापसनं आपंग हाय… मी भीक मागती, त्याची लाज त्याला वाटती का न्हाय मला म्हाईत न्हाय… कारन जनमल्यापसनं त्यो येडसर हाय… आन् कामधंदा पन न्हाय करु शकत… कारन, येड्या मानसांना कुनी काम देत न्हाई…”
आता दचकायची पाळी माझी होती, मी शरमलो… आपल्याला माहित नसतांना आपण काहीबाही बोलुन जातो… पण समोरचा माणुस दुखावतो…
मी शरमेनं तीला म्हटलं, “आगं आज्जी, मी गंमत केली, मला तसं नव्हतं म्हणायचं…” मी काहीतरी सारवासारव केली…
आजी मात्र दुखावली गेली… मलाच वाईट वाटलं… पुन्हा म्हटलं… “माफ कर आज्जी …मी सहज बोलुन गेलो..!”
ती कसंनुसं हसली, म्हणाली… “काय माप करु सायेब..? तुमचा काय दोश? आवो फाटल्यालं शीवायला गेले आन् दोराच संपुन गेला आसं झालंय… दोश कुणाला द्यायचा?”
म्हटलं, “हो ना,… होतंय असं… कसं तुमच्याच पोराला असं झालं कुणास ठावुक..?”
ती पुन्हा कण्हत कुंथत जागेवर जावुन बासली… शांतपणे…
“नऊ महिने व्हायच्या आत जन्मला का तो?” मी तीच्याजवळ जावुन विचारलं…
“मला काय म्हाईत?” बेफिकीरीने ती बोलली…!
मी गोंधळलो… म्हटलं… “आं…आज्जी, तुला नाय म्हाईत म्हंजे?”
तितक्याच शांततेत ती बोलली, “माज्या पोटचं न्हाई ते… सवतीचं हाय..!”
मला कळलं नाही… आणि मग नेहमीच्या सवयीने मी उकरत गेलो… जखमांची खपली उकलत गेलो… जुन्या जखमा पुन्हा छेडत गेलो…
हिचं लग्न झालं… पण हिला बरीच वर्ष पोर होईना… नव-यानं वाट पाहुन हिला घराबाहेर काढलं… दुसरा घरोबा केला… डोळ्यादेखत सवत आली… सवत घरात… ही बाहेर… बाहेर कुणाचा आसरा नाही… सवत म्हणायची, घरातली सगळी कामं कर, दोन वेळचं जेवण आन् रात्री झोपायला जागा देते… हि घरातली सगळी कामं करायची…पडेल ते… सवत सांगेल ते..!
खरंतर ही लग्नाची, सवत बिनलग्नाची, पण बोलणार कोण? बोललं तर ऐकणार कोण? आणि बोलुन फायदा काय? दोन वेळचं जेवण आणि रात्रीला मिळालेला निवारा यांतच ती धन्यता मानायची…
सवत आणि नवरा दोघंही खुप त्रास द्यायची पण… पण..!
एके दिवशी पाळणा हलला, सवतीला मुलगा झाला… सहा महिन्यांचं बाळ असतांना, नवरा ऍक्सिडेंट मध्ये गेला… पुढच्या सहा महिन्यांत सवत कुठल्याशा आजाराने गेली…
वाकड्या पायाचं हे बाळ घरात एकटं रडत रहायचं… आईविना…
दोन दिवस हिने ही रडु दिलं त्याला… सवतीचं पोर…माझा काय संबंध? मेलं तर मरु दे… सवतीनं नवरा नेला… मला घराबाहेर काढलं… मी कशाला कुणाचं करु…?
दोन दिवसांनी, हिनं ते पोर उचललं… आणि निघाली कुठंतरी टाकायला…
जसं या वर्षभराच्या पोराला तीनं टाकुन देण्यासाठी उचललं, तसं ते पोर आई समजुन हिच्या छातीशी झोंबायला लागलं…
आयुष्यात पहिल्यांदाच “आई” झाल्यासारखं तीला वाटायला लागलं… पोर फेकायला गेलेली ही “बाई”, पोराला न फेकताच येताना दुध घेवुन आली, तीच्याही नकळत “आई” होवुन गेली… !
आज कित्ती वर्ष झाली… त्याला ती सांभाळत्येय… त्याचे आजार बरे करण्यासाठी राहतं घर विकलं… एकुलतं एक छप्पर विकलं… दागदागीने विकले… पोर मात्र आहे तसंच राहीलं…
दुर्दैव हे, की या मुलाला काहीच कळत नाही, आपल्यासाठी कुणी काय केलंय हे समजण्याची त्याची पात्रता नाही… दरवेळी घरी गेलं की हा मुलगा, या आज्जी कडे अनोळखी नजरेनं पाहतो… जशी ही माझी नव्हेच कुणी…
आणि याच अनोळखी मुलाला, जगवण्यासाठी ही सावत्र आई… सख्खी होवुन जाते… रस्त्यावर भीक मागते…
आज कित्येक वर्ष… !
त्याचं दुखलं खुपलं बघता यावं, केवळ याचसाठी तीनं हट्टानं डोळ्यांचं ऑपरेशन करवुन घेतलं होतं तर…!
कुणीतरी कुणासाठी काहीतरी करत असतं… त्यामागची भावना ही असते की, उद्या याची परतफेड होणारच आहे…
पण, इथं ही माऊली भीक मागुन या वेडसर मुलाला जगवते… कुठल्याही परतफेडीच्या अपेक्षेवाचुन…
आणि या मुलाला माहीतच नाही की, आपल्या एक दिवसाच्या जगण्यासाठी, रोज कुणीतरी आपला आत्मसन्मान इथं विकतंय…
आजीचा हात हातात घेवुन म्हटलं… “आज्जी, हे पोरगं तुझं नाही तरी तु एव्हढं करतेस…?”
तेव्हा डोळ्यात पाणी आणुन म्हणाली, “माजंच हाय वो ते..!”
“माझ्याकडनं औषधं घेवुन, तु त्याला अजुनही बरं करण्याचा प्रयत्न करतेस? कसं शक्य आहे ते?”
ती म्हणाली, “चंद्रावर जायला पैशे पडत्यात डाक्टर, चंद्र पहायला पैशे न्हाई पडत… आवो… लोकं चंद्रावर गेली, आमाला जमिनीवरनं तरी चंद्र पाहु द्या… पोरगं बरं झालंय असं रोज मला सपान पडतंय… आवो आमाला सपान तरी पाहु द्या..!”
काय बोलु मी…?
“पण आज्जी, किती दिवस हे करणार?”
“फुलाला काय म्हाईत आसतंय का? आपुन देव्हा-यात जाणार का मयतीला वाहणार? तरी फुल काय उमलायचं राहतंय का? तसंच आमचं बी..! उमलत राहायचं डाक्टर… देव्हा-यात पडलो तरी लोकं फुलंच म्हणणार आन् तिरडीवर पडलो तरी लोकं फुलंच म्हणणार…सुगंध हितं बी द्यायचा आन् सुगंध तीथं बी द्यायचा… आपण आपलं इमान सोडायचं न्हाई…”
एका डॉक्टर माणसाला, एक अशिक्षित बाई जगण्याचं गुपीत सांगत होती… आजपर्यंत कुठल्याही डिग्रीच्या पुस्तकात नसलेलं मर्म ती उलगडत होती…
“आज्जी, पण या सगळ्यात तुला किती त्रास झाला? इथुन पुढंही होणारच आहे… मग?”
“डाक्टर, पोकळ बांबुला टोचुन भोकं पाडली की मग तीची “बासरी” व्हती… कुणी त्याला “पावा” म्हणतं… आवो जलमाला येवुन पोकळ बांबु व्हायचं का आंगावर भोकं पाडुन घिवुन बासरी व्हायचं हे ज्याचं त्याला कळलं पायजेन… पोकळ बांबु नुसताच “वाजतो” पण बासरीतनं ग्वाड आवाज येतु…”
मी शहारलो..!
म्हटलं, “आज्जी, कुटं शीकलीस हे…?”
विषण्ण हसत म्हणाली, “शिकवाय लागतंय व्हय डाक्टर? आवो आपुनच कळतं सारं..!”
खरंच हे शहाणपण आलं होतं, त्या भोगलेल्या अमर्याद वेदनांमुळे…
काच, स्वप्नं आणि नाती तुटली की टोचतातच… या टोचण्यातुनच मग जन्म होतो जीवनातील तत्वज्ञानाचा..!
“डाक्टर…” आज्जी च्या हाकेनं भानावर आलो…
“मला येकच काळजी हाय वो… मी जर या पोराच्या आदी मेले तर… ८ दिवसात ते पोरगं बी तडफडुन मरंल… आज इतकी वर्षं सांबाळला, मी गेल्यावर कुणीच करनार न्हाई त्याचं..!”
“माजी येकच इच्चा हाय आता…”
ती शुन्यात बघायला लागली, आणि कानाजवळ येवुन बोलली… “कुनतीच आइ म्हननार न्हाय आसं पन… पन…”
“पण काय आज्जी?”
“पन… माज्या आदी त्यानं मरावं…!”
मी हादरलो…
आज्जीनं कळवळलेला आपला चेहरा पदरानं झाकुन घेतला… पदराआडुन दबकत येणारे ते तीचे हुंदके मलाच असह्य झाले…
ब-याच वेळानं तीला शांत करुन मी निघालो… जातांना पुन्हा वळुन मागं पाहिलं…
किमान शंभर भोकं पडलेलं… ठिगळांनी शिवलेलं लुगडं घालुन… सावत्र पोरासाठी झिजलेलं शरीर आणखी झिजवत खुरडत चालुन, स्वतःचा आत्मसन्मान अनोळखी लेकरासाठी गहाण टाकुन भीक मागणा-या… स्वतःच्या अंगावर भोकं पाडुन घेवुन, माणुसकीचं सुरेल गाणं गाणा-या या “बासरीला” मी मनोमन नमस्कार केला…!!
Leave a Reply