मोल…

हे एक बाबा… मंदिराबाहेरच भिक मागायचे…

म्हटलं, “बाबा काम करा की काहीतरी…”

म्हणाले, “मी उकीरड्यातला घाण माणुस मला कोण काम देईल?”

म्हटलं, “उकीरडा घाण कुठं असतो…? तो असतो म्हणुन तर आसपास स्वच्छता असते..!”

लोकांना उकीरड्याची किंमत कळत नसेलही, पण उकीरड्यालाही नक्कीच मोल असतं…

रोज हवेतनं फुकट ऑक्सिजन घेतो… पण,

जीव जायची पाळी येते तेव्हा आय सी यु मध्ये हाच ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो…!

हवेतला मोफत ऑक्सिजन “मौल्यवान” …पण आय सी यु मधला “महाग” असतो बाबा..!

मौल्यवान आणि महाग यांत फरक आहे…!

ज्याला “मोल” नसतं… तो मौल्यवान … ज्याला “किंमत” असते तो महाग…!

“कळलं नाही डाक्टर…” बाबा म्हणाले!

“बाबा, पिंडीवरचा साप पुजला जातो… रस्त्यावर दिसलेल्या सापाला ठेचुन मारतात…”

“मंदीरातल्या देवीला लोकं लायनीत थांबुन साडीचोळी करतात… रात्री उशीरा रस्त्यात तावडीत “घावलेल्या” देवीची मात्र साडी चोळी काढतात…!”

“घरात उंदीर सापडला तर विष घालुन मारतात… पण गणपतीपुढच्या निर्जिव उंदराला मोदक भरवतात…”

“दगडाची मुर्ती बनवतात… आणि त्याच उरलेल्या दगडातनं पायरी घडवतात… एका दगडाला लोकं नमस्कार करतात आणि दुस-या दगडावर पाय ठेवतात…”

“गुलाबाचं फुल… देवाला भक्तीभावानं अर्पण होतं… त्याच झाडावरचं फुल… तिरडीवरही जातं… आणि त्याच झाडावरचं फुल वारांगनेच्या गज-यातही माळलं जातं…”

“किंमत कुणाला मिळते?”

“दोन हजाराची नोट… तिजोरीत बंद असते… एक रुपयाचं नाणं मात्र फिरत असतं… कधी भिक्षेक-यांच्या हातात… तर कधी सत्यनारायणाच्या ताटात…”

“बाबा, तुम्ही “किंमती” आहातच… पण “मौल्यवान” व्हा ना..!”

“मी नेमकं काय करु…?” बाबा तळमळीनं बोलले…

म्हटलं, “ज्या उकीरड्याची गोष्ट केली, तो उकीरडा साफ करा बाबा…”

“घाण करणारे लोक “घाण” असतात… दुस-याची घाण साफ करणारेच “महान” असतात..!”

“बाबा आपला “वापर” झाला की आपली “किंमत” ठरते… कुणाच्या उपयोगी पडलो तरच आपण “मौल्यवान” होतो..!”

“आपली “किंमत” ठरवायची का आपण “मौल्यवान” व्हायचं हे तुम्ही ठरवा बाबा…”

बाबा समजले..!

मंदिराबाहेरचा उकीरडा साफ करायला बाबांना विनंती केली…

त्यांनी तो साफ केलाही..!

या कामाचे मोल त्यांना मिळेल अशी व्यवस्था केलीय…

बाबा भिक मागत असले तरीही “किंमती” होतेच… आज उकीरडा साफ करण्याचं काम करुन ते “मौल्यवान” झाले..!!!

एक “भिक्षेकरी”, आज “कष्टकरी” झाला..!

1 Comment

  1. Khup khup abhinandan sir !!!!
    Proud of you and your wife ….
    Have you ever contacted Hanmantrao Gayakwad of BVG?i.e. Bharat Vikas Group… I think he could help you. Since I have heard you in Tendulkar Vyakhyanmala Kolhapur, I want to associate with you. And I’ll definitely do that after my board exams…
    Toparent all the very best Sir and Madam

Leave a Reply

Your email address will not be published.


*