पिंडावरचा कावळा

ही मावशी काहीशी सडपातळ, रंग गोरेपणाकडे झुकणारा… डोक्यावर पदर आणि वागण्यात कमालीची शालिनता!

म्हातारपणाकडं झुकत चाललेल्या चेह-यावर एक गोड स्मित हास्य!

ही बसलेली असते एका ठिकाणी भिक मागत..! वय अंदाजे ५५ – ६० वर्षे…

हिच्या डाव्या हाताला पाच वर्षाचा अतिशय चुणचुणीत मुलगा, उजव्या हाताला सहा वर्षाचा गोरा गोमटा तरतरीत मुलगा!

दोन्ही मुलांच्या अंगावर शाळेचा युनिफॉर्म!!! आजीच्या मांडीला दोघेही बिलगुन बसलेली असतात.

हो… ही, यांची आज्जी… सख्खी!

मी या ठिकाणी १५ दिवसातुन एका शनिवारी जातो. हिची माझी ओळख दिड वर्षांपुर्वी झाली…

पहिल्यांदा भेटली तेव्हा अशीच दोन मुलांना आजुबाजुला घेवुन बसली होती…

म्हटलं… “मावशी पोरं कुणाची?”

“माजीच आहेत!”

“माजी म्हणजे?”

“माजी म्हणजे, माज्या लेकाची… माजी नातवंडं हायत ही..!”

ती त्यांच्या गालावरनं प्रेमानं हात फिरवत सांगते.

म्हटलं, “पोरांची आई कुठाय?”

“आसंल कुठंतरी…” ती मोठ्या आवाजात बेफिकिरीनं बोलली…

“आणि तुमचा पोरगा?”

“त्योबी आसंल कुठंतरी…” तोंडातल्या तोंडात पुटपुटलेल्या या वाक्यात मात्र व्याकुळता होती…

आजीला म्हटलं… “आजी चांगल्या घरच्या दिसताय, एव्हढ्या गोड पोरांना बरोबर घेवुन भिक मागताय…”

“स्वतः पण मागताय, पोरांना पण भिक मागायला शिकवताय… शोभतं का हे तुम्हाला?”

“शाळेचा युनिफॉर्म आहे अंगावर, मग शाळेत का नाही गेली पोरं?”

“पोरांना बघुन लोकं भिक जास्त देतात, म्हणुन शाळेतनं काढुन पोरांना रस्त्यावर बसवलंय का?” मी जरा रागानं बोललो…

“पोरगा, सुन कुठाय? भेटु का मी त्यांना? कुठं राहतो पोरगा सांगा… मी भेटतो त्याला..!” अजुन आवाज चढवत मी म्हणालो.

आजीचे डोळे पाणावले…

पाणेजल्या डोळ्यांनी तीने आभाळाकडं बोट दावलं..!

ती म्हणाली, “त्याला भेटायला वर जावं लागंल तुमाला… तुमी गेला तर सांगा त्याला…तुजी पोरं नीट सांभाळत्येय म्हणावं आई तुजी!”

मी तिच्याकडं पाहिलं… डोळे पाण्यानं भरलेले… आणि स्मित हास्य जावुन चेह-यावर कारुण्य पसरलं होतं… धुकं पसरावं तसं…

धुक्यातनं वाट काढत चालावं, तशी अडखळत बोलली… “मलाबी माज्या पोराला भेटायचं हाय वो डाक्टर वर जावुन, पण या माज्या दोन लेकरांना खाली सोडुन वर जाता येत नाही..!”

मी थोडा वरमलो.

आजीजवळ बसुन तीच्या भुतकाळात शिरलो… तीच्याही नकळत….

हि तरुण होती, तेव्हाची गोष्ट..!

नवरा सधन शेतकरी! गावाकडं पाच एकर शेती. दोघं कष्ट करुन खायचे. संसार सुखाचा चालला होता. नवरा साधा भोळसट, चुलत मावस भावांनी गोड बोलुन सर्व शेती हडप केली, खुप भांडुनही न्याय मिळालाच नाही. उलट यांनाच गाव सोडायला भाग पाडलं. होत्याचं नव्हतं झालं..!

मग, पुण्यात एका चाळीत आले, हा हमाली काम करायचा आणि ती धुणीभांडी..!

पदरात, एक मुलगा, एक मुलगी… कष्ट करुन मुलांना शिकवलं.

मुलगी गोरीपान, अत्यंत देखणी, तितकीच सोज्वळ, त्यात ग्रॅज्युएट… बघता बघता एका श्रीमंत घरातली सुन म्हणुन गेली. हिचं लग्न थाटामाटात झालं.

आईबाप दोघंही हरखले.

राहता राहिला तो मुलगा, तोही कंपनीत कामाला लागला, त्याचंही लग्न करुन दिलं… यथावकाश त्याला दोन मुलं झाली.

पुन्हा एकदा गाडी रुळावर आली. एकुण मस्त चाललं होतं…

पण… नियतीला हे मान्य नव्हतं.

एके दिवशी मुलगा कसल्याशा आजारानं अचानक देवाघरी गेला. मागं तान्ही दोन पोरं टाकुन… या तान्ह्या पोरांनी आपला बाप कधीच पाहिला नाही, आणि भविष्यातही पाहु शकणार नव्हती.

मागं उरलेल्या तरुण सुनेला आता या तुटलेल्या संसारात रस नव्हता, तीची कुणाबरोबर तरी मैत्री झाली, आणि एके रात्री ती त्याच्याबरोबर निघुन गेली, तीने दुसरा घरोबा मांडला, दुस-या शहरात!

दोन्ही तान्ह्या पोरांचा विचार न करता, पोरांना सासुच्या हवाली करुन, ही निघुन गेली.

जाताना हा सुद्धा विचार तीला शिवला नसेल? की माझ्यावाचुन ही पोरं राहतील कशी? आईच्या दुधावाचुन ही तान्ही बाळं जगतील कशी?

खरंच ही आई होती…? की लादलेलं मातृत्व होतं ते?

केवळ जन्म दिला म्हणुन ती आई होत नसते…

मातृत्वाचं लेणं आयुष्यभर जपण्याची आं तरीक च्छा असणं म्हणजे आई!

स्वतः जमिन होवुन पोरांनी भाळ व्हावं, ही च्छा धरते ती आई!

समंतात श्वराचं रुप म्हणुन जी भरुन राहते ती आई!

मा तीत स्वतःला गाडुन घेते, आणि शाची ओंजळ लेकरावर धरते ती माय!

स्वतःचं मन मा रुन, लेकरांना आयुष्यभर ता रुन नेते ती माता!

लेकरांना सोडुन गेलेली ही बाई, यातल्या कुठल्या व्याख्येत बसते…?

नव-याच्या अंतिम संस्कारावेळीही उपस्थित नसणाऱ्या हिला नेमकं काय म्हणावं…?

बराच वेळ म्हणे, पिंडाला कावळा शिवत नव्हता…

तेव्हा ही आज्जी आभाळाकडं बघुन म्हणाली होती, “मी जिवंत हाय तवर तुज्या ल्येकरांचा सांभाळ करीन, त्यांची आई होवुन -हाईन..! तु काळजी करु नगो… तु काळजी करु नगो…!!!”

आज्जीनं फोडलेल्या या हंबरड्यानं कावळ्यांनाही पाझर फुटला असावा..!

ज्या हातांनी लहानग्या पोराला उचलुन कडेवर घेतलं… त्याच हातांनी पोराला उचलुन तिरडीवर ठेवायचं… त्या म्हाता-या हातांना कसं वाटलं असेल..?

ज्या पोराला डोक्यावर घिवुन नाचायचं, त्याच पोराला खांदा द्यायचा? त्या म्हाता-या खांद्याला कसं वाटलं असेल?

ज्या पोराला लहानपणी “चिवु काऊ” दाखवत जेवु घातलं… त्याच कावळ्यांना माझ्या पोरासाठी ठेवलेला हा शेवटचा घास आता तु खा म्हणायचं…? त्या शब्दांना कसं वाटलं असेल?

कसं… कसं… कस्सं… वाटलं असेल?

एव्हढं कमी म्हणुन की काय… काही दिवसातच आज्जीचा नवरा, हाय खावुन, परिस्थितीला हरुन बोलता बोलता, लेकाच्या आठवणीत, लेकाला भेटायला गेला आभाळात..!

तेव्हापास्नं, भरलेल्या या झोपडीत उरलेत आता फक्त तीन जीव… दोन लहान… भविष्याकडं नजर लावुन बसलेले आणि एक जीव थकलेला… भुतकाळाच्या मारानं पिचुन गेलेला..!

गेलेला भुतकाळ “भुत” म्हणुन मानगुटीवर बसलाय… भविष्यकाळ कुठंतरी दडुन बसलाय आणि दोघांच्या मधला जो “वर्तमान काळ”… या वर्तमान काळानं आजीच्या हातात भिकेची झोळी दिलेय…

भुतकाळाला विसरण्याचा प्रयत्न करत… वर्तमानकाळात हे पाय लटपटत लटपटत चालताहेत… पोरांचा भविष्यकाळ शोधत..!

तेव्हापासुन हि आज्जी या लहानग्यांचा सांभाळ करते.

सख्खी आई सोडुन गेली… पण आईच होवुन आज जी या पोरांना मायेचा आधार देत्येत तीच ही आज्जी…!!!

ही आज्जी एव्हढी धिराची की तीनं एका संस्थेला मुलांच्या शिक्षणासाठी विनंती केली, आणि या संस्थेनं दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलीय.

आज्जी दोन्ही मुलांना बोटाला धरुन शाळेत नेते, शाळेतुन परत आणते.

एका हाताच्या बोटाला एक मुलगा आणि दुस-या हाताला दुसरा मुलगा… असं चालत जातांना तिघांनाही मी खुप वेळा पाहिलंय…

यांना असं रस्त्यात चालतांना पाहुन नेहमी वाटतं…
वर्तमानकाळाचं बोट धरुन रस्त्यावरुन भविष्यकाळ चाललाय दिमाखात … भुतकाळाला पायाखाली तुडवत तुडवत..!

भानावर येत, पाणावलेल्या डोळ्यांनी मी तीचे हात हाती घेवुन म्हटलं होतं… “तुच यांची खरी आई! खुप सोसलंस तु, तरी उठुन उभी राहिलीस…”

ती यावर फक्त हसली होती.

“आज्जी, या पोरांना तु इथं का बरं बसवतेस?” मी जरा चाचरत बोललो.

ती म्हणाली, “नाय वो, आज शनवार ना? आर्ध्या दिसाची शाळा… शाळेतनं पोरं मला भेटायला आली… आता आमी तिगंबी घरीच जाणार… आभ्यास कराया लावणार… मी न्हाय बा माज्या लेकरान्ला रस्त्यात घिवुन बसत… ह्ये बगा निगाले मी… चला रं… म्हणत ती दोघांना घेवुन निघुन जाते…”

आज्जीला बिलगुन तुरुतुरु चालणाऱ्या त्या आईबापाविना जगणाऱ्या पोरांवर आणि आईबाप होवुन पोरांना जगवणा-या त्या आज्जीच्या पाठमो-या मुर्तीवर नजर खिळुन राहते.

यानंतरही आज्जी मला नेहमीच भेटते. मध्ये हिचे डोळे पुर्ण जायची वेळ आली होती. डोळे गेल्यावर माज्या लेकरांचं कसं हुयील या विचारानं ती धास्तावली होती.

यानंतर आज्जीच्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करुन घेतले, पुन्हा जेव्हा तीला नीट दिसायला लागलं, तेव्हा गळ्यात पडुन रस्त्यातच हमसुन हमसुन रडली होती..!

रडतच म्हणाली होती, “मला नाय, माज्या लेकरांनाच डोळे दिले तुमी जणु… तुमी जर माजं आपरेशन केलं नसतं तर आंधळी झाले आसते मी, मग माज्या लेकरांचं कुणी केलं असतं…? पोरं शिकुन मोठी होवुस्तवर देवाला म्हणावं… मला काय बी होवु देवु नगंस… डाक्टर सांगाल का वो देवाला?”

हातांचं चुंबन घेत कळवळुन बोलणारी तीची ही वाक्यं ऐकुन डोळे कधी दगा देतात हेच कळत नाही!

ती सर्व श्रेय मला देते, पण मी एकटाच या श्रेयाचा धनी नाही!

भिक्षेक-यांचे डोळ्याचे ऑपरेशन करण्याची सुबुद्धी आम्हाला ज्या अज्ञात शक्तीने दिली त्या शक्तीचे आभार!

लोकसहभागातुन मिळणाऱ्या देणग्यांवरच हे सर्व काम सुरु आहे.

कौतुकाचे खरे धनी म्हणजे ज्यांनी आम्हाला हरत-हेनं मदत केली ते ज्ञात आणि अज्ञात देणगीदार..!

अर्थात तुम्हीच..!

जाणते आजाणतेपणी आपल्याकडुन कुणाचं तरी आयुष्यं सावरलं जातंय याचा आनंद शब्दात नाहीच सांगता येत.

अशा लोकांच्या अंधाऱ्या आयुष्यात तुमच्याचमुळे पुन्हा उजेड पडतोय… मी ऋणी आहे सर्वांचा..!

आजीनं मला दिलेले आशिर्वाद मी तुमच्यापर्यंत पोचवतोय, कृपया स्विकार करावा!!!

तर… एकदा आज्जीला म्हटलं, “तुजी पोरगी तर चांगली श्रीमंत आहे… तीला सांग की जरा मदत करायला..!”

आज्जीनं हसत सांगितलं, “तीच्या लग्नात जावयाचा मानपान आमच्याकडनं नीट झाला नाय म्हणुन तो आमच्यावर चिडुन हाय. शिवाय ती बंगल्यातली मान्सं, आमी झोपडपट्टीतले… त्याला आमची लाज वाटते. माज्या पोरीला सुद्धा मला भेटायची त्यानं बंदी घातलीय. तरी पोरगी तोंडाला रुमाल बांधुन येते, काहीबाही मदत करुन जाते, कधी कुणाच्या हाती काहीतरी गुपचुप पाठवुन देते.”

“पण ज्या दिवशी हि गोष्ट तीच्या नव-याला कळते त्यादिशी तीला तो मरुस्तवर मारतो… एकदा तर ऍडमिट करायला लागलं होतं… मग मी त्याच्याविरुद्ध पोलिस कम्प्लेंट केली…”

“तेव्हापसनं तर पोरीचं तोंड पण दिसु दिलं नाय त्यानं…”

“असुदे, आमाला नको मदत… मला न भेटता जर तीला तो सुखानं नांदवत आसंल, तरी मला चालंल… आमी जगु कसंबी…!”

आज्जी नजर फिरवते… तीचे डोळे दिसत नाहीत, पण एका आईचे वाहणारे अश्रु लपतही नाहीत..!

मी तीला विचारलं, “तुझी आणि मुलांची सोय कुठं होते का? यासाठी प्रयत्न करु का?”

ती यावर नाही म्हणते…!

ज्या झोपडीत नवरा गेला, मुलगा गेला… त्या झोपडीत त्यांच्या आठवणी आहेत, वस्तुंना त्यांचा झालेला स्पर्श आहे… या त्यांच्या आठवणी आणि स्पर्शावरच शेवटपर्यंत जगायचं… आणि इथुनच निघुन जायचं असं तीनं ठरवलंय…!

मी तीला दिलासा देण्यासाठी म्हटलं… “मावशी, बघु नविन वर्ष सुरु झालंय… या नवीन वर्षात हुयील काहीतरी चांगलं…”

ती शुन्यात पहात म्हणाली, “डाक्टर, वर्ष फक्त वर्षातनं एकदाच बदलतं… माणसं दिवसातुन चारदा बदलतात, माणसं जोपर्यंत बदलायचं सोडणार नाहीत, तोपर्यंत कितीही वर्षे बदलली तरी उपयोगाची नाहीत..!”

किती गहन गोष्ट सोप्या भाषेत या मावशीनं सांगितली..!

माणुस वाचतो खुप… पण त्यातुन कळलं किती हे महत्वाचं..!

ऐकतो खुप… पण समजलं किती हे महत्वाचं..!

जीवंत राहुनही… जगला कसं हे महत्वाचं..!

ही मावशी आज या मुलांची आई झालीय, बाप झालीय… न वाचताही हिला बरंच काही कळलंय… आपलं आख्खं आयुष्य या पोरांच्या भविष्यासाठी तीनं रस्त्यावर मांडलंय… हिला जगणं कळलंय..!

आपण स्वतःचा विचार करत रात्र जागवतो त्याला “जागरण” म्हणतात… दुस-यांचा विचार करत रात्र जागवणे याला “जागृती” म्हणतात..!

नुसतीच जागरणं करायची का जागृत व्हायचं, ज्याचं त्यानं ठरवायचं..!!!

मावशी म्हणते, “पौर्णिमेचा चंद्र पहायचा असेल तर त्यो रात्रिलाच दिसणार… मग रात्र झाली अंधार पडला म्हणुन आपन का खंत धरायची? ज्याला चंद्र बघायचाय त्यानं काळोख पचवायला बी शिकलं पायजे…”

आयुष्याच्या युनिव्हर्सिटीनं मावशीला डबल ग्रॅज्युएट केलं होतं..!

औषध देतांना ही मला नेहमी म्हणते, “डाक्टर मी जर गेल्याचं तुमाला कधी कळलं तर पोरांची काळजी घ्या, त्यांना संस्थेत टाका… पोरांना मी गेले असं सांगु नका, त्यांना सहन नाय होणार…”

“आज्जी परत येणार आहे असंच सांगा..!”

या वाक्यांनी मी गहिवरतो…!

ती पदर पसरते, कराल ना माझ्या माघारी डाक्टर? कळवळुन पसरलेल्या तीच्या पदरात माझे अश्रु नकळत सांडतात… ती भाबडी या अश्रुंनाच माझा होकार समजत पदर सावरते..!

तिकडुन मुलं येतात, आज्जीच्या पदराशी झोंबत तीला म्हणतात, “चल ना घरी आज्जी…”

ही मावशीही उठते, पोरांना हाताला धरत निघते… भुवया उंचावत माझा निरोप घेते…

मी या तिघांच्या पाठमो-या आकृतीकडे पहात राहतो… निःशब्द!

देवा असशीलच कुठे तर पोरांच्या या आज्जीला जास्तीत जास्त जगव…

नाहीच जमलं तर या पोरांसाठी काही करायचं बळ मला दे..!

दोन्हीतलं एक काहीतरी कर…

करशील ना? करच..!

नाहीतर हिच्याही पिंडाला कावळा शिवणार नाही बघ…!!!

1 Comment

  1. पुन्हा निःशब्द……
    हीच नि:शब्दता खुप बळ देते ब-याच वेळी; सर्वांनाच..तुम्हाला, आम्हाला, सर्वांनाच…..

Leave a Reply

Your email address will not be published.


*