आज गुरुवार!
आज काही आज्जी आजोबांच्या डोळ्यांच्या तपासण्या केल्या…
२५ जुलैला ऑपरेशन ठरलेत..!
भुवड बाबा आणि भुवड ताईंच्या डोक्यावर भार ठेवुन निर्धास्तपणे पुढे निघालो.
डोळे तपासणी आणि ऑपरेशनचा सर्वचा सर्व भार या दोघांनी आपल्या डोक्यावर घेतलाय.
यांच्या ऋणातुन ऊतराई व्हायला आणखी एक जन्म घ्यावा लागेल!
तर आज कित्येक आजी आजोबांच्या डोळ्यांच्या तपासण्या झाल्या चष्मे दिले..!
ही तीच माणसं, ज्यांना निसर्गाने “डोळे” दिलेत पण “नजर” काढुन घेतली!
सर्व “नाती” दिलीत पण “ओलावा” काढुन घेतला…
आणि रुक्ष झालेली, सुकुन वाळलेली, तहानेनं व्याकुळ झालेली ही माणसं शोधताहेत थेंबभर प्रेमाचं पाणी..!
आज साईबाबा, स्वामी समर्थ आणि दत्तगुरुंचा वार… आज सगळी हिच मंदिरं केली…
इथल्या काही आज्यांना Uncontrolled Diabetes (कसल्याही औषधांना दाद न देणारा डायबेटिस) आहे.
तपासण्या करत, औषधं बदलत, कसंबसं ओढत आणलंय इथवर आयुष्य त्यांचं…
त्यातल्या तीन आज्या आज मला जास्त गंभीर वाटल्या.
उद्या शुक्रवार..!
उद्या मस्जिद आणि दरग्यांच्या बाहेरचे भिक्षेकरी तपासण्या अगोदरच या तिघींनाही सकाळी Diabetes Specialist कडे दाखवावं लागेल…
डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेवुन झालीय..!
या आज्ज्या अशा, ज्यांच्या केवळ रक्तातच साखर आहे… वैयक्तिक आयुष्यं कडुच कडु..!
रक्तातली थोडी साखर यांच्या आयुष्यातही आली तर..?
बाहेर पाऊस पडतोय… सगळं कसं हिरवंगार झालंय…
मोकळ्या मैदानात लुसलुशीत कोंब उगवलेत…
रस्ते, इमारती सगळं सगळं धुतल्यागत स्वच्छ झालंय…
सगळीकडं पाणीच पाणी..!
या मुसळधार पावसाला या आज्ज्या दिसल्या नसाव्यात का..?
पावसा, इतका बरसला तरी आज्यांच्या चेह-यावरचा रंग मात्र फिक्कट आणि धुरकटच राहीला रे..! तुलाही नाहीच ना जमलं…यांचं आयुष्य हिरवं करायला..?
पावसा तु रस्ता धुतलास रे, पण आज्यांची मळखाऊ लुगडी मळकटच राहीली..! रस्त्याचे पांग फेडलेस, या आज्ज्यांचे का नाही?
अरे, जीथं आशेचे कोंब उगवायला हवे होते…तीथं मरणाच्या विचारानं झुरणं यावं? का रे असं वागलास?
सभोवताली तळी साठवलीस पण तरीही थेंबभर पाण्यासाठी कुणीतरी तरसतंय रे..!
तो तेव्हढा एक थेंब तरी उधार देशील..?
का रे पावसा तु ही असा वागतोस? माणसागत निष्ठुर..!
आता साईबाबांच्या मंदिरातुन, समर्थांच्या मंदिराकडं निघालो… नंतर दत्ताचं मंदिर…
हो, आज गुरुवार ना..?
लोक मंदिराच्या आत जावुन, तोंडातल्या तोंडात पुटपुटत काहीतरी “मागतात”…
स्वतःकडे सगळं असुनही मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वा-यात गुपचुप मागणा-यांना “भक्त” म्हणतात..!
याच धार्मिक स्थळांबाहेर मागणा-यांना मात्र “भिकारी” म्हणतात, हि आपल्याकडची फॅशन..!
असो, मोटरसायकलवरुन पुढे निघालो…
घोले रोड वरच्या फुटपाथवर कुणीतरी पडलं होतं…
गाडी थांबवुन जवळ जाऊन पाहीलं… अरे ही तर आमची नेहमीची आज्जी..!
हलवुन जागं केलं, भयंकर अशक्तपणानं बोलताही येईना…
“काय गं इथं कशी..?”
“घरी चालले हुते बाबा, चालवंना, चक्कर आली आन् पडले हितंच…”
बीपी एकदम लो..!
ग्लुकोजची पावडर पाण्यातनं दिली, आज्यांनी मला दिलेली केळी बिस्किटं तीला दिली, खावु घातली… आणि रिक्षात बसवुन तीच्या “घर” नावाच्या फुटपाथवरल्या तुटक्या पत्र्याच्या शेडमध्ये सोडुन आलो..!
पाय देवुन निसर्ग पायातलं बळ का काढुन घेतो?
पाय नसण्याच्या दुःख्खापेक्षा, पाय असुनही चालता न येण्याचं दुःख्खं मोठं!
कुणी नाहीच आपलं या जगात, या दुःख्खापेक्षा सगळे असुनही सोबतीला मात्र कुणीच नाही याची व्यथा मोठी असते..!
हृदय बंद पडलं की माणुस मरतो असं मेडिकल सायन्स म्हणत असलं तरी ते शंभर टक्के खरं नाही…
माणसाला मिळणारी माया, आपुलकी, प्रेम मिळणं बंद झालं की माणुस मरतो..!
हिच खरी वस्तुस्थिती!!!
परवा शनिवार..!
रोजची मारुती आणि शनीची मंदिरं तर करायचीच..!
पण मागच्या आठवड्यात तीन आज्ज्यांना, “नातवंडांना शिकवा” म्हणुन तयार केलंय…
त्या तीनही मुलांची वह्या पुस्तकं घ्यायची आहेत शनिवारी..!
केवळ वह्या पुस्तकं घ्यायला पैसे नाहीत म्हणुन शिक्षण सोडलंय या मुलांनी, भीक मागत फिरतात …
आणि अशी लाख्खो आणि करोडो मुलं अजुन असतील..!
आपण खरंच महासत्ता होणार..?
ज्या देशाचं भविष्य आज ज्या मुलांच्या हातात आहे, ती वर्तमानात भीक मागताहेत…
केवळ वह्या पुस्तकंच नाहीत म्हणुन शाळा सोडताहेत..!
खाल्लेली भाकरी पचावी म्हणुन लोक Walk ला जातात…
आणि, एखादी तरी भाकर पदरी पडावी म्हणुन लोक दारोदार वणवण फिरताहेत…
या Walk घेणा-यांना, वणवण “फिरणा-याचं” दुःख्खं कळेल… त्या दिवशी आपण महासत्ता बनण्याचा विचार करु शकतो, तोपर्यंत नाही!
कुणी वर चालला की आपण त्याचे पाय खेचतो…
त्यापेक्षा जो खाली पडलाय त्याचे हात खेचुन त्याला उठवलं तर..?
हे पाय खेचणं सोडुन आपण जेव्हा कुणाचे हात खेचु… तेव्हा आपण ख-या अर्थानं माणुस म्हणण्यास लायक होवु… तोपर्यंत नाहीच..!
असो; तर, या तिघा मुलांना परवा वह्या पुस्तकं द्यायचीत!
एरव्ही, मी लिस्ट घेतो आणि लागणारं सगळं सामान आप्पा बळवंत चौकातुन विकत घेवुन त्यांना, ते जीथं असतील तीथे आणुन देतो…
पण, खरं सांगु? एखादी गोष्ट विकत घेण्यापेक्षाही… ती खरेदी करतांनाचा आनंद वेगळा असतो…
इच्छित ठिकाणी पोचण्यापेक्षाही वाटेतला प्रवास मजेशीर असतो…
प्रत्यक्ष भजी खाण्यापेक्षा, ती तळत असतांना आलेला दरवळ मनाला जास्त सुखावतो..!
आवडत्या माणसाचं पत्र आलं, तरी ते वाचण्याआधी, ते पाकिट फोडतानाची जी हुरहुर असते… ती पत्रापेक्षाही गोड असते..!
हा खरेदी करतांनाचा आनंद… तो नव्या को-या पुस्तकांचा धुंदावणारा सुवास… वाटेत घडणाऱ्या प्रवासाचा आनंद… दुकानातनं हे घेवु कि ते? यावर हेंदकाळणारं मन… या सर्व गोष्टींचा आनंद या मुलांना कधीच मिळणार नाही का?
का..?
ते भिका-यांच्या पोटी जन्माला आले म्हणुन..?
आपण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे आपल्या हाती असतं का?
मग त्यांचा यात काय दोष?
आणि म्हणुनच, आता ठरवलंय… मी पुस्तकं विकत आणुन देणार नाही,… याच मुलांना सोबत घेवुन जायचं खरेदीला..!
आता या तीनही मुलांना शनिवारी सकाळी, शनिवारवाड्याजवळ बोलावलंय.
आम्ही चौघेही रमत गमत, रस्त्यानं मस्ती करत, भिजत, भजी खात, खरेदीला जाणार…
वह्या घेणार, पुस्तकं घेणार…
दुकानातल्या सामानाची उलथापालथ करणार…
चार चार पेनांची झाकणं उघडुन उगीचंच लिहुन बघणार…
हे हाय का? ते हाय का? म्हणुन कायबाय इच्यारुन तितल्या दुकानदाराला भंडावुन सोडणार…
पैशे देताना उगंचंच नोटा चारदा मोजणार…
जमलंच तर इतके दिवस पडुन असलेली, जरा फाटलेली नोट बाकीच्या नोटांत दुमडुन देवुन चालवणार…
आणि… आणि येतांना… खरेदीचा तो आनंद… मनात साठवुन ठेवणार, एक मोठ्ठा श्वास घेवुन..!
आपण नाही का पहिल्या पावसानं पसरलेला मातीचा वास उरात साठवुन ठेवतो… अगदी तस्सांच…
Yessss, पुढच्या पावसाळ्यापर्यंत..!
या विचारांत असतांनाच एका ओळखीच्या गृहस्थांचा फोन आला…
म्हणाले, “काय डॉक्टर कसं चाललंय तुमचं..?”
मी मनात विचार करत राहिलो, “खरंच कसं चाललंय आमचं..?”
काय सांगु यांना..?
पोरांनी सोडलेल्या आयांचे डोळ्यांचे ऑपरेशन करतोय हे सांगु?
कि घरातनं बाहेर टाकलेल्या तीन आज्ज्या मरणाच्या दारात ऊभ्या आहेत, मरणाची वाट बघत हे सांगु?
कि सांगु, पायातनं ताकद गेलेल्या म्हातारीला, उघड्यावर मरायला पुन्हा फुटपाथवर ठेवुन आलोय?
कि असं सांगु..? शाळा सोडलेल्या पोरांना भविष्याचं स्वप्नं दाखवतोय, खरं खोटं मलाही माहित नाही..!
“अहो बोला कि डॉक्टर… काय विचार करताय..?”
“अहो,” मी म्हणलं, “कसं चाललंय तुमचं? मस्त ना..?”
दिवसभरातले सग्गळे प्रसंग आठवुन मी म्हटलं, “अं… हो… मस्त…”
“मस्तच चाललंय आमचं..!!!”
Leave a Reply