याचसाठी केला अट्टाहास…

पाखरांची शाळा” हा प्रकल्प म्हणजे मी जागेपणी पाहिलेलं स्वप्न..!

भिक्षेक-यांनी एकत्र समोर बसावं, जगण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टी शिकाव्यात. उदा. अंकगणित, अक्षरओळख अशा दैनंदिन कामात गरजेच्या गोष्टी…

त्याचप्रमाणे पैसा कमवुन देणाऱ्या काही कला शिकाव्यात, व्यवसाय करावा, स्वतःच्या पायावर उभे रहावे… भिक मागण्याची कुबडी फेकुन द्यावी… यांनी भिक्षेकरी नाही तर कष्टकरी व्हावं… गांवकरी व्हावं..! यासाठी मी आणि मनिषाने जीवतोड मेहनत केली..!

या भिक्षेक-यांसाठी मला शाळा काढायची होती, ज्यात माझे भिक्षेकरी वरील गोष्टी शिकतील… मग या शाळेला मी नाव देईन “पाखरांची शाळा..!!!” हे आमचं स्वप्न होतं..!

या स्वप्नाचा पाठलाग करतांना खुपवेळा आपटलो…

खुपदा अपमान व्हायचे…

नाही नाही ते ऐकुन घेतलं…

वाटायचं, “मरुदे ना… कशाला करु मी हे काम ?”

“या कामावाचुन माझं काय अडलंय..?”

काम पुर्ण सोडुन द्यायचाही विचार डोक्यात खुपदा यायचा…

पण, त्याचवेळी एखाद्या विकलांग आज्जी आजोबांची ची हाक कानात घुमायची, “बाळा… लेकरा…राजा… सोन्या… बबडु… तु न्हाय आलास तर मरून जाव आमी ल्येकरा… जीवंत हाय तवर तरी बग रं ल्येका… तुज्याबिगार कोन हाय आमास्नी ?”

ही आर्त, करुण हाक प्रत्येकवेळी आम्हाला परत परत भिक्षेक-यांपर्यंत ओढुन न्यायची… आणि पावलं परत परत यांच्याचकडं वळायची..!

आजपर्यंत टिकुन राहिलो या कामात, त्याचं खरं गुपीत या करुण हाकेत आहे..!

असो, आज मला सांगायला अभिमान वाटतोय, की जे स्वप्न मी आणि मनिषाने दिवसा पाहिलं… ते आज सत्यात उतरलं आहे..!

माझी पाखरांची शाळा सत्यात उतरली आहे..!

पुणे महानगरपालीकेने अत्यंत सहृदयतेने या प्रकल्पाचा विचार करुन हा प्रकल्प सुरु करण्यास दादोजी कोंडदेव, शाळा क्र. 8, साततोटी पोलीस स्टेशनसमोर, कसबा पेठ, पुणे येथील सांस्कृतिक भवन हा पुण्याच्या मध्यवस्तीतील भला मोठा बैठा हॉल पाखरांची शाळा सुरु करण्यासाठी दिला आहे.

पुणे मनपा ने मला किमान २० हॉल्स दाखवले असतील, पण काही दुर होते… तर काही चौथ्या पाचव्या मजल्यावर… आणि मी हट्ट धरुन बसलो होतो तळमजलाच मिळावा म्हणुन… माझ्या या म्हाता-या माणसांसाठी..!

याठिकाणी मला पुणे मनपा च्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे पाय धरुन धन्यवाद द्यायचे आहेत… जणु एखाद्या लहान लेकराचा हट्ट त्यांनी पुरवला..!

मला जसा हॉल हवा होता तसाच त्यांनी दिलाय या शाळेसाठी..!

या ठिकाणी आता सकाळी १० ते २ या वेळेत, माझ्या पाखरांची शाळा भरेल..!

मी हा हॉल बघत असतांना किती वेळा माझे डोळे भरले असतील देव जाणे..!

मा. डॉ. विठ्ठल जाधव सर, Special Inspector General of Police, Maharashtra,

मा. ज्ञानेश्वर मोळक सर, Joint Commissioner, Pune Municipal Corporation,

मा. सुवर्णा पवार मॅडम, Assistant Commissioner, Women and Child  Welfare, Maharashtra,
माझे मित्र रफिकभाई मुल्ला, Special Officer, मंत्रालय मुंबई,
या सर्वांचा मी ऋणी आहे, केवळ यांच्या मार्गदर्शनाने मी पुढे जावु शकलो. एरव्ही इतक्या मोठ्या मंडळींना नुसतं  भेटायचं म्हटलं तरी यांच्या अपॉईंटमेन्ट मिळणं अशक्य…

तरी या माननियांनी अक्षरशः लहान भावाला सल्ला द्यावा तितक्या पोटतिडकीनं मला सल्ला दिला…

यांचे आभार कोणत्या शब्दांत मानु…?

मा. डॉ. सिद्धार्थ धेंडे, उपमहापौर, पुणे मनपा,
मा. नितिन उदास सर, उपायुक्त, समाज विकास विभाग पुणे मनपा,
मा. आर. आर. चव्हाण, समाज विकास अधिकारी, समाज विकास विभाग, पुणे मनपा

या उच्च अधिकारीवर्गाने प्रत्यक्ष कार्यवाही केली… आणि आज हा हॉल मला पाखरांच्या शाळेसाठी मिळाला..!

मी या सर्वांसमोर नतमस्तक आहे… माझा प्रणाम स्विकार व्हावा !

काय असेल ही पाखरांची शाळा..? मी याविषयी सविस्तर माहीती देईनच…

सध्यातरी मला भेटलेल्या “माणसांपुढे” नतमस्तक होणे इतकंच माझं आणि मनिषाचं काम..!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*