चार आई आणि एक भाऊ

माझे एक स्नेही आहेत, हे वृद्धाश्रम चालवतात एके ठिकाणी… मला रस्त्यात सापडलेल्या दोन आई तेच सांभाळतात… वरचेवर आम्ही एकमेकांची ख्यालीखुशाली विचारत असतो…

एके दिवशी यांचा फोन आला म्हणाले, “अभिजीत, अत्यंत अपरिहार्य कारणांमुळे वृद्धाश्रम बंद करणार आहे… माझ्याकडे असणा-या सर्वांची मी सोय केली आहे, अजुन चार आई आहेत पण त्यांची सोय अजुन झालेली नाही… या चारांत तु दिलेल्या दोन आईही आहेत… या सर्वांची सोय तुला पहावी लागेल…” त्यांच्या आवाजात अगतिकता होती… आर्जव होतं…

माझ्यावर बाँब पडल्यागत मला झालं, मी अचानक कुठं सोय करणार ? तशी झालीही असती सोय पण चार लोकांचा भार अचानक  कुणावर टाकु? काहीच कळेना…

मी साता-यातील माझे मित्र रवी बोडकेंना फोन लावला…

रवी बोडके… हा “माणुस” रस्त्यावरच्या मनोरुग्णांना आपल्या निवारा केंद्रात आणतो… शुचिर्भुत करुन, औषधोपचार करवतो, या मनोरुग्णांचे  पत्ते शोधुन घरपोच पाठवतो… ज्यांचे पत्ते सापडत नाहीत, त्यांचा “आई-बाप” होतो… निवारा केंद्रात आयुष्यभर सांभाळ करतो..!

वाटतंय तितकं हे सोपं काम नाही…

आपल्या एका मनोरूग्ण मुलाला सांभाळतांना मेटाकुटीला आलेले आई-बाप मी पाहिले आहेत… रवी स्वतःहुन ही मेटाकुटी अंगावर ओढवुन घेतात… रोजच्या रोज !

मागे बोलतांना सहज बोलुन गेले, “केंद्राचा खर्च आणि जेवणाचा खर्च भागवण्यासाठी  दोन महिन्यांपुर्वी गाडी गहाण टाकलीय…” मला भरुन आलं होतं…

एव्हढं माहीत असुनही मी “निर्लज्जासारखा” यांनाच फोन लावला…

काय करणार,  चारही आईंची सोय करण्यासाठी मलाही लाज सोडणं भागच होतं…

“हॅलो, रवी शेठ…” मी सर्व बोलुन टाकलं… आवंढा गिळत शेवटचं वाक्य बोललो, “घ्याल या माझ्या चार वृद्ध आईंना पदरात…?”

मध्ये चार सेकंदांचा पॉज… हे चार सेकंद चार महिन्यासारखे वाटले…

मला नम्रतेनं नकार मिळेल याच अपेक्षेत मी होतो…

रवी म्हणाले… “इतर कुठंच सोय होत नाहीय…?”

“मी अजुन प्रयत्न नाही केला रवीशेठ, तुम्हालाच पहिला फोन…”

“असंय का? मग तुम्ही येताय त्यांना सातारला घेवुन ? का मी येवु त्यांना घ्यायला… ? यायचं असेल तर येतो दोन तासात… आत्ता कुठंय तुम्ही डॉक्टर ?”

मी उडालोच…

“रवी, पण तुम्ही इतक्या अडचणीत… आणि मी… खरंतर मी फोनच करायला नको होता…” मी ओशाळलो…

“काय बोलताय डॉक्टर, आईला सांभाळण्याची अडचण वाटते तर आपण कसली पोरं त्यांची…?

तुम्ही त्यांना आई म्हणता, मला भाऊ समजता… मग तुमच्या एकट्याच्याच या आई कशा ? माझ्याही झाल्याच की…”

मी गहिवरलो… रवी… मी…

पुढचं बोलुच शकलो नाही, रवींनी वाक्य तोडलं माझं… “हां डॉक्टर, कळलं मला, निघा आता लवकरात लवकर…”

टचस्क्रिनवर पडलेल्या डोळ्यातल्या थेंबांमुळे, फोन कट् करण्याचा प्रयत्न करुनही फोन कट् होईना… दाटलेल्या गळ्यानं बोलताही येईना… तिकडुन फक्त आवाज येत होता… “डॉक्टर लवकर या आईंना घेवुन… ऐकताय ना? वाट पाहतोय…”

खरंतर, एका एका आईची स्वतंत्रपणे चार ठिकाणी व्यवस्था मी करु शकलो असतो… ते मला सोपं पडलं असतं… पण या चारहीजणी इतके दिवस  एकत्र राहुन एकमेकींत मनानं गुंतल्या होत्या… आयुष्याच्या उतारावर  एव्हढं एकच मैत्रीचं नातं शिल्लक राहिलं होतं,  मला त्यांची ताटातुट करण्याचं पाप घडु द्यायचं नव्हतं आणि चार लोकांचा भार कुणा एकावरच टाकायचाही नव्हता…

मी धर्मसंकटात सापडलो होतो… आणि याच संकटातून रवींनी माझी सुटका केली होते… समोर असते तर मी नक्कीच पाय धरले असते रवीशेठ चे..!

या चारही आईंना घेवुन बुधवारी सकाळी निघालो साता-याला… रवीशेठ च्या स्वाधीन केलं… आई म्हणुन या चारही जणांचा मनापासुन स्विकार केला त्यांनी… मी ऋणात आहे यांच्या…

स्वतः पोटाला चिमटा काढुन हा “मुलगा” जगवेल या आईंना… जगावेगळं नातं मिरवत..!

रवी माझ्यापेक्षा वयाने लहान… पण आज माझा “मोठा भाऊ” झाला..!!!

या चारही आईंकडे पाहण्याचं मी टाळतो… त्या डोळ्यातली अगतिकता पाहण्याचं माझं धाडसच होत नाही…

मी दुरुन  येताना दिसलो की उठायच्या आणि हात जोडायच्या, जाताना दिसलो कि  हात जोडायच्या, शेजारी बसलो कि हात जोडायच्या, यांच्याकडे नुसतं पाहिलं तरी दुरुनपण हात जोडायच्या… मला मेल्याहुन मेल्यासारखं होतं हे असं हात जोडलेलं पाहुन…

परिस्थितीनं कित्ती लाचार बनवावं माणसाला…? आईनं पोराला नमस्कार करावा लाचार होवुन…? कशासाठी हि क्रुर थट्टा त्यांची ? आणि माझीही…?

शेवटी मी प्रेमानं दटावलं, “आता जर हात जोडलेले मला दिसले तर पुन्हा आई म्हणुन हाक मारणार नाही…”

शेवटी मी, भुवड ताई – बाबा निघालो तिथुन… त्यांना सोडुन…

डोळ्याला पदर लावुन चारही जणी गळ्यात पडल्या…

भुवड ताई-बाबांनी मायेनं थोपटत त्यांना सांगितलं… “रडायचं काय त्यात? उलट आता तुम्हाला दोन मुलं मिळाली… एक अभिजीत आणि दुसरा रवी…!”

तोंडावर हसु आणि डोळ्यांत आसु… अशा अवस्थेत आम्ही निघालो…

गाडीत बसतांना रवी सहज बोलुन गेले… “काही राहिलं नाही ना? सगळं घेतलंय ना?”

मी म्हटलं, “रवीशेठ, सगळं घेतलंय… पण चार आई आणि एक भाऊ इथंच ठेवुन चाललोय..!”

रवीनं प्रेमानं आलिंगन दिलं… मिटलेल्या ओठांतुन शब्द फुटलाच नाही… उघड्या डोळ्यांनी मात्र अश्रुंना थांबवलं  नाही..!

~~~~~~~~~~~~~~~

या चारही आईंना किंवा रवी बोडके सांभाळत असणा-या मनोरुग्णांना कुणाला मदत करावीशी वाटली, तर रवी बोडकेंच्या माध्यमातुन ती जरुर करावी…

रवी बोडके :: ९९२२४ २४२३६

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*