दृष्टी …एक नजर..!!!

दुरदृष्टी… हा शब्द आपण सामाजीक अर्थानं वापरतो… म्हणजे यांनी दुरदृष्टी ठेवुन हे केलं, ते केलं म्हणुन आज ते यशस्वी आहेत… वगैरे..!

दुरदृष्टी, म्हणजे भविष्यावर नजर असणे !

पण ज्यांचं वर्तमानच अंधकारात असेल अशांचं काय..?

पायाजवळचंही दिसत नसेल अशांनी दुरदृष्टी ठेवायची कशी ? ठेवुन फायदा काय ?

अशांना आधी “समीपदृष्टी” असणे आवश्यक आहे..!

आधी “जवळचं” पाहतील, तेव्हाच तर “दुरचा” ते विचार करतील..!

शब्दशः डोळ्यांचा विचार केला तर, ज्या वृद्ध भिक्षेक-यांसाठी काम सुरु आहे, त्यांना डोळ्याने जवळचंही दिसत नाही आणि दुरचंही..!

अशा २० लोकांची उद्या २७ सप्टेंबर रोजी लेले हॉस्पिटल येथे तपासणी आणि परेशन्स ठेवली आहेत. या अगोदरचे ११५ आणि आताचे २० अशा या लोकांना आता नजर मिळेल.

नजर” मिळाली तर ते स्वतःकडे पाहु शकतील… मी आत्ता कसा आहे? कुठं आहे? कुठं बसलोय? कुठल्या परिस्थितीत आहे? हे जर त्यांना “दिसलं” तरच… मी कसं असायला हवं? कुठं असायला हवंय? कुठं बसायला हवंय? याचा ते विचार करतील… दुरदृष्टीने..!

डोळ्याला “नजर” येणं गरजेचं आहे, त्यासाठी ऑपरेशन्स आणि तपासण्या गरजेच्याच आहेत…

पण “नजरेबरोबरच” यांना स्वतःकडे बघण्याची नवी “दृष्टी” मिळावी… लाचारीनं न जगता, स्वाभिमानानं मस्त जगु हा “दृष्टिकोन” निर्माण व्हावा… आणि “दृष्ट” लागेल असं मी भविष्यात माझं आयुष्य जगेन अशी “दुरदृष्टी” यांना मिळावी हीच आज प्रार्थना !!!

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*