दिवाळी..!!!

रॉबिनहुड आर्मीचे राठी साहेब यांचा पाडव्याच्या दिवशी 8 तारखेला रात्री फोन आला, “डॉक्टर, परिहार चौक औंधजवळ एक वृद्ध गृहस्थ बरेच दिवस पडुन आहेत, काही करता येईल?”

“बघतो सर…” मी मोघम बोलुन गेलो..!

९ तारखेला भाऊबीज…

मनिषाला माहेरी जायचं होतं भावांकडे, पण भिक्षेक-यांची खुप कामं होती, त्यामुळे तीला जाता नाही आलं…

मीच तीला जावु नको म्हणालो, या गोष्टीची मलाही खंत होती… पण नाईलाज होता..!

आज १० तारखेला राठींनी सांगितलेल्या वृद्ध गृहस्थांना भेटायला गेलो…

एकावर एक सहा शर्ट, त्यावर लाल स्वेटर… उजवा पाय खुब्यातुन मोडलेला… आणि अंडवृद्धीचा त्रास..!

अंगातुन वास, वाढलेल्या जटा, डोक्यात किडे, दाढीत किडे… अंगावर दोन तीन इंचाचा कळकट्ट मळ, पसरलेला भयानक दुर्गंध… वाईट्ट अवस्था!

जवळ जावेना… पण दोघेही गेलो… अगम्य भाषा..!

आम्ही काय बोलतोय त्यांना कळेना… ते काय बोलतात आम्हाला कळेना..!

राठींना फोन करुन झाला प्रकार सांगीतला, ते म्हणाले, “ते बाबा ओरिसाचे आहेत, त्यांची भाषा उडिया…”

त्यांनी मग उडिया भाषा जाणणारा संजीब नावाचा एक रॉबिन मदतीला धाडुन दिला…

आणि मग आमचा संवाद चालु झाला… संजीबच्या माध्यमातुन…

हे बाबा मुळचे ओरिसाचे… आईवडील अचानक गेले… आघात सहन झाला नाही… भरकटत इकडे आले….. कसे…? काय..? याचा त्यांनाही पत्ता नाही… बस्स आले..!

मी फक्त त्यांना एकच प्रश्न हात जोडुन विचारला, “झालं ते झालं बाबा, सोय करु का तुमची कुठं? रहाल का तुम्ही?”

ते उडिया मध्ये “हो” म्हणाले… संजीबच्या तोंडुन..!

त्यांचा होकार ऐकुन, बुलेटवर जावुन, पहिल्यांदा केस कापणा-या व्यक्तीला घेवुन आलो…

डोक्यातले आणि दाढीतले किडे पाहुन त्याने बाबांना हातही लावायला नकार दिला…

शेवटी हातापाया पडल्यावर दाढी आणि कटींगचे १५०० घेईन म्हणाला…

म्हटलं, “चालेल…”

दाढी – कटींग झाली…

कटिंग करतांना, आम्ही काय काम करतो हे कटींगवाल्यानं आम्हाला विचारलं… अर्थातंच सगळं सांगीतलं त्याला…

जातांना ५०० च्या तीन नोटा काढल्या आणि हातावर ठेवायला गेलो तर म्हणाला… “साब इस कामका आपसे पैसा लुंगा तो अल्लाह माफ नही करेगा मुझे..!”

मी चकीत होवुन पहात राहिलो… म्हटलं… “अरे भाई… तुम अपने काम का…”

मला तोडत म्हणाला… “साब आजतक मैने खुब काम किया, पैसा कमाया, सेवा पहली बार की है… हमको भी तो सेवा का मौका दो… सारा पुण्य आपही लेके जायेंगे क्या…?”

मिश्किल पणे बोललेल्या त्याच्या डोळ्यात आता पाणी साठलं होतं…

तो आला तसा गेला… “खुदा का बंदा” मला असा रस्त्यावरच दर्शन देवुन गेला..!

यानंतर मी रवी बोडकेंना फोन केला…

हा हक्काचा माणुस..!

म्हटलं, “यार रवी, एक बोलायचं होतं…”

माझं वाक्य पुर्ण व्हायच्या आत हा पठ्ठ्या म्हणाला… “सर पाठवुन द्या कोण असतील त्यांना..!”

मी काही बोललोही नाही, रवीला कसं कळलं असावं?

या मनीचे त्या मनी… हा वाक्प्रयोग मी ऐकला होता… आज पुन्हा एकदा अनुभवला…

बाबांची जागा रवीच्या निवारा केंद्रात फिक्स झाली…

हा रवी नावाचा “माणुस” म्हणाला, “मीच येतो सातारवरनं, पुण्याला… तुमी फक्त त्यांना तयार ठेवा…”

आता या बाबांना रवी येईपर्यंत शुचिर्भुत करणं गरजेचं होतं…

मी आणि मनिषा कामाला लागलो…

साबण, टॉवेल, ऊटणं, मोती साबण, फराळ आणि नविन कपडे..!

हो, दिवाळी आहे ना…?

मी आणि मनिषाने बाबांना ऊटणं आणि मोती साबणानं रस्त्यावरच आंघोळ घातली…

दिवाळीच्या शेवटच्या दिवशीचं हे “अभ्यंग स्नान” आमच्या कायम लक्षात राहील!

रस्त्यावरच टॉवेल गुंडाळुन, विश्वास म्हांबरे, यांनी नुकतेच दिलेले नविन कपडे बाबांना चढवले…

बघता बघता गलिच्छ दिसणाऱ्या व्यक्तीचं रुपांतर एका रुबाबदार व्यक्तिमत्वात झालं…

ही किमया मनिषाची..!

बाबांच्या डोळ्यात मनिषा बद्दलची कृतज्ञता स्पष्ट दिसत होती…

आम्ही एकमेकांची भाषा जाणत नव्हतो… पण तरीही जोडले गेलो होतो, अनामीक नात्यानं..!

रस्त्यावर बाबांना आंघोळ घालतांना मनिषाच्या डोळ्यात वारंवार अश्रु येत होते, मी खुणेनंच तीला विचारलं, “काय झालं..?”

ती एव्हढंच म्हणाली… “माहेरी जाता नाही आलं म्हणुन मला वाईट वाटत होतं… पण या बाबांच्या रुपात मला माझे भाऊही दिसले आणि माझे वडिलही..! माहेरी न जाताही मला माहेर मिळालं..!” तीने हुंदका आवरला..!!!

या बाबांना यातलं काय कळलं कोण जाणे… पण त्यांनी प्रसन्न मुद्रेनं मनिषाकडं पाहिलं..!

साधारण चार वाजता रवी बोडकेही सपत्निक आले…

या दोघांनीही बाबांना आपलेपणानं धीर दिला, आम्ही तुमची मुलं आहोत, आणि मुलांप्रमाणंच आयुष्यभर सांभाळ करु असा विश्वास दिला… अर्थात् वागण्यातुन…

कारण त्यांची भाषा कुणाला येत होती इथं…?

त्या बाबांनाही ते कळलं असावं… कारण ते आमच्याकडं आळीपाळीनं पाहुन हसत होते…

त्यांचं ते गुढ हसणं पाहुन, क्षणभर मला वाटलं कुणीतरी, कुणाच्या तरी रुपात येवुन परीक्षा घेतंय आमची!

शेवटी रवी आणि त्यांच्या पत्नी बाबांना आपल्याबरोबर घेवुन निघुन गेले साता-याला…

रिकामा झालेला फुटपाथ पहात आणि बाबांचं हसु आठवत मी आणि मनिषा तिथंच थांबुन राहिलो..!

आमचा दिवाळसण ख-या अर्थानं आज साजरा झाला… अभ्यंग स्नान झालं, उटणं लावुन आंघोळ झाली, फराळ झाला, नवी कपडे झाली… भाऊबीज झाली…

बाबांच्या डोळ्यात पेटलेल्या आशेच्या दोन पणत्या पाहिल्या… आणि बाबांच्या चेह-यावरचा आनंद पाहुन, आमच्या मनात फटाके फुटत होते…

आकाशातला कंदिल अजुन प्रकाशमान झाला होता…

दिवाळी दिवाळी म्हणजे काय असते… इतके दिवस पहात होतो, आज अनुभवली..!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*