बिन बासरीचा कृष्ण..!

आज गोकुळ अष्टमी..!

मी नेहमी विचार करतो, ज्या श्रीकृष्णानं एका बोटानं पर्वत उचलला त्याच श्रीकृष्णाला इवलीशी बासरी वाजवायला मात्र दहा बोटांची गरज पडते…

एका बोटानंही पराक्रम करता येतो, पण प्रेमानं कुणाला जवळ बोलवण्यासाठी जास्त ताकद लागते..!

आज गोकुळाष्टमी… दहिहंडी… त्यात श्रावणातला सोमवार… मी अर्थातच एका शंकराच्या मंदिराबाहेर…

देवाकडं काहीतरी मागायलाच आलेल्या “भक्तांची” अमाप गर्दी… पण ती मंदिरात…

काहीतरी मागायलाच आलेल्या “भिक्षेक-यांची” गर्दी… पण मंदिराबाहेर…

मंदिरात मागतो तो भक्त… मंदिराबाहेर मागतो तो भिकारी… असं काही सुत्र असावं का..?

असो, मीही मंदिराबाहेरच असतो…

अर्थात् मी ही काहीतरी मागतोच आहे… जगात कुणी भीक मागु नये, प्रत्येकानं कुणापुढं लाचारीनं हात न पसरता, सन्मानानं जगावं हे मागणं मागतोय…

एका अर्थानं… मी ही भक्त… आणि मी ही भिकारीच !!!

तर… या मंदिराच्या बाहेर होतो…

एक दाढी वाढलेली.. अंगानं अत्यंत कृश अशी वृद्ध व्यक्ती मला दिसली… हे यापुर्वी मला कधीच दिसले नव्हते…

भिंतीला टेकुन ते बसले होते, पाय मुडपुन छातीजवळ घेतले होते… दोन्ही पायांना हातांनी विळखा घातला होता, दोन गुडघ्यांमध्ये हनुवटी टेकवुन शुन्यात पहात काही विचार करत होते…

मी इतर लोकांना तपासत होतो… यांचं माझ्याकडं लक्ष नव्हतं…

सगळे पेशंट संपवुन मुद्दाम या बाबां शेजारी बसलो… त्यांनी ढुंकुनही पाहिलं नाही…

मी म्हटलं… बाबा काय त्रास आहे ? असेल काही तर सांगा..! मी औषध देतो… बाबांनी ऐकुन न ऐकल्यासारखं करुन तोंड दुसरीकडं फिरवलं…

मला दिसत होतं, अंगावर ठिकठिकाणी कसल्यातरी विचित्र जखमा होत्या… काही भरल्या होत्या… काही चिघळल्या होत्या…

काहीतरी बोलायचं म्हणुन बोललो, “काय झालंय हे बाबा, कसल्या जखमा आहेत ? बाबा गप्प. म्हटलं, “सांगा की; अहो, औषध देतो…”

खुप वेळानं चेहरा वर करुन म्हणाले…

“कोणकोणत्या आजारांवर लागणारं औषध आहे आपल्याकडे डॉक्टरसाहेब ?”

बोलण्यातील ढब आणि उच्चार पाहुन जाणवलं,,. बाबा सुशिक्षित आसावेत…

मी म्हटलं, “जवळपास सर्वच आजारांसाठी लागणारी औषधं आहेत… आपल्याला काय आजार आहे..?”

ते हसले… म्हणाले, “मला कोणताच आजार नाही… आणि जो आजार आहे, त्याचं औषध तुमच्याकडे नाही..!”

मी काय समजायचं ते समजलो…

तरी म्हटलं, “या जखमा कसल्या..?”

बाबा हसले, म्हणाले, “खुप चांगलं वागण्याची शिक्षा आहे ती सर…”

मी बाबांना उकरत गेलो… बाबा उलगडत गेले… त्यांच्याही नकळत…

पुण्याजवळच्या तालुक्यात… एक नवरा बायको… त्यांना तीन मुलगे… वडिल ब-यापैकी शिकलेले… पुण्याजवळच्या एका गावात नगरपरिषदेच्या बागेत माळी म्हणुन आयुष्यभर काम केलं… दोघां नवरा बायकोनं पै पै करुन पैसा साठवला… छोटं का असेना, गावात घर घेतलं… नोकरी सोडल्यावर एकरकमी आलेले दोन लाख… तीन मुलांत समसमान वाटुन टाकले…

तरी बायको म्हणत होती, “अहो, थोडं आपल्या म्हातारपणालाही ठेवा…” पण नाही ऐकलं… पुन्हा सायबाच्या पाया पडुन एका मुलाला आपल्याच जागेवर माळी म्हणुन लावलं, इतर दोघांना दुकानं काढुन दिली… लग्न लावुन दिली…

सगळं ठिक होतं…

वाटेत मुलांच्या आईनं निरोप घेतला… ती गेली देवाकडं..!

हे म्हातारबाबा स्वतःकडे काही न ठेवता पोरं आणि सुनांच्या आधारानं राहु लागले… पण, नियतीला हे बघवेना… कुठं माशी शिंकली माहीत नाही… तीनही पोरांनी आणि सुनांनी बापाला सांभाळायला नकार दिला…

शब्दानं शब्द वाढला, शेवटी ज्यानं घरटं बांधलं… त्यालाच बाहेर हाकललं, आणि हे बाबा आले रस्त्यावर…

गेल्या चार वर्षांपासुन हे रस्त्यावर आहेत,..

मी पुन्हा विचारलं, “बाबा जखमा कसल्या या?”

बाबांनी हसत शर्ट काढला… अत्यंत घाण वासाचा भपका माझ्या नाकात घुसला…

बापरे…!!!

चिघळलेल्या अत्यंत घाणेरड्या जखमा… कपड्यांवरुन लक्षात येत नव्हतं… पण… पण या कसल्यातरी विचित्र जखमा होत्या, आतल्या आत मांस लोंबत होतं…

चेहरा सोडुन सर्व अंगावर या जखमा… मी हादरलो… या अशा जबरदस्त जखमा घेवुन हा माणुस शांतपणे माझ्याशी बोलतोय ?

“बाबा काय हे…” मी जवळपास ओरडत बोललो…

ते शांतपणे पुन्हा शर्ट चढवत म्हणाले, “कुत्री चावली हो साहेब…”

“अशी..?”

“हो… अशीच”

“तुम्हाला त्रास होत नाही बाबा?”

“नाही, कुत्र्यांपेक्षा… माझ्या तीन पोरांचा चावा मला त्रास देतोय…”

“कुत्री चावली ते दिसतंय… पोरांचं चावणं दिसत नाही… पण जे दिसत नाहीये तेच जास्त दुखतंय…”

“बाबा, अहो ही कुत्री कशी चावली..????”

तर… बाबा उपाशीपोटीच, एकदा नदीकाठच्या या शंकराच्या मंदिराबाहेर अंगाचं मुटकुळं करुन अंगावर फाटकी चादर घेवुन झोपले होते… दुरुन कुणीही बघीतलं तर एक बोचकंच वाटावं…

शेजारच्या भटक्या कुत्र्यांना वाटलं असावं.. कुणीतरी आपल्याला काहीतरी खायला टाकलेलं असावं…

चार कुत्र्यांनी मिळुन हे “बोचकं” ओढत आणलं बाजुला हळुहळु … आणि आत काहीतरी खायला आहे असं समजुन “बोचक्याला” चावे घ्यायला सुरुवात केली…

इतका वेळ पोटात काही नसल्यामुळे ग्लानीत असलेले या बाबांना हे चावे असह्य झाले… जीवाच्या आकांतानं ते चादर फेकुन ओरडायला लागले… पण, तोपर्यत भटक्या कुत्र्यांनी त्यांचे लचके तोडले होते …

मी डोळे फाडुन, कान विस्फारुन हे ऐकत होतो हे…

एका क्षणी कुत्र्यांनाही कळलं असावं… अरे हा तर “माणुस” आहे… ज्या माणसाचे, खुद्द त्याच्या मुलांनीच लचके तोडलेत , अशाला आपण का त्रास द्या..? या विचारांनी बहुतेक कुत्र्यांनीही त्यांना जिवंत सोडुन दिलं..!

काय गंमत आहे ना…
हिंस्त्र जनावराला “माणुसकी” समजली… पण माणसाला नाही..!

“बापरे बाबा… अहो चुकुन बचावला तुम्ही…” मी म्हटलं.

बाबा म्हणाले, “डॉक्टर , कुत्री चावत होती… खुप त्रास झाला… पण सगळ्यात त्रास काय झाला माहित आहे ? मी वाचवा वाचवा म्हणत असतांना लोक आजुबाजुला जमुन माझे फोटो काढत होते, व्हिडीओ काढत होते हो… पण एकाही माणसाने (?) या कुत्र्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला नाही… शेवटी कुत्र्यांना कळलं असावं… हा माणुस आहे, तेव्हा मला सोडलं त्यांनी…”

मी सुन्न झालो… मी असलं काहीतरी पहिल्यांदाच काही ऐकत होतो…

मी पुर्वी पुस्तकांत वाचलं होतं… माकडांपासुन माणुस झाला… पण आता वाटतंय…. माणसांचं पुन्हा जनावर होत चाललंय…

जनावरांनाही “माणुस” कळतो… पण माणसाला “माणुसकी” अजुन कळलीच नाही…!

हिंस्त्र जनावरांचा चावा परवडला… पण माणसांचा नको…

बाबा बोलले, “डॉक्टर आयुष्यभर बागेत काम केलं… मी ऐकलं होतं… संगतीनं माणुस सुधारतो… मग या नियमानं,… गुलाबाच्या काट्यांना गुलाबाचाच सुवास यायला हवा… पण गुलाबाच्या काट्यांना कधीच सुवास आला नाही हो..!”

“माझ्या संगतीत राहुन माझी पोरं कशी बिघडली..? सांगा की डॉक्टर…”

मी काय बोलणार यावर ?

मी म्हटलं, “असुदे बाबा, अहो तुटणा-या ता-याला बघुनही लोक स्वतःसाठी काहीतरी मागतात… आपण कोसळतांना आपल्याकडं कुणी काही मागीतलं तर समजायचं… आपण तारा आहोत…”

“तुम्हीही तसेच…. ता-यासारखे… नका वाईट वाटुन घेवु..!”

बाबा सुखावले..!

यानंतर मी सर्व जखमा स्वच्छ करुन दिल्या, मलम लावलं, औषधं दिली…

बाबा नकळत बोलुन गेले, “डॉक्टर देव माणसांत बघावा असं ऐकलं होतं, आज प्रथमच अनुभवलं..! मला माणसांत देव दिसला…” असं म्हणुन माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला…

मी म्हटलं, “बाबा, हल्ली देव स्वस्त झालाय हो… जीकडं तीकडं देवच दिसतो… माणुस मात्र दिसत नाही आजकाल कुठंच…” ते ही यावर केविलवाणे हसले..!

निघतांना म्हणाले, “एक गंमत सांगु ?”

“मला चावलेली जी कुत्री आहेत ना, ती मला रोज भेटतात, मी मला मिळालेली भाकर त्यांना पण देतो… रोज माझ्याजवळ येवुन बसतात … खातात बिचारी… भुकेजली असतात हो… त्यांना तरी कोण देईल? आम्ही मिळुनच जेवण करतो… थांबा तुम्ही पण, आत्ता येतीलच येवढ्यात…”

“बाबा, अहो काय बोलतांय..? अहो त्यांनी तुमचं आख्खं अंग फाडलंय… त्यांनाच खावु घालताय?” मी आश्चर्याने बोललो…

ते म्हणाले, “खरंय डॉक्टर… चुकले ते, पण नकळतपणे चुक केलीय त्यांनी… मुद्दाम नाही, जेव्हा त्यांना कळली चुक त्यांची, तेव्हा चावे घ्यायचं त्यांनी थांबवलं होतं डॉक्टर… हे मी विसरु शकत नाही..!”

“नकळतपणे, अजाणतेपणी झालेल्या चुका माफ करायच्या असतात…” ते बोलले…

“आणि मुद्दाम केलेल्या चुकांचं काय करायचं..?” त्यांच्या मुलांना डोळ्यासमोर ठेवुन मी बोललो…

त्यांनाही ते कळलं असावं… ते हसत म्हणाले, “मुद्दाम केलेल्या चुका आठवायच्या नसतात… त्या विसरायच्या असतात..!”

“म्हणजे मुलांनी केलेल्या चुका तुम्ही विसरलात तर..!”

“अर्थातच डॉक्टरसाहेब, अहो जिथं जनावरांना मी माफ केलं तिथं मुलांवर मी काय सुड घेणार..?”

डॉक्टर, एक सांगतो… आपल्याबरोबर काही वाईट घडलं ना तर आठवायच्याच नाहीत अशा गोष्टी… आणि आठवल्याच चुकुन तर फट्कन् माफ करायचं तिथल्या तीथं… वाईट गोष्टी मनात जपुन कशाला ठेवायच्या… अहो सुगंध जपावेत नेहमी..!!!

माझ्या डोळ्यातनं आता पाणी यायला लागलं…

मी त्यांचा हात हातात घेतला… म्हटलं, “बाबा… कृष्णानं अर्जुनाला गीता सांगीतली होती… आज तुम्ही पण आयुष्याचं सार सांगीतलंत…”

“मी अर्जुन नाही पण… विना बासरीचे कृष्ण झालात तुम्ही…”

मी तिथुन निघालो… शंकराची आरती चालु झाली.. जोरजोरात घंटानाद होवु लागला… मी मागं वळुन पाहिलं… का कोण जाणे… या घंटानादात मला अधुन मधुन बासरीची मधुर धुन ऐकु येत होती..!!!

1 Comment

  1. तुमच्या सुंदर विचारांप्रमाणेच, तुमची लेखनकलाही सुंदर आहे….!!

Leave a Reply

Your email address will not be published.


*