एक बाबा… मेडिसीन घ्यायचे… आणि हळुच कानाजवळ यायचे आणि म्हणायचे… “डॉक्टर, तुमचा मोबाईल द्या ना एक मिनीट…” त्यानंतर त्यांच्याजवळच्या छोट्या डायरीत पाहुन कुठे कुठे ७ – ८ कॉल्स करायचे…
हे बाबा, सुशिक्षित आहेत, परिस्थितीच्या फे-यामुळं सध्या भिक्षेकरी वर्तुळात आहेत…
असो… तर मी यांचं हक्काचं फोन बुथ आहे..!
मला हे हळुच म्हणायचे, “डॉक्टर, मला पण एक मोबाईल घेवुन द्या की…” मी म्हणायचो… “मोबाईल घेवुन भिक मागणार का आता?”
“बाबा, काम करा काहीतरी मोबाईल पण घेवुन देईन… भिक मागणार असाल तर अज्जिबात देणार नाही..!”
खुप दिवसांनी बाबा हॉटेलात काम करायला तयार झाले, एका हॉटेलात काम मिळवुन दिलं… तीथं ते काम करायला लागले…
मी मुद्दाम हॉटेलात भेटायला जायचो… आणि दरवेळी ते आठवण करायते, “डॉक्टर, मोबाईल देताय ना..?”
मी हसत म्हणायचो… “हो… हो… देणार कि..!”
खरंतर मी या भिक्षेकरी आजी आणि आजोबांना काय देणार…?
यांनीच मला भरभरुन दिलंय..! लोकांचं प्रेम, कौतुन, मान सन्मान…
खुप लोक मला विचारतात, “हे काम करुन तुम्हाला काय मिळतं…?”
मी बिनदिक्कत ऊत्तर देतो, “मी मिळवत काहीच नाही… उलट खुप गमावतो..!”
मी खरंच या कामात खुप गमावलं…
एक तर मी माझा अहंकार “गमावला…”
दुस-याला हीन समजण्याची वृत्ती “गेली…”
एखादी गोष्ट पाहुन… “श्शी… घाण” म्हणण्याची माझी बोलती “गेली…”
किळस वाटणारी नजर “गेली…”
ज्या स्पर्शाला लोक गलिच्छ म्हणतात, तो गलिच्छ भाव मनातुन “गेला…”
“मी” कुणीतरी आहे… “माझंही” काही स्थान आहे… यातला “मी” गेला… “माझा” गेला… आता उरलंय… “तु, तुझं किंवा आपलं..!”
एव्हढं सगळं गमावलंय मी…
मी पुर्वी डॉक्टर होतो, ऑफिसर होतो, सर पण होतो, आणि साहेबपण होतो…
एका माणसाच्या चेह-यावर किती मुखवटे असतात ना..?
मी हे सगळे मुखवटे “गमावले” आणि सध्या “माणुस” म्हणुन जगण्याचा प्रयत्न करतोय…
भिक्षेक-यांच्या कामात अशा हजारो गोष्टी मी “गमावल्या” आणि एव्हढं गमावुन नुकताच “माणुस” म्हणुन जन्माला आलोय !!!
याच प्रवासात… आदरणीय शहिद हेमंतजी करकरे साहेब यांच्या कुटुंबियांशी निकटचा संपर्क झाला…
हे पण त्या भिक्षेक-यांचेच आशिर्वादच नव्हेत का ? नाहीतर माझी काय वैयक्तिक पात्रता…?
साहेबांचे बंधु आणि त्यांच्या पत्नी, सौ. अमृताताई करकरे या भिक्षेक-यांच्या कामातील प्रवासात मला भेटले !
मी यांना मोठ्या बहिणीच्या नात्यानं ताई म्हणतो..!
एकदा ताईंनी मनिषाला विचारलं… “वस्तुरुपात मदत तुम्ही घेता…?”
खरंतर औषधी किंवा वैद्यकीय वस्तु सोडुन इतर काही आम्ही घेत नाही..!
सवयीने मनिषा नम्रपणे त्यांना म्हणाली… “नाही, आम्ही वस्तु स्विकारत नाही…”
मी शेजारीच उभा होतो… झट्कन् विचार आला… करकरे साहेबांच्या स्पर्शाने पावन झालेल्या वस्तु या “वस्तु” नव्हेतच… ही तर स्मारकं..!
ही स्मारकं आम्ही वस्तुरुपात स्विकारली आणि योग्य त्या गरजु ठिकाणी दिली तर ही स्मारकं साहेबांच्या स्मृतीरुपानं जनमाणसांत वावरतील…
योग्यवेळी बी जमिनीत पेरायलाच लागतं…
मी ही साहेबांची स्मारकं समाजात पेरेन… प्रेरणा घेवुन, लाखात एखादं फळ तरी साहेबांसारखं रुजेल…
मी फट्कन् अमृताताईंना म्हटलं… “आम्ही या सर्व वस्तु, नव्हे, स्मारकं स्विकारु… मी स्वतः येवुन जाईन या वस्तु घ्यायला..!”
कधीही वस्तु न स्विकारणारे आम्ही, ताईंच्या घरी जावुन सर्व साहित्य स्वतः जावुन घेवुन आलो…
दोन टेम्पो भरतील इतकं सारं साहित्य अमृताताईंनी संस्थेला दिलं…
हे सर्व गाडीतुन आणताना मला वाटत होतं, कुबेरानं सारं धन माझ्या रथात टाकलंय आणि मी या रथाचा निव्वळ सारथी..!
आणलेल्या प्रत्येक वस्तुस नमन करुन, योग्य त्या गरजु मंदिरास आणि व्यक्तींना या सर्व वस्तुंचं वाटप केलं… नव्हे, ही सारी स्मारकं मनोभावे सांभाळण्याची जबाबदारी दिली…
घेणाऱ्या प्रत्येकाला या “स्मारकाचं” महत्व सांगितलं… आणि घेणाऱ्यानंही तितक्याच मनोभावे हा प्रसाद स्विकारला..!
अमृताताईंना सांगुन यातली एक वस्तु, साहेबांची आठवण म्हणुन मी माझ्याचकडे ठेवली आहे… हो, एक स्मारक जपण्याची जबाबदारी माझीही आहे..!
साहेब, आज आपण आमच्यात नाहीत ही एक “अफवा” आहे बिनबुडाची…
अहो आपण आजही आहातच आमच्यात… आणि ही आमची “श्रद्धा” आहे..!
अफवा पोकळ असते आणि श्रद्धा अभेद्य..!!!
आज आपल्या वस्तुंच्या रुपानं मी जनमाणसांत ही स्मारकं वाटलीत…
मला ती माझी जबाबदारी वाटली…
मी हे काम, या देशाचा केवळ जबाबदार पोस्टमन म्हणुन केलंय… माझी तेव्हढीच पात्रता…
ही स्मारकं आयुष्यंभर या लोकांच्या मनात राहतील आणि ही आपली “महत्ता”
आम्हां सर्व “भिक्षेक-यांकडुन” ही आदरांजली आजच्या या दिवशी आपणांस समर्पित!!!
तर…
ही सर्व स्मारकं वाटुन झाल्यानंतरही ताईंकडुन मिळालेले दोन मोबाईल मात्र माझ्याकडे उरले होते…
हे मोबाईल मी कोणत्या “पात्र” व्यक्तीस देवु… याचा विचार करत असतांनाच… “त्या” बाबांचा आवाज कानात घुमला… “डॉक्टर, तुमी मला मोबाईल देणार होता ना…?”
मी Samsung कंपनीचा हा मोबाईल चट्कन उचलला आणि “त्या” बाबांना देवुन आलो…
“बाबा, हा मोबाईल नाही, स्मारक आहे…” मी हातात मोबाईल ठेवत म्हणालो.
बाबांच्या डोळ्यात पाणी तरळलं… कपाळाला मोबाईल लावत त्यांनी कृतज्ञतापुर्वक आकाशाकडे पाहिलं…
बाबांकडनं साहेबांना मिळालेला हा मुक सलामच असेल..!
देशासाठी लढत शहिद झालेला एक अजिंक्य योद्धा आदरणीय शहिद हेमंतजी करकरे साहेब
आणि परिस्थितीच्या फे-यात अडकुन या वयातही आयुष्याशी लढत देणारे हे बाबा… हा दुसरा योद्धा..!
एका योद्ध्याची “ऊर्जा” मी दुस-या योद्ध्याला देण्याचा प्रयत्न करतोय…
या दोघांमधली ऊर्जा वाहुन नेणारी मी फक्त एक तांब्याची तार… याहुन माझं काही अस्तित्व नाही..!
या दोन्ही योद्ध्यांना माझा कडक सॅल्युट..! जयहिंद !!!
Leave a Reply