शप्पथ..!!!

रविंद्र नावाचा ५५ वर्षांचा एक गृहस्थ अशाच एका मंदिराबाहेर भिक मागायचा.

दोन वर्षांपुर्वी मला भेटला होता, पायानं अधु, खुरडत चालुन भिक मागायचा, मला भेटला, नेहमीच्या सवयीनं त्यानं माझ्याकडंही भिक मागीतली, म्हटलं “भिक नाही देणार, तुला “पायावर उभं” करतो, पाय दुरुस्त केले तर काम करशील का?”

तेव्हा तो हो म्हणाला !

मनिषा आणि मी रविंद्राला अनेक दवाखान्यात घेवुन गेलो, खुप पैसे खर्च झाले, पण… हळुहळु पाय सुधारत गेला.

आधी व्हिलचेअर दिली, मग कुबडी दिली, त्यानंतर काठी..!

नंतर, हळुहळु बीनआधारानं चालायला लागला, “स्वतःच्या पायावर”…

आता रविंद्रा काम करेल अशी आशा वाटायला लागली, आणि मध्येच डोळ्याला अंधुक दिसायला लागलं म्हणाला… झालं, दोन्ही डोळ्यांचंही ऑपरेशन केलं…

एव्हाना तो व्यवस्थित चालायला लागला… दिसायलाही व्यवस्थित दिसायलं लागलं…

हा माझ्यापेक्षा वयानं मोठा पण मला “पप्पा” म्हणतो… आणि मनिषाला “ताई”..!

बापापेक्षा पोराचं वय कमी, हे जगातलं पहिलंच उदाहरण असावं…

आणि याच नात्यानं मी त्याला “रवी” असाच एकेरी उल्लेख करतो..!

मी याच्यासाठी काम बघायला सुरुवात केली…

पुणे महानगरपालीकेत स्वच्छता दुत (सफाई कामगार) म्हणुन याला रुजु केलं…

ज्या दिवशी पायानं चालत, सफाईची हातगाडी ओढत तो कामावर निघाला, त्यादिवशी त्याला बघुन अक्षरशः मला रडु आलं… तो ही गळ्यात पडुन खुप रडला..!

खुरडत चालणारा हा, कधी उभा राहु शकेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं…

खुरडत खुरडत भिक मागणारा माणुस कधी तरी “स्वतःच्या पायावर” उभा राहील हे स्वप्नं मी आणि मनिषानं पाहिलं होतं… ते ख-या अर्थानं तेव्हा पुर्ण झालं होतं..!

परत जाताना म्हटलं, “रवी, बघ हां नीट काम कर, सोडु नको काम! माझी शप्पथ आहे तुला…”

तेव्हा रडत म्हणाला होता, “छ्या… पप्पा मी शपथा बिपथा काय पाळत नाय कुणाच्या…”

“पण तुमची पाळीन..!”

त्या दिवशी मी न् मनिषा खुप खुष होतो… “पोरगं” कमावतं झालं होतं…

पोरगं स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर कुठल्या आईबापाला आनंद होणार नाही…???

पुढे इतर कामांना आम्ही दोघेही लागलो.

तो ही हातानं ओढायच्या सफाई गाडीतुन कचरा उचलायला लागला, स्वच्छता दुत म्हणुन..

रवीची भेट होत नव्हती तशी, पण तो काम करतोय ना, याची मी ऑफिसला चौकशी करतच होतो.

आज शिवाजीनगरला मोटरसायकलवरुन निघालो होतो, सिग्नलला थांबलो होतो, तेव्हढ्यात एक व्यक्ती कच-यानं खचाखच भरलेली गाडी भरुन खेचत होती, आणि नेमकी ती गाडी खड्ड्यात अडकली होती.

त्याच्या ताकदीपेक्षा गाडीचं वजन जास्त होतं… खड्ड्यातनं गाडी निघतंच नव्हती. त्याचे पाय लटपटत होते… त्याच्या या प्रयत्नात, तो पडेल की काय असं वाटत होतं…

बघत सगळेच होते, पण कचरा गोळा करणा-या या माणसाला मदत कुणीच करत नव्हतं..!

“लोकं” खुप होते, पण “माणुस” कुणीच नव्हतं त्या गर्दीत…

मला आमच्या रविंद्राची आठवण झाली, तो ही कुठंतरी असंच कष्टानं काम करत असेल. या जाणिवेनं थोडं वाईट वाटलं, आणि त्याच भावनेनं मोटरसायकल बाजुला लावुन हेल्मेट आणि तोंडावरचा रुमाल न काढताच त्याच्याजवळ गेलो… तो पाठमोरा उभा होता…

मागुनच गाडीला थोडासा धक्का दिला, दोघांच्या ताकदीनं गाडी खड्ड्यातनं झट्कन् बाहेर आली…

माझी मोटरसायकल रस्त्यातच उभी होती, त्यामुळं ट्रॅफिक थोडं जाम झालं होतं…

लोकं मला शिव्या देत होते, मी पळतच माझ्या मोटरसायकल कडे निघालो…

पाठीमागनं ओझरता आवाज आला… “धन्यवाद वो सायेब…”

मी थबकलो… आवाज रविंद्रासारखा वाटला… मागं वळुन पाहिलं तर हा आमचा रविंद्राच होता…

माझा विश्वास बसेना..!

त्याचं माझ्याकडं लक्ष नव्हतं… हेल्मेट मुळं त्यानं मला ओळखलंच नव्हतं….

गाडी नीट पार्कींगला लावुन मी परत त्याच्याजवळ गेलो…

तो अजुनही काम करत होता…

मी पाठीवर हात ठेवुन हळुच हाक मारली, “रवी..!!!”

तो चमकला… गर्रकन् वळुन पाहिलं आणि पाहताच “पप्पा” म्हणुन गळ्यात पडला..!

म्हणाला, “तुमी माजी गाडी सोडवली व्हय ? मला कळलंच नाही मगाशी… पण… जवा जवा माजी गाडी आडकती, तवा मला तुमचीच आटवन येती…”

खुप अर्थांनी तो हे बोलत होता हे मला जाणवलं..!!!

भर रस्त्यात चाललेला आजचा हा प्रसंग सगळे लोक बघत होते…

कुणाला गंमत वाटत असावी, कुणाला मज्जा… कुणाला नाटक किंवा कुणाला तमाशा..!

त्यांना काय माहीती…?

आम्ही आयुष्याच्या सर्कशीतला हा अवघड खेळ खेळत होतो..!

कधी आपटु जमिनीवर माहित नाही…

पण सर्कस संपेपर्यंत किंवा आपटुन जीव जाईपर्यंत “खेळ” सोडणार नाही..!

माझे भिक्षेकरी आणि मी ही…

“चला ना च्या पिवु…” रवीच्या वाक्यानं मी भानावर आलो…

सफाई गाडी बाजुला लावुन त्यानं मला एका भारी “हाटेलमंदी” नेलं…

आणि ऑर्डर दिली…

“दोन पेशल च्या द्या… करुन ठिवल्याला दिवु नका, नविन करुन द्या…” त्यानं दणदणीत आवाजात मॅनेजरला सुनावलं…

त्याच्या या कॉन्फिडन्सचं मला कौतुक वाटलं…

“पप्पा, च्या प्यायच्या आदी काय खाणार तुमी?” मेन्युकार्ड माझ्याकडं सरकवत रवी म्हणाला..!

मी त्याच्याकडे कौतुकानं पहात होतो…

एक वर्षापुर्वी खुरडत हा भिक मागणारा…
“रुपाया द्या वो दादा” म्हणत लाचारीनं लोकांचे कपडे ओढणारा…
शिव्या दिल्या तरी पाठ न सोडणारा…हा रविंद्रा..!

आज मला पॉश हॉटेलमध्ये घेवुन आलाय आणि मला पार्टी देतोय…

एक घेणारा हात देणारा झाला…

अजुन एक भिक्षेकरी कष्टकरी झाला…

एक भिक्षेकरी गावकरी झाला…

एक माणुस पुन्हा माणसात आला…

माझ्या डोळ्यातलं पाणी हटेना…

मी आणि मनिषानं त्याच्यासाठी केलेली एकेक गोष्ट आठवत होती… आज याने दामदुपटीने ते परत केलं आम्हाला…

माझ्या डोळ्यातलं पाणी बघुन तो म्हणाला, “काय झालं ? डोळ्यातनं पाणी का वो येतंय ?”

म्हटलं, “अरे मघाशी तुझ्या गाडीतला कचरा बहुतेक डोळ्यात गेला असेल…”

समोर बसलेला तो उठुन माझ्याशेजारी बसला…

माझ्या डोळ्यांच्या पापण्या चिमटीत धरुन वर करत डोळ्यात नीट बघत म्हणाला… “कचरा तर काय दिसत नाय…”

पुन्हा आपल्या जागेवर बसत हळु आवाजात माझ्या डोळ्यात बघुन म्हणाला… “कचरा तर नाय दिसला, पन माज्यावानी कच-यात पडलेली लय लोकं मला दिसली वो डोळ्यात..!”

उरला सुरला माझा बांध फुटला आणि नंतर त्याचाही..!

मी म्हटलं, “येड्या तु कशाला रडतो…?”

रडता रडता हसत म्हणाला, “माज्याबी डोळ्यात कचराच गेलाय जणु…”

बापसे बेटा सवाई यालाच म्हणत असावेत का…?

आजचा हा भावविभोर प्रसंग मी विसरुच शकत नाही..! विसर पडुही नये..!!!

शेवटी, मी हळुच उठुन बिल द्यायला निघालो, तर हा बशीतुन “च्या” पिता पिताच ओरडुन बोलला, “पैशे तुमी द्यायचे नाहीत हां… मी देणार…”

म्हटलं, “आत्ता मी देतो, नंतर तु दे…”

“नाय म्हन्जे नाय… शप्पत हाय तुमाला माजी…”

मी परत फिरत हसत म्हणालो, “शपथा बिपथा पाळत नाहीस ना ?”

“मग आता शपथा कधीपासनं द्यायला आणि घ्यायला लागलास?”

जोरात म्हणाला, “छ्या… शपता बिपता मी आजुन पन नाय पाळत….”

“…. पन कुनी मनापासनं घातली तर मोडत पन नाय..!”

हे हळुच बोललेलं वाक्य मला छेदुन गेलं…

मी घातलेली शप्पथ अजुन पाळत होता तो..!

“रवी, आज लय रडवलं तु मला हां…” मी गंमतीनं बोललो…

“बाप झालाव ना? मंग तुमाला सहन करावंच लागंल ना ?”

म्हटलं “रवी, तु मला बाप समजतोस यात मला कौतुक आहे… तु मोठा आहेस माझ्यापेक्षा…”

रवी म्हणाला, “मला ना आई ना बाप… मला लय इच्छा होती बापाला पप्पा म्हणावं… मी माज्या आईला ताई म्हणायचो…”

“माज्या आईनं मला लय चांगलं सांबाळलं… पण बापानं दगा दिला… मला बोलायला यायच्या आदीच त्यो देवाकडं गेला… मग पप्पा कुणाला म्हणु?”

“बोलायला यायला लागलं, जरा समजाय लागलं तर आई म्हंजे माजी ताई मला सोडुन गेली…”

“तुमाला पप्पा म्हणुन मी माजी हौस भागावतो आणि मनिषा म्याडमला ताई म्हणुन आईची आटवन उरात जागवतो…”

म्हटलं, “आपलं नातं कसं रे… मी लहान तुज्यापेक्षा आणि तु पप्पा म्हणतोस मला… मनिषा त्याहुन लहान, तु तीला आई समजतोस… ताई म्हणतोस…?”

म्हणाला, “सर, कुनीच न्हाई मला… तुमीच माजे हाय… राव्हाल ना माज्याबरोबर कायम ?”

“पप्पा आन ताई म्हणुन…??? सर, सांगा ना…, शप्पत हाय माजी तुमाला..!!!”

दिलेली शपथ आम्ही तरी कशी मोडणार ?

जगाच्या विपरीत आम्हाला चाळीशीत पंचावन्न वर्षाचं पोर झालं…

आम्ही त्याला सांभाळणार…

“रवी मी तुजा पप्पा आणि मनिषा तुजी ताई… आता हस बरं…”

“खरंच ना पप्पा…?” तो भाबडेपणाने विचारत होता…

मी म्हटलं “हो रे बाळा तुझी शप्पथ !!!”

(मी हा व्हिडीओ केवळ भिक्षेक-यांना प्रेरणा मिळावी म्हणुन शेअर करत नाहीय, तरआपल्यातही अनेक लोक असे आहेत, जे सध्या नकारात्मक विचारात गुरफटुन गेले आहेत…त्यांनाही प्रेरणा मिळावी या हेतुने हा व्हिडीओ शेअर करतोय… एक सरपटत चालणारा माणुस उभा राहु शकतो तर आपण का नाही? एक जरी नकारात्मक विचार, सकारात्मक बनला तर माझ्या लिखाणाचे चीज होईल असे मला वाटते)

1 Comment

  1. I don’t think that anything would be greater than this one…..
    तुम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि आम्हाला तुम्हा तिघांचा ???

Leave a Reply

Your email address will not be published.


*