Thank you..!!!

गेल्या कित्येक महिन्यांपासुन एका वयस्कर बाबांच्या संपर्कात आहे.

दरवेळेला यांच्या हाताला अन् पायाला जखमा…

आजुबाजुचे सर्व लोक यांना “वेडा” किंवा “मतिमंद” समजतात…

ब-याच जणांनी मला सल्ला (?) दिला होता, “या वेड्याशी बोलत जावु नका” म्हणुन…

आता यांना कसं सांगावं की, मी अशा वेड्या माणसांतच रमतो…

या बाबांना आख्ख्या जगात सख्खं कुणीच नाही…

असो, खरंतर हे बाबा वेडे अथवा मतिमंदही नाहीत. फक्त ते पायानं अपंग आहेत आणि बोलतांना त त प प करत अस्पष्ट बोलतात… इतकं अस्पष्ट की ते काय बोलतात हेच कळत नाही. पण आपण बोललेलं सगळं कळतं यांना…

पायाच्या अपंगत्वामुळे लहान बाळासारखं ते रांगत चालतात… मध्येच अगम्य काहीतरी बोलतात…

या सर्व बाबींमुळे लोकांनी त्यांना वेडं ठरवलंय !

गंमत म्हणजे त्यांची भाषा हल्ली मलाही कळायला लागलीय… एक तर ते माणसांत आले असावेत किंवा मी वेडा झालो असेन ..!

तर रस्त्यावर रांगत चालल्यामुळे, यांचे तळहात सोलवटले आहेत, गुडघ्यावरची कातडी गेली आहे… खोटं वाटेल, यांच्या मांडीला कातडी नाही, डायरेक्ट मांस दिसतं … रस्त्यावर घासुन ही कातडी निघुन गेलीय…

दरवेळी मी क्रीम देवुन औषधंही देतच असतो… पण काय फायदा?

जोपर्यंत हे रांगत चालणार तोपर्यत कधीच या जखमा भरुन येणार नाहीत..!

मनात विचार आला, यांचे हात चांगले आहेत, पाय अपंग असले तरी… यांना हाताने चालवायची व्हिलचेअर दिली तर रांगत चालणार नाहीत.

मी त्यांना तसं विचारलं तर, त्यांच्या भाषेत त्यांनी मला होकार दिला.

बाबा सायकलीला तयार झाल्यावर, मी अजुन जरा धाडसानं म्हटलं… “बाबा, सायकलीवर बसुन भिक मागण्यापेक्षा, रुमाल, स्कार्फ वैगेरे गोष्टी विकत घेवुन देतो… सायकलीवर बसुन हे विका की…”

बाबा हसुन यालाही तयार झाले..!

मी तशी तयारी सुरु केली…

रॉबिनहुड आर्मी, पुणे माझ्या कामात मला काही न् काही मदत करतच असते… एके दिवशी एका वेगळ्या कामाची चर्चा रॉबिनहुड बरोबर करत असतांना सहज ही बाब त्यांच्याशी मी बोललो, तत्क्षणी रॉबिनहुडच्या या पदाधिका-यांनी सायकल आम्ही देणार हे हक्कानं जाहिर केलं…

मधले सगळे सोपस्कार पार पडल्यावर, आज शनीवारी या बाबांना अत्यंत सन्मानपुर्वक रॉबिनहुड आर्मी च्या सहकार्याने बाबांना ही सायकल दिली.

नुसतीच दिली नाही तर, रॉबिनहुड आर्मीचे सर्व “रॉबिन्स”, आमचे भुवड बाबा, भुवड ताई, राहुल सावंत यांनी अक्षरशः लहान मुलाला शिकवावी, तशी या बाबांना रस्त्यावर सायकल शिकवली, बाबांना ट्रेनिंग दिलं… दोनेक तास सर्वांची ही कसरत चालु होती…

बापाच्या वयाचं माणुस आमचं आज छोटं पिल्लु झालं होतं… बाळ झालं होतं..!

ते नात्यानं आमचे कुणीच नव्हते पण तरीही या नात्याला “वजन” होतं… “बोजा” नव्हता..!

सायकलीवर बसुन बाबांचा चेहरा अस्सा हरखला होता की सांगता सोय नाही… आज त्यांच्या या भावना पकडायला माझ्या शब्दांनीही नकार दिलाय..! हरकत नाही, माझ्या डोळ्यात कैद आहेत त्या…

मी बाबांना म्हटलं, “बाबा आता पुढच्या खेपेला वस्तु आणणार आहे, त्या विकायच्या… त्याचंही ट्रेनिंग देतो… ते हसले आणि मानेनंच त्यांनी होकार दिला…”

शेवटी आम्ही निघालो, पण बाबा आम्हाला सोडायलाच तयार नव्हते… त्यांना आम्हाला Thank You म्हणायचं असावं..!

ते बोलु काहीच शकत नव्हते तोंडाने… जे बोलत होते ते कुणालाच कळत नव्हतं…पण त्यांच्या प्रत्येक हालचालीत हा Thank you ठासुन भरला होता…

कधी माझ्या हाताचं चुंबन घेत होते, कधी पाठीवरनं माझ्या उगीचंच हात फिरवत होते, मध्येच शेकहँड करत होते, मध्येच डोळे पुसत होते, मध्येच गालावरुन, डोक्यावरुन हात फिरवत होते, स्वतःच्या कातडं गेलेल्या तळहाताकडे डोळे भरुन पाहत होते, तो तळहात मलाच दाखवुन पुन्हा पुन्हा हसत होते, बसुन स्वतःच्याच हातानं जखमा झालेल्या टाचा पाय उचलुन बघत होते, टिममधल्या प्रत्येकाचा हात हातात घेत होते… खुदुखुदु हसत लांबुन टाटा करत होते…

मध्येच अगम्य असं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होते… या न कळणा-या शब्दांत हा Thank you शब्द स्पष्ट ऐकु येत होता…

बिनशब्दांची त्यांची प्रत्येक भावना पोचत होती, पोचली होती…आणि Thank you या शब्दानं माझी “झोळी” भरली होती…

आज मला आशिर्वाद देण्यासाठी मा. सौ. चित्राताई कुलकर्णी मॅडम, डिशनल कमिशनर, सेल्स टॅक्स, नाशिक या ही फिल्डवर उपस्थित होत्या. उपस्थित सर्वांना त्यांनी पेढे वाटले… जणु त्यांच्याच घरात काही नविन वस्तु आली आहे..!

कोण हे रॉबिन्स या बाबांचे? काय म्हणुन यांनी इतक्या महागाची सायकल भेट द्यावी या अनोळखी माणसाला?

कोण हे भुवड ताई आणि बाबा? लहान बाळासारखं काखेला उचलुन या बाबांना सायकलवर ठेवायची का हौस आहे यांना?
“जपुन चालवा हां बाबा सायकल…” कुठल्या काळजीनं ही भुवड ताई या बाबांना दटावुन पण मायेनं सांगत होती?

कोण हा राहुल सावंत, जो जॉब सोडुन, सुट्टी घेवुन, माझ्या एका शब्दावर, चांगल्यात चांगली सायकल पुण्यात कुठं मिळते हे शोधत दिवसभर उपाशी फिरतो…

कोण या चित्राताई…? या ऍडिशनल कमिशनर… यांना भेटायला कित्येक दिवस अपॉईंटमेन्ट मिळत नाही… रस्त्यात काय या पेढे वाटत फिरतात? काय तर म्हणे या बाबांना सायकल मिळाली, आता रांगत चालणार नाहीत… अंगावरची कातडी सोलवटणार नाहीत…

ही खरी वेडी माणसं, माझ्या नजरेतनं… जगानं बेशक यांना “वेडं” म्हणावं…

आणि हो… यांना “शहाणपण” कधीच येवु नये… कारण… कारण… मी ही अशा वेड्या लोकांतच रमतो..!

 

3 Comments

  1. खरंच Great ! तुम्ही पण, आणि तुमच्या संपर्कात येणारी माणसं पण…..??‍♂️?‍♀️

  2. ‘माणसाला माणसाने माणसासम वागणे’….
    या ओळींच जीवंत उदाहरण आपण आणि आपल्यासारखी लोक आहेत.सगळ्यांना स्वाभिमानाने जगवण्याची आपली माणूसकी माझ्या सारख्या तरूणांना खूप प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*