माकडाला भेटलेली माणसं…!!!

“ऐ पोरा, हिकडं ये…” एक आज्जी हाक मारते… “काय गं?” मला वाटतं ती आजार सांगुन गोळ्या मागेल… तर म्हणते… “आरं जरा भांग बिंग पाडत जा की, केसं किती इस्कटल्यात?”

मी मिश्किल हसुन म्हणतो, “आगं म्हातारे, तुज्याशिवाय आता कोण बगायचंय मला ?”

ती म्हणते, “कुणी बगावं म्हणुन नसतंय बाळा चांगलं राह्याचं… कुणी बगत नसलं तरी आपण चांगलंच राव्हावं, चांगलंच वागावं…!”

ती हे बोलेपर्यंत दुसरी आज्जी येते आणि तीला म्हणते… “काय शिकीवती गं माज्या लेकाला आं…?”

आणि मग लेक कुणाचा आणि त्याला कुणी काय शिकवायचं यावर दोघींची लुटुपुटीची भांडणं चालु होतात…

आणि मी मात्र… “कुणी बगत नसलं तरी आपण चांगलंच राव्हावं वागावं या वाक्यानं अंतर्मुख होतो…!”

आपल्याला कुणी बघत असतांना आपण जे वागतो त्याला “Personality” म्हणतात… आणि आपल्याला कुणीही बघत नसतांना जे आपण वागतो त्याला “Character” म्हणतात…

माणसानं “Personality” सोबतच “Character” जपायचं असतं…

आजी किती सहज शब्दांत हे सांगुन गेली…?

कुणीतरी बघत असतांना आपण कसे वागतो ? कुणीही बघत नसतांना आपण कसे वागतो ?

कुणी बघत असतांना आणि कुणी बघत नसतांनाचं वागणं जर सारखंच असेल तर तो “चेहरा” नाहीतर “मुखवटा”…

आता चेहरा “घेवुन” जगायचं की मुखवटा “लावुन” हिंडायचं… ज्याचं त्यानंच ठरवायचं ..!

धुंद होणं वेगळं… मस्तीत असणं वेगळं… नशा वेगळी…
आणि उधळणं वेगळं…!

ज्यानं दुस-यांचा विचार केला तो “धुंद…”

जो आपल्या पायातली चप्पल दुस-याचा पायात घालतो ती “मस्ती”…

ज्याला “मी” कळत नाही फक्त “तुच” कळतो ती “नशा”…

आणि शर्यतीत जीव तोडुन पळतांनाही, दुस-याला पुढं जाण्याची संधी देतो, स्वतःचं जिंकणं जो उधळुन लावतो ते खरं उधळणं…!!!

एक रस्त्यावरची आजी… मी गंमतीनं म्हणतो, “काय आज्जे, आगं ह्यावर्षी तरी आंघोळ करशील का ?” यावर ती जशास तसं उत्तर हसत देते, “या वर्साला पाऊस कमी पडला, म्होरल्या वर्साला झाला चांगला तर करीन की…!”

हसता हसताच कुठंतरी खोलवर बघत म्हणते, “आंगुळीचं काय घिवुन बसलास बाबा, पावुस न्हाय म्हणुन, पीकं न्हाईत, झालीच पीकं तर भाव न्हाई म्हणुन शेतकरी फास लावुन घेत्युया… शेवटची आंगुळ घालायला पन गावाकडं पानी न्हाय… पानी पाटव म्हणुन देवाला टपाल धाडलं असतं पण त्येचा तरी “पत्ता” कुठंय…? आता वर जाईन, तवाच सांगीन…!”

थट्टेतनं सुरु झालेला हा विषय इथवर येतो…

ज्यांना समाजातली घाण समजलं जातं त्यांच्या जाणिवा किती समृद्ध आहेत ?

या शेतकऱ्यांशी खरंतर यांचा काहीही संबंध नाही… तरीही त्या “नातं” जपतात… आणि आपण अडकुन राहतो कोरड्या “Relationship” सांभाळण्यात… या “रिलेशन्स” ची “नाती” कधी होणार?

आपल्याला कुणी काही दिलं तर “ते” कितीचं असेल याचा आपण हिशोब लावत बसतो…
हिशोब लावला की ती वस्तु “गिफ्ट” होवुन जाते…

त्याचं मोल कळालं की तीची “भेट” होते..!

नुसतंच “देणं” वेगळं… आणि “समर्पण” वेगळं…!

हातचं राखुन ठेवणं हे “देणं”… देणारा हात च राखुन ठेवणं हे “समर्पण” !!!

चार आज्ज्या शेकोटी भोवती बसल्या होत्या… म्हटलं… “नीट बसा हाताला भाजेल…!”

त्यातली एक म्हणाली… “आजुन काय भाजायचं राह्यलंय…?”

“फरक इतकाच की आज शेकोटीभवती आहोत… उद्या सरणावर असु… भाजलेलं आज कळंल… पण उद्या कळणार न्हाई…”

“जिवंत हाय म्हणुन भाजतंय… मेल्यावर कशाला भाजंल?”

“आपल्याला भाजतंय मंजी आपन जीवंत हाय… मेलो न्हाय… हे काय कमी हाय का? कसं का आसंना, मानुस म्हनुन तरी जगलो…आभार बाबा त्या देवाचं…”

आपल्या छोट्या दुःखातही आपण किती हळहळतो…

आपल्याला भाजतंय म्हणजे आपण जिवंत आहोत याचा आनंद नसतो आपल्याला… उलट नशीबालाच शिव्या देतो आपण आणि ज्यांचं आख्खं आयुष्य जळुन गेलंय ते मात्र आयुष्याचे आभार मानतात… त्यांना जगवल्याबद्दल !

आयुष्यातला एकेक दिवस काटकीसारखा ते या शेकोटीला अर्पण करतात… जळुन धुर झाला तरी दुःख्खं नाही… आणि राख झाली तर संताप नाही…

यांच्या तोंडी असतात फक्त आशिर्वाद !!!

यांच्या दृष्टीनं शेकोटी, यज्ञ, होमहवन, आणि पेटलेली चिताही सारखीच..!

नावं आपण देतो…!!!

आणि याच नावांच्या गुंत्यात आपण आयुष्यंभर अडकुन राहतो, आणि ते मात्र मस्त लवलवणाया आगीच्या उबदार कुशीत स्वतःला झोकुन देवुन कृतज्ञ राहतात..!

आयुष्यात आगीबद्दल मला एक समजलं… जोपर्यंत सुख देते तेव्हा ती “उबदार” असते… हीच उबदारता वाढली की त्याची “धग” होते… धग वाढली की मग “भाजतं/ पोळतं”… भाजणं आणि पोळणं याची तिव्रता वाढली की मग ती “जाळते”..!

आपणच जर “आग” असु तर आपल्या आजुबाजुला असणाऱ्यांना उब द्यायची, धग द्यायची, चटके द्यायचे की जाळुनच टाकायचं हे ज्यानं त्यानं ठरवावं…!

या माझ्या भिक्षेक-यांनी मला हे शिकवलंय… मी ही शिकतोच आहे अजुन…!

मला हे शिकवताहेत… धुंद व्हायला, नशा प्यायला, थोडं थोडं उधळायला, दुस-यांना उब द्यायला, समर्पित व्हायला… !

पुर्वी “माकड” म्हणुन जगत होतो, आता मात्र मला या माझ्या भिक्षेक-यांनीच मी “माणुस” असल्याची जाणिव करुन दिली…!!!

1 Comment

  1. खुप खुप भारी …..
    जाणिवेची जाणीव आता हळूहळू होतीयेय ???

Leave a Reply

Your email address will not be published.


*