रोजच्या माझ्या कामात, जास्तीत जास्त भिक्षेकरी, मला एकगठ्ठा कुठं मिळु शकतील याच्या सतत शोधात असतो.
ही माहिती मी त्यांच्याचकडुन काढत असतो.
एके दिवशी मला समजलं, पुण्यात एक कब्रस्तान आहे, तिथे एका विशिष्ट दिवशी भिक्षेक-यांची खुप गर्दी असते..!
धार्मिक स्थळांबाहेर भिक्षेक-यांची गर्दी मी रोजच पाहतो… पण कब्रस्तानही..? इथेही भिक्षेक-यांची गर्दी???
मी मग एके दिवशी त्या विशिष्ट दिवशी कब्रस्तान मध्ये गेलो… खरंच कब्रस्तान बाहेर भिक्षेक-यांची तुडुंब गर्दी..!
सगळेच लोक माझ्यासाठी नविन आणि त्यांच्यासाठी मी ही..!
“हा कोण?” सगळ्यांच्याच चेह-यावर प्रश्नचिन्ह…
मी भिक्षेक-यांना ओलांडुन, गेट मधुन दबकत कब्रस्तानमध्ये गेलो… आतलं वातावरण खरंच अत्यंत करुण!
बांधलेल्या चौथ-याशेजारी उभं राहुन प्रत्येकजण आपआपल्या गेलेल्या लोकांशी डोळ्यात पाणी आणुन तोंडातल्या तोंडात पुटपुटत होते… जणु ते त्या गेलेल्या व्यक्तीशी संभाषण साधत होते…
काही व्यक्ती तर, हातवारे करुन इतक्या तल्लीन होवुन चौथ-याशी बोलत होत्या, जणु ती व्यक्ती समोर आहे…
काहीजण हताश होवुन रडत होते… काहीजण गेलेल्या व्यक्तीला परत येण्याबद्दल मनापासुन विनवत होते…
काहीजण आभाळाकडं बघुन मुक आक्रोश करत होते…
कब्रस्तान मध्ये कमालीची शांतता होती… पण तरीही भेटायला आलेल्या व्यक्तीच्या मनात इतका कल्लोळ माजला होता आणि प्रत्येकाच्या चेह-यावर तो दिसत होता…
इतकं करुण वातावरण पाहुन मलाही रडु फुटेल का काय असं वाटायला लागलं…
गेलेल्या प्रत्येक व्यक्तीस शांतता मिळो, मागे उरलेल्या आप्तांना धैर्य मिळो अशी प्रार्थना करुन मी कब्रस्तान च्या बाहेर आलो…
बाहेर भिक्षेक-यांची तोबा गर्दी…
गेलेल्या व्यक्तीसाठी दुवा मागितली की कब्रस्तानमधुन बाहेर येतांना लोक काही दान करतात..!
अच्छा..! म्हणजे भिक्षेक-यांची गर्दी यासाठी होती तर..!!!
मी माझी ओळख करुन देवुन कब्रस्तान बाहेर गेटवर त्यांच्यातच जावुन बसलो… हळुहळु ओळखी होत गेल्या..!
यानंतर मी नेहमीच तिकडे जायला लागलो… माझं कुटुंब अजुन वाढलं… साधारण ५० लोकांची अजुन भर पडली या माझ्या कुटुंबात..!
माझ्या या कुटुंबात अंध आहेत, अपंग आहेत, खुप थकलेले आयुष्याच्या अंताला लागलेले आहेत तसेच काम नाही म्हणुन हताशपणे भीक मागणारेही लोक आहेत..!
यांच्या घरातला मी कर्तापुरुष आहे… असं ते समजतात आणि आता मी ही..!
चालायचंच, वासरांत लंगडी गाय शहाणी..!
तर… औषधं देता देता माझी नजर अशांनाच शोधत असते…
असाच इथे एकदा आलो होतो… नेहमीप्रमाणे भिक्षेक-यांना तपासत असतांना एका तरुणाकडं लक्ष गेलं…
बाजुच्या कच-यात पडलेल्या, लोकांनी उकिरड्यात फेकलेल्या वस्तु तो वेचत होता. मध्येच काही खायची वस्तु हातात आली तर ती खातही होता..!
खुप वाईट वाटलं..!
कसं असतं ना… काही लोक अन्न मिळवण्यासाठी पायपीट करतात तर काही अन्न जिरवण्यासाठी शतपावली..!
चालणं तेच पण संदर्भ बदलले की अर्थ बदलतात..!
बुद्धीबळात असते ती “चाल”… शत्रु करतो ती “चालच”… गाण्याला लावतात तीही “चाल”… शब्द एकच… पण अर्थ अनेक..!
आपल्याही आयुष्याचं असंच..!
इथे अनुभव “मोफत” मिळतात… पण तरीही फार मोठी “किंमत” या अनुभवांसाठी मोजावीच लागते..!
काहीच फुकट मिळत नाही इथं म्हाराजा..!
एक श्वास घ्यायचा असेल तर एक श्वास द्यावाच लागतो..!
मी याच्याजवळ गेलो… पाठीवर हात ठेवला… झट्क्यात माझा हात झटकुन तो उठला आणि पुढं चालायला लागला…
मी मागं… तो पुढं..!
भविष्यकाळाच्या मागे भुतकाळ चालतो तसाच..!
शेवटी गाठुन, हाताने खायची खुण करुन,.. “काही खायचं का” विचारलं… झुरळ झटकावं तसं, माझ्याकडं बघुन “छ्या..!” म्हणाला…
“मग मघाशी उकीरड्यातलं वेचुन का खात होतास..?”
“पोराची आठवण आली… ह… ह… ह…”
विचित्रपणे हसल्यासारखं करत तो बोलला…
“म्हणजे..?”
“काय नाय… कच-यात केकचा तुकडा दिसला… ह… ह… ह…”
पुन्हा तसंच हसणं..!
खुप खोलातुन आलेलं ते हसणं… “ह… ह… ह..!”
पाणी नसलेल्या विहीरीतुन, तळाकडनं गुढ आवाज यावा तसा…
मी या विहीरीचा तळ गाठायचं ठरवलं…
महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातला हा..!
घरात आईबाप नावाच्या दोन म्हाता-या काटक्या, बायको नावाची एक जबाबदारी आणि या जबाबदारीला चिकटलेलं एक लहान, सुकलेलं फुल.. मुन्ना नावाचं!
नवरा बायको, गावात दुस-याकडे मिळेल ते काम करुन गुजराण करायचे… दोन वेळचं जेवण हीच चैन..!
त्यातल्या त्यात कळत्या पोरानं, कुणाला तरी गावात केक खाताना बघितलं… आईबापाकडे त्याने खायला केक मागितला.
दोन वेळची भाकर जमवण्यात ताकद खर्ची होत असलेल्या बापानं केक कुठनं आणावा…
रातभर पोरगं रडुन धुमसत राहिलं केकसाठी… आणि इकडे आईची उशी भरुन गेली आसवांनी…
बाप तिकडं तळमळत राहीला… रात्रभर..!
एक केकचा तुकडा देवु शकत नाही आपण पोराला?
तिरीमिरीत उठला… रात्रीचे तीन वाजलेले… वाट फुटेल तिकडे निघाला… आत्महत्या करण्यासाठी..!
केकच्या एका तुकड्यानं व्यथित झालेला बाप… मनात आत्महत्या आणि डोळ्यापुढं मुन्ना..!
चालता चालता विचार बदलत गेले… विचार आला, आत्महत्या करण्यापेक्षा, पुण्यात जावु काहीतरी काम करु… घरी पैसे पाठवु…
पुण्यात आला, पडेल ते, मिळेल ते काम करायला लागला…
दिवस काहीसे बदलले… मिळतील ते पैसे घरी पाठवायला लागला… दिवस ब-यापैकी पालटले…
घरीही जावुन येवुन करायचा महिन्यातुन एकदा!
बरं चाललं होतं…
आणि अशात घरुन सांगावा आला… घरात नुकतंच उमलु लागलेलं फुल कसल्याशा आजारानं देवाघरी गेलं… कायमचं… परत कधीही न येण्यासाठी..! मुन्ना गेला..!!!
पोराच्या एका केकचा तुकडा मिळवायच्या इर्ष्येखातर, गाव सोडुन पुण्यात जीव तोडुन काम करायला येणारा एक बाप आता मात्र मुलाच्या जाण्याने कायमचा कोसळला..!
मोडुन पडला… तुटुन गेला..!
“आता काम कुणासाठी करु? केकचे तुकडे कुणाला भरवु..?”
झोपेतही त्याला दिसायचा… त्याचा तो गोड मुलगा… मुन्ना… अन् त्याला आवडणारा केकचा तुकडा..!
आठवणींचं हे विष पचवण्यासाठी मग सुरु झालं “दारु” नावाचं औषध..!
या दारुने, मग याला सर्वांपासुन दुर नेलं…
नोकरी, घरदार, आणि समाज सगळं काठावर राहीलं… आणि हा गटांगळ्या खात राहीला भिकारी नावाच्या डोहात… हातात कटोरा घेवुन!!!
आज याच पोराचा वाढदिवस!
याच दिवशी तो गेला होता… आणि नेमका याच दिवशी मी याला भेटावं..?
कच-यात सापडलेल्या केकच्या तुकड्याचं मर्म आता मला कळलं होतं…
“ह… ह… ह…” करत तो हसला होता… मी रडलो होतो..!
मी त्याच्याजवळ बसलो… काय बोलु..? कसं बोलु..? एखाद्या बापाचं पोरगं गेल्यावर काय बोलायचं असतं..? कसं सांत्वन करायचं असतं..?
मी फक्त त्याचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं… आणि म्हटलं, “मी केक आणतो… मुन्नाचा आपण आज वाढदिवस साजरा करु…”
यावर तो दोन्ही हाताच्या मुठी वळुन, पालथ्या हाताने, रडणारे दोन्ही डोळे चोळत म्हणाला होता… “डाक्टर… त्यो येईल का खायला..? सांगा की… त्यो येईल का..? ह… ह… ह… सांगा ना..!”
मी येड्यासारखा फक्त त्या वेड्या बापाकडे बघत राहीलो… मी काय बोलु..?
आत्ता मला कळलं… कब्रस्तान च्या बाहेरच याचा जीव का रमत असावा..???
“चल जावु..?”
मी कसाबसा आवंढा गिळत म्हटलं..!
“डाक्टर… माज्या मुलाला आज आशिर्वाद देवुन जावा… आज त्येचा वाडदिवस हाय…” तो बोलला…
मी काही बोलणार… इतक्यात तो म्हणाला, “थांबा ना तो आहे इथंच… भेटुन जावा त्येला… जावु आपण त्याच्याकडे…”
मी चक्रावलो..!
तो उठला… मला हाताला धरुन कब्रस्तानातल्या एका चौथ-यापाशी घेवुन गेला… आणि त्या चौथ-याला हलवल्यागत करुन म्हणाला,
“देख मुन्ना… देख… कौन आया है… अंकल है आपना… डाक्टर अंकल है अपना… हॅलु बोल… हॅलु बोल… केक लायेला है अंकल… हॅलु बोल…”
पुन्हा माझ्याकडे बघत म्हणाला, “ह… ह… ह… बोलताईच नयी, सोयेला होंगा… ह… ह… ह..!”
तो हसत होता, आणि आख्खा रस्ताभर गाडी चालवता चालवता मी रडत होतो..!
आख्खा रस्ता मला भरल्या डोळ्यानं कब्रस्तान वाटत होता… आभाळाकडं पाहुन मी म्हटलं, “यार मुन्ना क्युं रुला रहा है अपने अब्बु को… वापस आजा मेरे भाई..!”
मध्येच मला भास झाला कुणाच्या तरी करुण हसण्याचा, “ह… ह… ह..!”
कोण हसलं हे..??? भरल्या डोळ्यांनी मला दिसलंच नाही…
शेवटपर्यंत…
“ह… ह… ह..!!!”
खुप काही अनुभवताय तुम्ही…इतकं, की मोठ्या कादंबरीचे शे दिडशे खंड हा हा म्हणता भरून जातील…तुम्ही खुप समृद्ध आहात, श्रीमंत आहात ते यामुळेच… तुम्ही आणि इतर वेगळे आहेत ते यामुळेच… शिवाय तुमचं लिखाण, त्यातला दृष्टीकोन तर अतुलनीय…hats off अभिजीत सर ?