अमिताभ बच्चन या नावानं सर्वांनाच वेड लावलं आहे..! गेली कित्येक दशकं हा माणुस एकहाती “अमिताभ बच्चन” म्हणुन वावरतोय!
मी याच्यावर खुप प्रेम करतो..!
हा अमिताभ बच्चन माझ्या खुपवेळा अंगात येतो…
मी त्याच्या आवाजाची मिमिक्री करु शकतो..!
लहानपणी स्वप्नात तो माझा मोठा भाऊ म्हणुनच यायचा..!
मुकद्दर का सिकंदर… या पिक्चरच्या दरम्यान मोटरसायकल वर त्याच्या पुढे पेट्रोल च्या टाकीवर बसवुन त्याने मला फिरवलं आहे अशी स्वप्नं मी पाहिली आहेत…
सिलसिला च्या वेळेस तर, त्या फुलांच्या बागेत मी, माझा मोठा भाऊ अमिताभ आणि रेखा वहिनी गेलो होतो..!
ट्युलीप ची बाग आल्यावर अमिताभ दादा मला म्हणला… “बाळा जरा उतर खाली, मी तुला ३० पैशांची दोन गारेगार (आमच्या खेड्यात आईस्क्रिमला गारेगार म्हणतात) घेवुन देतो… तु तवर बस तिथं, मी आन् तुजी रेखा वयनी, देखा एक ख्वाब तो ये सिलसिले हुए गाणं म्हणुन येतो… जा ना… माजं शानं बाळ… जा गारेगार खा..!”
अमिताभ दादानं सांगितल्यावर मी पन गपगुमान गेलो हुतो..! आयच्यान् ..!!!
कुली पिक्चरच्या वेळेस त्या हरामीची फाईट दादाला लागली हुती तवा मी बी रडुन चार दिवस जेवलो नव्हतो..!
शोले मदे दादानं गेल्याची ऍक्टिंग केली, तवा मी धर्मेंद्र आंकलला म्हणलं.. “काय वो काका… तुमचा मैतर हाय म्हनता… आमच्या दादाला कसं मरु दिलं तुमी..? व्हय वो हेमा आंटी… तुमी तरी सांगा धरम आंकलला..!!!”
मंग, आमच्या अमिताभ दादानंच मला समजावलं हुतं… “आसं नसतंय बाळा… हो, त्यो मला ल्हानपनी बाळाच म्हणायचा..!”
मी खरोखरच ही स्वप्नं जगलोय..!
कौन बनेगा करोडपती (KBC) या अमिताभ च्या कार्यक्रमानंही लोकांची मनं जिंकली…
नेहमीच्या खेळासोबतच एखाद्या क्षेत्रात वेगळं काम करणाऱ्यांना इथं आमंत्रित केलं जातं…
खेळ खेळता खेळता त्यांना बोलतं केलं जातं… त्यांनी जिंकलेली रक्कम ही त्या संस्थेला डोनेशन म्हणुन मिळते!
तर या KBC मध्ये मी ही जावं… हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच वाटतं..!
परंतु ते इतकं सोपं नाही..!
संबंधीत व्यक्तीची पुर्ण माहिती (Profile), KBC च्या Research Team ला द्यावी लागते, यानंतर ही टिम सर्व पाळंमुळं खणुन काढते…
हजार चाळण्यांतुन लाखात एखाद्याची निवड त्यातुन होते..!
बरं, हे profile दुसऱ्या कुणीतरी द्यावं लागतं… स्वतःहुन देणारी व्यक्ती तिथंच बाद होते!
माझ्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांनी, “तुमचं profile देवु काय डॉक्टर” अशी विचारणा केली…
पण हे असं profile देणं, “मला घ्याना हो” असं म्हणणं मला आवडत नाही…
म्हणुन मी दरवेळी नाही म्हणायचो प्रत्येकाला..!
तरीही… KBC च्याच research team ला मदत करणारे प्रितेश हे माझे मित्र, well-wisher यांनी माझा profile, तिकडे सादर केला आहे…
KBC च्याच Expert Advisor रिचा अनिरुद्ध, या मला नी मनिषाला भेटायला दिल्लीहुन आल्या होत्या…
त्यांनी आमच्यावर एक स्वतंत्र Documentary केली आहे… “Jindagi with Richa” म्हणुन..!
यांनीही माझं profile “कौन बनेगा करोडपती” मध्ये घुसडलंय..!
हे सर्व मागच्या वर्षापासुन सुरु आहे… मला माहिती नव्हतं..!
अर्थात् मला हे सारं आत्ताच कळतंय..!
तर, हा profile तिकडे गेल्यानंतर… असं काही काम असु शकतं यावर खुद्द बच्चन साहेबांचा विश्वास बसेना..!
प्रितेश यांना बच्चन म्हणाले, “इनका profile, Approve करना, या ना करना वो तो research team के हाथ मे है, मै उसमे कोई दखलअंदाजी नही करुंगा, let them do their work..!!!”
“लेकीन मै इस डॉक्टर को मिलना चाहुंगा… आप मुझे इनसे मिलाईये..!”
“Saturday २४ को KBC का मेरा shoot है, मै वही सेटपर उनसे मिल लुंगा..!”
हि बातमी मला प्रितेश यांच्याकडुन समजली…
मी आनंदानं सगळ्यांना कळवली…
माझ्यावर अफाट प्रेम करणाऱ्या सर्वांना वाटलं … आमची KBC मध्येच निवड झालीय..!
नाही हो…आम्हाला फक्त बच्चन साहेबांनी, भेटीला बोलावलं होतं सेटवर, KBC या कार्यक्रमाशी सध्या तरी आमचा काहीही संबंध नाही, भविष्यात त्यांची research team जे ठरवेल त्यावर सारं अवलंबुन आहे..!!!
हां… तर वेळ ठरली सकाळी ८:३० ची, तारीख २४ ऑगस्ट , स्थळ KBC चा सेट, फिल्मिस्तान, गोरेगांव, मुंबई!
८:३० ला पुण्यावरनं मुंबईला पोचायचं म्हणजे traffic धरुन पहाटे ४ – ४:३० ला निघायचं…
म्हणजे ३ ला उठायचं… एरव्ही आंघोळीला दांडी मारली असती नेहमीसारखीच, पण बच्चनला भेटायचं तर किमान आज तरी आंघोळ करायला पायजे..!
३ ला उठायचं म्हणजे शुक्रवारी रात्री १० ला तरी झोपायला हवं…
नेमका शुक्रवारी रात्री यायला उशीर..!
आल्यावर गिरीशजींनी दिलेलं फेट्याचं गिफ्ट पॅकिंग करण्यात जरा वेळ गेला, (हा फेटा दिड फुटी काचेच्या आवरणात खास बंदिस्त करुन दिला होता) बच्चन साठी खास तयार करुन घेतलेलं पर्सनल ग्रिटिंग कार्डचं पॅकिंग आणि इतर काही गोष्टी यात १२:३० वाजलेच!
घरात प्रत्येकाच्या मोबाईलवर अलार्म लावला…
नीट वाजेल कि नाही म्हणत चार चार वेळा अलार्मची रिंगटोन चेक केली…
यात एक वाजला… दोनच तास झोप!
कसंबसं उठुन धडपडत प्रितेश यांचं घर गाठलं ४:३० वाजता…
त्यांनाही गाडीत घेतलं..!
आमच्या कारचं “सारथ्य” करणारे रवी यांनी ८ वाजताच गाडी फिल्मिस्तानच्या गेटवर आणुन लावली…
एखाद्या फिल्मी गुंडाला लोळवल्यावर बच्चन जसं विजयी मुद्रेनं पाहतो,तसंच रवीनं गाडी लावता लावता माझ्याकडं विजयी मुद्रेनं पाहिलं ..!
KBC चे ऑडियन्स म्हणुन आलेले, बच्चनला बघायला आलेले हजारो लोक..!
मी आणि मनिषा या गर्दीत बावळटासारखे बाजुला उभे..!
तीच्या हातात ग्रिटिंग कार्ड, बच्चन सायबाला द्यायचं उपरणं… आणि गणपती धरावा तसा माझ्या हातात भल्या मोठ्या काचेच्या पॅकिंग मधला फेटा! लोक आम्हाला पाहुन हसत होते!
या गर्दीतनं आमाला आत सोडतील का? या विचारानं मी व्याकुळ..!
तोवर प्रितेश सरांनी बॅगेतनं कोट काढला, अंगावर चढवला..! टाय घातला आणि ऐटीत कुणाशी तरी बोलु लागले..!!!
प्रितेश सरांचा सुट आणि फोनवर बोलतांनाचे हावभाव पाहुन… आता आपल्याला एव्हढ्या गर्दीतनं पण नक्कीच सोडतील आत असं वाटायला लागलं..!
झालंही तसंच..!
“या माझ्या मागं”, असा प्रितेश सरांनी हुकुम सोडला..!
आम्हाला घ्यायला आतुन कुणीतरी आलं होतं, प्रितेश च्या सांगण्यावरुन ..!
ते पुढे, त्यांच्या मागे प्रितेश, मग मी आणि माझ्या मागे मनिषा..!
खुष्किच्या मार्गाने, गनिमी कावा करत, वाटेत आडव्या येणाऱ्या सर्व योद्ध्यांना कोपरानं ढोसत, वाट काढत, आम्ही चाल करुन पुढे पुढे जात होतो..!
असं करत करत एकदाचे आम्ही अतिशय आलिशान अशा एसी केबिन मध्ये येवुन पोचलो…
VIP लोकांना वैयक्तिक भेटण्यासाठी केलेली ही व्यवस्था होती..!
आम्ही तिथं पोचताच धाडधाड असा आवाज आला…
मी खुष झालो, मला वाटलं आपण सहिसलामत पोचलो म्हणुन कुणीतरी तोफांची सलामी दिली असावी..!
नंतर कळलं, बाजुच्या किचनमधले एकावर एक ठेवलेले पत्र्याचे डब्बे कुणाचा तरी धक्का लागुन पडले होते… हे समजल्यावर माझा जरा हिरमोड झाला!
आम्ही ज्या आलिशान केबीनमध्ये बसलो होतो, तिथे आधीच ८ – १० लोक बसले होते…
काय त्यांचा रुबाब..! काय त्यांचे कपडे..!! काय त्या परफ्युमचा दरवळ..!!! आहाहा…
पण, मला पाहुन, “हे कोण आलंय या VIP रुम मध्ये?” असा चेहरा त्या लोकांनी केला..!
यांच्यात आम्ही म्हणजे शुभ्र तांदळातले खडे!
आमच्या हाती तो फेटा, ते उपरणं पाहुन… त्यांना वाटलं असावं… “खेड्यातनं आलंय येडं आन् भज्याला म्हणतंय पेढं..!”
वाटु दे, काय करावं आम्ही?
मनीषाच्या वडिलांनी मागच्या दिवाळसणाला जावई बापु म्हणुन दिलेला शर्ट मी आज घालुन आलो होतो..!
मी मनिषाला तो ब-याच वेळा घालायला मागितला होता… पण टिपीकल गृहिणीप्रमाणे, “थांब जरा, घाल कुठल्यातरी चांगल्या कार्यक्रमात” असं सांगुन तीनं मला दरवेळी टोलवलं होतं..!
आज हा शर्ट घालण्याचा सुदिन माझ्या नशीबी आला होता..!
गर्दीतुन मी वाट काढत असतांना, मला कुणाचा धक्का लागु नये याचा ती मघाशी आटोकाट प्रयत्न करत होती..!
केबीनमध्ये पोचल्यावर मी कृतार्थ होवुन, भावविभोर होवुन तीला म्हटलं, “गर्दीत किती काळजी घेत होतीस गं..!”
“मग..? उगीच शर्ट नको चुरगाळायला..!”
“अशाच चांगल्या कार्यक्रमात घालण्यासाठी मी ठेवला होता नीट…”
“आता घरी गेल्यावर पुन्हा कपाटात ठेवणार आहे मी..!”
बोंबला..!!! कुणाचं काय आणि हिचं काय..!
“अगं बच्चनचा भेटायला आलोय आपण, बच्चनला..!”
“असु दे, तुला माझ्या माहेरचं कौतुकच नाही काही..!”
हा “सुसंवाद” आणखी वाढला असता, पण तेव्हढ्यात तिकडुन एक धिप्पाड पहाड हळुहळु पावलं टाकत आमच्याकडे आला…
सहा – साडेसहा फुटी हा पहाड, शर्टाच्या बाहीतुन डोकावणारे त्याचे दंड… हत्तीचा पायच जणु..!
चेहऱ्यावर रेखीव दाढी, धारदार नाक, डोळ्यांत जरब… संपुर्ण मागे फिरवलेले केस आणि त्यावर लटकावलेला गॉगल..!
बघुनच धडकी भरावी..!!!
“इतकी ही अशी रेखीव दाढी कुणी करुन दिली वो दादा?” असा एक ग्रामिण भाबडा प्रश्न विचारावासा वाटला मला..!
पण त्याचे ते डोळे पाहुन धीरच झाला नाही..!
आल्या आल्या तो सर्वांना हात जोडुन “नमस्कार” म्हणाला..!
आयला, तो नमस्कार म्हणतोय का दम देतोय तेच कळलं नाही..!
सोबत त्याने एक थैला आणला होता… त्याने आपापले सर्व सामान त्या थैल्यात ठेवण्याची विनंती ( कि धमकी?) सर्वांना केली..!
सर्वांनी पटापट सामान टाकलं, पावती घेतली… मी ही टाकलं..!
“मोबाईल भी डालीये सर बॅगमें..!” विनंती करत त्याने धमकी दिली…
“अरे भाई… ओ सर… मेरको बच्चन सायेब का सेल्फी लेनेका हय ना… आप ये मोबाईल लेके जायेंगा तो, मै सेल्फी कैसे निकालेंगा..!”
मला येत असलेल्या शक्य तितक्या शुद्ध हिंदित मी बोललो..!
पण त्या क्रुरकर्म्याने काहीही विचार न करता माझा मोबाईल काढुन घेतलाच..!
काळीज काढुन नेणं म्हणजे काय मला तेव्हा समजलं..!
आता फोटो काढायचे कसे?
माज्या डोक्यात पुना येक विचार आला… “घेतला मोबाईल तर घेवुं दे…”
आयला बच्चन भेटुं दे.. मग त्याला म्हणु… “बच्चन सायेब, मै आपका भौत बडा फ्यान हय… आपके वो आडदांड आदमी ने हमारा मोबाईल निकाल के लिया… अब हम क्या करेंगा, तुमीच बताव..!”
“येक काम करो, तुम मेरकु एक मिस कॉल देव… मै तुमारा नंबर सेव करता है… वो खाने का शेव नाही… सेव… सेव… हां..!”
“तुम अपने मोबाईल पे सेल्फी ले लो और मेरकु वाट्सआप पे भेज देव… तुम वाट्सआप वापरता है ना..? हां ग आश्शी..!!!”
त्या हैवानाने मोबाईल नेला नसता तर?
हातात असलेल्या शहेनशहा फेट्याचा परिणाम म्हणुन कि काय कोण जाणे…
माझ्यात विरश्री संचारली… मनातल्या मनात मी माझं काळीज नेणा-या त्या क्रुरकर्म्याच्या छाताडावर बसलो आणि आता तलवारीने मी त्याचं मुंडकं कलम करणार इतक्यात तो परत आला…
बापरे, माझ्या मनातलं यानं ऐकलं तर नसेल ना? एसीतही मला घाम फुटला!
तो पुन्हा त्याच जरबेनं आला… “म्हणाला बच्चन सर अभी दस मिनट मे आयेंगे… मै कुछ instructions देना चाहता हुँ… प्लीज ध्यान से follow करीये…”
“नंबर 1 – बच्चन साब आपसे शेकहँड करेंगे… प्लीज उनसे ऐसे हाथ मिलाना के आपके नाखुन उन्हें ना लगे..!”
“नंबर 2 – बस उनसे हाथ मिलाना है, नाजुकसे… हाथ झिंझोढना नही है..!”
“नंबर 3 – उनके कपडों को हाथ ना लगाना… उनको Infection हो सकता है..!”
“नंबर 4 – कुछ बताना है तो 10-15 सेकंद में बताना… irrelevant बातें ना करें… आपसे मिलने के बाद, उन्हे शुट पे जाना है, उनका समय किमती है..!”
“नंबर 5 …”
आयला, पुढच्या सुचना कानात घुसल्याच नाहीत..!
मला पुन्हा घाम फुटला..!!!
पयल्यांदा मी माझ्या हाताची नखं पाहिली…
मनिषा मागच्याच महिन्यात म्हणत होती, “नखं वाढली आहेत बाबा, कापुन टाक!”
मी सगळे नवरे करतात तसं ऐकण्याचं नाटक करुन… तीचं ऐकलंच नव्हतं… कसं फसवलं तीला..?
हाय रे कर्मा… भोगा आता कर्माची फळं..!
किमान येवढं तरी मी तेव्हा तीचं ऐकायला पायजे होतं..! नखं काढायला पायजे होती..!
बापरे! या हैवानानं माझी वाढलेली नखं पाहीली तर माझा जीवच घेईल हा..!
मी फेटा बाजुला ठेवुन साळसुदासारखा पँटीच्या खिशात गुपचुप हात घातले…
आणि नंतर कुणाचं लक्ष नाही असं बघुन फटाफट दातानं नखं कुरतडुन टाकली..!
आपल्या स्पर्शाने बच्चन सायबाला infection होवु शकतं, हे ऐकुन मला माझ्या अंगावर जंतुच जंतु दिसायला लागले…
समोरच्या बाईच्या हातावरुन तर झुरळ चाललंय असा मला भास झाला…
तीला तसं सांगायचा मला मोह झाला, पण मनिषाने दटावलं म्हणुन गप्प बसलो..!
आणि तेव्हढ्यात तो एक आडदांड कमी म्हणुन का काय अजुन चार सहा असेच मस्तवाल आले…
“Attention… बच्चन साब आ रहे है… Instructions याद रखना..!”
दरवाजा उघडला गेला… आणि भारदस्त पणे चालत अमिताभ बच्चन साक्षात समोर प्रगटले…
गोरापान चेहरा, पांढरी शुभ्र दाढी, धारदार नाक, मधुन भांग पाडलेले, मागे वळवलेले वळणदार केस… शोधक आणि भेदक नजर आणि त्यावर काळ्या फ्रेमचा चष्मा..!
मोरपंखी रंगाचा सुट, चमकणारे बुट.. साक्षात शहनशहा… बिग बी आमच्या समोर दोन फुटांवर..!
आम्ही भेटायला आलेले ८ – १० लोक इंग्रजी C आकारात उभे होतो…
या C च्या एका टोकापासुन त्यांनी लोकांना भेटायला सुरुवात केली… आम्ही C च्या दुसऱ्या टोकाला होतो..!
ते एकेकाशी बोलत संवाद साधत, मध्येच हसत पुढं सरकत होते… मी निरखुन फक्त पहात होतो..!
किती अदब, किती नम्रता, किती विनय… मी भारावुन गेलो..!
शेवटी माझ्याजवळ ते आले, हृदय धडधडायला लागलं…
ते आम्हां दोघांकडे पाहुन हसले आणि अत्यंत प्रेमानं हात हाती दिला… दोन्ही हातांनी मी तो हाती घेतला आणि नमस्कारासाठी वाकलो..!
त्यांनी स्मित हास्य चेहऱ्यावर आणत हात जोडत विचारलं… “सर आपकी तारिफ..?”
बच्चनजी सारखा हिमालय हात जोडुन विचारतोय, “आपकी तारिफ..!”
कधी स्वप्नातही विचार केला नव्हता..!
नम्रता अंगातच असावी लागते, तीचं सोंग आणता येत नाही…
अंगात “अभिनय” भिनलाय यांच्या पण वागण्यात कुठलीच “ऍक्टिंग” नव्हती..!
जे होतं ते मनापासुन..!!!
“सर मै…” अशी सुरुवात करत, माझी नी मनीषाची ओळख करुन दिली…
काम अगदी थोडक्यात सांगितलं…
ऐकता ऐकता त्यांनी डोळ्यांवरचा चष्मा काढला…
डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा स्पष्ट दिसल्या… भावुक होवुन ते माझ्याकडं आणि मनीषाकडं पहात होते..!
त्या डोळ्यात मला मायेचा झरा दिसला..!!!
ते बोलले काहीच नाहीत… पण, संपुर्ण हॉल स्तब्ध..!!!
त्या निःशब्दतेत ते खुप काही बोलुन गेले… मी खुप काही ऐकुन गेलो ..!
त्यांनी काहीही न बोलता माझा हात परत हाती घेतला…
या हातात घेतलेल्या हातांचं आता आपण काय करावं ते त्यांनाच कळत नसावं बहुतेक..!
हलकाच त्यांनी माझा हात दाबला आणि चष्मा परत डोळ्यांवर चढवला..!
खरं सांगु?
नाजुकपणे दाबलेल्या त्यांच्या हातांचा स्पर्श मला वेगळा जाणवला नाही… ते हात बच्चनजींचे असले तरीही..!
कारण… मी हाच स्पर्श रोज अनुभवतो!!!
माझ्या वयस्कर भिक्षेक-यांचे हातही असेच आहेत..!!!
मला रस्त्यावर मुलगा नातु समजणा-या माझे भिक्षेकरी आजी आजोबाही असाच माझा हात हाती घेतात…
बोलत काहीच नाहीत… पण, नाजुकपणे असाच माझाही हात ते दाबतात…
इथंही निःशब्दता असते…
तरी त्याही निःशब्दतेत ते खुप काही बोलुन जातात… मी खुप काही ऐकुन घेतो ..!
शेवटी माणुस हा माणुसच असतो, तो बच्चन असला तरी… आणि माणुस हा माणुसच असतो… तो भिक्षेकरी असला तरीही… हेच खरं..!!!
फरक इतकाच की, यांनाही कुणाची तरी नखं बोचतील, त्यांनाही रस्त्यावर राहुन infection होईल असा विचार करणारं यांच्याजवळ यांचं कुणी नसतं..!
मी आणि मनिषा या लोकांना परिस्थितीची नखं लागु नयेत यासाठी प्रयत्न करतोय…
ओरबाडलंच कुणी यांना नखानं, तर मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करतोय ..!
Infection होवुच नये जंतुंपासुन याचा प्रयत्न करतोय…
झालंच Infection तर सर्वांना माणुसकीचं Infection व्हावं, असा प्रयत्न नक्कीच करतोय..!
ते निघाले… मी हातातलं भलं मोठं गिफ्ट त्यांना दाखवलं, आणि स्विकारण्याची विनंती केली..!
ते म्हणाले, “इतना महंगा गिफ्ट क्युँ लाये हो? और इतना बडा गिफ्ट रखने के लिए मेरे पास इतना बडा घर भी नही है..!”
ते हसले… पण मी काय बोलु..? वाक्यांचा अर्थ ध्यानी आला..!
मी एव्हढंच म्हणालो, “आप शहनशहा हो… और ये शहनशहा कि पगडी हमने आपके लिए लायी है, कृपया स्विकार करें..!”
गडगडाटी हास्य करत हा माणुस म्हणाला… “हा… हा… हा… शहनशहा? अब बुढापे में काम मिलना बहुत मुश्कील है डाक्टरसाब..! बुढे लोगों को कौन पुंछता है..?”
मनात म्हटलं… “खरंय … म्हाताऱ्या खोडांना कुणीच विचारत नाही हो सर..!!!”
मनिषाने त्यांना दोन ग्रिटिंग दिले… पैकी एकावर सही करुन त्यांनी परत दिलं, दुसरं स्वतःकडे ठेवलं..!
मी म्हणालो, “सर आपके साथ एक फोटो चाहिये था..!”
परत हात जोडत सर्वांकडे पहात ते तितक्याच नम्रपणे म्हणाले, “यहां पे Security Reason कि वजहसे फोटो निकालना मना है…”
“लेकीन अभी KBC का शुटिंग होगा, आप आरामसे शुटिंग भी देखीये…”
वहां हमारे प्रोफेशनल कॅमेरामॅन रहेंगे, मै आपके साथ वही पे फोटो खिंचवा लुँगा… जो आपको ६ ऑक्टोबर के बाद मिल जायेंगे… हमारे KBC के वेबसाईटपर..!
एव्हढं बोलुन ते नम्रपणे सर्वांना नमस्कार करुन निघुन गेले..!
यानंतर आम्ही शुटिंगही पाहिलं… यांच्या professional कॅमेरामॅननी फोटोही काढले आमचे..!!!
शुटिंग संपलं, ते गेले… पण मला दारातुन परत जातानाचे पाठमोरे बच्चनजी परत परत आठवत होते..!
मी त्या पाठमो-या मुर्तीला नमस्कार केला… आणि मनात म्हटलं…
“सर, या गडबडीत बरेच प्रश्न विचारायचे राहुन गेलेत तुम्हाला..!”
“विचारु..?”
“माझे भिक्षेकरी, भिकारी या शब्दांचं ओझं वहात कुली म्हणुनच जगले… यांना शान ने कधीच जगता येणार नाही का?”
“भिकारी म्हणुन पायात साखळदंड म्हणजे तुमच्या भाषेत जंजीर बांधली आहे यांच्या… ती तोडुन अभिमानाने जगण्याचा आनंद मिळवत जगता येणार नाही का यांना?”
“शान ने जगुच नये का यांनी?”
“आपण जगतो तो समाज आणि त्यांच्यात खुप मोठी दिवार आहे, ही भिंत तोडुन यांनाही खुद्दार बनवता येईल का?”
“यांनाही मुकद्दर का सिकंदर बनवता येईल? स्वाभिमानाची ठिणगी टाकुन यांच्याही मनात शोले भडकवता येतील?”
“शहनशहा म्हणुन यांनी जगावं ही माझी अंतिम इच्छा आहे सर!!! ती पुर्ण होईल का कधी?”
“सर मला एक आशिर्वाद द्याल?”
“बच्चन साहेब… मला तुमची हॉट सीट नको, माझ्या म्हाताऱ्या माणसांच्या हृदयात माझी बैठक पक्की आहे… ही बैठक ढळणार नाही असा आशिर्वाद द्या मला..!”
“मला तुमचे करोड नकोत साहेब…”
“मी आधीचाच अब्जाधिश माणुस आहे… माझी ही आशिर्वादाची संपत्ती कधी कमी होणार नाही, असा मला आशिर्वाद द्या…”
“द्याल ना आशिर्वाद बच्चन साहेब…”
“मी खुप आशेनं आलोय..!”
“भिक्षेक-यांचा डॉक्टर म्हणुन नाही… त्यांचा मुलगा म्हणुन … नातु म्हणुन, त्यांचा सखा म्हणुन… सख्खा म्हणुन..!”
“आयुष्यभर मी स्वप्नात थोरला भाऊ मानलं तुम्हाला…”
“एकदा… एकदाच खरा भाऊ व्हाल माझा..?”
Leave a Reply