एक तरुण… याचं नाव…? जावुदे नाव नकोच..!!!
घरातलेही याचं नाव आता पुर्णपणे विसरुन गेलेत..!
तसंही नावात काय असतं…?
नयना नावाची एक अंध ताई एका ठिकाणी भिक मागते…
बलराज नावाचा माणुस निपचीत पडुन असतो फुटपाथवर, कुस बदलायची तरी कुणाची तरी मदत लागते… आणि हा असतो स्वतःच्याच ओझ्याखाली दबलेला… एक अपंग !!!
सुंदराबाई नावाची आजी भकास डोळ्यानं आभाळाकडं पहात असते… आणि सांभाळत असते कुष्ठरोगानं विद्रुप झालेली… झडलेली बोटं…
तसाच हा सुद्धा..! वयानंच फक्त तरुण… पण आयुष्याच्या शर्यतीत पुर्ण हरुन मनानं म्हातारा झालेला..!
सगळे असुनही कुणीच नसलेला..!
“नात्याला ओलावा असेल तर ते टिकुन राहतं… ओलावाच नसेल तर घरंगळुन जातं…”
मातीचंच उदाहरण घ्याना… ज्या हातानं आपण पाणी टाकुन माती कालवु… त्या हाताला चिखल म्हणुन का होईना, पण ती चिकटुन राहते… पण कोरड्या मातीला कितीही मुठीत घेण्याचा प्रयत्न केला तरी ती सुर्रकन् निसटुन जाते… शेवटी हातात उरते धुळ..!
दर्दभ-या गाण्यांचा आनंद माणुस स्वतः आनंदी असल्यावरच घेवु शकतो… एरव्ही दुःखात आनंदी गाणंही नकोसं होतं..!
सोबत कुणी असेल तरच विरहगीताची मजा अनुभवता येते..!
चार जण एकत्र येवुन नफ्या तोट्याच्या गोष्टी करतात ती “चर्चा”
प्रत्येकजण आपलंच सांगत असतो त्या “गप्पा”
आणि एकमेकांच्या सुखदुखाःत एकत्र येवुन जमते ती “मैफल” !!!
अशी मैफिलीतुन बाद झालेली माणसंच मला भेटतात… त्यातलाच “हा”..!!!
तरुणपणीच भिक मागायचा…
या वयातही म्हाता-या माणसांना असतो तसा डोळ्यात मोतिबिंदु..!
एरव्ही हाताच्या अंगठीत असणारा “मोती” सर्वांनाच हवासा वाटतो… हाच “मोती” डोळ्यात आला की नकोसा होतो…
प्रत्येक गोष्टीची किंमत स्थानावरुन होत असते… स्थान महत्वाचं..!
कुणाची चपलेनं पुजा होते… तर कुणाच्या चपलांचीही पुजा..!
….तर, बरोब्बर सहा महिन्यांपुर्वी याच्या डोळ्यांचं ऑपरेशन केलं… चष्मा दिला..!
याला दिसायला तर लागलं होतं… पण आयुष्याकडं बघण्याची “दृष्टी” अजुनही आली नव्हती..!
हॉटेलींगच्या कामाचा यापुर्वीचा याला अनुभव…
तोच धागा पकडत मी याचा पिच्छा पुरवला..!
कसं असतं… इलेट्रॉनिक खेळणं कितीही छान असलं तरी… बॅटरीशिवाय चालत नाही…
आणि अकालीच म्हातारा झालेल्या “याला” चालवेल अशी बॅटरी मला सापडत नव्हती..!
कालांतराने, अनेक गोष्टी सांगुन झाल्यावर, स्वप्नं दाखवल्यावर, हा हॉटेल मध्ये काम करायला तयार झाला..!
मी काम बघायला सुरुवात केली..!
“आबाचा ढाबा” या सुप्रसिद्ध हॉटेल शृंखलेचे मालक, माझे ज्येष्ठ स्नेही, श्री. राहुल कुलकर्णी सर, यांचा काही दिवसांपुर्वीच फोन आला होता… “डॉक्टर आम्ही काय मदत करायची, आम्हालाही सांगा…”
झट्कन् कुलकर्णी सरांना फोन लावला… म्हटलं, “सर… एक मदत कराल? माझ्या एका माणसाला काम द्याल?”
“एक काय दोघांना देतो डॉक्टर…”
“हो… पण, तो… पुर्वी भिक मागायचा…” मी चाचरत बोललो…
“डॉक्टर, पुर्वी भिक मागायचा… आत्ता नसेल मागत… तुम्ही फोन केलाय… यातंच आलं की हो..!”
“सर मग, एक दोन दिवसांत आणु…?”
“अज्जिबात नाही… आज आणा… आत्ताच… मी खरंतर कामात आहे एका… पण या नेक कामाला देरी नको… लवकर या… मी पोचतोच हॉटेलवर..!”
राहुल कुलकर्णी नावाच्या या “माणसानं” माझ्या एका सदस्याला त्यांच्या हॉटेलमध्ये सामावुन घेतलं..!
लोकं माणसांसारखी दिसतात… पण असत नाहीत खुपवेळा…
राहुल कुलकर्णी हे अपवाद..!!!
ते दिसतात “माणसांसारखे”… बोलतात “माणसांसारखे” आणि वागतातही “माणसांसारखेच”…
एका भिक्षेक-याला “कष्टकरी” बनवण्याच्या माझ्या प्रयत्नात राहुल कुलकर्णी साहेबांसारखी मोठी “माणसं” भेटली…
एरव्ही एव्हढ्या नावाजलेल्या हॉटेलात भिका-यांना पाउलही ठेवु देत नाही कुणी…
या “माणसानं” हे सगळे बंध झुगारले… माझ्या कुटुंबातल्या एकाला कामाला लावलं… पोटाला लावलं…
माणसातल्या या माणुसकीला माझा नमस्कार !
हॉटेलमधील निजामपुरकर साहेबांच्या व्यवस्थापनाखाली, आमचा हा सदस्य कामं शिकेल… कमावता होइल..!
लक्ष्मी रोड, अलका टॉकिजजवळ जीथं संपतो तीथं दिमाखात उभ्या असलेल्या “आबाचा ढाबा” या नावाजलेल्या हॉटेलात “हा” उद्यापासुन (२९ डिसेंबर २०१८) कामाला लागेल..!
मी निघतांना “तो” गहिवरुन म्हणाला… “सर..!”
मला कळलं… मी त्याला जवळ घेत म्हटलं… “गप, कळलं मला… डोळ्यातला मोती काढुन टाकलाय मी… पण काही दिवसांनी तो मला हाताच्या अंगठीत दिसला पायजे हां..!”
तो डोळ्यात पाणी आणत म्हणाला, “सर… पयल्या पगारात, मी तुमाला मोत्याची आंगटी करंल…”
तेव्हढ्यात, त्याच्या डोळ्यातले अश्रु त्याच्या खांद्यावर ठेवलेल्या माझ्या हातावर पडले…
म्हटलं, “येड्या… मोती मिळाले मला आत्ताच…”
“उरलेले अंगठीसाठी जपुन ठेव..!!!”
त्यानं आवेगानं माझ्या गळ्यात हात टाकुन मला मिठी मारली…
ही हाताची मिठी म्हणजे, कुण्या राजा महाराजानं मला दिलेल्या रत्नजडीत मोत्यांच्या हारापेक्षाही मौल्यवान होती..!
रत्नजडीत मोत्यांचा मला मिळालेला हा मौल्यवान हार मी जपुन ठेवेन… कायमचा..!
किती, कोणत्या शब्दात आणि कसं कौतुक करावं तुमचं? मुळात कौतुक करावं की आभार मानावेत? आणि आभार मानायचे म्हणलं, तर आभार मानून माझं काम सुरू होण्या अगोदरच संपेल ना!? आणि कौतुक करावं म्हणलं तर मी तुमच्या पेक्षा वयाने,अधिकाराने,मानाने खुपच लहान आहे…
मग? काय करू?
हा, एक करू शकते…. तुम्हाला मनापासून वचन देऊ शकते, की शक्य तितक्या लवकर तुमचं हे काम ‘बंद’ पाडण्यात तुम्हाला सहकार्य करायला नक्कीच येईन ….
Proud of you Abhijeet Sir and Manisha Madam ???