कर्णफुल…!!!

कधीतरी वाचलं होतं… बोलता बोलता माणुस अभिमानानं म्हणतो… “ही माझी सावली!” पण खरंतर सावलीसुद्धा आपली नसते… प्रकाशानं निर्माण केलेला तो आभास असतो…
आपण या सावलीला वाहुन नेणारे फक्त “वाहक..!”

काही आयुष्यं सुद्धा अशीच असतात… ते जगत नसतातच… ते फक्त “श्वास” वाहुन नेत असतात… परिस्थितीतुन निर्माण झालेल्या गुंत्यात अडकलेले असतात, कधी गुंता सुटतो, कधी कधी आयुष्यभर राहतो आणि सरणावर गेल्यावरच तो जळतो..!

अशाच गुंतागुंतीच्या आयुष्यात अडकलेली एक आजी मला भेटली होती पुर्वी. रस्त्यातनं उचलुन तीला एका वृद्धाश्रमात ठेवलं होतं.
आजी खुप प्रेमळ आणि मायाळु, तितकीच हेकट आणि रागीट… तोंडावर काहीही बोलायला कमी करत नाही.
हिला म्हटले तर सर्व आहेत… म्हटलं तर कुणीच नाही !
सध्या माझ्यातच ती सर्वस्व बघते, आणि याचा मला सार्थ अभिमानही आहे..!

अगदी सुरुवातीला भेटली तेव्हा तपासतांना म्हणाली होती, “या बघ, अंगावरच्या या जखमा सगळ्या लहान होते तेव्हाच्या… मोठी झाल्यावर सगळे घाव बसले ते मनावर..!”
आज्जीचं जुन्या काळातलं थोडंफार शिक्षण झालंय… आज्जी मला सांगते… “सगळ्या विषयांत हुशार होते मी बाळा, पण “गणित” माझं कच्चंच राहिलं रे… तेव्हाही आणि आत्ताही..!”

खुपवेळा ती आदळआपट करत चिडचिड करायची… मी ही मग कधीतरी रागवायचो तीला… खुप वेळानं शांत होवुन सांगायची, “आधी नव्हते रे मी अशी… पण नंतर आयुष्यात शिकले… लोक गोड गोड फळंच निवडतात आणि नंतर चाकुनं कापुन खातात…जे कडु असतं ते किमान वाचतं तरी मतलबी लोकांच्या सुरीपासुन…”

खरंच, किती सत्य आहे हे..!

तर; एका वृद्धाश्रमात हिला ठेवलं होतं, पण तिथं काही हिचं पटलं नाही… संस्थाचालकांनी सांगितलं, “डॉक्टर, आजीला घेवुन जा…” मी आणलं..!
दुस-या वृद्धाश्रमात सोय केली, तिथंही तेच… आलो परत आजीला घेवुन…
पुन्हा तिस-या ठिकाणी सोय केली… गंमत म्हणजे इथंही तेच… इथुनसुद्धा परत घेतलं तीला…
आता मी ही वैतागलो होतो..! इतका वेळ नाहीच माझ्याकडं… केवळ तीच्यावरच्या प्रेमापोटी केलं…

भुवड दांपत्य अर्थातच बरोबर होते परतीच्या प्रवासात….. तीला रागानं म्हटलं, “आता तुझी सोय कुठंही करणं मला शक्य नाही… काय करायचं ते तु सांग…”
म्हणाली, “पुणे स्टेशनवर सोड… तिथं राहीन… फुटपाथवर…”
मी कपाळावर हात मारला, म्हटलं, “फुटपाथवरच तुला सोडायचं असतं तर तीनदा तुझी सोय करत मी इतका वेळ वाया घालवला असता का?”
पुन्हा काहीतरी आठवल्यागत म्हणाली, “स्टेशनवरुन काश्मिरला ट्रेन जाते का रे?”
“जात असेल, मी काय तिथं कामाला नाही…” तिरसटासारखं मी बोललो..!
म्हणाली, “मग त्या गाडीत बसवुन दे… तिथं अतिरेकी असतात, तिथं गोळ्या खावुन मरेन..!”

मला हसावं का रडावं हेच कळेना…
शेवटी ठरवलं, हिला जिथुन आणलंय, तिथंच ठेवायचं रस्त्यावर… पडु दे हिला तिथ्थंच…
पण हा विचार क्षणभरच टिकला… शेवटी रस्त्यातच सोडायचं तर हिला टाकुन देणा-या पोरात आणि आपल्यात फरक काय राहिला? या विचारानं माझीच मला लाज वाटायला लागली… खरंतर माझी झोप झाली नव्हती सगळ्या दगदगीमुळे, प्रवासात पुर्ण झोपायचं असं मी ठरवलं होतं…
पण या विचारानं माझी झोप उडाली..!

फोनची कॉन्टॅक्ट लिस्ट काढुन संपुर्ण प्रवासभर जमतील तिथं आजीची सोय करण्याबाबत फोन सुरु केले… किमान ६० – ६५ कॉल झाले असतील… सर्वांनीच ८ – १० दिवसांचा वेळ मागुन घेतला… पण तोपर्यत काय? आजची रात्र हि कुठं राहिल?
माझ्या किंवा भुवड ताईंच्या घरी रहा म्हणुन पण सांगुन पाहिलं… पण ती ऐकेल तर शपथ !
माझंच डोकं आता फुटेल असं वाटायला लागलं…

हा शेवटचा कॉल म्हणत मी सौ. रामेश्वरी जाधव यांना कॉल लावला…
रामेश्वरी मॅडम, बारामतीजवळ क-हावागज या छोट्या गावात कर्णबधीर मुलामुलींसाठी निवासी शाळा चालवतात. मला पुर्वी रस्त्यात भेटलेल्या दोन तरुण मुलींना यांच्याकडे पाठवलं होतं. मॅडमनी पोटच्या पोरींप्रमाणे यांना सांभाळलं…
यांच्या कर्णबधीर शाळेत एकदा गेलो होतो… बोलु न शकणारी आणि ऐकुही न शकणारी ही अनाथ मुलं… यांची असहायता पाहुन डोळ्यात पाणी आल्याशिवाय रहात नाही… दगडाला पाझर फुटणं म्हणजे काय या वाक्प्रयोगाचा अर्थ इथं समजतो…

खरंतर ही मुलं कर्णबधीर नाहितच… बधीर आहेत “ते” लोक, ज्यांनी या मुलांचं पालकत्व नाकारलंय…
अशाच नाकारलेल्या मुलाबाळांची आई म्हणजे सौ. रामेश्वरी जाधव !!!
ही बाई कुणी श्रीमंत नाही….या मुलांसाठी या “आई” ने अंगावरचे दागिनेही विकलेत…
एकदा गंमतीनं यांना मी म्हटलं… “एक बाई दागिन्यांवाचुन राहुच कशी शकते?”
तेव्हा बाजुच्या मुलाला काखेत उचलुन म्हणाल्या… “कोण म्हणतंय दागिन्यांवाचुन राहते..? हे काय माझं कर्णफुल..!”

ऐकायला न येणा-या लहानग्यांना कर्णफुल म्हणणा-या या मातेला माझा सलाम !

तर शेवटचा फोन यांना केला… थोडक्यात माहिती दिली… म्हटलं, “माझ्या या म्हातारीला तुमच्या पदरात घ्या… तुमच्या कर्णफुलांत माझी पण एक मोत्याची माळ सांभाळा… धागा जरा जीर्ण झालाय… कधी तुटेल माळ माहीती नाही… पण…”

मी “राम” नावाचा “ईश्वर” पाहिला नाही… पण “रामेश्वरी” नावाचा “माणुस” पाहिलाय…
या मॅडमनी माझी ही माळ नुसतीच स्विकारली नाही तर गळ्यात घालुन घेतली… काय म्हणु मी यांना…? नतमस्तक !!!

त्यांच्याकडे सोडतांना माझ्या म्हातारीला मी गंमतीनं म्हटलं, “फुटपाथवर सोडु? का काश्मिरात सोडु तुला गोळ्या खायला?”
म्हणाली, “माझा लेक असतांना मी बरी जाईन फुटपाथवर… आणि गोळ्या खायला काश्मिरात?”
मी पुन्हा म्हटलं… “पण ना, म्हातारे तुला चार दिवस काश्मिरात घेवुन जाणारच आहे मी… तुझ्या जाचानं अतिरेकी तरी भारत सोडतील चार दिवसांत..!”

ती हसली यावर… नंतर जवळ बोलावलं म्हटली, “इकडे ये…”
मी वाकलो… तीनं अक्षरशः माझा कान धरला आणि कानात बोलली, “मनिषा आणि सोहम कसे आहेत?”
“छान आहेत”, मी मोघम बोललो… तीनं एक मळखाउ पिशवी काढली, म्हणाली, “मनिषाला दे…” वेफर्स चं पाकिट काढलं… म्हणाली, “सोहम ला दे…”
मी जरा रागानंच विचारलं… “आणि मला गं म्हातारे… मला काय?”
तीनं गालगुच्चा घेतला माझा… गालाचा पापा घेतला आणि डोक्यावर हात ठेवुन म्हणाली, “कुणीतरी कधीतरी परिक्षा घेत असतं आपली… आपल्याही नकळतपणे…कुठल्याही रुपात… तुला फक्त आशिर्वाद…”
“तुझी पण परिक्षा झाली आज… आणि तु पास पण झालास… ! माझा आशिर्वाद माझ्या बाळा तुला…” असं म्हणुन हाताचं चुंबन घेतलं माझ्या…

मला तीला सोडल्यावर कळलं…
मी परिक्षार्थी होतो तर आज…
कुणीतरी परिक्षा घेत होतं माझी… माझ्याही नकळत… तीच्याही नकळत..!
आम्ही परत फिरलो… मनिषाला दिलेली पर्स, सोहमचा खाऊ आणि मला दिलेला “आशिर्वाद” मिरवत मी रस्त्यानं अभिमानानं चाललो होतो…
माझ्या या हेकट म्हातारीनं मला सर्व परिक्षांत पास केलं होतं… आता मला कुठलीही डिग्री नको… “या” म्हातारीचा नातु एव्हढी ओळख मला पुरेशी आहे जगायला… आणि पुढच्या परिक्षा द्यायला…!!!
~~~~~~~~~~~~~~~
रामेश्वरी मॅडमच्या “कर्णफुलांना” मदत करायची असेल तर खालील नंबरवर त्यांचा संपर्क होवु शकतो : ८००७७०८२८२ / ९७६५१३९२८०

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*