हा एक तरुण… तिशीतला ! भिक मागायचा…
मिनतवारी करुन गाड्या पुसण्याचं काम करायला याला भाग पाडलं..!
सकाळी आता गाड्या पुसतो… पण, सकाळचं काम संपलं की दुपारी आणि संध्याकाळी पुन्हा भिक मागायला हजर..!
उरलेल्या वेळेत याला अडकवलं तरच याची भिकेची सवय जाईल!
बोलतांना कळलं, याला दाढी कटींग करता येते… याही कामाला त्याला तयार केलंय… सर्व सामान घेवुन दिलंय…
आता पुढील सोमवारपासुन स्वारगेट परिसरातल्या वर्दळीच्या भागात, रस्त्यावर एका बाजुला हा व्यवसाय सुरु करेल…
पहिला ग्राहकही मीच असेन…
रस्त्यावर दाढी कटींग करायची मज्जा काही औरच असेल नाही..?
मी ते अनुभवणार आहे..!!!
भिक्षेकरी म्हणुन तुच्छतेनं ज्याला सर्वजण “पहात” होते त्याच्याकडे आता कष्टकरी म्हणुन सन्मानानं सर्वांची “नजर” जाईल..!
या “पाहण्यापासुन”… “नजरेपर्यंतचा” प्रवास म्हणजेच माझं आयुष्य..!
असो…
इतकं सारं होतंय तरीही एक खंत आहेच मला…
मी ज्या प्रमाणात काम करतोय, त्या तुलनेत यश मिळण्याचं प्रमाण खुप कमी आहे…
शिवाय आज कामाला लागलेली मंडळी कायम काम करतच राहतील किंवा नाही याची खात्री नसते…
चार महिन्याच्या अथक कष्टातुन एखादी व्यक्ती काम करायला तयार होते… कदाचीत ती पण नाही..!
हे प्रमाण निश्चित वाढलं असतं…
माझ्याकडे आत्ता २० – २५ भिक्षेकरी (कुटुंबं) आहेत, ज्यांना बसुन काम हवंय… माझ्याकडे ते आहे सुद्धा…
“फेकुन दिलेल्या प्लास्टिकच्या कॅरीबॅग्ज पासुन उशा तयार करणे व थर्माकोल ऐवजी त्यांचा वापर करण्यासाठी कारखानदारांना विकणे…”
हे काम भिक्षेक-यांकडुन करवुन घेवुन रोजचा मेहनताना त्यांना देणे अशी माझी कल्पना!
हा प्रकल्प चालु झाला तर…
सुरुवातीला एकावेळी किमान २० कुटुंबात चुल पेटेल, आत्मसन्मानाची ज्योत पेटेल… कायमस्वरुपी !
आणि एकाचं ऐकुन दुसरा जॉईन होत राहील… भिक्षेक-यांना हक्काचं कामाचं ठिकाण मिळेल…
रोज निश्चित पगाराची हमी मिळेल…
बेभरवशाचं जगणं कमी होईल..!
पण… पण…
हा प्रकल्प चालु करु कुठं ? यांना बसवु कुठं ? कुठं मी काम करवुन घेवु यांच्याकडून ?
रस्त्यावर शक्य नाही, नाहीतर ते ही केलं असतं..!
जागेचा अभाव हा मुळ मुद्दा..!
माझ्याकडे स्वतःची जागा नाही…
सरकारी जागा पुण्याबाहेर आहेत…रोजचं जाणं येणं शक्य नाही !
ज्या पुण्यात आहेत त्या ही दोन तीन तासां साठीच वापरायला मिळतील… बाकी वेळ इतरही लोक ती जागा वापरणार… मग आमचा कच्चा माल आणि मशीन्स आम्ही त्या वेळेत ठेवायची कुठं?
खाजगी जागेचे भाडे किमान रु. ४०,००० – ५०,००० दर महिना… मला परवडणार कसं?
कधी वाटतं, नोकरी करत मी हे भिक्षेक-यांचं काम करायला हवं होतं…
कर्ज तरी मिळालं असतं…
कर्ज काढुन एखादी कमर्शिअल जागा विकत घेता आली असती…
नोकरी नाही, म्हणुन माझा तो ही मार्ग बंद..!
एक सर्वार्थानं परिपुर्ण बाणेर – पाषाण रोडवर अशी कमर्शिअल जागा माझ्या पाहण्यात आहे तीचा विक्रीचा दर एक करोड पेक्षा जास्त आहे… पण या कामासाठी ते ७२ लाखात ही जागा सोहम ट्रस्टला द्यायला तयार आहेत…
हा त्यांचा मोठेपणाच खरंतर..!
पण यांना कसं सांगु ?
अहो, भिक्षेक-यांचा “डॉक्टर” असलो तरी… डॉक्टरांमधला मी एक “भिकारीच” आहे..!
मला कुठं नेवुन विकलं तरी एव्हढे पैसे मिळणार नाहीत..!
आणि मला विकुन मिळणारच असतील पैसे जागेसाठी तर मी या “म्हाता-या माणसांसाठी” विकुन घ्यायलाही तयार आहे..!!!
Leave a Reply