त्या दोघी..! एकीचं वय असावं अंदाजे ९० वर्षे आणि दुसरीचं असावं ८० वर्षे..!
यांचं भीक मागायला बसायचं ठिकाण कुठं एकच नाही… कुठंही भेटतात या… पण जीथं भेटतात, तीथं दोघीही एकत्र !
शरीरं दोन पण मन एकच, वेदना एकच, इच्छा एकच, आनंद एकच… इतक्या एकरुप !
दोघीही एकमेकींच्या कुणीच नाहीत, नात्यानं..!
दोघी एकमेकींना सावरत एका झोपडपट्टीत एका शेडखाली राहतात…
यांच्या या “घराला” छप्पर आहे पण भिंती नाहीत, यांच्या घराला कुठलीही मर्यादा नाही, आणि म्हणुनच कदाचीत दुस-यावर “अमर्याद” प्रेम करणं यांना जमलं असावं…
ज्यांच्या घरांना सुरक्षित भिंती असतात, ते लोक प्रेमही “मर्यादीतच” करतात ! हातचं राखुन..!
भिंत सुरक्षितता देत असेल, पण त्याचबरोबर मर्यादा आखुन देते, आपण या मर्यादा पाळण्यात आयुष्य “घालवतो”, आणि हे लोक मर्यादा न पाळताही आयुष्य “जगतात”…
आपलं आयुष्य नुसतंच लांब – रुंद…पण यांचं आयुष्य खोल..!
आपलं आयुष्य उथळ… म्हणुन खोटी नाती जपण्याचा किती खोटा “खळखळाट” आपण करतो…
यांची आयुष्यं फाटकी असली तरीही खोल असतात, म्हणुन यांच्या नात्यांचा आवाज येत नाही… खोटं खोटं नातं जपण्याची इथं कुठलीही दिखावु “खळखळ” नसते, असते ती केवळ निर्मळ “तळमळ”..!!!
या “खोट्या खळखळीपासुन” ते “ख-या तळीमळीपर्यंत” पोचणं म्हणजेच आयुष्य असावं का..?
भांडताना माणुस जवळ असला तरी जोरात ओरडुन बोलतो… कारण शरीरं जवळ असली तरी मनं दुर गेलेली असतात…
माया करतांना मात्र हळु बोलुन किंवा न बोलताही ती व्यक्त करता येते… कारण माणसं दुर असली तरी मनं जवळ असतात… जवळजवळ असणाऱ्या मनांना ओरडुन बोलायची गरजच पडत नाही…
तशाच “या दोघी”…
मनानं एकमेकींच्या अत्यंत जवळ… कुठलंही नातं नसतांना !
औषध देताना एकीला विचारलं काय होतं ? तर दुसरीला ही नेमकं तेच होत असतं…
एकीचं डोकं दुखत असेल तर दुसरीचंही नेमकं डोकंच दुखत असतं…
गुडघेदुखीच्या गोळ्या “हिला” दिल्या तर “तीलाही” त्याच हव्या असतात…
सुख , दुःख, आनंद दोघीही एकत्र “उपभोगतात” आपण मात्र निव्वळ “भोगत” असतो…
माझं आणि यांचं नातं… शब्दांच्या पलीकडचं…
मी गंमतीनं म्हणायचो… “म्हातारे, मेल्यावर काय दोघी एकत्र वर जाणार आहे का?”
तर म्हणायच्या, “हो… ! दोगीबी आमी संगटच जाणार हाय..!!!”
मी हसत म्हणायचो, “तुमी एकत्रच एका विमानात बसुन वर जाणार…”
दरवेळी भेटल्या की मी अशी खुप थट्टा मस्करी करायचो यांची…
मधल्या काळात बरेच दिवस भेटल्या नाहीत..
आजुबाजुला चौकशी करायचो, पण कुणालाच काही माहिती नव्हतं… कुणाला माहिती असण्याचं कारणही नव्हतं… वाळुन चिपाड झालेल्या म्हाता-या भिक्षेक-यांची किंमत कोण करेल ?
खुप दिवसांनी आज मला “ती” एकटी दिसली… बाजुची जागा रिकामी होती… मी चरकलो… तीची नजर शुन्यात होती..!
मी दबकत गेलो, म्हातारे मी आलोय म्हणत तीचा हात हातात घेतला…
सुरकुतलेल्या हातांनी माझे दोन्ही हात हातात घेत तीने रस्त्यावरच टाहो फोडला… “ती ग्येली रं लेकरा… आपल्याला सोडुन ग्येली..!!!”
तीचा तो व्याकुळ आवाज ऐकुन रस्त्यानं जाणारे लोकही थबकले… माझ्या गळ्यात पडुन ती हंबरडा फोडुन रडायला लागली..!
“ती” गेल्याचा घाव “या” आजीला सोसवेना… ती अक्षरशः वेदनेनं कळवळुन रडत होती…
साहजीकच माझाही बांध फुटला..!
माझ्या गालावरनं हात फिरवत रडत म्हणाली, “तु म्हन्ला व्हता ना, दोगीबी संगट जानार म्हनुन… मंग आता का मला फशीवलं तीनं..? सांग की… सांग की रं बाबा..!”
काय उत्तर देवु ?
निसर्गानं खरंच का केलं असेल असं ? कुणाला विचारु मी तरी ?
मी कशी जगु..? तीच्या प्रश्नावर काय प्रतिक्रिया देवु..? काहीवेळा साध्या प्रश्नांना उत्तरं नसतात… !
तीचा आधीच सुरकुतलेला चेहरा अजुन आकसला होता… चेह-यावरच्या प्रत्येक सुरकुतीत वेदना भरली होती… आणि मी असहाय..!
मी तीला म्हटलं, “आज्जी तु आता इथं नको राहु… मी तुझी कुठंतरी सोय करतो दुसरीकडं…”
ती डोळे पुसत म्हणाली, “मी “ती” ला सोडुन कुठंच येणार नाही..!”
चाचरत म्हटलं, “अगं ती तर गेली की आता… तु…”
माझे शब्द तोडत, तीने बाजुच्या रिकाम्या जागेकडं बोट दाखवलं आणि त्याच करुण आवाजात रडत बोलली… “ती काय “ती” तिथं झोपलीया, तीला सोडुन कशी येवु मी?”
व्यवहारी जगात स्वच्छ डोळे घेवुन मिरवणारा मी… मला ती जागा रिकामीच दिसली… भकास झालेल्या डोळ्याच्या खोबणीतुन, अंधुक झालेल्या नजरेतुनही तीला मात्र “रिकामी” झालेली जागाही “भरलेली” दिसत होती… “ती” च्या आस्तित्वानं…
नुसतं डोळे असुन चालत नाही… नजर असावी लागते, याची पुन्हा मला जाणिव झाली…
तीने माझे दोन्ही हात पकडले होते, एक हात सोडवत, मी माझ्या खिशात घातला…
पेट्रोल भरण्यासाठी मी ८०० रुपये वरच काढुन ठेवले होते… मी ते काढले आणि तीच्या हातात सरकवले…
तीनं ते अंधुक नजरेनं नीट न्याहाळले… आणि परत माझ्या हातात ठेवत म्हणाली… येवड्या पैशानं ती परत येनार हाय का ?
तीची रोखुन पाहणारी नजर मला बोचुन गेली…
डोळ्याच्या खोबणीतुन पुन्हा अश्रु एकमेकांशी स्पर्धा करत धावु लागले…
एरव्ही दोन पाच रुपयांवरही झडप घालणारे लोक आपण पाहतो…
पण आज या नोटांनाही किंमत नव्हती तीच्या लेखी..!
लोकं आयुष्यभर पैसं पैसं करत “मान्सं” गमावत्यात… आनी ही बाई गेलेल्या मान्सासाठी पैसं गमावत होती…
तीला कळत होतं मान्साची किंमत “मानुस” आसन्यातच आस्ती…
नोटांनी माणसं न्हाई “कणसं” मोजत्यात..!
अशिक्षित माणसांना हे तत्व कळले, सुशिक्षितांना केव्हा कळणार ?
नुसता मेंदु असुन उपयोग नसतो, तो कुठं आणि कसा वापरायचा हे ठरवण्यासाठी “हृदयच” असावं लागतं..!!!
मी पुन्हा कळवळुन तीला म्हटलं, “चल की, इथं एकटी नको राहुस..!”
भकास हसत ती म्हणाली, “मी येकटी न्हाय बाबा… माज्यावर लय मोटी जबाबदारी हाय… मी जाताना “तीला” सबुद दिलाय..!”
“म्हणजे..? मला कळलं नाही…”
मी जे विचारलं त्यावर तीने जे सांगीतलं त्यानं मी शहारुन गेलो…
जी आज्जी गेली होती, त्या आजीने एका रस्त्यावर सापडलेल्या अपंग आणि मतिमंद मुलीचा सांभाळ करत तीला मोठं केलं. या मुलीला कळत काहीच नाही.
डॉक्टरांनी तीला Special Child म्हणुन जाहिर केलंय आणि कोणत्याही क्षणी ती “जावु” शकते असंही सांगितलंय.
गेलेल्या या आजीनं मुलीची काळजी घ्यायला या मागं उरलेल्या जीवंत आज्जीला जातांना शपथ घातली होती…
आणि उरलेल्या या जीवंत आजीनं जाणाऱ्या आज्जीला वचन दिलं होतं…
“मी जित्ती हाय तवर या पोरीजवळच -हाईन, तीला सोडुन कुटंच जाणार न्हाई..!!!”
मी आ वासुन ऐकत राहीलो…
यांचा स्वतःचा ठिकाणा नाही… भीक मागत जगतात…
दुस-याचं लेकरु एक आज्जी सांभाळते… जातांना आपली जबाबदारी दुसरीवर टाकुन जाते…
आणि दुसरी आजी क्षमता नसतांनाही केवळ दिलेला शब्द पाळायचा म्हणुन जीवापाड ती जबाबदारी उचलते..!
मी या आजीची आणि मुलीची दोघींची व्यवस्था करु शकतो, पण दोघींना वेगवेगळं ठेवावं लागेल, सध्याच्या परिस्थितीत दोघींचंही आयुष्य कमी आहे… सध्या एकमेकींच्या आधारानं त्या जगताहेत… वेगवेगळं ठेवलं तर दोघीही जास्त दिवस जगणार नाहीत..!
शिवाय एका आज्जीनं दुस-या आज्जीला जाताना शब्द दिलाय, मी जित्ती हाय तवर हिला सोडुन जानार नाही… तीच्या या शब्दाचा मान राखत तीचा स्वाभिमान मलाच जपायला हवा..!
“तु सांग बाबा… हिला सोडुन मी कुटं जावु? मी तीला सोडुन जानार न्हाई… माजं नसंल लेकरु… पन कुनाचं तरी आसंलंच की… खरी आई आस्ती तर लेकराला सोडुन गेली आस्ती का?”
मी भानावर आलो…
आता कळवळुन गळ्यात पडुन रडायची माझी पाळी होती…
इथं सख्खी नाती पाळली जात नाहीत… ही दिलेल्या शब्दाखातर परकी नाती सांभाळते…
वेडी म्हणु या म्हातारीला की अजुन काही म्हणु ?
शहाणपणाचं वेड पांघरता येतं… वेडं असण्याचं नाटक नाही करता येत..!
त्यासाठी वेडंच असावं लागतं… आणि हे वेड भाड्यानं किंवा उधार मिळत नसतं…
हे वेड रक्तातच असावं लागतं… आणि इतकी वेडी एक आईच असु शकते… !!!
मी तीच्या जवळ बसलो… माझ्याच डोळ्यात घळाघळा पाणी..!!!
इतका वेळ मलुल झालेली आज्जी माझ्या डोळ्यातलं पाणी पदरानं पुसत खंबीरपणानं म्हणाली… तु रडु नगो, मी हाय की…!!!
हे वाक्य बोलतांना मघाचा दीनवाणेपणा, चेह-यावर नावालाही नव्हता… होता केवळ एक आत्मविश्वास !!!
माझ्यासारख्या शरीरानं धडधाकट आणि शिकलेल्या माणसाला, आधाराशिवाय उभंही राहु न शकणारी ८० वर्षाची निरक्षर आजी मला सांगते… “रडु नगो… मी हाय की..!”
का कोण जाणे, तीच्या या वाक्याने तीच्या डोळ्यात मला “स्वामी समर्थ” दिसले..!!!
पोटभर रडुन झाल्यावर मी तिथुन निघालो…
जाताना म्हणाली, “दिवाळी हाय… तुला द्यायला चिवडा आणलाय…” पिशवीतनं तीनं चिवडा काढुन मला दिला…
मी बॅगेत ठेवला चिवडा, आणि निघालो…
पुन्हा काय तीच्या लक्षात आलं माहित नाही… इकडुन तिकडुन शोधुन एक दहा रुपयांची नोट तीनं काढली… हातात ठेवली… म्हणाली, “उंद्या लक्षुमी पुजन हाय… हे पैसं ठेव आणि पुज..!”
मला ती आजी, ती नोट आणि तो चिवडा यातलं काही काही दिसत नव्हतं… !
डोळे पाण्यानं काठोकाठ भरल्यावर मला तरी काहीच दिसत नाही, इतरांचं मला माहीत नाही !
मी वाकलो, तीला नमस्कार केला, न जाणो पुन्हा भेटेल न भेटेल म्हणुन… (असला अभद्र विचार माझ्यासारखी नालायक, दळभद्र माणसंच करतात)
पाया पडल्यावर तीने मला आशिर्वाद दिला, “म्हातारा हो..!”
या आशिर्वादाचा खरा अर्थ असा आहे की, “पुर्ण म्हातारा होईपर्यत जग… मध्येच सोडुन जावु नकोस… दिलेलं काम हातपाय थकुन म्हातारा होईपर्यत कर..!”
निघायचं मन होत नव्हतं, तरी निघालो…
नेहमीच्या सवयीनं जाताना थट्टा केलीच…
“म्हातारे… आता तु जाणार… तुझा नंबर आहे … काळजी घे..!”
ती मिश्किल हसली, म्हणाली… “आरं बरं झालं, तु आटवन केलीस, मी जानारच हाय… पन मी गेल्यावर माज्या पोरीची काळजी घे बरं का..! घेशील ना? माज्या माघारी तीला कुनीच न्हाई… तीचा भाऊ हो..!”
मी पुन्हा अंतर्मुख झालो…
एकीनं दुसरीवर… दुसरीनं तिसरीवर… तिसरीनं चौथीवर जबाबदारी टाकली… आणि आता माझ्यावर ही जबाबदारी येवुन पडली…
हरकत नाही..!
पुन्हा गंमतीनं म्हणालो, “फुडल्या आटवड्यात येतो भेटायला… मरु नको हां..!”
ती म्हणाली, “मी मरत न्हाय लवकर… मी दिल्याली नोट पुज उद्या माजी गरीबाची..!”
“गरीबाची” हा शब्द बोचला मला…
मैत्रीणीवर जीवापाड प्रेम करणारं गरीब कसं असु शकतं..?
दुस-याचं लेकरु सांभाळणारी आई गरीब कशी असु शकते ?
मला १० ची नोट नातु म्हणुन देणारी आज्जी गरीब कशी असु शकते ?
नोट देतांना तीचा हात वर होता, आणि माझा हात खाली…
माझा हात आज खाली असण्याचा मला अभिमान आहे… आनंद आहे..!
मला हेच अपेक्षित आहे… माझ्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींचा हात देणारा व्हावा..!!!
मी मनात म्हटलं… “म्हातारे… तु गरीब कसली..? आम्ही सगळे गरीब… मी एक भिकारी…. आणि तु..?”
“तु माझी लक्षुमी आई..!”
“लक्षुमी पुजन लोकं उद्या करतीलच… मी आजंच करतोय… कारण तुच माझी लक्षुमी…!!!”
“माझा नमस्कार घे…”
तीला काय कळलं माहीत नाही… पण पदराआडुन ती एव्हढ्या दुःखातही खुसुखुसु हसत होती…
देव प्रसन्न होणं यालाच म्हणत असावेत का ?
जातांना, “नीट जा बाळा” म्हणत तीनं हात उंचावला… यालाच “आशिर्वाद” म्हणत असावेत का?
काही असो…! माझं लक्षुमी पुजन मी माझ्या परीनं कालच केलं होतं…
आणि भविष्यात येणाऱ्या भाऊबीजेसाठी सुद्धा मी आत्ताच सज्ज झालो होतो…!!!
Leave a Reply