स.न.वि.वि.
पत्रास कारण की…
एका बाबांना मदत करण्याविषयीचं आवाहन मी सकाळी ८.३० ला केलं होतं… १२.३० वाजेपर्यंत ६२१ जॉब ऑफर्स या बाबांसाठी मिळाल्या.
एका कंपनीत बाबांच्या राहण्या खाण्यापासुन नोकरीपर्यंतची सोय झाली आहे. या सद्गृहस्थांना माझा साष्टांग नमस्कार !
मी ऋणी आहे आपलाही !
कधी कधी माझाच मला हेवा वाटतो… आपणांसारखी “माणसं” मला मिळाली…
अर्थात् तुमची माझी भेट म्हणजे या म्हाता-या माणसांनी मला दिलेला आशिर्वाद असं मी समजतो !
पण या सर्व प्रक्रियेत एक प्रश्न मनात आला…
एका आवाहनाला प्रतिसाद म्हणुन चार तासांत ६२१ लोक नोकरी द्यायला तयार झाले…म्हणजे नोकऱ्या उपलब्ध आहेत तर…
तरीही मग समाजात ही बेरोजगारी का बरं असावी ?
सेवा देणारा आणि घेणारा दोघांच्यात असलेली दरी हे एक कारण असावं…
असो..!
लोक मला आणि मनिषाला म्हणतात… तुम्ही खुप मोठं काम करताय वैगेरे… पण खरं सांगु आम्ही विशेष काहीच करत नाही… डॉक्टर म्हणुन पेशंट चेक करणं हे आमचं कर्तव्यच आहे…
आणि पडलेल्याला हात देणं ही माणुसकी…
त्यात आम्ही विशेष काही करतोय असं वाटण्याचं काहीच कारण नाही..!
डॉक्टरने डॉक्टर सारखं वागणं आणि माणसानं माणसासारखंच जगणं यात काय कौतुक आहे..?
कौतुक आहे, आपल्यासारख्यांचं जे या कामात आम्हाला मदत करताहेत… निःस्वार्थपणे…
खरं काम पडद्याआड राहुन आपण करताय…
मी फक्त पोस्टमन…
हातात आलेलं पत्र योग्य पत्त्यावर पोचवणं हे पोस्टमनचं काम…
तुमची मदत, तुमच्या भावना नी प्रेम योग्य पत्त्यावर पोचवणं एव्हढंच माझं काम… आम्ही ते इमानानं करतोय इतकंच…
माझ्या या भिक्षेक-यांनी आपणांस केलेला नमस्कार एक पोस्टमन म्हणुन आपणांपर्यंत पोचवणं हे ही माझंच काम की..!
तर त्यांनी पत्राद्वारे पाठवलेल्या या आशिर्वादाचा आपण स्विकार करावा ही विनंती..!!!
Leave a Reply