माझे एक ज्येष्ठ स्नेही आहेत… सर्वच बाबतीत ते मोठे आहेत… गुरुबंधुच म्हणाना!
श्री. नंदकुमार सुतार साहेब, दै. पुढारीचे संपादक, अतिशय लाघवी आणि प्रेमळ “माणुस”..!
पुण्यात दरवर्षी रास्तापेठेत शीख समाजाचा किर्तन सोहळा असतो… हजारो – लाखोंच्या संख्येने शीख बांधव या सोहळ्यास येत असतात आणि गुरु ग्रंथ साहेब चे पुजन करतात.
याच सोहळ्यात काही वेगळं काम करणा-यांना पुरस्कार दिला जातो.
तर… सुतार साहेबांनी माझ्यावरच्या प्रेमापोटी या सत्कारासाठी माझं आणि मनिषाचं नाव सुचवलं.
काल हजारो लोकांसमवेत आम्हां दोघांचा आणि आईवडीलांचाही या कार्यक्रमात सत्कार झाला.
आम्ही ऋणी आहोत शीख बांधवांचे आणि सुतार साहेबांचेही!
मुळ सांगायचा मुद्दा असा, की या सत्कार समारंभात मला “तलवार” देवून गौरविण्यात आलं…
आईशप्पथ..!
सोनेरी नक्षीकामात घडवलेली मुठ… मखमलीची म्यान… त्यावरही सोनेरी नक्षीकाम!
मी तलवार म्यानातुन बाहेर काढली… चकाकत्या पात्याची धारदार तलवार, लपलपत बाहेर आली…
मी थरथर कापत ती तलवार मस्तकी लावुन नमस्कार केला!
आयुष्यात पहिल्यांदाच मी खरी तलवार हातात घेत होतो…
माझे डोळे दिपुन गेले… वेगळ्याच भारावलेल्या मनःस्थितीत मी होतो..!
परत येतांना मनिषा गंमतीनं म्हणाली, “काय डॉ. सोनवणे ? उद्यापासुन युद्धाला जाणार काय…?”
वडील म्हणाले, “अरे असं शस्त्र खरंच घरात न्यायचं का आपण? घरात असं शस्त्र असलं की माणुस रागाच्या भरात त्याचा काहीही विपरीत उपयोग करु शकतो..! स्वतःवर किंवा दुस-यावरही..!”
दोघांच्या या वाक्यांनी माझं विचारचक्र सुरु झालं…
खरंच शस्त्रानं नेहमी तोडफोडंच करायची असते का ? दंगलीच घडवायच्या का ? युद्धंच खेळायची का ? रक्तच सांडायचं असतं का…?
“शस्त्र” कधी जगण्याचं “साधन” नाही होवु शकत का…?
आपण ज्या वस्तुचा जसा वापर करु तशी त्याची नावं बदलतात आणि आपली नजरही..!
शिवाय ते “शस्त्र” कुणाच्या हाती आहे यावरुनही त्या शस्त्राचे मोल ठरते..!
शस्त्राला “अस्त्र” बनवुन लोकांना मारुन टाकायचं की… शस्त्राला “साधन” बनवुन लोकांना जगायला मदत करायची…? ज्याचं त्यानं ठरवायचं..!
गृहिणीच्या हाती “चाकु” आला तर ती भाज्या कापुन, जेवण रांधुन घरातल्यांचं पोट भरते…
डॉक्टरच्या हाती हाच “चाकु” आला तर तो ऑपरेशन करुन रुग्णाला जीवदान देतो…
हाच “चाकु” चोराच्या हातात आला तर तो चोरीसाठी समोरच्याला भोसकतो..!
शस्त्र एकंच… या शस्त्रामुळं कुणाचं पोट भरलं, कुणाचा जीव वाचला तर कुणाचा जीव गेला..!
कुणाच्या हाती हे शस्त्र आहे, त्यावरुन त्याचा उपयोग ठरतो…
चाकुचा ऊपयोग गृहिणीने “साहित्य” म्हणुन केला… त्याच चाकुचा ऊपयोग डॉक्टरांनी “अवजार” म्हणुन केला… तर तोच चाकु “अस्त्र” म्हणुन चोरानं वापरला!
वीटेचा उपयोग घर बांधायलाही होतो… चुल मांडायला पण होतो… आणि फेकुन एखाद्याचं डोकं फोडायलाही होतो…
वीट हे शस्त्र नाही… तरीही डोकं फोडण्यासाठी तीला शस्त्र म्हणुन वापरलं जातं…
जीभ ही चव चाखण्यासाठी आणि संवाद साधण्याचं “साधन”…पण लोक तीला “शस्त्र” म्हणुन वापरतात..!
लेखणीचंही तसंच… सासुरवाशीण पोरीनं बापाला लिहिलेलं पत्र… हा मौल्यवान ठेवा..!
पोरीनं लेखणीला “साधन” म्हणुन वापरलं …
हीच लेखणी जेव्हा धमकीचं पत्र लिहिते तेव्हा ती ही धारदार “शस्त्र” बनते..!
लेखणी तीच, शाई तीच, कागद तोच… लिहिणारा बदलतो आणि बदलते फक्त भावना..!
आणि ही भावनाच ठरवते… “साधन” व्हायचं… “अवजार” व्हायचं… की “शस्त्र” ???
चांगली ओळख असणं वेगळं… आणि चांगलंच ओळखुन असणं वेगळं…
पाणी पिणं वेगळंच आणि एखाद्याला पाणी पाजणं वेगळं…
कलाकाराला उद्देशुन, “आम्ही नेहमी तुमचं नाटक पाहतो”, म्हणनं वेगळं… आणि “आता बास, लय झाली तुझी नाटकं” म्हणनं वेगळं…
विद्यार्थ्यांना धडा “समजावुन सांगणं” वेगळं आणि एखाद्याला धडा “शिकवणं” वेगळं …
डोळ्यात धुळ “जाणं” वेगळं आणि डोळ्यात धुळ “फेकणं” वेगळं…
प्रसंग तेच, पण हेच प्रसंग कधी साधन बनतात, तर कधी शस्त्रं!
एखादी वस्तु, कुणी “साधन” म्हणुन वापरते… तीच गोष्ट कुणी “अवजार” म्हणुन वापरते… तर कुणी “शस्त्रं”..!
खरं सांगु ?
प्रमाणात घेतलेलं “विष” ही औषध असतं…
अती प्रमाणात घेतलेलं औषधही “विष” असतं…
अतिरेक करायचा नाही…
माणुस हवंय तेव्हढं पाणी पितो… तृप्त होतो…
पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी तोंडात जातं तेव्हा गटांगळ्या खातो..!
असो…
ही तलवार माझं शस्त्रं नाही… हे माझं साहित्य आहे..!
मी या तलवारीचा “साहित्य” म्हणुनच आणि “अवजार” म्हणुनच ऊपयोग करणार आहे..!
या भिक्षेकरी समाजाला … “भिकारी” म्हणुन अडकवुन ठेवलंय… एका बंधनात… मी माझ्या तलवारीने हे बंधन कापुन काढीन…
हा समाज दुर्लक्षित असण्याची मुळं खुप खोलवर रुजलीत… ही असली मुळं मी छाटुन टाकीन माझ्या तलवारीनं…
दारिद्रयामुळं, घर चालवायला मी असमर्थ आहे, असं म्हणुन जे गळ्याभोवती फास लावुन घेत आहेत… त्यांच्या गळ्याभवतीचे फास कापीन मी या तलवारीनं…
स्वतःला भिकारी म्हणवुन घेवुन, स्वतःचे हात स्वतःच दोरखंडानं बांधुन घेणारे… काम न करणा-यांचे असे दोरखंड कापेन मी या तलवारीनं…
मी भिकारीच हाय… मी काय गांवकरी नाय… मी मागुनच खानार… या त्यांच्या मानसिकतेला छाटुन टाकायचंय मला या तलवारीनं…
कु-हाडीच्या धाकानं दरोडे घातले जातात… याच कु-हाडीनं लाकडं फोडुन चुलही पेटवली जाते…
कु-हाडीनं धाक दाखवण्यापेक्षा, चुल पेटवणं केव्हाही पवित्रच..!
धाक दाखवतांना कु-हाड “शस्त्रं” होते… चुल पेटवतांना हिच कु-हाड “अवजार” होते…
चला नं… आपणही कुणाच्या ऊपयोगाचं साहित्य होवु… अवजार होवु..!
माझ्या या “नंग्या” तलवारीचा वापर मी कुणाचं तरी अंग “झाकण्यासाठी” करेन…
भिक्षेक-यांची उमेद मी लकाकत्या तलवारीच्या धारीसारखी करेन…
भिक्षेक-यांची सुरकुतलेली मुठ, मी नक्षीदार करेन… सोनेरी करेन…
जसं तलवारीचं आणि म्यानाचं नातं अतुट असतं… तसंच समाज आणि भिक्षेक-यांचं नातं अतुट बनवेन..!!!
आणि एव्हढं सगळं करुन… तलवार हाती असुन शेवटी मी मात्र निःशस्त्र योद्धाच असेन..!!!
Leave a Reply