शक्यतो गुरुवारी मी या दरगाह च्या बाहेरच्या भिक्षेक-यांना भेट देतो…
नेहमीप्रमाणेच, मोटारसायकलला बांधुन आणलेल्या कुबड्या,कुणाला वॉकिंग स्टिक, कुणाला कमरेचे पट्टे वैगेरे गरजेप्रमाणे देवुन इतर भिक्षेकरी तपासत असतो…
जवळपास सर्व म्हातारी माणसंच आहेत इथं भीक मागायला…
नाही म्हणायला ३ – ४ लहान मुलं आणि मुली आजुबाजुला खेळत असतात… कुणी धनिक व्यक्ती येताना दिसली की, हि मुलं खेळणं थांबवतात… मुद्दाम दीनवाणा चेहरा करतात… आणि धनिकापुढं नम्रतेनं जावुन हात पसरतात… “द्येव ना चाच्या… कल से भुखे है..!”
धनिकाच्या चेह-यावर अनामिक प्रेम दाटतं… पाच पाचचे कॉइन काढुन तो बिचारा प्रत्येकाच्या हातावर ठेवुन पुढे नमाज अदा करण्यासाठी निघुन जातो…
मुलं पुन्हा खेळ चालु करतात… पुन्हा कुणी दिसलं येतांना दुरुन की परत तेच… तोच दीनवाणा भाव..!
मी हा “खेळ” नेहमी बघतो या मुलांचा..!
पाच – पाच रुपये भीक देवुन काय सिद्ध करायचं असतं आपल्याला…???
काय दाखवायचं असतं दुनियेला…?
मी पैसेवाला आहे…?
मी खुप दयाळु आहे…?
मी दानशुर आहे…?
मी कर्णाचा अवतार आहे…?
खरं सांगु? कुणाच्या भावना दुखवायचा हेतु नाही… पण असं कुणाला काही देवुन आपण आपला फक्त “इगो” / “आत्मसन्मान” कुरवाळण्याचा प्रयत्न करत असतो..!
खरंतर, या देण्यातही आपल्याला काहीतरी हवं असतं… कधी पुण्य, तर कधी आत्मिक समाधान !
अशा देण्याने आपल्याला वाटत असतं, आपल्या हातुन नकळतपणे झालेल्या एखाद्या पापातुन माझी सुटका होईल… देव मला माफ करेल… अल्लाह मुझे माफ करेगा..!
आपण हे जे देतोय ना, ते काहितरी मिळवण्यासाठीच..!
देण्यापेक्षा काहीतरी घेण्याचाच अट्टाहास जास्त असतो… बघा नीट विचार करुन..! उत्तर मला देवु नका…
मी उत्तर मागणारा कोण?
पण स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीला विचारा..!
या आपल्या काहीतरी मिळवण्याच्या नादात आपण काय गमावतोय… याचा थोडा अभ्यास माझा झालाय या लोकांत राहुन…
मी लहान असेन आपणांपेक्षा… बुद्धीने, वयाने, कुवतीने पण या लोकांत राहुन ब-याच गोष्टी मला समजल्या आहेत… त्या मी सांगतो…
खास करुन, मुलांना आपण जी भीक देतो… त्यातुन तोंड जरा वाकडं केलं… गयावया केली, कि हवं ते फुकट मिळतं, कष्ट करायची गरज नसते… हा मेसेज तुम्ही मुलांना देत आहात… जर सर्व फुकटचं मिळतंय तर शिकण्याचे कष्ट, अभ्यासाचे कष्ट, नंतर कामाचे कष्ट करायची गरजच काय? हा विचार आपण त्यांच्यात रुजवत आहोत… नागडं उघडं राहुन… जरा गयावया केली की लोक सगळं फुकट देतात, हि तुमची मानसिकता त्यांना समजली की शिक्षण आणि कष्ट यावरचा त्यांचा विश्वासच उडतो..!
आणि याचमुळे, काही टोळ्या इतर भागांतुन मुलं पळवुन आणतात आणि तुमच्या “दयाळु” (???) मानसिकतेचा लाभ उठवतात… त्यांना भीक मागायला लावतात… त्याबद्दल त्यांना पगारही देतात..!
खास करुन लहान मुलांना भीक देवुन होतंय काय…? तर…
- आपल्या मुलांना तुम्ही अपंग बनवताय मनाने… त्यांच्यातल्या शिकण्याच्या आणि कष्ट करण्याच्या वृत्तीचा तुम्ही अक्षरशः “खुन” करताय…
- मुलांना पैसे खुप मिळतात दया भावनेने, म्हणुन टोळ्या बाहेरुन मुलं पळवतात आणि आपल्या इथं त्यांना भीक मागायला लावतात… (आणि हो… आपली मुलं पळवुन… बाहेरच्या राज्यात त्यांना भीक मागायला लावतात)
- ही मुलं कायम दुस-यानं काहीतरी फुकट द्यावं, या एकाच विचारात असतात… जर कुणी ते फुकट दिलं नाही तर रस्त्यावरचं आयुष्य त्यांना हिसकावुन घ्यायलाही शिकवतं… चोरी करण्याची धाडस देतं … पण कष्ट करायची उमेद देत नाही..!
तेव्हा आपल्या अशा भीक देण्यानं आपण आपली पुढची पिढी अपंग करत आहोत, त्यांच्या आत्मसन्मानाचा खुन करत आहोत, मुल पळवण्यासाठी अप्रत्यक्षपणे मदत करत आहोत आणि चोर पण आपणच निर्माण करत आहोत… पटणार नाही कदाचित पण… बघा विचार करुन..! फक्त आपणच जबाबदार आहोत..!
या मुलांना एकवेळची भाकरी नका देवु… आयुष्यभर भाकरी कशी कमवायची याची अक्कल जमलं तर द्या… भाकरी कमावण्यासाठी मदत करा..!
यातलं काहीच जमलं नाही तरी चालेल, पण भीक नका देवु…
अशी तुमची मदत, हेच खरं दान होईल निःस्वार्थ..!!!
दोन – पाच रुपये आणि एखादा पाचवाला ग्लुकोज चा पुडा म्हणजे दान नव्हे..!!!
हे असलं काही थातुर मातुर देवुन तुम्हीच खेळताय तुमच्या मनाशी… !
भिक्षेक-यांना “भीक” देण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभं रहायला “मदत” करा…
भीक आणि मदत यांत एक फरक आहे…
तुमची कोणतीही कृती एखाद्याला “परावलंबी” बनवत असेल तर ती भीक..!
तुमची कोणतीही कृती एखाद्याला “स्वावलंबी” बनवत असेल तर ती मदत..!
मायबापांनो, भीक नको… मदत करा..!
असो… तर वर सांगितलेल्या मुलांची चौकशी केली असतां, इथं भीक मागायला येणा-या दोन आज्यांची ती नातवंडं आहेत असं समजलं,..!
मी साधारण दोनेक महिन्यांपुर्वी या आज्यांशी बोललो होतो…
“आज्जी तु भीक मागते… नातवंडांना पण भिकारीच बनवायचं आहे का?”
“शिकवा की त्यांना… तुम्हाला भीक मागायची लाज तर वाटतंच नाही… आता नातवंडांना पण भिकारी बनवायची लाज वाटत नाही…” मी उद्वेगानं बोलतो..!
आज्यांनाही माझ्या बोलण्याचा मग राग येत असावा, मला म्हणतात… “प्वाट भरावं का पोरान्ला साळा शिकवावी…? तुमाला काय जातंय बोलायला? आमी खर्च भागवायचा कसा?”
एकाअर्थी हे ही बरोबरच असतं म्हणा !
ही मुलं पुर्वी शाळेत जात होती… आता अनेक कारणांमुळं ती जात नाहीत. (School Drop Out)
मी या आज्यांना म्हटलं होतं, “मी परत शाळेत ऍडमिशन घेवुन दिली… वह्या पुस्तकं, युनिफॉर्म घेवुन दिला… शाळेची फी भरली तर शाळेत जावु द्याल का यांना?”
त्यांना तेव्हा यावर विश्वास नव्हता बसला..! तरी त्या हो म्हणाल्या होत्या..!!!
मागच्या महिन्यात शाळेत भेटुन मग मी या मुलांची फि भरली… लागणा-या पुस्तकांची लिस्ट घेतली… युनिफॉर्म आणि आप्पा बळवंत चौकातुन सर्व वह्या पुस्तकं घेतली… आणि यातल्या दोन आज्यांच्या तीनही नातवंडांना दिली…
आज शुक्रवारी मी हे सर्व घेवुन गेलो, मुलं शाळेत होती, दोन्ही आज्यांच्या हातात सर्व वह्या पुस्तकं ठेवली… आज्या गहिवरल्या होत्या… म्हटल्या, “डाक्टर आमची बी पोरं उंद्या सायेब बनतील तुमच्या सारकी…!”
मी हसत म्हटलं, “मावशी मी “सायेब” होतो आधी… हल्ली हल्लीच “माणुस” झालोय…
सायेब बनणं लय सोप्पं आहे… माणुस बनणं लय अवघड आहे, सायेब नाय झाले तरी चालतील… माणसंच होवुं द्या त्यांना… सध्या सायेब लई हायेत… माणसांचीच संख्या जरा कमी झालीय..!”
आजी सहज बोलुन गेली… “तसं का हुयीना… सायेब राहुंद्या “माणुस” तरी बनत्याल..!!!”
ती बोलली त्यात नक्कीच तथ्य होतं… उद्या ही मुलं शिकतील… भविष्यात जे भिकारी बनणार होते… ते स्वतःच्या पायावर तरी उभे राहतील आणि मुख्य म्हणजे, त्यांनी जर “जाणिव” ठेवली तर ते ही अशीच कुणाला तरी “मदत” ही करतील..!
या शुक्रवारी प्रथमच… दरग्याबाहेर दरवेळी दिसणारी मुलं खेळतांना आणि भीक मागतांना मला दिसली नाहीत… आत्ता ती शाळेत आहेत या भावनेनं मी खुप सुखावलो…
यांना शाळेत घालायचं, शिकवायचं… एक चांगला माणुस बनवायचं हे माझं स्वप्न आहे..!
आणखी एक चांगली गोष्ट आज झाली… आणखी इतर चार आज्जी आणि आजोबांनी मला विनंती केलीय की, “आमचीही मुलं शाळेत जात नाहीत, त्यांना तुम्ही मदत केलीत तर आम्ही तयार आहोत त्यांना शिकवायला…” मला तरी अजुन काय हवंय…?
पुढच्या आठवड्यात यांच्या मुलांसाठी प्रयत्न करणारच आहे…
या दोन आज्यांना वह्या पुस्तकं देत असतांनाच… तिकडुन एक चाचा आले… गंमतीनं म्हणाले, “क्युं डाक्टर साब… बुक्स बेच रहे हो क्या…?”
मी म्हटलं, “नही चाचा कुछ बेच नही रहा हुँ… सपने खरीद रहा हुँ..!”
चाचांना सर्व समजल्यावर म्हणाले, “ईन्शा अल्लाह, अल्लाह सलामत रख्खे आपको..!”
जातांना सहज आज्ज्यांकडे पाहिलं… हातात न पेलवणारी पुस्तकं होती आणि नजर शुन्यात…
आपली नातवंडं मोठ्ठी झाल्याचं ते स्वप्न तर बघत नसतील…?
बघु देत… हे स्वप्न… आणि ते खरंही होवु देत… आमेन..!!!
Leave a Reply