पाखरांची शाळा..!!!

(भिक्षेक-यांना एका जागेवर बसवुन, त्यांना काम करायला लावुन, रोजगार मिळवुन देणारा “जगातला पहिला” प्रकल्प)

पाखरांची शाळा… हा प्रकल्प म्हणजे मी जागेपणी पाहिलेलं स्वप्न..!

भिक्षेक-यांनी एकत्र समोर बसावं, जगण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गोष्टी शिकाव्यात उदा. अंकगणित, अक्षरओळख अशा दैनंदिन कामात गरजेच्या गोष्टी…

त्याचप्रमाणे पैसा कमवुन देणाऱ्या काही कला शिकाव्यात, व्यवसाय करावा, स्वतःच्या पायावर उभे रहावे… भीक मागण्याची कुबडी फेकुन द्यावी… यांनी भिक्षेकरी नाही तर कष्टकरी व्हावं… गांवकरी व्हावं..! यासाठी पाहिलेलं एक स्वप्न..!

काय आहे ही पाखरांची शाळा…???

सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत पुण्यातल्या वेगवेगळ्या भागातुन भीक मागणारी मंडळी इथं येतील. स्वेच्छेने येण्यासाठी आम्ही त्यांना प्रवृत्त करु. येण्याजाण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आम्ही करतच आहोत.

या ठिकाणी यांना अंकगणित, अक्षरओळख, स्वच्छतेचं महत्व अशा बाबी हसतखेळत त्यांच्या कलानं घेवुन शिकवल्या जातील.

या सोबतच काही शोभेच्या वस्तु तयार करण्यात व काही आयुर्वेदीय वस्तुंचे पॅकिंग करणे यात त्यांची मदत घेतली जाईल.

या सर्वाचा मेहनताना म्हणुन त्यांना रु. १००/- रोज दिले जातील.

कुठे असेल ही शाळा…?

दादोजी कोंडदेव, शाळा क्र. ८, साततोटी पोलीस स्टेशनसमोर, कसबा पेठ, पुणे येथील सांस्कृतिक भवन. (वेळ – सकाळी १० ते दुपारी २)

नेमका कसा चालेल हा प्रकल्प…?

 1. ज्या वस्तु तयार करण्यात अथवा पॅकिंग करण्यात भिक्षेक-यांचा सहभाग असेल, अशा वस्तुंची विक्री करुन, त्यावरील नफा हा मेहनताना देण्यासाठी वापरला जाईल.
 2. प्रकल्पाची दैनंदिन देखरेख करण्यासाठी, हिशोब ठेवण्यासाठी पगारी व्यक्तीची नियुक्ती केली जाईल.
 3. सुरुवातीला “सोहम मोत्याची फुलझडी” व “सोहम सोनेरी पिंपळपानांची गुलछडी” अशा दोन शोभेच्या वस्तु भिक्षेक-यांच्या सहाय्याने तयार करणार आहोत.

त्याचप्रमाणे संपुर्ण १००% नैसर्गिक व केमिकल विरहीत “सोहम आयुर्वेदीक फेस पॅ” व “सोहम आयुर्वेदीक केश तेल” अशी एकुण चार उत्पादने विक्रीसाठी तयार करणार आहोत.

भविष्यात इतर उत्पादन करण्याचा विचार आहे… परंतु आत्ता मात्र चारच उत्पादने..!

 • सोहम मोत्याची फुलझडी

सोनेरी तारांत गुंफलेल्या शोभेच्या मोत्यांचा गुच्छ !

किंमत रु. ५०/- प्रति गुच्छ.

 • सोहम सोनेरी पिंपळपानांची गुलछडी

सोनेरी तारांत गुंफलेल्या छोट्या छोट्या सोनेरी पिंपळ पानांचा गुच्छ !

किंमत रु. ५०/- प्रति गुच्छ.

वरील दोन्ही शो पिसेस दिसायला मस्त दिसतात.

आपण आपल्या फ्लॉवरपॉट मध्ये या फुलछडी आणि गुलछडी कायमस्वरुपी ठेवुन फ्लॉवरपॉट सजवु शकतो. फुलं बदलायचं झंझट किमान ५ वर्षेतरी नाही, कारण या दोन्ही वस्तु किमान ५ वर्षे आहेत तशाच देखण्या राहतात.

फुलांचा १५० – २०० रुपयांचा आपण कुणाला गुच्छ दिला तरी दुस-या दिवशी तो कच-यातच जातो.

५० रुपयांचे हे गुच्छ आपण भेट म्हणुन कुणाला दिल्यास किमान ५ वर्षे या वस्तु न फेकता आपली आठवण म्हणुन त्यांच्या घरात राहतील… फ्लॉवरपॉट मध्ये डोलत..!

मोती आणि पिंपळपान दोघांनाही एक वेगळंच महत्व आहे, या गोष्टी आपल्या घरात असणं सौभाग्याचं समजलं जातं…
आपल्या किंवा इतरांच्या घरात प्रतिकात्मक म्हणुन का होइना… पण या सौभाग्यदायी वस्तु या निमित्तानं येतील..!

 • सोहम आयुर्वेदीक फेसपॅक

संपुर्ण नैसर्गिक व केमिकल विरहीत असा हा फेसपॅक. शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेदीक जडीबुटी पासुन बनविलेलं हे संपुर्ण आयुर्वेदीक चुर्ण !

फक्त चेह-यालाच नाही तर अंगावर असणाऱ्या इतर त्वचा विकारांवर अतिशय प्रभावी.

रोज वापरल्यास चेह-यावरील डाग, मुरुम, पुटकुळ्या तसेच शरीरावरील इतर त्वचारोग कमी करण्यास मदत करते.

शरीराचे काळवंडलेले भाग उदा. मान, गळा, कोपरापासुन खालचा हात, पाऊल इ. वरची त्वचा उजळण्यास मदत करते.

किंमत : ५० ग्रॅम पाऊच रु. ५०/-

 • सोहम आयुर्वेदीक केश तेल

शुद्ध माका, कोरफड, जास्वंद व इतर केशवर्धक आयुर्वेदीय जडीबुटी पासुन बनविलेले तेल. केस गळणे, पिकणे याचे प्रमाण कमी होते. केसांची निरोगी वाढ होवुन, कोंडा कमी करण्यास मदत करते.

किंमत : १०० मिली. रु. १२०/-

या ठिकाणी मुद्दाम सांगावेसे वाटते की वरील फेसपॅ केशतेल डॉ. मनिषा सहकारी अत्यंत Hygienic Condition मध्ये इतर ठिकाणी बनवणार आहेत. ही आयुर्वेदीक उत्पादने बनविण्यात भिक्षेक-यांचा कोणताही सहभाग नसेल.

केवळ वस्तु मोजणे, स्टिकर लावणे, उत्पादने पिशवीत भरणे, पिशव्या चिटकवणे, बाटल्यांची झाकणे लावणे, अशा प्रकारची बाह्य मदत भिक्षेक-यांकडुन घेतली जाणार आहे.

हे इतकं सगळं आपणांस सांगण्याचं कारण एकच की, आपण कुणी ग्राहक नाहीत, आणि मी ही कुणी विक्रेता नाही!

केवळ भिक्षेक-यांच्या उच्चाटनासाठी, त्यांना बळ देण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी उभारलेला हा एक प्रकल्प आहे.

आजपर्यंत तुम्ही कायम माझ्याबरोबर राहिलात, त्यादृष्टीने आपलं नातं पार्टनरशीपचं… भागीदारीचं..!

आपल्या पार्टनरला, भागीदाराला सर्व गोष्टी सांगुन पुढे जाणं, एखादी गोष्ट करणं हे मी माझं कर्तव्यच समजतो, म्हणुन या सर्व बाबी आपणांस सांगण्याचा अट्टाहास केला.

या वस्तु तयार करणे, विकणे, ही शाळा चालवणे यात भिक्षेक-यांना रोजगार उपलब्ध करुन देणे एव्हढा एकच हेतु नसुन त्यांची आपल्याबरोबर उठबस घडवणे, समाजातल्या इतर मंडळींशी त्यांची भेट करवुन देणे, जगात काय चाललंय याची माहीती करुन देणे, या निमित्ताने त्यांच्याबरोबर सतत संवाद साधणे आणि हळुहळु भीक मागण्याची प्रवृत्तीच नष्ट करणे हा मुळ हेतु आहे…

आणि या पुर्ण प्रकल्पाचे तुम्ही आजीव भागिदार आहात..!!!

या प्रकल्पात कशी मदत करता येईल?

 • संस्थेस देणगी मिळाल्यास, त्याची 80 G पावती मिळेल.

या निधीचा वापर प्रकल्पांतर्गत पगारी लोकांना पगार देण्यास, भिक्षेक-यांची ने आण करण्यास, औषधी व ऑपरेशन चा खर्च करण्यास केला जाईल.

योग्य तेव्हढा निधी जमल्यास रोजच्या जेवणाची व्यवस्था करणे शक्य होईल. सध्या तरी चहा देणे शक्य आहे पण प्राप्त परिस्थितीत जेवण देणे शक्य नाही.

 • वरील वस्तु विकत घेवु शकता. या वस्तु घेतल्यास, वस्तुंवरील निव्वळ नफा हा भिक्षेक-यांना रोजचा मेहनताना देण्यास वापरला जाईल.
 • आपल्या संपर्कात कुणी भिक्षेकरी कामाला तयार असल्यास त्याला अशा प्रकारच्या प्रकल्पाची माहीती देवुन कामास उद्युक्त करता येईल.
 • वेळ मिळाल्यास आपण प्रकल्प ठिकाणी येवु शकता.
  • मनोरंजनातुन प्रबोधन करु शकता.
  • भिक्षेक-यांचे अभिनंदन करुन त्यांना मानसिक पाठबळ देवु शकता.
 • रस्त्यावरील भिक्षेक-यांना काहीबाही देणे, दोन चार रुपये देणे याने आपण भीक मागण्याची प्रवृत्ती वाढवित आहोत. फुकटच मिळतंय म्हणुन खुप लोक सध्या भीक मागत आहेत. जे लोक अशी रस्त्यात कुणाला “भीक” देत आहेत त्यांना अशी भीक देण्यापासुन रोखु शकता.
 • ज्या लोकांनी या प्रकल्पाच्या माध्यमातुन भीक मागणं सोडलंय… जे आता भिक्षेकरी नाहीत… कष्टकरी झालेत आणि गांवकरी होवु इच्छितात अशांना हरत-हेने मदत करण्याचे समाजातील दानशुर मंडळींना आवाहन करु शकता..!

आपल्या कुठल्याही कृतीमुळे समोरची व्यक्ती परावलंबी होईल ती भीक… आणि आपल्या कुठल्याही कृतीमुळे समोरची व्यक्ती स्वावलंबी होईल ती मदत..!

तेव्हा चला या लोकांना भीक देवुन गटारात खितपत पाडण्यापेक्षा.. मदत करु स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, सन्मानानं जगण्यासाठी..!

कुणाला एकावेळची तयार भाकरी खायला देण्यापेक्षा भाकरीच तयार करायला शिकवु..!

लहान तोंडी मोठा घास घेतलाय… तुमचा आशिर्वाद हवाय… आता कडेवर घ्या नाहीतर पायदळी तुडवा, निर्णय सर्वस्वी तुमचा आहे… आम्ही स्वतःला स्वाधिन केलंय तुमच्या…!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*