झुक झुक बाबागाडी..!!!

“काय गं? थांब की जरा किती गडबड करते..? बाकीचे पण आजारीच आहेत ना..? त्यांना पण औषधं देवु दे की..!”

“न्हाय वो, मला जरा गडबड हाय… पोरगं येकटंच सोडुन आलीया… द्या की औशीद… आन् जावुंद्या मला…”

“अगं पण..? बरं… ये इकडं…”

लहान मुल असेल पाठीमागे, म्हणुन गडबड करत असेल, असं समजुन आधी तीला तपासायला घेतलं.

“केवढा आहे मुलगा..?” मी सहज तपासतांना विचारलं…

म्हणाली, “आसंल की तीसेक वर्साचा…”

मी जरा वैतागुन म्हटलं, “एवढं मोठं पोरगं आहे तुझं, मला वाटलं लहान नातवंड आहे म्हणुन घाई करत होतीस..!”

“पुन्हा अशी लबाडी नको करु हां…औषधंच देणार नाही खोटं बोललीस माझ्याशी तर..!”

यावर ती काकुळतीनं म्हणाली, “खोटं न्हाय बोलत सायेब… खरंच पोराला सोडुन आलीया औशीद न्हेयाला, येकटाच आसंल… त्येला सोत्ताचं सोत्ता काय करता येत न्हाई, माज्यावर आवलंबुन हाय…”

“हो ना, कुक्कुलं बाळच असेल ना हा ३० वर्षाचा घोडा? काय काम करतो, की दुसरीकडं भिक मागायला बसवुन आलीस त्याला..?”

तो भीकच मागत असणार हे गृहित धरुन मी गुश्श्यातच बोललो…

आपण प्रत्येक गोष्ट गृहित धरुन जगतो — यापेक्षा वेगळं काही असुच शकत नाही हे आपल्या मनात पक्कं बिंबलेलं असतं—

बर्फ थंडगार असतो हेच सर्वांनी गृहित धरलेलं असतं…

पण जास्त काळ बर्फाच्या संपर्कात आलो तर भाजल्यावर जसे फोड येतात तसे फोड येतात अंगावर… म्हणजे बर्फ ही भाजतो तर!

साप दिसला की चावणारच म्हणुन लोक लाठी हातात घेतात…

मी ही असंच गृहित धरुन बोललो होतो…

गंमत कशी ना? हत्यार तीक्ष्ण असतं, पण हत्याराने झालेला घाव भरुन येतो…

जीभ कोमल असते, मांसल असते पण जीभेमुळे झालेले घाव भरत नाहीत वर्षानुवर्षे..!

जीभेचा वापर आपण नकळतपणे “घाव” करण्यासाठी वापरतो… याच जीभेचा वापर आपण जाणीवपूर्वक “लगाव” साधण्यासाठी केला तर..???

असो, माझ्या शब्दांनी घायाळ झालेली ती, डोळ्यांत पाणी आणुन म्हणाली, “न्हाई न्हाई, त्यो भीक मागत न्हायी वो… त्यो लिंबु मिरची इकायचा… आजुन कायबाय इकायचा, धंदा करायचा… पन… पन… त्येचा धंदा सुटला आन् म्हनुन मला रस्त्यावर भीक मागाय लागती…”

“मनानं न्हाय भीक मागत मी डाक्टर… पोराला जगवायला भीक मागती मी…”

असं म्हणुन ती डोळ्यातलं पाणी आवरत निघुन गेली..!

आमचा हा संवाद साधारण ८ – १० महिन्यांपुर्वीचा!

यानंतर मी तीला भेटलो… दरवेळी तुकड्या तुकड्यानं मला कळत गेलं… मी तुकडे जोडत गेलो..!

तीचा हा मुलगा चांगला धडधाकट, तगडा, पैलवान गडी… काहीबाही फिरुन विकायचा… हमाली करायचा… पडेल ते काम करायचा… वडिल नव्हते… पण आईला घेवुन सुखात रहायचा…

योग्यवेळी आईने लग्न लावुन दिलं… घरात लक्ष्मीच्या रुपानं सुन आली. ती ही चार घरी धुणंभांडी करायची… पैशाला हातभार लावायची. एकुण मजेत चाललं होतं…

कालांतरानं घरात अजुन एक पाव्हणा येणार अशी कुणकुण लागली… आख्खं घर आनंदात न्हावुन निघालं…

हा तीची खुप काळजी करायचा, यानं तीची कामंही कमी केली, म्हणाला, “आता आराम करायचा बाये… मी हाय की कामाला..! तुला काय बी कमी पडुन देणार नाय…”

तीचे डोळे भरुन यायचे..!

रात्र रात्र याला झोप यायची नाही… उघड्या डोळ्यांनी स्वप्नं बघायचा हा…

“आमाला बाळ हुयील, मग ते बाळ मला पप्पा म्हणंल… मंग मी त्याला घिवुन फिराय जाईन…”

“जरा मोटा झाला की श्रीमंत लोकांकडं आस्ती तशी बाबागाडी घेईन, आणि त्याला गावभर फिरवुन आनीन…”

ही मावशी त्याला म्हणायची, “तुज्या बापाचा बी लय जीव हुता तुज्यावर… आता माज्या सुनंच्या पोटी तुजा बापच फिरुन येईल जन्माला! पोरगा हुयील न्हायतर पोरगी… काय बी चालंल मला…”

काम करतांना याने पोरांची चार नावं, पोरीची चार नावं पक्की करुन ठेवली होती…

आपला बापच मुलगा किंवा मुलीच्या रुपानं आपल्या पोटी येणार, या विचाराने तो सुखावुन जायचा…

या मावशीने, म्हणजे याच्या आईनेही टोपडी शिवायला घेतली, फाटक्या सुती चादरींची दुपटी केली… जुन्या सुती साड्यांची मऊ वाकळ केली… नातवंडाच्या रुपात अर्ध्यावरच सोडुन गेलेला नवरा येणार, तेव्हा नाही जमलं, आता नातवंडाचे लाड करुन नव-याचे पांग फेडणार..! हा त्या माऊलीचा विचार!

एकुण काय, या कुटुंबानं स्वर्गात घर न मागता, घरालाच स्वर्ग करायचं ठरवलं..!

डिलीव्हरीचा दिवस जवळ आला… याच्या जीवात जीव नाही… जणु हाच बाळंत होणार होता!

हो! हे ही खरंच आहे… ज्या दिवशी बाळ जन्माला येतं त्याच दिवशी एक आई ही जन्माला येते आणि एक बापही!

एका बाळाच्या जन्मानं, किती नवी नाती जन्मतात त्या दिवशी?

आजी, आजोबा, काका, काकु, मामा, मावशी… किती जन्म..!

हा विचार करायचा, “माजं बाळ मला पप्पा म्हनंल का ड्याडी..? नको ड्याडी नको… दाढी म्हनल्यागत वाटतंय… पप्पाच म्हनुंदे…”

पोती उचलतांना, लिंबु विकतांना या सर्वा विचारांनी तो गालातच खुद्कन हसायचा!

गरोदर “ती” होती पण गुलमोहर इकडे फुलला होता!

झालं, तो दिवस उजाडला… घाईगडबड चालु झाली, तीला डॉक्टर डिलीव्हरी रुममध्ये नेत होते…

याने तीचे हात दोन्ही हातात घेतले, “काळजी करु नगंस म्हणाला..!”

ती त्या कळांतुनही कसंबसं त्याला म्हणाली, “जेवुन घ्या तुमी, काल संध्याकाळपसनं कायीच खाल्लं नाय तुमी…”

डोळ्यातलं पाणी लपवत तो तीला म्हणाला… “आगं तु पन कालपस्नं उपाशीच हायस, मंजे माजं बाळबी उपाशीच आसंल रात्रीपस्नं… मंग मीच कसा जेवु एकटा?”

तु ये भायेर, मंग आपण “तिगंबी” संगतीनं जेवान करु..!

दिलखुलास तो हसला… आणि ती कळा घेत आत गेली..!

बाहेर बाकड्यावर बसुन मायलेकाचा जीव निघंना…

याच्या आईनं दुपटी आणली होती… या दुपट्यांना ती वारंवार तपासुन पहात होती…

हा… शंभरवेळा उठला आणि डिलीव्हरी रुमच्या बंद दाराला कान लावुन आला…

“आये, आतनं काय आवाज येईना की…” खुळावल्यागत तो बोलला…

आई हसत म्हणाली, “येड्या, तुला काय वाटतंय… तुजं बाळ… पप्पा म्हणुन हाक मारत भाईर येईल काय?”

बस तिथं गप… ती लटक्या रागानं बोलली…

तो गुपचुप बसला…

पण थोडाच वेळ..!

पुन्हा आईच्या कानाला लागुन म्हणाला… “आये, मला काय हितं बसवत न्हाय… दारुवाला पुलावर जावुन बाबागाडी घेवुन येवु काय?”

आईने या भाबड्या मुलाचा गालगुच्चा घेत म्हटलं, “मुडद्या, हे बाळ आसतंय वितभर, तुज्या बाबागाडीत बसनार हाय का बाळ आत्ता?”

“आरं दोन चार वर्साचं झाल्यावर बाबागाडी आणु बाळा…”

खजील होवुन तो गप्प बसुन राहीला ..

शेवटी डिलीव्हरी रुमचं दार एकदाचं उघडलं…

डॉक्टरांनी मायलेकांना एका बंद खोलीत बोलावलं…

आणि सांगितलं “आम्ही बाळ आणि आई दोघांना वाचवु शकलो नाही… कारण…”

कारणं ऐकण्याआधीच हे दोघेही भोवळ येवुन पडले..!

ती पण गेली आणि बाळ पण..!

हा… पैलवान गडी… पण हरला! कुस्ती न खेळताच…

याने तेव्हापासुन काम सोडलं… जेवणही सोडलं…

तिघांनी एकत्रच जेवायचं हे अजुन त्याच्या लक्षात आहे… तो वाट बघतोय, पण… पण… स्वप्नं विरुन गेलंय..! कायमचं..!!!

तो स्वतःलाच विचारायचा, “आता कोण म्हणेल मला पप्पा? नावं शोधलीत…पण त्या नावानं कुणाला हाक मारु मी?”

“आता बाबागाडीत कुणाला फिरवायचं?”

तो हंबरडा फोडतो रोज आकाशाकडं बघुन…

“ये ना बाळा… मी वाट बघतोय, तुझा पप्पा मी रे, आपल्याला बाबागाडीत फिरायला जायचंय ये ना…”

पण ते पिल्लु येत नाही!

ढगांत दिसणाऱ्या आकृतीकडे पाहुन तो तीला म्हणतो, “का गं? का कंटाळलीस मला? एकत्र जेवायचं म्हणालीस… का गेलीस? गेलीस ते गेलीस… माझ्या बाळालाही घेवुन गेलीस… ये ना गं बाय… ये ना गं बाय… माज्या बाळाला घेवुन ये की गं बाय..!” पण ती नाही येत!

ढगांना पान्हा फुटतच नाही… ती आलीच नाही… आणि ते बाळही!

विचार करुन वेड लागायची पाळी आली याची…

नव्हे हा वेडाच झाला!

तेव्हापासुन हा खरंच वेडा झाला…

बाप होता होता… निसर्गानं एक वेडा जन्माला घातला..!

कुठंही भेटला तरी हा सर्वांना म्हणतो… “बाबागाडी… बाबागाडी… बसता माज्या बाबागाडीत? हे…हे… बसा ना माज्या बाबागाडीत..! बाबागाडी…झुक झुक… बाबागाडी..!”

ही व्यथा ऐकुन मीच सुन्न झालो..!

मी म्हटलं मावशीला, “भेटवशील मला त्याला एकदा?”

ती म्हणाली, “काय भेटता त्याला? येडा झालाय तो…”

“त्याला येडा म्हणुन सर्टिफिकेट द्या, आपण येरवडा मेंटलला भरती करु… सुटंल बिचारा…”

वेदनेनं विव्हळत ही माऊली बोलली..!

“असं नको म्हणु गं… बाप म्हणुन जन्म होता होता त्याच्यातल्या बापाचा मृत्यु झालाय… वेडा नाही तो… आणि तसाही मी कुठं शहाणा आहे?”

“दोन येड्यांची भेट घालुन देशील मावशी?”

मी त्याला भेटलो…

त्याला, म्हणजे एका बापाला भेटलो मी…

भेटलो तेव्हा “डुर्र् डुर्र्” करत बाबागाडी चालवत तो आला,.. , “बसता का माझ्या झुकझुक बाबागाडीत? बसा की पाडनार नाय तुमाला,… आये… बसव की पावन्याला..!”

“औ पावनं बसा की… झुकझुक… झुकझुक बाबागाडी..!”

तो “नसलेली” बाबागाडी हातानं चालवत होता, आणि समोर “असलेली” परिस्थिती मला चालवता येत नव्हती!

आजवर डॉक्टर म्हणुन अनेक मृत्यु मी पाहिले… डेथ सर्टिफिकेट दिले…

आजचा हा डोळ्यादेखत होणारा बापाचा मृत्यु न पाहवणारा होता…

जिवंत माणसाला डेड म्हणुन घोषीत कसं करु मी? येडा कसा म्हणु मी याला?

एक जिवंत बाप होता हा… मेंटलला कसं भरती करु?

कसं असतं ना? हा आधी घर चालवत होता… आईवर जीव टाकला…बायकोवर जीवापाड प्रेम केलं याने… न झालेल्या बाळाचा हा बाप, त्याच्यासाठी आणलेली ही खोटीखोटी बाबागाडी!

आज याच मुलाला मेंटल हॉस्पिटलला भरती करण्यासाठी मला त्याची आई विनवणी करत्येय, त्याच्याच भल्यासाठी!

दोष कुणाला देवु?

वेड्यासारखं प्रेम करणारी माणसं “येडी” का ठरतात?

मी याला मेंटलला भरती केलं नाही.

एका बापाला मी “येडा” ठरवुन मेंटल हॉस्पिटलला भरती केलं असतं, तर माझ्यातल्या बापानं मलाच माफ नसतं केलं..!

एका प्रथितयश Psychologist कडुन याला ट्रीटमेंट दिली… हा माणसांत आला…

आता सगळं ओळखतो, झाल्या प्रकारातुन बाहेर आलाय तो…

पण ८० किलोचा हा माणुस केवळ २७ किलोचा उरलाय!

सगळं वजन, बायको आणि न झालेल्या बाळाला अर्पण केलं असेल का याने?

मी याला पुन्हा काम सुरु करण्याविषयी सुचवलं…

पण २७ किलोचा हाडाचा सापळा, पोती कशी उचलेल पुर्वीसारखी? कोण काम देणार याला?

मी खुप बैठे व्यवसाय सुचवले याला… पण नाहीच म्हणायचा..!

माझ्याही डोक्यात, ध्यानात मनात तोच… एक जिवंतपणीच मेलेला बाप!

काय करावं याचं..? कसा माणसांत आणु याला? माझे सर्व प्रयत्न थकले होते!

मागच्या पंधरा दिवसांपुर्वी पुण्याचे माझे ज्येष्ठ स्नेही श्री. मिलिंदजी गुप्ते आपल्या भगीनी सौ. सुनिता प्रधान यांच्यासह भेटायला आले होते.

बोलता बोलता सुनिता ताई सहज बोलुन गेल्या, “डॉक्टर आमचा मुलगा, सुन आणि नात फॉरीनला गेलेत, घरात ब-याच वस्तु आहेत… तुम्हांला ऊपयोगाला येतील का?”

मी सहजच म्हटलं, “काय आहेत वस्तु..?”

त्या बोलुन गेल्या, “एक नवी खट्ट बाबागाडी आहे… एक हे… एक ते… आणि हे… आणि ते पण..!”

एव्हढ्या त्यांच्या बोलण्यातुन मला फक्त आणि फक्त बाबागाडी लक्षात राहीली… पुढचं मला ऐकुच आलं नाही..!

पण, सुनीता ताईंमुळे माझ्या डोक्यात एक कल्पना आली…

मी याला पुन्हा भेटलो, “म्हटलं लिंबु आणि मिरचीचा व्यवसाय पुन्हा सुरु कर…”

त्याने नेहमीप्रमाणे वाकडं तोंड केलं…

मी म्हटलं, “मी तुला खरी बाबागाडी देतो, या बाबागाडीत लिंबु मिरच्या ठेवुन विकायच्या… आजपर्यंत खोटी बाबागाडी चालवलीस, मी तुला खरी देईन… चालवशील बाबागाडी? पण या बाबागाडीचा उपयोग व्यवसाय करण्यासाठी करायचा? करशील?”

त्याचे क्षीण डोळे चमकले..!

तो आधार घेत उठला… म्हणाला, “खरी बाबागाडी? मला द्याल झुकझुक बाबागाडी..???”

“द्या ना मला… मी लिंबु विकेन, मिरच्या विकेन आणि… आणि… माज्या न जलमलेल्या बाळाला पन फिरवेन या बाबागाडीत..!”

शेवटच्या त्याच्या वाक्यावर त्याने फोडलेल्या हंबरड्याने जमिनही शहारली असेल!

हा आहे, पुण्याजवळच्या एका ग्रामिण भागात, २७ एप्रिल, शनीवारी मी ही बाबागाडी त्याच्या आईला सुपुर्त केली..!

आजवर अनेक वस्तु कुणाकुणाला व्यवसायाला दिल्या असतील, पण बाबागाडी कुणालाच दिली नव्हती…

खरंतर ही बाबागाडी नव्हेच… हे एक स्वप्नं होतं एका बापाचं..! न जन्मलेल्या मुलासाठी त्याने पाहिलेलं..!

मी या माऊलीला ही बाबागाडी पुण्यात दिली…

लिंबु मिरच्या विकत घेवुन दिल्या…

हा व्यवसाय माझ्यासाठीही नविनच होता…

वस्तु आणि बाबागाडी तीला देवुन मी निघणार एव्हढ्यात ती बोलली…

“डाक्टर एक बोलु?”

“हां गं बोल की…”

“माझ्या पोराचं ल्येकरु गेलं न्हाय…”

“म्हणजे..?” मी बावचळलो!

“आवो ते ल्येकरु फिरुन जलमाला आलंय तुमच्या रुपांत…”

“आँ… मला नाही कळलं गं…

“डाक्टर, न जलमलेल्या पोराच्या बापाला बाबागाडी घ्यायची लय हौस होती!”

“ती त्या ल्येकराला पोटातनं पण कळली आसंल…”

“आणि आपल्या बापाची हौस त्यानं तुमच्या रुपानं जाता जाता भागवली आसंल..!”

“जिवंत बाप आपल्या ल्येकराची हौस नाय भागवु शकला… आज गेलेल्या ल्येकरानं बापाची हौस भागवली..!”

हे ऐकुन मी नखशिखांत शहारलो..!

ती बाबागाडी घेवुन निघाली, मी तीच्या पाठमो-या आकृतीकडे पहात राहिलो…

मी सहज आभाळाकडं पाहिलं… भर उन्हाळ्यातल्या दुपारी आभाळ गच्च भरलं होतं…

पाउस पडलाच नाही तरी मी चिंब झालो होतो..!

इथुन कोणतीही ट्रेन जात नाही तरीही, झुकझुक झुकझुक असा आवाज करत एक गाडी गेली… हा भास असावा!!!

मी पुन्हा आभाळाकडं पाहिलं… म्हटलं , “बाळा, तुला बाबागाडी पाठवल्येय… येशील का या गाडीत बसायला..?”

काय आश्चर्य… भर दुपारी पाऊस पडायला लागला..!

हे त्या बाळाचे अश्रु असावेत का माझे?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*