भिक्षेकरी… हा विषय पुर्वी खुप कमी बोलला जायचा, किंवा बोललाच जात नसे.
आपणां सर्वांच्या आशिर्वादातुन सुरु झालेल्या माझ्या या कामामुळे हळुहळु समाजात प्रबोधन होत आहे, सरकारदरबारी या विषयावर आता गांभिर्याने चर्चा होत आहे.
या दुर्लक्षित आणि वंचित घटकासाठी काहीतरी करायचंय अशी तळमळ सरकार आणि समाजातही निर्माण होत आहे.
भिक्षेक-यांचं पुनर्वसन हा विषय अत्यंत जिव्हाळ्याने राज्यसभेत आणि सुप्रिम कोर्ट इथेही चर्चिला गेला.
या सर्वांचा परिपाक म्हणुन ऍड. कर्णिका सेठ, सुप्रिम कोर्ट, श्री. खगेश गर्ग, संचालक, सामाजिक न्याय मंत्रालय, श्री. संजय कुमार, संचालक आश्रय यांच्याबरोबर भिक्षेक-यांचे पुनर्वसन या विषयावर साधक बाधक चर्चेसाठी नवी दिल्ली येथे मला बोलावले होते.
राज्यसभेतील घटनांचे वार्तांकन करणा-या राज्यसभा टि.व्ही. ने या चर्चेचे जाहिर प्रक्षेपण केले.
भिक्षेक-यांबाबत आपला नेमका दृष्टिकोन काय असावा, भिक द्यावी की नको, यांच्याशी कसं वागावं, भिक्षेकरी का निर्माण होत आहेत, सरकारचं आधीचं धोरण काय होतं… आत्ता या घटकासाठी काय करता येईल अशा अनंत प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली.
नुसतीच चर्चा झाली नाही, तर सरकार दरबारी याची नोंद झाली… आणि आता भिक्षेकरी घटकासाठी ठोस पावलं सेंट्रल गव्हर्नमेंट कडुन उचलण्याची तयारीही सुरु झालीय.
तुमच्या साथीनं “गल्लीतल्या” रस्त्यावरच्या “माणसांसाठी” सुरु केलेलं हे काम… “दिल्ली दरबारात” पोचलंय…
या सर्व प्रक्रियेत जर भिक्षेक-यांसाठी योजना निर्माण झाल्या, या माझ्या माणसांना “माणुस” म्हणुन समाजानं स्विकारलं… एखादा “भिक्षेकरी” जर “कष्टकरी” झाला तर तो दिवस माझ्यासाठी सर्वात मोठा असेल…
माझ्यादृष्टीने ही खरी “जीत” असेल…!
अर्थात याचं श्रेय आपणालाच, कारण मी एकट्याने काहीच केलं नाही… तुमची साथ नसती तर दोन पावलंही चालणं महाकठिण होतं माझ्यासाठी…!
वर्तमानातला “भिक्षेकरी” भविष्यात जर “कष्टकरी” झाला तर या विजयाचे आपणच मानकरी असाल हे कृतज्ञतापुर्वक आपणांस सांगावेसे वाटते.
लोक मला गंमतीनं विचारतात, “अहो डॉक्टर, मंदिराच्या पायरीचा दगड काढुन काय कळसाला लावणार आहात काय?”
अज्जिबात नाही… पायरीवरचा दगड पायरीवरच राहीला तरी हरकत नाही, मला या पायरीवरच्या दगडाला कळस बनवण्यात स्वारस्य नाही..!
या पायरीमुळेच आपल्याला आत प्रवेश मिळतो…
लोकं पायरीला हात लावुन नमस्कार करतात…
आणि कळसाला दुरुन..!
बस्स समाजातल्या “या” पायरीलाही कुणी नमस्कार करावा, तेव्हढी त्यांच्यात पात्रता यावी एव्हढ्याचसाठी माझा प्रयत्न…!!!
(अधिक माहिती जाणु इच्छिणाऱ्यांसाठी या व्हिडीओ ची लिंक पाठवित आहे… https://youtu.be/Sk2Q_AWSCbQ )
Kay bolu????
Nisshabd kelat sir aapan…. Thank you so much