या महिन्यात पाच आज्ज्यांना जीवदान मिळालं…
अर्थात् मी काहीच केलं नाही, कर्ता करविता कुणी दुसराच असतो, मी निमित्तमात्र ठरलो!
सहावी एक आज्जी… मागुन खायची, खुप वर्षांपुर्वी पडली, कमरेच्या हाडाचे चार तुकडे झाले… झोपुन होती…
कण्हत कुंथत कसंतरी सुरु होतं… पुन्हा पडली, आणि त्या तुटलेल्या हाडाचे आणखी तुकडे झाले…
कित्येक महिन्यांपासुन झोपुनच… सर्व काही जागेवरच!
डॉक्टरांना दाखवलं, डॉक्टरांनी (Hip Joint Replacement) संपुर्णपणे सांधा बदलायला सांगीतला…
खर्च..? काही लाखांत..!
वयोमानानुसार इतर अनेक बाबी नाजुक… इतक्या नाजुक की ऑपरेशन शक्यच नाही, शरीरातलं रक्ताचं प्रमाण (हिमोग्लोबीन) ६… ऑपरेशन शक्यच नाही!
डॉक्टर म्हणाले, “अभिजीत, रिस्क घ्यायची का?”
म्हटलं, “सर रक्त चढवुन रिस्क घेवु..!”
तीन बाटल्या रक्त दिलं…
रक्त थोडं वाढलं…
आजीला मुलं सुना होत्या, पण खर्च करणं त्यांच्या आवाक्यापलीकडे..!
मी तरी काय मोठा जहागीरदार..?
तरी म्हटलं, “सर करा ऑपरेशन..!”
“अभिजीत, ऑपरेशन successful झालं तर म्हातारी उठुन चालेल, पण बाकीच्या conditions पाहता… थोडं काही फसलं तर म्हातारी जाईल सुद्धा..!”
म्हटलं, “सर, गेल्या कित्येक महिन्यांपासुन ती पडुन आहे, सगळं जागेवर… जिवंत असुनही मेल्यासारखीच..! करु ऑपरेशन…”
“बघ हं, काही वाईट झालं तर जबाबदारी कोण घेईल?”
“सर मीच कि आणखी कोण!”
“सही देशील? लिहुन द्यावं लागेल?”
“होय सर!”
“गेली तर?”
“नाही जाणार सर, जीनं सत्तर वर्षे आयुष्याबरोबर झगडा केला ती मृत्युला घाबरणार नाही..!”
मी मुलगा म्हणुन दवाखान्यात सही दिली, तीची दोन्ही मुलं जीवंत असुनही..!
मी तिसरा झालो..!
मागच्या सोमवारी १ जुलैला ऑपरेशन झालं…
डॉ. सुराणा या महाराष्ट्रातल्या नामांकित ऑर्थोपेडीक सर्जनने चार तास खपुन हे ऑपरेशन केलं… संपुर्ण सांधा बदलला… उत्तमातली उत्तम टेक्नोलॉजी वापरुन…
दरवेळी असहाय झोपलेल्या अवस्थेत तीचं ते कण्हुन विचित्र रडणं मला बोचायचं… टोचायचं..!
ही आयुष्यात कधी हसेल का..?
मागच्या पंधरा दिवसांत हिच्यासाठी जीवाचं रान केलं सर्वांनीच…
प्रत्येकवेळी तब्येतीत चढउतार…
जाईल कि राहील… याची रुखरुख… रोज घाबरत दचकत जायचो तीला भेटायला..! आज्जी असेल ना आज..?
रोज तीचं तेच, झोपुन कण्हणं… आणि विव्हळणं..!
आज सोमवार ८ जुलै (लिहीता लिहीता मंगळवार उजाडला)…
आज ती उभी राहीली…
कितीतरी वर्षांत ती उभी राहीली प्रथमच! ते ही हसत…
येताना आज्जीला स्ट्रेचरवर आणलं होतं… आज चालत जाईल!
समर्थ हॉस्पिटलचे माझे स्नेही डॉ. कलशेट्टी सर, डॉ. वैभव पाटील सर, हॉस्पिटल स्टाफ यांचा मी ऋणी आहे!
आज्जीचं आजचं हसु, आज्जीचे कालचे आसु, आज्जीचं चालणं , तीचं हसुन बोलणं… सारं सारं तुम्हां सर्वांना समर्पित!
आजीला उभं करण्यास मदत करणा-या आपणां सर्वांच्या मी कर्जात आहे!
“हि कधी हसेल का..?”
रोजच्या माझ्या या प्रश्नापुढचं “प्रश्नचिन्ह” आज जावुन तिथं “पुर्णविराम” आला.
ती हसली… हसत राहिली… तीच्या हसण्याने माझं पोट भरेना म्हणुन मी तीला दहावेळा म्हणत होतो, “म्हातारे हास की… हासुन दाकव की…” म्हातारी तितक्या वेळी हसायची..!
हे हसणं होतं… ती जगणार नाही म्हणणा-यांवर!!!
आज माझी ही म्हातारी हसत हसत चालत निघाली दवाखान्यातुन!
एव्हढ्यातुनही आज्जीनं जाताना मला इच्यारलं, “ऐ बाबा, हास्पीटलातलं बील किती आलं..?”
म्हणलं, “तुज्या हसण्यापेक्षा बिलाचं मोल जास्त नाय म्हातारे…”
“जावु दे, चल मला हसुन दाकव…”
म्हातारीनं माज्या गालावनं हात फिरवुन कडाकडा बोटं मोडली… आणि हसत हसत माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं…
ती हसत होती… तरी माझा शर्ट तीच्या अश्रुंनी भिजला..!
तीला चालत घेवुन मी हॉस्पिटलच्या खाली आलो… तीच्यासह चाललो…
ती चालतांना मला आशिर्वाद देत होती, चालता चालताच तीला मदत करणा-यांना आशिर्वाद देत होती… हे आशिर्वादाचे शब्द तीचे जणु “विठ्ठल विठ्ठल” नाद करत होते…
तीच्या बांगड्यांची किणकिण जणु “टाळ” झाले होते…
तीच्यासह चालणं हीच माझी “वारी” झाली होती…
आख्खं हॉस्पिटल जणु “पंढरी” झाली होती…
प्रत्यक्ष “विठुमाऊली” आज माझ्या हाताला हात धरुन चालली होती…
आणि मी झालो होतो “वारकरी”..!!!
“विठुमाऊलीच” प्रत्यक्ष माझ्याशेजारी असतांना मी कशाला जावु पंढरपुरी..?
Dr you are really a god!!!