थांब ना गं आई..!!!

दोन दिवसांपुर्वीची गोष्ट..!

पुण्यात धो धो पाऊस… पाणीच पाणी..!

मी मोटरसायकलवर, अंगाखांद्यावर चार बॅगा, रेनकोट घालुनही पुर्ण भिजलेलो…

मला चिंता, “गोळ्या तर भिजल्या नसतील ना बॅगेतल्या..?”

अशात हेडफोनवर फोनची घंटी वाजली…

“हॅलो…”

“हां, आभ्या कुठायस..?”

मित्राचा फोन!

“हां बोल… अरे मी कुठं असणार?”

“रस्त्यावर..! चाललो नेहमीच्या कामाला… निघालो म्हाता-या माणसांकडं..!!!”

“अरे? आज तुला सुट्टी नाही आभ्या? आम्हांला तर सुट्टी दिलीय ऑफिसनं, पुण्यात पुराचा धोका… हा.. ह्हा… ह्हा… ये की घरी, मस्त पाऊस आहे… आज सुट्टी घे!”

मी विचार करायला लागलो, त्याच्या या वाक्यानं…

सुट्टी मी घेईनही, पण रस्त्यावर जगणाऱ्या माणसांना येणारं आजारपण आज सुट्टी घेईल का?

पावसानं भिजलेल्या म्हाता-या माणसांना, भिजल्यामुळं वाजणारी थंडी आज सुट्टी घेईल का?

रोज लागणारी भुक आज सुट्टी घेईल का?

डोळ्यातनं वाहणारं पाणी आज सुट्टी घेईल का?

रोज त्रास देणारं दारिद्रयं आज सुट्टी घेईल का?

नाही… नाही… नाहीच..!

मी तरी कशी घेवु सुट्टी?

पुर्वी इंटरनॅशनल कंपनीत काम करताना, खणकावुन सुट्या घ्यायचो…

सुट्टीच्या दिवशी काही काम केलंच तर त्याचं Compensation ठणकावुन मागायचो..!

पण आता नाही असं करु शकत…

सुट्ट्या नोकरीत मिळतात!

मी नोकरी करतच नाही कुणाची, मी चाकरी करतोय या म्हाता-या माणसांची… त्यांना भाकरी मिळण्यासाठी..!!!

जोपर्यंत त्यांना लागणारी भुक सुट्टी घेत नाही, त्यांना येणारं आजारपण सुट्टी घेत नाही, तोपर्यंत माझ्या सुट्टी घेण्याला काय अर्थ..?

आणि मी जे काही करतो त्यांच्यासाठी, त्याचा मोबदला रोज मिळतो मला…

त्यांचे खरबरीत हात मायेनं डोक्यावरुन, गालांवरुन फिरवत ते आशिर्वाद देतात..!

तेव्हा, प्रत्यक्ष अल्लाह, ईश्वर, येशु खाली येवुन डोक्यावर हात ठेवताहेत असा भास होतो मला…

कोणता दिडशहाणा रोज मिळणारे हे आशिर्वाद सोडुन सुट्टी घेईल?

तर… आज मंगळवार, ६ ऑगस्ट!

सकाळी ६:३० वाजता एक फोन…

पलीकडनं आवाज आला, “डॉक्टर, तुम्ही तपासायला येता ती अमुक अमुक आज्जी सिरीयस आहे, लवकर येता का?”

मी म्हटलं, “तीला फोन द्या!”

ती धापा टाकत, काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण, मला काहीच कळलं नाही…

काहीतरी गंभीर होतं..!

सुदैवानं, ती रहात असलेली झोपडपट्टी मला माहित होती.

नदीकाठच्या रिकाम्या जागेत ही झोपडपट्टी आहे..!

घरातला कचरा उकिरड्यात फेकावा तसा समाजानं फेकलेला “माणुस” नदीकाठच्या आस-यानं इथं रहात होता..!

श्रीमंत माणसांच्या घरातल्या कुत्र्यांना बांधलेली घरंही यापेक्षा मोठी असतात..!

असो!

मी आहे तसा घरातल्या कपड्यानिशी ७:१५ ला पोचलो. पावसानं आजही सुट्टी घेतली नव्हती!

निम्मी झोपडपट्टी पाण्याखाली..!

मी पोचलो तेव्हा भर पावसात, एका आडोशाला, चिखलात ती पडली होती, धापा टाकत..!

दम्याचा अटॅक होता हा ..!

या अटॅक ने ही आज सुट्टी घेतली नव्हती..!

लवकरात लवकर ऍडमिट करणं गरजेचं होतं…

तीचा श्वास कोंडला होता..!

कुणी आपल्यासमोर गुदमरतंय, त्याला श्वास घेताच येत नाही, किंवा श्वास पोचतच नाही…

श्वास नाही म्हणुन आपटलेले हातपाय, एका श्वासासाठी होणारी ती धडपड…

जेव्हा आपल्यासमोर हे रस्त्यातच घडतं … तेव्हाची पेशंटची आणि पाहणाऱ्याची अवस्था शब्दांत कशी मांडु..?

पण, एव्हढ्या त्रासातही, मला पाहुन, तीला आलेला धीर तीच्या निष्प्राण डोळ्यांत स्पष्ट दिसला..!

आपल्याला पाहुन, कुणालातरी धीर येतो… यासारखं जगात दुसरं सुख नाही!

मी तीचा हात पकडला, फट्कन् उचललं, बघ्यांपैकी एकाला रिक्षा आणायला पळवलं…

चिखलात पडलेला मांसाचा तो गोळा उचलला…

देवा, आज हे “शरीर” हॉस्पिटलला घेवुन चाललोय…

मला हे शरीर हॉस्पिटलने “बॉडी” म्हणुन परत करु नये, एव्हढे ऊपकार कर!

एव्हढ्यातुनही कसाबसा माझा हात धरत, ती रहात असलेलं घर तीनं बोटानं दाखवलं..!

सग्गळीकडं पाणीच पाणी! ती रहात असलेलं घर आस्तित्वातच नव्हतं… तिथंही पाणीच!

आणि घर तरी कसलं..?

दोन झोपड्यांच्यामध्ये जी दोन फुट जागा उरली होती, त्यावर मीच तीला पुर्वी पत्रा टाकुन आडोसा करुन दिला होता…

घर म्हणुन!

ती तिथं जगत (?) होती..!

तुमची आमची टॉयलेट सुद्धा यापेक्षा मोठी असतात!

आणि… आणि… आज ही टॉयलेट एव्हढी जागा… तीचं घर… नदीनं गिळुन टाकली होती..!

का गं बाई नदी? कुठल्या जन्मीचा राग काढलास?

भुक लागली होती तर गिळायला तुला यांचीच घरं मिळाली..?

Critical Care या रास्तापेठेतल्या हॉस्पिटलात पोचलो…

डॉ. मुकादम सर आणि डॉ. सौ. मुकादम मॅडम..!

माझे सिनिअर्स..!!!

योग्य त्या मेडिकल ऍक्शन्स घेवुन आजीला पुन्हा जीवदान दिलं!

ती पुर्ण सेटल झाली… दुपारचे दोन वाजले होते…

सकाळी ७:३० ते २:०० आमची झुंज… जीवन कि मरण?
शरीर न्यायचं कि बॉडी..?

पण, आम्ही जिंकलो होतो, ती वाचली, तणाव पुर्ण गेला ..!

भुकेची जाणिव झाली, पण पोट पुर्ण भरलं होतं..!!!

चार सहा दिवसांनी डिस्चार्ज मिळेल…

मग मी हे शरीरच घेवुन जाईन… चालतं बोलतं… बॉडी नाही..!

हो, पण… पण…

कुठं नेणार मी हिला डिस्चार्ज मिळाल्यावर?

रहायला जागाच नाही..!

की देवु फेकुन तीला त्याच चिखलात… जीथुन तीला सकाळी उचललं होतं?

का देवु ढकलुन तीला या पुराच्या पाण्यात..!

का सांगु नदीलाच? घर गिळलं तसं हिलासुद्धा गिळुन टाक…

का आपटु नेवुन फुटपाथवरच..?
सडु दे तीला फुटपाथवर पुन्हा…

का सोडुन देवु रस्त्यावरच हातपाय आपटत गुदमरुन मरायला?

काय करु? काय करु..?

आज आत्ता तरी हा प्रश्न अजुनही अनुत्तरीत आहे..!

या साल्या जगण्यानंच आम्हाला छळलंय..!

आहे तसाच, रेग्युलर मंदिरात जाण्यासाठी निघालो… विचार तोच, चार दिवसांनंतर हिला कुठं न्यायचं..?

विचारांच्या तंद्रीत नेहमीचं काम चालु केलं…

तेव्हढ्यात धापा टाकत एकजण गडबडीनं माझ्याजवळ आला…

“आवो सर मी किती दिवस झाले शोधतोय तुम्हाला…आज सापडले तुम्ही…”

हा तिशीचा पोरगा, चार महिन्यांपुर्वी एक विचित्र अपघात झाला.

रस्त्यावरुन जाणा-या एका टेंपोच्या मागच्या बाजुनं एक रॉड बाहेर आला होता.

या रॉडमध्ये याचा शर्ट अडकला, पन्नास ते साठ फुट घासत नेलं या टेंपोने, वेळ रात्रीची… कुणाच्याच लक्षात आलं नाही…

हा जीवाच्या आकांतानं ओरडत होता… टायर आणि रस्त्याला घासुन उजव्या हाताचं कातडं आणि मांस पुर्णपणे निघुन गेलेलं…

यांची नशिबं इतक्या लवकर फाटतात… पण दुर्दैव असं की शर्ट लवकर फाटलाच नाही!

शेवटी शर्ट फाटला, आणि मगच धरलेल्या टेंपोनं या पोराला सोडला!

अशा केसला कुणीही हात लावला नाही… ज्यांनी लावला, त्यांनी सांगितलं, हात खांद्यापासुन Amputee करावा लागेल… कापावा लागेल..!

हा हबकला..!

वेड्यासारखा फिरत राहीला.

पुण्यात वारी आली तशी काहितरी खायला मिळेल या आशेनं, वारीतनं फिरत मिळेल ते खात पावसांत भिजत पंढरपुरला पोचला.

पावसात भिजुन, रस्त्यावर झोपुन Infection झालं Septic झालं..!

व्यावहारिक भाषेत हात अक्षरशः नासला… कुजला!

त्रास आणि वेदना सहन होत नव्हत्या..!

आता विठ्ठलाचं शेवटचं दर्शन घेवुन आत्महत्या करायचा निर्णय घेतला..!

दर्शन घेतलं… देवापुढं रडला आणि नदीकिनारी आला..! जीव देण्यासाठी…

पण धाडस होईना..!

बाजुला त्याच्याच सारखे काही भिक्षेकरी बसले होते…

हा त्यांच्यात जावुन मिसळला… आपलं गाणं त्यानं रडत त्यांना ऐकवलं…

त्यांच्यातल्याच एकानं त्याला सांगितलं…

“आरं तुमच्या पुन्यात, कुनीतरी सोनवने डाक्टर हाय, त्यो भिका-यांसाटीच काम करतो, बग,जा परत पुन्यात, शोद त्याला…”

“बग पुन्यातल्या एकांद्या भिका-याला विचार त्येचा पत्ता… सापडला डाक्टर तर भेट..!”

आणि असं करत करत हा आज माझ्यासमोर..!

हत्तीचा पाय छोटा वाटावा इतका सुजलेला हात…

ऊजव्या खांद्यापासुन बोटापर्यंत कातडी आणि मांस नाही…

संपुर्ण कुजलेला…

त्यावर रस्त्यावर सापडतील त्या चिंध्या गुंडाळलेल्या…

इतका भयानक दुर्गंधही असु शकतो हे मी आजच अनुभवत होतो…

तो माझ्याजवळ आल्यावर, माझ्याजवळ बसलेले सगळे भिक्षेकरी त्याला शिव्या देत, येणारा वास सहन न होवुन अक्षरशः दुर पळुन गेले…

मी कुठं जाणार होतो..?

आपण इतके दिवस शोधत असलेला माणुस आज आपल्याला सापडला या भावनेनं तो इतका उल्हसित आणि आनंदी झाला होता की, त्याने रडतच येत, “डॉक्टर सायेब” म्हणत घट्ट मिठी मारली मला..!

खरंच सांगायचं, तर हा वास इतक्या जवळुन मलाही सहन होईना…

मी श्वास रोखुन धरला माझा… पण त्याची मिठी सैल होवु दिली नाही..!

खुप विश्वासानं मारलेली ती मिठी होती…

हातातुन दुर्गंध येत असला तरी त्या विश्वासात सुगंध होता..!

त्याचा भावनावेग आवरल्यावर जवळ बसवलं…

सर्व माहिती घेतली नी निघालो परत ताराचंद हॉस्पिटलला!

यावेळी माझा मदतनीस विक्रम हाळंदे याला सोबत घेतलं..!

हॉस्पिटलला गेल्यावर कुठुन आली ही ब्याद असं सर्वांना झालं…

मी डॉक्टर पुढे हात जोडले… सग्गळं सांगितलं… ड्रेसिंग करण्याची विनंती केली… मी ही ड्रेसिंगला मदत करतो असं सांगितलं..!

डॉक्टर, कॅप आणि डबल मास्क लावुन तयार झाले…

हातावरच्या चिंध्या सोडल्या… उकडलेल्या बटाट्याचं साल काढलं किंवा लालभडक कलिंगडावरचं सर्व हिरवं साल काढल्यावर जसं ते लालभडक कलिंगड दिसेल तसं सारं चित्र..!

या पुढचं मी जास्त लिहीत नाही…

माझी खात्री आहे… ते वाचतानाही कदाचीत कुणाला ओकारी होईल!

खांद्यापासुन बोटापर्यंत स्वच्छ बँडेज केलं… आता वेदना कमी झाल्या.

मी डॉक्टरांना पुन्हा हात जोडले…

ते म्हणाले, माझे कसले आभार मानता? तुमच्यामुळं असं पुण्याचं काम करण्याची संधी मला मिळाली..!

पण डॉ. सोनवणे, I think, we may not save his hand, we should amputee his hand, to save his life!

या डॉक्टरांनीही, याचा जीव वाचवण्यासाठी हात कापण्याचाच सल्ला दिलाय!

याचं वय अजुन धड तिशीचं नाही…

भीक मागतो नाईलाजानं… त्यात ऊजवा हात खांद्यापासुन कापला तर राहिलंच काय..?

पण मी निर्णय घेतलाय, याचा हात मी Amputee होवु देणार नाही..!

मला यासाठी वाट्टेल ते करावं लागलं तरी चालेल..!

बघु, ज्या शक्तीने त्याची माझी भेट घडवुन आणली, तीच शक्ती माझी हि इच्छा पुर्णत्वास नेईल..!

उद्या बुधवारी, पुढील तपासण्या आणि इतर बाबींसाठी त्याला परत घेवुन जाणार आहोत..!

निघतांना पुन्हा त्याने मिठी मारली…

यावेळी कसलाच दुर्गंध नव्हता… उरला होता केवळ विश्वास आणि प्रेमाचा सुगंध… फक्त सुगंध आणि सुगंधच!

जाताना म्हटलं, “बाळा… एकच कर… या ड्रेसिंग च्या हाताला एक थेंबसुद्धा पाणी लागु देवु नकोस..!”

“आणि काळजी करु नकोस, कितीही पैसा खर्च होवु दे, मी तुझा हात कापु देणार नाही…”

“पण हात नीट झाल्यावर काम करशील ना?”

माझ्या या प्रश्नावर, बाहेर पडलेल्या त्याच्या हुंदक्यानेच मला होकारार्थी ऊत्तर दिलं …

“फक्त पाणी लागु द्यायचं नाही… एव्हढंच पाळ पण!”

तो खिडकीतुन बाहेर बघत, पडणाऱ्या पावसाकडं पाहुन भकास हसला..!

मलाही कळलं..!

बाहेर पाण्यानं थैमान घातलंय…

गुडघाभर पाणी साचलंय रस्त्यात, लोकांची घरं ही बुडलीत… काही वाहुन गेलीत…

आणि रस्त्यावर राहणाऱ्या, डोक्यावर छप्परही नसणाऱ्या माणसाला मी सांगत होतो… “पाणी नको लावुस हां बाळा..!!!”

केव्हढी क्रुर थट्टा!

माझ्याबरोबर असलेल्या विक्रमने मला विचारलं सर, “जखम बरी होईपर्यंत, याला आपल्या कुठं ठेवता येणार नाही का..?”

विक्रमनं माझ्या जखमेची पुन्हा खपली काढली…

अरे सकाळपस्नं आणि गेल्या कित्येक दिवसांपासुन हाच विचार करतोय…

या अशा लोकांना कुठं ठेवायचं..?

अरे मी पडलो शेवटी “भिका-यांचा डॉक्टर” यातला डॉक्टर काढला की उरतो तो भिकारीच!

माझ्याकडे अशा लोकांना आसरा देण्यासाठी कुठल्याच चार भिंती नाहीत… आणि चार भिंतीही नकोत रे, एक छप्पर असलं तरी पुरे..! करु आपण ऍडजस्ट..!!!

पण, आपल्याकडं तेव्हढंही नाही.

माझे डोळे पाणावले..!

विक्रमनं पुढचं काही विचारलंच नाही…

“या पावसात ड्रेसिंग भिजुन चालणार नाही… काय करुया विक्रम..?”

“चल, आपण एक मोठा रेनकोट आणि छत्री विकत आणुन देवु याला..!”

“बुडत्याला तेव्हढाच काडीचा आधार..!”

“थांबा सर, संस्थेचे पैसे नको खर्च करायला… मी माझा रेनकोट घरनं घेवुन येतो, तुम्ही दोघेही थांबा सर इथंच..!”

“अरे… अरे विक्रम थांब”, म्हणेपर्यंत तो दिसेनासा झाला…

आता हा विक्रम स्वतःचा रेनकोट आणुन देवुन टाकेल याला…

आणि मोठ्या आनंदानं स्वतः पावसात चिंब भिजेल… आनंदानं…पावसालाच वाकुल्या दाखवत!

विक्रमसारखी इतक्या मोठ्या मनाची माणसं सोबत आहेत… म्हणुनच मी आणि माझं काम… आम्ही अस्तित्वात आहोत..!

सग्गळं, सग्गळं खरं असलं तरी, प्रश्न अजुन कायम आहे…

मी कसा आसरा देवु यांना..? घरं नसलेल्यांना कुठं ठेवु?

आत्ता हा लिहिलेला लेख वाचुन, कुणीतरी या दोघांना मदत करायला पुढं येईलही… या दोघांची सोय होवुन जाईलही…

पण अशा शेकडो लोकांना याआधी रस्त्यावरच सोडलंय त्यांचं काय..?

उद्यापासुनही परत असेच लोक भेटतील, त्यांचं काय?

खुप वेळा वाटतं आपली एखादी जागा असायला हवी होती…

पुण्याबाहेर जवळपास मला ४ – ५ गुंठे जागा मिळाली तर मी किमान पत्र्याचं शेड मारुन या लोकांची व्यवस्था करु शकेन..!

जागा मोफत मिळत नाहीत, त्यासाठी पैसा लागतो..!

सोहमच्या पुढील शिक्षणासाठी जे पैसे एक जबाबदार बाप म्हणुन मी साठवले आहेत… ते पैसे मी यासाठी खर्च करायला तयार आहे..!

हा पैसा अपुरा आहे… पण, मला तरी कुठं आधी माहीत होतं..? भविष्यात माझ्या पदरात म्हातारी माणसं पडणार आहेत… आणि मला त्यांचाही बाप व्हायचंय..!

आणि म्हणुन संस्थेच्या नावावर कर्ज काढुन मी रक्कम उभी करेन..!
थोडा त्रास जरुर होईल जागा घेतांना…

पण या आस-याखाली निराधार लोक जेव्हा आधार घेतील, सन्मानानं जगतील… तेव्हा भरुन पावु आम्ही… त्रास जाणवणारच नाही

पुण्याच्या आसपास अशी योग्य ती जागा माझ्यासारख्या भिक्षेक-याला, मला परवडेल अशा खर्चात मिळाली तर हवी आहे..!

याच जागेत त्यांच्या हाताला काही काम देवुन सन्मानानं त्यांना पायावर उभं राहण्यासाठी मदत करता येईल..!

मरणाच्या ऊंबरठ्यावर असणा-या, आपल्याला सोडुन चाललेल्या एखाद्या आईचा हात धरुन आग्रहानं तीला सांगता येईल… थांब ना गं आई… जावु नकोस… रहा ना अजुन चार दिवस, अगं घर तुझंच आहे..!

खरंच जाणा-या एखाद्या आईला आपण थांबवु शकलो तर आतापर्यंतच्या जगण्याचं सार्थक होईल..!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*