भिक्षेक-यांना रोजच्या रोज गोळ्या औषधी देणं चालु आहे, हे आपण जाणताच !
त्यांच्याशी नाती तयार करुन, या नात्यांच्या बळावर, त्यांना काम करायला, स्वतःच्या पायावर उभं रहायला मदत करतोय हे ही आपण जाणताच !!
पण मला नेहमी एक प्रश्न पडतो…
ठीक आहे, हे करतोच आहे, पण यापुढं अजुन काय ? यापुढं अजुन क्काय ?
अजुन यांच्यासाठी आखीव रेखीव काही करता येईल काय मला?
हा प्रश्न मला नेहमी छळायचा… याविषयी मनिषाबरोबर चर्चा केल्यानंतर एक धुसर स्वप्न डोळ्यासमोर उभं राहीलं… ज्याला खरंच आखीव रेखीवता होती !
दिवसा उजेडी रोज मी हे स्वप्न पाहतोय… आणि दिवसेंदिवस या स्वप्नात आणखी रंग भरले जात आहेत..!
पाहिलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी एक सर्व्हे करणं आवश्यक होतं…
हा सर्व्हेही मागच्या दोन महिन्यांपासुन सुरु केला… अर्थात आपल्याच मदतीनं…
या सर्व्हेमध्ये आपण मला शारीरिक, आर्थिक, मानसिक आणि वस्तुरुपांत मदत केलीत… मी आपणां सर्वांच्या ऋणात आहे..!
आता, मी पाहिलेल्या या स्वप्नाच्या मी आणखी जवळ आलोय…
पाहिलेलं हे स्वप्नं आज तुमच्याशी शेअर करतोय…
घराबाहेर भटकणारी ही म्हातारी लाचार माणसं, खरंतर मी यांना “पाखरं” असंच म्हणतो… कारण पक्षी घरटं बांधतात, त्यात राहतात, प्राणी बिळांत आणि गुहेत किंवा झाडाच्या ढोलीत राहतात… एकमेकां सोबत… गुण्यागोविंदानं राहतात… माणुस राहतो आलिशान घरात, पण अतृप्तच… असो… शेवटी काय, सर्वांना काही न् काही आसरा असतो…
पण या पाखरांना स्वतःचं असं घर नसतं… दिसेल त्या फांदीवर बसतात, मिळेल ते खातात… आयुष्य असेल तितपत जगतात… एकेदिवशी गुपचूप जग सोडुन जातात… यांच्या असण्याने कुणाचा फायदा नाही, यांच्या नसण्याचा तोटा तर त्याहुन नाही…
मी ज्यांच्यासाठी काम करतोय, तीही अशीच पाखरं… रानोमाळ भटकणारी… मरण येत नाही म्हणुन जगणारी..!
आयुष्यात ना काही उमेद, ना आनंद..!
आर्थिक स्थैर्याबरोबरच आयुष्यात इतरही अनेक गोष्टी आहेत, त्या यांना कधी आयुष्याच्या संध्याकाळी तरी अनुभवता येतील का ? हा सतत मला छळणारा प्रश्न…
आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला यात काय करता येईल…? हा त्याहुन मोठा प्रश्न…
तरीही, या सर्व प्रश्नांच्या धुक्यात एक कल्पना सुचली… हेच ते स्वप्न..!!!
आपण या भटक्या “पाखरांची शाळा” सुरु करायची…
सकाळी १० वाजता ही शाळा भरेल…
आल्याआल्या प्रार्थनेने हा आमचा वर्ग भरेल…
चहा पिता पिता, एकमेकांसोबत लहान मुलांसारखी दंगामस्ती केल्यास कोणतीही शिक्षा नसेल..
अवघं आयुष्य वयाचं ओझं वाहण्यात गेलं… आता तरी त्यांना मुल होवुन जगु दे..!
यानंतर यांना कागदाच्या आकर्षक पिशव्या, देखणी पाकिटं आणि तत्सम वस्तु शिकवण्याचं प्रशिक्षण दिलं जाईल आणि या वस्तु त्यांच्याच कडुन तयार करुन घेतल्या जातील…
सध्या या एकाच प्रशिक्षणावर भर द्यायचा… उगीच शंभर गोष्टी शिकवुन, एक ना धड होण्यापेक्षा, यांतच त्यांना पारंगत होवु दे… कारण रंगीत कागद, कात्री आणि फेव्हिकॉल इतकाच कच्चा माल अपेक्षित आहे… भविष्यात कुठंही बसुन हे काम करता येण्याजोगं आहे… इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा हा त्यातल्या त्यात सोपा ! कुठलीही बोजड मशीन्स नाहीत किंवा फार मोठ्या अक्कलहुशारीची गरज नाही, शिवाय कष्ट कमी… फेल जाणार नाहीत, परंतु गेलेच तरी, होणारे नुकसानही कमी…
शिवाय प्लास्टिक पिशव्या बंद झाल्यामुळे या आकर्षक पिशव्यांना आता मरण नाही..!
पाखरांच्या या शाळेत हि पाखरं हसत खेळत, ते ही बसुन, गप्पा मारत या ईकोफ्रेंडली पिशव्या आणि पाकिटं बनवतील…
पाखरांच्या शाळेचा आकर्षक आणि टिकावु पिशव्या हा ब्रँन्ड होईल.
“आम्ही बाबा, अमुकच ब्रँन्डची तमुकच गोष्ट वापरतो”, असं लोक अभिमानानं म्हणतात…
इथुन पुढे मॉल, मोठी कपड्यांची दुकानं आणि इतर लोकही म्हणतील, “पाखरांच्या शाळेत तयार झालेल्या पिशव्याच आम्ही वापरतो… बाकी हलकं सलकं वापरतच नाही आम्ही..!”
तर, हसत खिदळत जेवणाच्या वेळेपर्यंत ही पाखरं काम करतील… त्यांना जमेल झेपेल असं…
कुठलंही टार्गेट नाही, काम छान आणि चोख व्हावं ही अपेक्षा आहेच… कारण ब्रँन्डनेम व्हायचंय, पण त्यासाठी कुठलंही दडपण नाही..! काम पुर्ण करण्यासाठी छडी घेवुन मागं लागणं नाही…
वरण भात, पोळी भाजीचं सात्विक जेवण झाल्यावर तिथंच थोडं “लवंडतील”
एक डुलकी झाल्यावर, चहा… आणि चहासोबत यांना आवडतील अशी खेळ, गाणी, भजनं… किंवा त्यांना जे आवडेल ते…
यासोबतच मराठी अक्षरओळख, अंकओळख या बाबी गोष्टी रुपांत आणि चित्र रुपात करुन द्यायची. जेणेकरुन याचा उपयोग व्यवहारात त्यांना होवु शकेल..!
शिवाय स्वच्छतेचं महत्व, आत्मसन्मान, स्वयंपुर्णता, आत्मनिर्भरता यासारख्या बोजड शब्दांची उकल –
त्याचं वय लक्षात घेवुन रामायण, महाभारत आणि इतर पुराण कथांच्या आधारानं त्यांच्या डोक्यात भिनवायच्या… यावर त्यांना विचार करायला लावायचा..!
मनोरंजनातुन काही गोष्टी शिकवायच्या, नाहीतर रोज शाळेत यायला “गंमत” कशी वाटेल…?
उरलं सुरलं काम हातावेगळं करुन, संध्याकाळी त्यांच्या कामाचा मेहनताना रु. १०० – १५० इतका रोज द्यायचा…
हो… जर ते भिक मागायचं सोडुन शाळेत जर रोज आले, तर त्यांनी जगायचं कसं…? शिवाय आपण त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देतोय, त्यांच्या कष्टाचे पैसे देतोय, भिक नाही..!
सहा वाजता ही शाळा सुटेल… ज्यांना शक्य आहे त्यांना बसचे पास काढुन द्यायचे, शक्य नाही त्यांना गाडीतुन सोडायचं…
या शाळेत जर ते रोज आले तर आपण त्यांच्या कामाचे पैसे त्यांना रोज देणारच आहोत.
नाहीच शाळेत आले तर बसल्या जागी हा उद्योग त्यांना करायला लावुन या पिशव्या आपण त्यांच्याकडुन विकत घ्यायच्या… जितक्या जास्त पिशव्या आणि व्हरायटी तितके पैसे जास्त..!
आज हे रस्त्यावर आहेत, पण पैसे मिळु लागले, आत्मसन्मानाची चव एकदा समजली की आपोआप स्वतःची सोय स्वतः करण्याची धम्मक निर्माण होईल…
आणि समजा धडपडलेच वाटेत कुठं तर आपण आहोतच की… आहोत ना…?
१० ते ६ पाखरांची शाळा भरवण्यामागे आणखी एक विचार आहे… भिक मागण्याची प्रमुख वेळ १० ते ६ हीच असते, नेमके याच वेळेत ते आपल्या सोबत असतील… काही शिकत असतील, काम करत असतील, नकळतपणे काही विचार यांच्या अंतरंगात रुजत असतील, संस्कारीत होत असतील, आपसुकच यामुळे भिक मागण्याची वृत्ती कमी व्हायला मदत होईल..! हा आपला माझा विचार..!!!
या एका शाळेचं मी स्वप्नं पाहतोय, भविष्यात अशा अनेकानेक शाळा असतील…जीथे “भिक्षेकरी” म्हणुन ते प्रवेश घेतील…पण बाहेर पडतांना “कष्टकरी” म्हणुन बाहेर पडतील..!
अर्थात् हे माझं स्वप्न आहे… जागेपणी पाहिलंय, झोपेत नाही, म्हणुन ते सत्यात उतरेल याचा मला मनापासुन विश्वास आहे… अर्थात् तुमच्या बळावरच हा विश्वास निर्माण झालाय…
अशी शाळा काढायला किमान १००० स्क्वेअर फुटाची मोकळी जागा मिळाली तरी आम्ही पत्र्याचं शेड टाकुन बसु… डोक्यावर छप्पर असलं म्हणजे पुरे… बाकी झुंजायला आम्ही जन्मभर शिकलो आहोतच..!
जे काही पैसे संस्थेला देणगीरुपांत मिळत आहेत, तेच पैसे यांना आपण मेहनताना म्हणुन देणार आहोत. शिवाय या पाखरांनी बनवलेल्या पिशव्या, पाकिटं इत्यादी वस्तु मोठे मॉल्स, नामांकित दुकाने याठिकाणी विकुन जे पैसे येतील, त्यातुन यांच्या जाण्यायेण्याचा खर्च निघु शकेल.
तुमचा पुढचा प्रश्न इथुनही मला तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतोय, “आम्ही यात नेमकी काय मदत करु…?” हो..ना…?
तर… आता मी जे बोललो, यांतुन काय मदत करायची याचा साधारण अंदाज येतोच आहे…
- आपण आपल्या पाहण्यात असणाऱ्या एखाद्या पाखराला या शाळेत घालु शकता.
- शक्य असेल त्यावेळी त्यांच्या राहत्या जागेपासुन येण्याजाण्याची सोय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे करु शकता.
- चहा किंवा जेवणाच्या खर्चास जमेल तसा हातभार लावु शकता.
- ओळखीच्या हॉटेल किंवा उत्तम खानावळी मधुन अल्प मुल्यांत चांगले जेवण देण्यासंदर्भात, कच्चा माल पुरवण्यासंदर्भात विनंती करु शकता. अशा सहृदांना माझ्याशी जोडुन देवु शकता.
- पिशव्या तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल पुरवण्या साठी मदत करु शकता.
- मेहनताना देण्याच्या खर्चास हातभार लावु शकता.
- निश्चित केलेल्या वेळेत, वर सांगितलेल्या अक्षर ओळख, अंक ओळख याचं सोप्या पद्धतीने शिक्षण देवु शकता.
- प्रशिक्षणासंदर्भात आपल्या परिचयातील प्रशिक्षकांना संस्थेशी जोडुन देवु शकता.
- पिशव्या तयार झाल्यानंतर त्याच्या विक्री प्रक्रियेत भाग घेवु शकता.
- आपल्या ओळखीतील मोठी दुकाने आणि मॉल्स किंवा पिशव्या विकणारे होलसेल दुकानदार यांना आपल्या पिशव्या घेण्याबाबत विनंती करु शकता.
- आपण स्वतः या पिशव्या विकत घेवुन आपल्या मित्र मैत्रीणींच्या गोतावळ्यात या पिशव्या त्यांनीही वापरण्या संदर्भात विनंती करु शकता.
- तसेच संस्कार होतील, मन परिवर्तन होईल, जगायला उभारी मिळेल अशा गोष्टी इथे येवुन सांगु शकता.
- मनोरंजनातुन उद्बोधन करण्याची काही कला असेल तर त्याचा लाभ आमच्या पाखरांना देवु शकता.
मी हा एक कच्चा आराखडा आपल्यासमोर मांडलाय… यातुन आपणांसही पुढे जाण्याच्या दृष्टीने आणखी काही सुचत असेल तर कळवावे. आपले मार्गदर्शन मिळावे, आपला सल्ला घेवुन मगच पुढे जावे, केवळ इतकाच हेतु आजच्या लिखाणामागे आहे !
असो, फार मोठं शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करतोय… सोबत आपण आहातच म्हणुन निश्चिंतही आहे..!
मुख्य प्रश्न जागेचा आहे… तो सुटला की निम्मं काम आवाक्यात येईल… उरलेली कामं थोड्या “पैशानं” आणि थोड्या “प्रेमानं” होतील याची खात्री आहे..!
मला माहीत आहे, यात मला अनंत अडचणी आहेत…
पण आता कितीही मोठी अडचण आली तरी मी माझ्या स्वप्नांना ती अडचण सांगणार नाही…
आता अडचणीलाच सांगेन… बाई गं… तु जरा मागं थांब… तु कितीही मोठी असलीस, तरी त्याहुन माझं स्वप्नं मोठं आहे..!!!
थांबशील ना प्लिज…? माझ्यासाठी… नव्हे, या माझ्या पाखरांसाठी ???
खरंच, तुमचं स्वप्न तुमच्यासारखंच महान आहे….
मला मदत करण्याची इच्छा आहे.