जादुची ऊशी..!!!

मी २४ तास विचार करतोय…

भिक्षेक-यांना नेमकं कुठलं काम द्यावं ? ज्यात कच्च्या मालाची किंमत कमी असेल, प्रॉडक्शन साठी फारसे स्किल नाहीत, अवाढव्य मशीन्स नाहीत, पण वस्तु अशी बनेल की लोक त्यांच्या मागे लागतील… “आम्हाला विकत द्या हो… प्लिज…” म्हणुन!

तसं पाहिलं तर मनिषाने चंदनाचं उटणं बनवलं… आणि मी माझ्या भिक्षेक-यां कडुन पॅकींग आणि स्टिकींग करवुन घेतलं.

उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला… पाकीटं हातोहात खपली…

भिक्षेक-यांना ऊत्तम मेहनताना वाटुन दिला…

अर्थात् आपणां सर्वांमुळेच हे शक्य झालं..!

ख-या अर्थानं दिवाळी साजरी होईल आता त्यांची…

पण… पण… हे सर्व करायला मी अन् मनिषा सोबत होतो… !
मशीन्स आणि स्किल्स आमची होती, कच्च्या मालाला लागणारं भांडवल आम्ही घातलं होतं…

ऊटण्याचा अमाप खप होवुनही, आम्ही नाखुषच आहोत, कारण उद्या स्वतंत्रपणे भिक्षेकरी हे ऊटण्याचं काम करु शकतील का ? तर नाही..! त्यांना माझ्यावर अवलंबुन रहावंच लागेल…तेच तर नकोय मला..!

मग असं काय करता येईल ? ज्यात मशीनचा वापर फार नाही… कच्च्या मालाचं जास्त अवडंबर नाही… स्किल ची फारशी गरज नाही… कुणावर फारसं अवलंबुन रहायची गरज नाही, भांडवल घालायची फारशी गरज नाही… तरीही माझ्या या भिक्षेक-यांना खुप फायदा मिळेल…

असा व्यवसाय मी शोधतोय… पण सापडत नाहीय..!

असा एखादा व्यवसाय सापडेल असं रोज स्वप्नं मी पहायचो… आणि त्या दिवशी नेमकी माझी झोप उडायची… अर्थात् स्वप्नंही अधुरंच…

डोक्यात सतत हाच विचार..!

एके दिवशी शुन्य कचरा प्रकल्पाचे जनक, माझे ज्येष्ठ स्नेही आदरणीय कौस्तुभ ताम्हणकर यांना भेटण्याचा योग आला… त्यांनी आयडीया दिली… प्लास्टिक च्या कॅरी बॅग पासुन पॅकींग मटेरीअल बनवायचे…

ऐकुन बस्स मी आनंदानं वेडा झालो… मला मार्ग सापडला…

ताम्हणकर सरांची आयडीआ आणि वर थोडं माझं डोकं वापरुन मी भिक्षेक-यां साठी खालील प्लॅन बनवलाय…

  1. रस्त्यात, घरात पडुन असलेल्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्ज गोळा करायच्या.
  2. साधारण उशीच्या कव्हरच्या आकाराची एक हलक्या कापडाची बॅग किंवा जेवणाच्या पार्सलसाठी वापरतात त्या सिल्व्हर पेपर पासुन तयार केलेली बॅग… (या बॅग्ज रेडीमेड मिळतात) आणायची… यात या सर्व प्लॅस्टिक कॅरीबॅग्ज खोचुन भरायच्या आणि पिशवीचं तोंड बंद करायचं.
  3. थोडक्यात काय तर एक उशीच बनवायची, पण आत कापुस नसेल, असतील फक्त टाकावु प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगा…

4.आता याचा उपयोग काय?
तर.., जे कारखानदार नाजुक वस्तु बनवतात, ते या नाजुक वस्तु बॉक्समध्ये भरतांना फुटु नये म्हणुन बाजुला थर्माकोल ठेवतात, जेणेकरुन या नाजुक वस्तु फुटु नयेत…

पण… सध्या थर्माकोल वर सुद्धा बंदी आहे… त्यामुळे मालाची वाहतुक करतांना या वस्तु न फुटता कशा न्यायच्या या विचाराने ते त्रस्त आहेत..!

मग…? मग काय आमच्या या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्ज च्या ऊशा त्यांना स्वस्तात विकायच्या..!

याचा ऊपयोग ते बॉक्समधल्या वस्तु (टिव्ही, फ्रिज, काचेची भांडी…इ…) वाहतुकीत फुटु नयेत यासाठी बॉक्स पॅक करतांना बाजुला ठेवतील… वस्तु सुरक्षित आणि ते निश्चिंतही!

आम्हाला या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्ज कशा मिळतील?

  1. लोक पेपरची रद्दी विकतात, तसे आपल्या घरातल्या टाकावु कॅरीबॅग्ज आम्हांस विकतील (किंवा देणगी म्हणुन आम्हांस मोफत देतील ?)
  2. भंगार माल गोळा करणारे लोक कधीही प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्ज उचलत नाहीत, कारण त्या कुणी विकत घेत नाहीत. या भंगार माल कामगारांकडुन आम्ही या पिशव्या विकत घेवु.
  3. विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांना आणि स्वयंसेवी वृत्तीने काम करणाऱ्यांना आवाहन करु… जिथे रस्त्यात, कचराकुंडीत प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्ज दिसतील, तिथुन उचलुन आम्हाला विका किंवा दान करा..!

म्हणजे कुठंही न जाता आमच्याकडे आम्हाला लागणारा कच्चा माल अल्प दरात मिळेल.

आणि आम्ही त्याच्या ऊशा बनवुन छोट्या, मोठ्या कारखानदारांना विकु…

अशा कॅरीबॅग्ज च्या उशा विकुन काय काय साध्य होईल…?

  1. माझ्या भिक्षेक-यांच्या हाताला काम मिळेल, त्यांना पैसा मिळेल. ज्यात मशीनचा वापर नाही, स्किल्स लागत नाही, भांडवल विशेष नाही, शिवाय कच्चा माल घरपोच मिळणार.
  2. घरातल्या प्लॅस्टिक कॅरीबॅग्ज लोकांनी आम्हाला दिल्या तर लोक रस्त्यावर त्या फेकणार नाहीत, म्हणजे रस्त्यावर जमा होणारा प्लॅस्टिकचा होणारा कचरा शुन्य
  3. भंगारमाल गोळा करणाऱ्यांनी उकिरड्यातल्या बॅग्ज वेचुन आम्हाला विकल्या तर, त्यांना पैसा मिळेल, शिवाय गायी आणि इतर प्राण्यांच्या पोटात या कॅरीबॅग्ज जाणार नाहीत.

4 कारखानदारांना थर्माकोल चा प्रश्न जाणवणार नाही. वस्तु सुरक्षित राहीलच शिवाय थर्माकोल पेक्षा खर्च कमी. आणि या उशीचा वापर एकदा नाही अनंत वेळा होवु शकतो.

  1. मा. पंतप्रधानांनी जे स्वच्छ भारत अभियान राबवलंय, त्याला ख-या अर्थानं भारतवासीयांचा “हात” लागेल… कारण सर्व गोष्टींवर उत्तर आहे, पण प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्ज वर नाही..!

देशाची ही अशा प्रकारे केलेली एक सेवाच ठरेल…

हे सगळं डोक्यात सुरु आहे… रोज हे स्वप्न पाहतोय, पण सत्यात उतरत नाही… कारण पुण्यात माझ्याकडे जागा नाही, हे सर्व सत्यात उतरवायला..!!!

असो, बघु, जागा मिळाल्यावर, पुनश्च आपणांस कळवेनच..!

या विचारापर्यंत पोचायलाही खुप अडचणी आल्या… पण बरं झालं… वाटेत ऊन्हं होती म्हणुन मी आणि मनिषा चालत तरी राहिलो रस्त्यावरून… वाटेत सावली मिळाली असती तर जरा वेळ बसु म्हणुन तिथंच सावलीखाली बसुन रेंगाळत राहीलो असतो… आणि… अजुन वेळ लागला असता इथपर्यंत पोचायला..!

प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्ज पासुन बनलेली ही ऊशी… कितीतरी जणांची डोकेदुखी कमी करायला मदत करेल…

पैसा मिळतोय म्हणुन भिक्षेकरी खुष,
माल कमी खर्चात पण सुरक्षित जातोय म्हणुन कारखानदार खुष,
घरातल्या कॅरीबॅग्ज चा कचरा खपला म्हणुन सामान्य माणुस खुष,
भंगार माल वेचणारे पैसे कमवुन देणारा नवीन ऊद्योग मिळाला म्हणुन खुष,
स्वच्छ भारत अभियान ख-या अर्थानं राबतंय म्हणुन पंतप्रधान खुष…

सगळ्यांना खुष करणारी ही ऊशी जादुचीच नाही का?

असो, आता मी काय करणार…?

तर… प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग्ज पासुन बनवलेली ही माझी “जादुची ऊशी” डोक्याखाली घेवुन भिक्षेकरी ते कष्टकरी हे स्वप्नं पहात राहणार… जागा मिळेपर्यंत..!!!

जागेपणी आणि पुर्ण शुद्धीत पाहिलेलं हे स्वप्नं आहे… झोपेत नाही… म्हणुन पुर्ण होण्याची खात्री आहे…

आणि तुम्ही आहातच की सोबत..!!!

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*