दसरा

आज दसरा

मी वाट पाहतोय एखादा दिवस असा असेल…

जेव्हा सर्वांच्या अंगी स्वतःचा सदरा असेल…

प्रत्येक घरात कुटुंब प्रमुखाची आई रांगोळी काढत असेल, दारावर तोरण लावत असेल…

“माजं सोनं गं” …म्हणत नातवंडांच्या गालावरुन हात फिरवत असेल…

आपट्याच्या पानावरल्या शीरा जशा, तसेच या म्हाता-या माणसांचे हात, जाळीदार..! ही जाळी असते अनुभवाची आणि भोगलेल्या सुखदुःखाची… आपट्याचं पान म्हणुन हेच तळहात कुणी हाती घेत असेल, हृदयाशी लावत असेल… आणि मग त्या माऊलीच्या गालावर पिवळाधम्मक झेंडु उमलत असेल…

लुटण्याची इथं भाषा नसेल… वाटण्याची मात्र मनापासुन हौस असेल…

पुजायला इथं कुठलंही शस्त्र नसेल, अस्त्र नसेल… असतील फक्त सोलवटलेले म्हातारे पाय… आणि जेव्हा या पायांवर झुकलेलं मस्तक असेल…

प्रेमाला जीथं सीमाच नाही, तिथं उल्लंघन हे मान्यच नसेल…

आईबापापुढं गुडघे टेकुन शरण जाण्यासारखा जीथं दुसरा कोणताही विजय नसेल…

पोरांबाळांत रमलेला हा थकलेला देह, तृप्ततेनं दहावेळा आशिर्वाद देत असेल… याहुन मोठी कुठलीही दशमी नसेल…!

मी त्या दिवसाची वाट पाहतोय…

त्या दस-याची वाट पाहतोय…

तोपर्यंत आजच्या या शुभदिनाच्या आपणांसही शुभेच्छा !!!

१८ ऑक्टोबर, आश्विन शु. ९, विजयादशमी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*