आज बालदिन… माईंचा वाढदिवस..!
माईंचा आशिर्वाद घ्यायला गेलो… पहिला प्रश्न, “मनिषा कशी आहे रे बाळा… आणि सोहम..?”
माईंच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सासवडच्याही पुढील गावात होता… म्हणाल्या, “एव्हढ्या लांब आलास..? काम सोडुन..?”
मी म्हटलं, “माई, इंधन संपलं कि इंधन भरायला यावंच लागतं… तसा इंधन भरायला आलोय… तुम्ही माझं इंधन आहात… ऊर्जा कमी पडायला लागली की इथं ऊर्जा घ्यायला येतो… तुम्हीच माझी ऊर्जा आहात…”
त्या हसल्या…
मी नमस्कार करुन पायाजवळ बसलो… मला जवळ घेत म्हणाल्या, “खाली नको बसु, इथं ये माझ्याशेजारी…”
म्हटलं… “माझी तेव्हढी लायकी नाही, ती निर्माण झाल्यावर बसेन मी शेजारी… आणि मला वाटत नाही कि या एका जन्मात ती मला मिळेल..! तोपर्यंत बसतो खालीच..!!!”
आईच्या मायेनं त्यांनी गालावरुन हात फिरवला….
म्हणाल्या, “तु भिक्षेक-यांसाठी इतकं करतोस… मी पुर्वी भीक मागायचे; माझ्यावेळी जर मला भेटला असतास तर माझ्या आयुष्याची एव्हढी परवड नसती रे झाली बेटा..!”
माझ्या अंगावर सर्रकन् काटा आला…
माझे डोळे पाणावले… “माई…” मी पुढचं वाक्य बोलु शकलो नाही….
म्हणाल्या, “डोळ्यात पाणी कशाला बेटा? अरे तेव्हा भेटला असतास तर मग तु माझा “बाप” झाला असतास की रे बेटा…” असं म्हणुन त्या खळखळुन हसायला लागल्या..!
मी म्हटलं, “माई, रडवु नका आता… उलट तुमच्या पंखाखाली यायला मी आत्ताही “अनाथ” व्हायला तयार आहे..!!!”
यावर त्या गंभीर झाल्या, म्हणाल्या… “नको रे बेटा अनाथ होणं केव्हाही वाईटच… तु असाही माझ्या पंखांखालीच आहेस..!”
“माझ्या पंखांच्या छायेत जरुर रहा… पण तिथंच रमु नकोस, स्वतःचे पंख निर्माण कर आणि ते इतके बळकट कर की तुझ्या पंखांची सुद्धा एक सावली निर्माण व्हावी..!”
माई गर्भित अर्थाच्या रुपानं मला काय सांगु इच्छितात हे मला चांगलं कळत होतं..!!!
“होय माई, तुम्ही आशिर्वाद द्या…” मी आपसुक बोललो…
यावर त्या काहीच बोलल्या नाहीत… मिश्किल हसत, त्या उठायला लागल्या… उठतांना माझ्या खांद्यावर हलकासा दाब देवुन उठायला लागल्या…
उठताना माझ्याकडे पहात म्हणाल्या…
“ओझं दिलं रे बाबा तुझ्या खांद्यावर…”
ज्या पद्धतीनं त्या हे वाक्य बोलल्या त्या वाक्याचा दिसतो तितका साधा सरळ अर्थ नाही… हे ही मला जाणवलं…
मी झट्कन् बोललो… “हे “ओझं” नाही माई “जबाबदारी” आहे…. आणि या जबाबदारीला “वजन” नक्कीच आहे… पण याचा मला “बोजा” कधीच नाही वाटणार..!!!
यावर त्या दिलखुलास हसल्या… आणि कानाजवळ येत हळुच म्हणाल्या… “मला माहित आहे, म्हणुनच मी “ते” तुझ्या खांद्यावर टाकलंय..!”
मी पहात राहिलो… त्या निघुन गेल्या…. मी पुन्हा त्या मुर्तीला नमस्कार केला..!
खांद्यावर पुन्हा कुणाचा तरी हात आहे असा भास झाला..!
मी ही मग ते “हात” तसेच माझ्याबरोबर घेवुन पुढे निघालो… भरल्या डोळ्यांनी… माईच्या पाऊलखुणांना नमस्कार करत…!!!
Leave a Reply