रुग्णसेवा हिच ईश्वर सेवा? नको रे देवा..!!!

दवाखान्यात बसलो होतो, नेहमीप्रमाणेच पेशंट्स कोणीच नव्हते.

ब-याच वेळानंतर सत्तरीतल्या मध्यम वर्गीय कुटुंबातल्या एक आजीबाई आल्या.

मी भलताच बिझी आहे हे दाखवण्याचा निष्फळ प्रयत्न करतच होतो, तेवढयात आजीबाई म्हणाल्या, “मी एका तासापासुन बाहेरच उभी आहे पण कुणी माणुस दिसंना, म्हणलं आत जावावं का नको…? शेवटी आले धाडस करुन…”

मी ओशाळलो (पण तीला मी मुळीच कळु दिलं नाही…)

तर तीच्या गुडघ्याला सुज होती, मी तपासुन इंजेक्शन आणि गोळ्या दिल्या, फि घेतली.

आजी जरावेळ टेकली, आणि म्हणाली, “तुमच्या गोळ्यांनी काही त्रास नाही होणार ना मला?”

मनात म्हणलं, “आजीबाई मला तरी कसं कळेल…? तु गोळ्या खाल्ल्याशिवाय?”

तरी म्हणालो, “काही नाही होणार आज्जी , वाटलं तर माझा मोबाईल नंबर घ्या आणि मला फोन करा…”

“आवो डाक्टर, तित्तंच तर आडलंय, चार दिवसापासून फोन येत बी न्हाई आणि जात बी न्हाई… जरा बगता का फोन… तुमचा नंबर बी टिपुन द्या त्यात…”

नेहमीप्रमाणेच यातलंही मला काहीच कळत नाही पण म्हटलं बघुयात तरी…

नोकियाचा जीर्ण झालेला हँडसेट होता तो..!

पहिल्यांदा रिस्टार्ट केला, बँटरी काढुन जीभेला लावुन चुर्र् होते का बघितलं, पँटिला उलटी पालटी घासुन पुन्हा बसवली, सीम कार्ड ३ – ४ वेळा उलट सुलट घालुन बघितलं, सेटिंग मध्ये जावुन थोडी खटपट केली… फायनली मोबाइल चालु झाला, माझा नंबर मी त्यात सेव्ह केला, माझी मोबाइल बरोबरची झटापट आजी शांतपणे बघत होती…

आजीला म्हणालो, “आजी घ्या फोन, झाला चालु…”

खरं न वाटुन आजी म्हणाली, “झाला चालु ? खरंच ? आता एक काम करा…”

“काय आज्जी ?”

“कुणाचाही फोन आला कि हळु आवाज येतो बोलणा-याचा, तो जरा वाढवा” – मी पुन्हा सेटिंग मध्ये जावुन व्हॉल्युम वाढवला…

“झालं…? आता ती आक्षरं जरा मोटी करा, मला मेलीला दिसतच नाही कुणाचा फोन आलाय…”

“परवा ह्यांचा नंबर समजुन ह्यांच्या मित्राशीच बोलले कितीतरी वेळ…” पदरामागुन आज्जी खुसुखुसु हसत होती…

मी पुन्हा शहाण्या बाळासारखा सेटिंग मध्ये जावुन – फॉन्ट साईज / त्याचा बोल्डनेस इत्यादी गोष्टी तत्परतेने बदलुन घेतल्या. आणखी काही गोष्टी बिघडल्या आहेत का हे सुद्धा काळजीपूर्वक पाहिलं, आणि अवघड ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर डॉक्टर्सच्या चेह-यावर जे समाधान दिसेल तेव्हढ्याच समाधानाने मी तो फोन आज्जीला देवु केला.

प्रसाद घ्यावा त्याप्रमाणे आजीने दोन हातांची ओंजळ करुन तो घेतला. तेव्हढ्याच भाविकतेने मी ही तो नोकियाचा जुना ठोकळा, ग्रंथ ठेवावा तसा अलगद पणे तीच्या ओंजळीत अर्पण केला…

यानंतर पंधराएक दिवसांनी दवाखाना उघडत असतानाच तीच आजी दुरुन येताना दिसली, मला बघुन हरखली… लांबुनच म्हणाली, “काय डाक्टर, आवो सहा हेलपाटे झाले माजे… भेटलाच न्हाई तुमी…”

“चार दिवस झाले त्रास होतोय… पण म्हनलं, तुमच्या शिवाय कुटं जायाचंच न्हाई…”

मी इकडं तिकडं बघितलं… चार लोकांनी तरी नक्कीच हे ऐकलं असणार… मी सुखावलो !

मुद्दाम मीच जरा मोठ्याने, पण विनयाने बोललो, “माझी वाट बघत चार दिवस कशाला त्रास काढला आज्जी… दाखवायचं कोणालातरी…” (मला सुखावणारंच उत्तर येईल याची खात्री होतीच मला)

“नाय डाक्टर, एकदा विश्वास बसला की बसला… आजुन चार दिवस त्रास सहन केला आसता पण तुमच्या शिवाय कुठंच गेली नसती मी…”

“आवो हल्ली आशी देवासारकी माणसं मिळायलाबी नशीब आसावं लागतंय…”

आजुबाजुला काही लोक ऐकतच होते हा संवाद… मी भरुन पावलो..!

किती कष्टाने ही नाती निर्माण केलीत आपण… आपण लोकांच्या हृदयात किती पटकन शिरु शकतो? लोक किती प्रेम करतात आपल्यावर? आज ही बाई माझ्यासाठी चार दिवस अंगावर त्रास काढते? या विचारांनी मीच भारावुन गेलो..!

छे… छे… किती हा विश्वास आणि जिव्हाळा!!!

रस्त्यावरच हा संवाद मला आणखी वाढवायचा होता, त्यासाठी दार न उघडता मी बाहेरच घुटमळत होतो, म्हणजे आणखी 4-6 जणांना तरी आमच्या संवादांवरुन माझं “मोठेपण” कळलं असतं…

पण रस्त्यावर आता कोणी ऐकणारं उरलं नव्हतं… नाही म्हणायला एक गाढव रस्त्यावरच डुलकी घेत उभं होतं, पण त्याने ऐकुन माझा काय फायदा ? म्हणुन मी आटपतं घेतलं…

आणि दार उघडलं… दवाखान्यात आलो. नम्रपणे स्टेथोस्कोप कडे पाहीलं आणि हळुच शंकराच्या नागाप्रमाणे गळ्याभोवती गुंडाळला. याच स्टेथोस्कोप मुळे तर मी अशा पेशंटच्या गळ्यातला ताईत झालोय.

लोकं काय उगीचच आपल्यासाठी खोळंबुन राहतात ? अंगावर त्रास सहन करत वेड्यासारखी माझी वाट पहात राहतात ? अतीव समाधानाने मी खुदकन माझ्याशीच हसलो…

यानंतर शक्य तेव्हढं झुकुन, समोर बसलेल्या आजीला टेचात विचारलं, “काय आज्जी गुडघ्याचा त्रास गेला ना पळुन ???”

आज्जी म्हणाली, “ते सांगत्ये नंतर, आदी एवडा मोबाईल बगा, मागल्या खेपेसारखाच पुना त्रास देतोय…”

“हो आज्जी, मोबाईल बघतो पण कुठल्या त्रासासाठी तुम्ही माझी वाट बघताय तो त्रास सांगा, तो आधी बघतो…” मी स्टेथोस्कोप हलवत म्हणालो… (जणु समस्त रोगांचं उच्चाटन करण्यासाठीच श्रीकृष्णानं स्टेथोस्कोप रुपी सुदर्शन चक्र माझ्या हाती देवुन या भुतलावर मला पाठवलं होतं)

आजी म्हणाली, “त्रास म्हनजे, हाच वो, मोबाइल पुना बंद पडला… चार दिवस मोबाइल वाचुन काडायचे म्हणजे त्रास होणारच की..!”

“कुणाचाच फोन येत न्हाई आणि जात न्हाई..!”

“म्हणजे आज्जी, मोबाइल साठी तुम्ही वाट बघत होता माझी आज्जी ?”

“मग लेकरा, मगापासुन काय बोलतीया मी ?”

मी हिरमुसलो… चीडलो… आणखीही बरंच काहिबाही झालं… मग तो पुन्हा नोकियाचा ठोकळा घेतला, आधीचे सर्व उपद्व्याप पुन्हा केले.

म्हातारीचा मोबाईल तीच्या सर्व आर्डरीप्रमाणे नीट करुन दिला… आणि धुसफुस करत तीच्यासमोर आदळला..!

आजी म्हणाली, “फी किती देवु डाक्टर?” तुसडेपणानं म्हणालो, “तपासलंच नाही मी, फि कसली देता ? जा आता…”

“बग गं बाई… कोकरु गं माजं… फी पण नको म्हणतंय..!”

“बाबा, मोबाईल दुरुस्तीला टाकला तर चार दिवस परत देत न्हाईत आणि वर येवडे पैशे घेतात, आणि तु तर धा मिन्टांत बीन पैशे घेता माजा मोबाईल दुरुस्त करुन दिला…”

“मगाशिच म्हणलं ना, आशी देवासारकी माणसं मिळायला नशीब लागतंय… वासरु गं माजं… (आत्ता आज्जीच्या या वासराला शिंगं असती तर मी नक्कीच…)”

“बरं, जावु का आता?”

“आरे हो, माज्या धाकल्या बहिणीला पण आसाच त्रास हाय, पुडल्या खेपेला तीला पाटवते बर का…”

खुर्चीतनं उठत, पुन्हा उल्हसीत होत, मी विचारलं, “त्यांना काय त्रास आहे…? गुडघ्याचा…? पाठवा न्..!!!”

“नायरे माज्या वासरा, गुडघ्याबिडग्याचा काय तरास नाय… ह्योच मोबाईलचा तरास… बग बरं का नीट..!”

स्टेथोस्कोप खुंटीला अडकवुन, डोक्याला हात लावुन, मी खुर्चीत मट्कन् बसलो…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*