पप्पा..!!!

पुण्यातलाच एक इंग्रजाळलेला भाग… मी १५ दिवसातल्या एका मंगळवारी इथं येतो.

तीच गर्दी… तेच चेहरे! काही मुखवटे लावलेले काही बिनमुखवट्याचे…

कुणी आत काही मागत असतं, कुणी बाहेर काही मागत असतं…

कुणी एक स्वप्नं पुर्ण झाल्यावर, दुसरं पुर्ण होण्याची इच्छा मनी धरुन येतो, कुणी स्वप्नंच मागायला येतो, कुणी झोप मागायला येतं, तर कुणी स्वप्नं पाहण्यासाठी रात्रच मागायला येतं..!

प्रत्येकाचं मागणं वेगळं..!

“रात्र” हरवलेली माणसं इथं येतात “दिवसा”… स्वप्नं गोळा करायला!

अशाच एका स्वप्नं हरवलेल्या तरुण भिक्षेक-याबरोबर बसलो होतो. त्याचा नुकताच ऍक्सिडेंट झाला होता, पाय तुटला होता, पायात रॉड घातला होता. आता तो व्यवस्थित चालुही शकतो. पायाला मलमपट्टी करत करत मी त्याला काहीतरी काम करण्यासाठी सुचवत होतो, विनवत होतो..!

“पाय बरा झालाय आता, सिक्युरीटी गार्ड म्हणुन बैठं काम करशील? नाही?”

“बरं, बिल्डिंगला वॉचमन? नको..?”

“बरं मग… केटरींग व्यवसाय? तोही नाही..?”

“मग ते हे करशील..? किंवा ते करशील..?”

“नाहीच..! बरं राहु दे बाबा..!!!”

जावु दे थोडे दिवस, करु त्याला तयार नंतर हळुहळु कामासाठी, असं स्वतःलाच समजावत मी तिथुन उठायला लागलो…

तेव्हढ्यात पाठीवर कुणाचीतरी थाप पडली, आणि कानावर आवाज आला…

“Why you are wasting your time on such people doctor? They will not listen to you!”

मी मागं पाहिलं, अंगावर चुरगाळलेला पण स्वच्छ हिरव्या चौकड्याचा शर्ट, काळी पँट, पायात जीर्ण झालेली चप्पल, पाठीवर अडकवलेली एक सॅक, दोन्ही हात रिकामे…

दोन्ही हातांची बोटं एकमेकांत गुंफलेली… सावळा वर्ण, केस साधारण विस्कटलेले… पांढरे झालेले… चेह-यावर दाढीचे बारीक वाढलेले पांढरे खुंट…

समोरचे दात पडलेत हे बोलताना जाणवत होतं… पण डोळ्यात मात्र विशिष्ट चमक..!

मला कळेना हे बाबा कोण? मनात म्हटलं, आले असतील दर्शनाला…

मग त्यांना म्हटलं,

“I am not wasting my time sir, I am investing my time on these people. Today they are not listening, but after realising the fact in future, they will start listening… We need to give some time!”

“शेतात बी पेरल्यावर काय लगेच धान्य येतं का? खतं आली, मशागत आली, पाऊसपाणी आलं, निगराणी आली… मग शेवटी धान्य मिळणार..! त्याची पण गॅरंटी नाही…”

“आता तर कुठं पेरलंय, उगवायला वेळ लागेलच की… बघु…” मी हसत बोललो..!

“ज्याची गॅरंटीच नाही ते करायचं कशाला डॉक्टर..?”

“सर, उद्या उठायची गॅरंटी नसतानाही, रात्री झोपतोच की आपण…”

“जिंकायची गॅरंटी नसतानाही आयुष्यात कसले कसले डाव मांडतोच की आपण…”

“काहीही इथुन घेवुन जाण्याची गॅरंटी नाही, तरी आयुष्यंभर काहीतरी साठवतच असतो की आपण…”

“माणुस श्वासावर नाही, आशेवर जगतो…”

“श्वास थांबतो ते खरं मरण नाहीच, आशा संपते, तेव्हाच मृत्यु होतो..!”

ते हसले, कदाचित कौतुक वाटलं असावं, त्यांनी खांद्यावर हात ठेवला माझ्या..!

मी म्हटलं, “सर आपण..???”

ते हसले, म्हणाले, “In that way, I am also your client..!”

“म्हणजे..? मी समजलो नाही..?” मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं…

पुन्हा शुन्यात बघत म्हणाले, “ज्या भिक्षेकरी वर्गासाठी तुम्ही काम करता, त्याच वर्गातला मी एक प्रवासी..!”

“मी अजुनही समजलो नाही…” मी आश्चर्याने बोललो..!

ते पुन्हा हसले… म्हणाले, “तुम्ही आत्ता जो डॉक्टरचा पांढरा कोट घातलाय, त्यावर पाठीमागे काय लिहीलंय..?”

म्हटलं “DOCTOR FOR BEGGARS (डॉक्टर फॉर बेगर्स )”

“हां…बरोब्बर! अहो तुम्ही डॉक्टर आणि मी बेगर म्हणजेच भिकारी..! समजले???”

“हा…हा…हा..!!!” ते गडगडाटी हसले, म्हणाले, “मी ही कधीकधी येवुन बसतो इथे… काय करणार..?”

हे ऐकुन, मला खरंतर फार आश्चर्य वाटलं नाही…

चांगल्या घरातले बरेचसे लोक, ओढवलेल्या विचित्र परिस्थितीमुळे भिकेला लागलेत, हे मी जवळपास रोजच पाहतो…

मी म्हटलं, “बाबा तुम्ही चांगल्या घरातले, शिकलेले वाटता…”

तिरकसपणे माझ्याकडं बघत म्हणाले… “शिकलेला वाटतो ते ठिक आहे, पण मी चांगल्या घरातला आहे हे अनुमान कशावरुन काढलंत आपण साहेब?”

मी ओशाळलो… “नाही म्हणजे… ते…”

माझं वाक्य अर्ध्यावरच तोडत ते बोलले, “चांगल्या घरातला असणं वेगळं… आणि घरातले लोक चांगले असणं वेगळं…”

“ब-याचवेळा इमारत बांधली जाते, पण ते घर होईलच याची गॅरंटी नसते..!”

“पत्त्याच्या खेळात बादशहा आपल्याकडे असतो, आपण निर्धास्त असतो… पण समोरचा ऐनवेळी “एक्का” काढतो… आणि क्षणार्धात आपण डाव गमावतो..!”

“एक्क्याची खरी किंमत काय? एकच ना? पण तो बादशहालाही भारी पडतो…”

“त्याची राणी मग माघार घेते…”

“दुर्री पासुन दश्शी पर्यंत जन्म दिलेली पिलावळ मग सोडुन जाते…”

“आणि हा बादशहा जगतो केवळ एक “गुलाम” म्हणुन..!”

मी बोलुन गेलो… “खरंय बाबा, हा एक्का म्हणजे कुणीही असेल… परिस्थिती असेल, नशीब असेल किंवा आपलं कर्मही असेल!”

“या एक्क्यापुढं कुणाचंच काही चालत नाही!”

“पण, आयुष्याची गंमत अशी की फुलांनाच चुरगाळलं जातं… काट्यांना कुणी चुरगाळल्याचं ऐकलंय का कधी..?”

“आपण जेव्हा इतरांकडुन चुरगाळले जातो, तेव्हा आपण फुल आहोत, काटे नाहीत असं बेशक समजावं… तेव्हढंच आपल्या मनाचं तरी समाधान… निदान यामुळे आपलीच जगण्याची उमेद तरी वाढते…नाही का?”

ते भकास हसत म्हणाले, “स्वतःला देवाघरचं फुलच म्हणायचो मी पुर्वी… पण कधी Fool झालो कळलंच नाही… झोळीत इतकं काही पडलंय कि Full झालो, पुरे आता म्हणायची वेळ आली…”

“पुर्वी “लोक” मला म्हणायचे, हि पण “वेळ” निघुन जाईल… पण आता वेळेनंच मला सांगीतलंय की… “लोकच” निघुन गेलेत केव्हाचेच…”

“असो, हरकत नाही. पण मी अजुन हरलो नाही बरं…”

“डॉक्टर, उमेद असेल ना तर घड्याळातले काट्यांची “टकटक” ऐकु येते, उमेद संपली की याच काट्यांची “कटकट” होते…”

“माझ्यात अजुन उमेद आहे डॉक्टर..!”

“उन्हं खुप आहेत बाबा, चला त्या झाडाखाली सावलीला बसु”, मी म्हटलं…

बसता बसता म्हटलं… “या वयातही उमेद न सोडणा-या बादशहाशी मी बोलतोय याची मला जाणिव आहेच… पण या बादशहानं मग हि “गुलामगिरी” का पत्करली..?”

हातात हात घेत ते म्हणाले, “जावु दे ना डॉक्टर… आपली दुःख्खं आपल्या मनात ठेवली तरच त्याला किंमत असते… ती जगाला दाखवली की लोकं आपला तमाशा बघतात… त्याचा बाजार करतात..!”

मी म्हटलं, “मला सांगा… मी त्याचा बाजार नाही मांडणार, तमाशा नाही पाहणार, किंवा तुमची दुःख्खं विकतही नाही घेणार..!”

“जमलंच मला तर, त्यात वाटेकरी होण्याचा प्रयत्न करेन…”

“नको डॉक्टर, आता मी दगड झालोय…”

“असु दे ना, याच दगडात एक मुर्ती लपली आहे… नको असलेला दगडाचा भाग आपण तासुन टाकायचा… उरते केवळ मुर्ती!”

पुन्हा एकवार गडगडाटी हसत त्यांनी सुरुवात केली…

“मी खरंतर ग्रॅज्युएट. नोकरी कुठं केली नाही. पण मिळेल ते काम करत गेलो… पै पै साठवत गेलो. घर बांधलं… दोन मुलं झाली. थोरल्याला वकील केलं, त्याचं लग्न लावुन दिलं, त्याची बायकोही वकिलच!”

“माझं सर्वस्व मी त्याला दिलं… त्याने शब्दशः माझं सर्वस्व घेतलं…”

“सुरुवातीला बरं होतं, पण कुठं कसं काय झालं कळलं नाही…”

“मी घरातुन बाजुला फेकला गेलो. माझ्या बायकोने म्हणजेच त्याच्या आईने, मुलगा आणि सुनेचा हात धरला. मी दुर फेकला गेलो…”

“आधी मानसिक मग आर्थिक आणि आता शारीरीक! मी एकटाच आहे..!!!”

इतक्या वेळात प्रथमच मी त्यांच्या डोळ्यात पाणी पाहिलं…

डोळ्यातल्या या पाण्याला वाहण्याचाही जोर नव्हता…

डबक्यात साठुन राहिलेल्या पाण्यागत, गालावरच थिजुन जात होतं, त्यांच्या डोळ्यातलं हे पाणी!

गालावरुन खाली ओघळण्याचं धैर्य या अश्रुंमध्ये नाही… आणि प्रेमानं कुणी ते पुसावेत असं भाग्यही नाही…

इतकी अगतिकता का यावी आयुष्यात..?

“बाबा, पण तुमची बायको?” मी खालच्या आवाजात विचारलं…

म्हणाले… “आम्ही म्हणजे नदिचे दोन काठ हो… सोबत राहिलो… पण एकत्र कधी आलोच नाही..!”

माझ्या अंगावर काटा आला…

खरंच सोबत राहणे म्हणजे एकत्र असणे नव्हे..!

एक काठ दुस-या काठाच्या हाकेच्या अंतरावर असतो, शेजारीच असतो… सोबत असतो… पाण्याला घेवुन त्याच्या वाहण्याला ते वाट करुन देतात… स्वतः मात्र तिथेच… अबोल आणि अगतिक… कित्येक वर्षे ते असेच पडुन राहतात, शेजारी शेजारी…

दुष्काळात पाणी नसतांना हे काठ जास्त ठळक दिसतात, आणखी बटबटीत होतात… कारण पाणीच नसतं..!

कधीकधी वाटतं… पुर यावा… नदी दुथडी भरुन वेगानं काठ तोडुन वहावी… आणि दोन्ही काठ तुटुन पडत, स्वतःचं स्वतंत्र आस्तित्व सोडुन एकच व्हावेत…

पाण्या पाण्याच्या थेंबांनी आणि माती मातीच्या कणांनी मग एकत्र यावं… एकमेकांना गच्च धरत एकरुप व्हावं…

इतकं की काठ कुठला, पाणी कुठलं नी माती कुठली हे कळुच नये कुणाला… सारं सारं गढुळ होवुन जावं..! असा एखादा पुर यावा आयुष्यात..!

वैयक्तिक आयुष्यात हि एकरुपता साधता आली तरच ते आयुष्य… नाहीतर नुसताच काठ, नुसतंच पाणी… आणि उरणारी ती नुसतीच भुसभुशीत माती..!

कधीकधी असंही गढुळ व्हायला काय हरकत आहे..!

“डॉक्टर…” बाबांनी तंद्री तोडली माझी…

“झोपला काय बसल्या बसल्या”, ते हसत म्हणाले…

म्हटलं, “नाही हो… आत्ता तर कुठे जागा होतोय…”

“फक्त पापण्या मिटल्या म्हणजे झोपला असं नसतं…”

“डोळ्यात स्वप्नं घेवुन वावरायचं असतं… हळुच पापण्या मिटुन त्या स्वप्नांशी हितगुज करायचं असतं…”

“डोळ्यांत स्वप्नंच नसतील, आणि नुसत्याच पापण्या मिटणं यालाच मृत्यु म्हणतात..!”

“असो, बाबा… ज्या मुला बायकोनं तुमच्यासारख्या बादशहाला, गुलामासारखं जगायला लावलं, त्यांचा राग नाही येत तुम्हाला..?”

“नाही हो डॉक्टर… राग कसला..? ज्याचा त्याचा वैयक्तिक गुणधर्म असतो… Characteristic म्हणा ना…”

“साखर गोड असते, ती गोडवाच देणार… मीठ खारट असतं… ते खारटच राहणार… मिरची तिखट असते… ती तिखटच राहणार…”

“यांनी आपापले गुणधर्म सोडले तर काही अर्थ राहील का?”

“प्रत्येक गुणधर्माच्या याच वस्तु घेवुन आपण स्वयंपाक करतो ना…”

“मीठ खारट म्हणुन, जेवणात आपण टाकायचं थांबतो?”

“का… मिरची तिखट म्हणुन वापरायचं कुणी थांबतं?”

“काहीवेळा एखादी गोष्ट कमीजास्त होणारच…”

“कधी मीठ जास्त पडलं तर जेवण खारट… कधी मिरची जास्त पडली तर तोंडाची आग..!”

“चुक असते स्वयंपाक करणा-याची…यात मिठाचा आणि मिरचीचा काय दोष? त्यांनी आपला धर्म सोडला नाही इतकंच..!”

“माझ्याही जेवणात मीठ आणि मिरची जरा जास्त आली इतकंच… चालायचंच की..!” ते सहज बोलुन गेले…

“यावर आता उपाय काय..?” मी एखाद्या शिष्यानं गुरुला विचारावं तसं विचारलं…

हळुच मग माझ्या कानाजवळ येवुन, काहीतरी गुपीत सांगितल्यागत ते बोलले,

“जेवणात मीठ मिरची जास्त पडली तर एखादी सुगरण काय करते माहित आहे का? ती ते जेवण फेकुन देत नाही… त्याच भाजीत आणि आमटीत ती थोडं पाणी ओतते… थोडं शिजु देते, वाट पाहते… याच जेवणातला खारटपणा आणि तिखटपणा मग कमी होतो आपोआप!

मी पण हेच करतोय… माझ्या आयुष्यात आलेल्या खारट आणि तिखट जेवणात, मी हळुहळु पाणी टाकतोय, शिजण्याची वाट पाहतोय… अशानं होईल माझ्याही आयुष्यातला खारटपणा आणि तिखटपणा कमी… जरा कळ सोसावी लागेल इतकंच..!”

“बाबा, पण हे खारटपणा कमी करण्यासाठी पाणी टाकायचं म्हणजे नेमकं काय करायचं..?”

मी बालीश प्रश्न विचारला…

ते चेह-यावर स्मितहास्य आणत म्हणाले…

“Doctor I am Jack of all but master of none..!”

“म्हणजे..?” मी पुन्हा बाळबोध चेहरा करत विचारलं…

“म्हणजे डॉक्टर, मी मघाशीच म्हणालो, आयुष्यात पडेल ते काम केलंय मी!”

“मला थोडं व्यापारातलं कळतं, थोडं Construction लाईनमधलं, मी ड्रायव्हिंग केलंय, मी एक उत्तम कुक आहे… तुम्ही जे सांगाल ते मी काम करु शकतो,”

“बरं मग..???” मी!

“अहो बरं मग काय? मी हे असं पडेल ते काम रोज करतो आणि मिळालेल्या पैशात काटकसरीने जेवतो, मिळेल तिथे झोपतो आणि साधारणपणे माझ्या कमाईतले 60 टक्के रक्कम मी घरी मनीऑर्डर करतो…”

“माझ्या मुलाला आणि बायकोला मदत करतो..!”

“क्काय..?” मी जवळपास ओरडलो असेन!

“अहो बाबा, हा येडपटपणा कशासाठी? अशा लोकांसाठी का करता हे???”

ते म्हणाले, “मी आधीच सांगितलंय; मुलगा खारट आहे आणि बायको तिखट… त्यांचा हा गुणधर्म जाणार नाहीच, पण मग मी माझा तरी गुणधर्म का सोडु?”

“मी पाणी टाकत राहणार… गोडवा देत राहणार… बदलेलच कधीतरी परिस्थिती माझ्या ताटातली..!”

“आणि नाहीच बदलली तर?” मी बोललो…

“डॉक्टर तुम्हीच म्हणालात ना… पेरायचं, मशागत करायची, खतपाणी घालायचं… पीक नक्कीच उगवेल…”

“तुम्हीच म्हणालात ना आशेवर माणुस जगतो… मी ही याच आशेवर आहे..!”

खुळ्या आशेवर हा जगत असलेला एक बाप आणि एक पती… त्याहुन मोठा एक माणुस!

मी त्यांचे हात हाती घेतले, थंडगार सावलीत बसुनही, बाबांचे हात गरम होते, या हातांवर आता माझ्या डोळ्यातल्या उष्ण अश्रुंचा अभिषेक होवु लागला…

“बाबा… काम तर करता, मग ही भीक कशासाठी?”

ते छद्मीपणानं म्हणाले, “माझ्यासारख्या म्हातारघोड्याला पुर्णवेळ कामावर कोण ठेवील? काम असलं की करायचं, नसेल तेव्हा इथं यायचं… या लोकांची दुःख्खं बघायची… आणि त्यामानानं आपलं आयुष्यं किती छान म्हणत, आपल्याच दुःखावर आपणच फुंकर मारायची…”

ते पोकळ हसले… आणि मान दुसरीकडं वळवली…

मान वळवली, तरी हुंदके लपवता येत नाहीत!

“बाबा तुम्हाला दुसरा मुलगाही आहे असं तुम्ही म्हणालात…” मी चाचरत बोललो.

डोळे पुसत ते उत्साहाने म्हणाले, “हो; इंजिनियरींगच्या दुस-या वर्षाला तो आहे.”

“त्याची फी भरुन त्यालाही शिकवावं अशी घरातल्या कुणाचीही इच्छा नाही, शिकला नाही तर वाया जाईल तो, म्हणुन मी परस्पर त्याच्या कॉलेजात जावुन बिनबोभाट त्याची फी भरुन येतो…”

मला हसावं की रडावं तेच कळत नव्हतं..!

म्हटलं, “बाबा… अहो त्याला तरी किंमत आहे का तुमची?”

“मी किंमतीसाठी करतच नाहीय काही डॉक्टर…”

“मी माझा गुणधर्म सोडणार नाही..! त्यांना वागायचं तसं वागु दे..!”

“मुलं काय म्हणुन हाक मारतात तुम्हाला..?”

“पुर्वी पप्पा म्हणायचे…” ते उदास हसत बोलले..!

“आता कुणी काही म्हणायचा प्रश्नच येत नाही…”

“बाबा, जे तुम्हाला पप्पा म्हणायलाही नकार देतात, त्यांच्यासाठी इतकं करताय तुम्ही..?”

“डॉक्टर, अहो ती मुलं आहेत, बाप काय चीज असते, त्यांना थोडंच कळणार आहे?”

“जेव्हा ही मुलं भविष्यात बाप होतील, तेव्हातरी त्यांना आपल्या बापानं केलेल्या गोष्टी आठवतील..!”

म्हटलं, “म्हणजे; ते जे वागले, त्या सर्व गोष्टींना माफ केलं तुम्ही असंच ना?”

“Offcourse! माफ केलंय मी त्यांना… मरतांना त्यांनी केलेल्या चुकांचं ओझं मी का वाहु?”

“आज मी त्यांना माफ केलं तरच उद्या ते कुणालातरी माफ करु शकतील… अन्यथा सुडाचा हा खेळ वर्षानुवर्षे चालेल..!”

“म्हणजे एक्का तुमच्याचकडे असुनही तुम्ही मुद्दाम डाव हरणार तर…”

थोडं थांबुन म्हणाले… “हरणं आणि जिंकणं कसलं आलंय डॉक्टर…”

“पण ही मुलं जर माणुस म्हणुन जगली तर मी जिंकलो…”

“चवीपुरतंच खारट व्हायचं असतं एव्हढं आयुष्यात शिकली तर मी जिंकलो…”

“स्वादापुरतंच तिखट व्हायचं असतं, एखाद्याला दाह नसतो द्यायचा, एव्हढं यांना समजलं तरी मी जिंकलो…”

“सुड घेण्यात मजा नसते… माफ करणारा दिलदार असतो, एव्हढं त्यांना कळलं तरी मी जिंकलो..!”

माझे डोळे पाणावले… आणि त्यांचेही…

पोरांनी घराबाहेर काढलेला तरीही त्यांच्यासाठी काम करणारा, प्रसंगी भिक मागुन त्यांना हात देणारा हा बाप खुप उंच वाटला मला..!

मी म्हटलं… “आजपास्नं मी तुम्हाला पप्पा म्हटलं तर आवडेल का?”

झट्कन् माझा हात ओढत कपाळाला लावत म्हणाले, “वर्षानुवर्षे तहानलेल्याला पाणी हवंय का म्हणुन काय विचारताय डॉक्टर..?” यापुढंही ते बरंच बोलले असावेत, पण खालमानेनं दिलेल्या त्यांच्या हुंदक्यात शब्द कुठंतरी हरवुन गेले होते..!

जातांना म्हटलं, “कायमस्वरुपी एका मोठ्या हॉटेलात कुक म्हणुन नोकरी दिली तर कराल? रहाणं खाणं कपडालत्ता आणि वर पगार अशी सगळी सोय होईल…”

“डॉक्टर, मी कशाला नाही म्हणेन… करेन मी मन लावुन काम…”

“ठरलं तर मग बाबा, मी येतो पुढल्या खेपेला, तेव्हा कामाला जायच्या तयारीने या..!”

“हो… पण तुम्ही मला बाबा नाही पप्पा म्हणणार होते ना..?” लहान मुलासारखं, मान खाली घालुन ओठांचा चंबु करत म्हणाले…

मी परत आलो, खांद्यावर हात ठेवला… आलिंगन दिलं… आणि कानाजवळ येवुन हळुच म्हणालो, “येतो मी पप्पा..!”

त्यांचा उरलासुरला बांध फुटला… अश्रुंना त्यांनी मनमोकळी वाट करुन दिली आणि माझ्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले… “हो… हो नक्की ये बाळा… Come again in my life, come again!”

ही वाक्यं त्यांनी त्यांच्या मुलांना उद्देशुन वापरली असावीत. माझ्यात काही काळ त्यांना आपली मुलं दिसली असावीत…

ते निघाले, उठुन चालायला लागले. चालता चालता डोळे पुसत होते, मध्येच मागे वळुन मला टाटा करत होते, पुन्हा भेट हां असं दुरुनच मला खुणेनं सांगत होते…

त्यांच्या पाठमो-या आकृतीत मला दिसत होता एक प्रेमळ आणि मायाळु “पप्पा”, आणि मुलांसाठी गुलाम म्हणुन जगणारा एक बादशहा..!!!

त्यांच्यातल्या या पप्पाला माझा मनापासुन साष्टांग नमस्कार!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*