अमिताभ बच्चन भेटीचा वृत्तांत आपण वाचला असेल, माझ्यापेक्षा इतरांनाच या भेटीची उत्सुकता जास्त होती..!
काय झालं या भेटीत, ते समजुन घेण्याची चिकित्सा होती..!
पण मी या भेटीतुन बाहेर आलोय, खुद्द अमिताभला भेटुनही..!
अमिताभ हा माझा आवडता कलाकार..!!!
त्याला भेटावं असं कुणालाही वाटेलच… मलाही ते वाटणं साहजीक होतं..!
पण खरं सांगु? अमिताभ भेट ही माझ्यासाठी एक चित्रपट होता..!
पिक्चरमध्ये दाखवणारी गोष्ट खोटी आहे हे माहीत असुनही, आपण त्या तीन तासांमध्ये समरस होवुन जातो. कॉमेडी झाल्यावर हसतो, दुःखद प्रसंगाला डोळे पाणावतात, पडद्यावरचे सीन पाहुन काहीवेळा आपल्यातही दहा हत्तींचं बळ आलंय असं वाटतं… पण हे सगळं कधीपर्यंत?
तर थिएटर मधुन बाहेर पडेपर्यंतच किंवा फार फार तर घरी पोचेपर्यंत..!
कारण यानंतर चालु होतं आपलं खरंखुरं आयुष्य! आपण त्यात गुरफटत जातो..!!!
माझंही तसंच झालं, अमिताभ भेट मी फक्त “चित्रपट” म्हणुन एन्जॉय केला.
तेवढ्यापुरता विरंगुळा म्हणुन मी रममाण झालो…
कारण अमिताभ किंवा हि फिल्मी दुनिया म्हणजे एक स्वप्नं आहे..!
खोट्या स्वप्नात रमण्यापेक्षा, वास्तविक जगणं केव्हाही चांगलं..!
फिल्मिस्तान च्या स्टुडिओतुन मी बाहेर पडलो…
आणि अमिताभला त्याच रंगेल फिल्मी दुनियेत सोडुन आलो…
मी माझ्या वास्तविक दुनियेत परत आलो..!
या फिल्मी दुनियेचा किंवा अमिताभचा मला किंवा माझ्या लोकांना काही उपयोग नाही..!
आणि माझा तर त्यांना काडी इतकाही ऊपयोग नाही..!
अमिताभ भुमिका जगत असेलही… पण माझी ही माणसं जगण्याची भुमिका करत आहेत..!
तेव्हा परत… भिक्षेकरी ते कष्टकरी..!
- एक २५ वर्षाचा मुलगा, त्याची वीसेक वर्षाची बायको, आपल्या तान्ह्या बाळासह भीक मागतात. आधार कुणाचा नाही. लोक यांना भीक देतात, पण उठुन उभं रहायला हात कुणी देत नाही..! येणारे लोक बाळाकडे पाहुन रुपाया दोन रुपये हातावर टेकवुन पुण्य विकत घेतात..!
महागाईच्या जमान्यात पुण्य मात्र स्वस्त झालंय..!
- आणखी एक अपंग माणुस… चाकं असलेल्या पाटावरुन सरपटत, आपल्या पत्नीसह भीक मागतो..! पाटावरुन हा पुढे सरकतो, पण आयुष्य नाही पुढे सरकत… ते घसरलंय! आणि एकाच जागेवर थांबुन राहीलंय..!
या आयुष्यालाही चाकं लावता आली तर..?
- २२ वर्षांचा तरुण मुलगा असलेली एक माता… ती ही भीकच मागते! पोरगा मदत करतो आईला, भीक मागायला..!
आणि हे सुद्धा लोकांना दोन दोन रुपयांत पुण्य (?) वाटत फिरत असतात..!
अशी हि तीन कुटुंबं … गेल्या कित्येक महिन्यांपासुन मी यांच्या संपर्कात आहे..!
तीनही कुटुंबं मलाच त्यांच्या घरातला कुटुंबप्रमुख समजतात..!
माझी त्यांच्याबरोबर न तुटणारी नाती तयार झालीत…
यांचा मी कधी भाऊ होतो तर कुणाचा भैय्या, कुणाचा मामु तर कुणाचा चाचु..!
दरवेळी माझी भुमिका बदलत असते..!
याच नात्यांच्या बंधनात त्यांना गुंफुन, आवाहन केलं या तीनही कुटुंबांना, “भाऊ ना मी तुमचा? मै भैय्या हुँ ना तुम्हारा?”
“मग भीक मागणं सोडा..!”
माझ्या आवाहनाला प्रतिसाद देवुन तीनही कुटुंबांनी भीक मागणं सोडुन काम करायची तयारी दाखवलीय..!
अर्थात, हे परिवर्तन एका रात्रीत घडलेलं नाहीय..!
नात्याचं भांडं करुन, त्यात त्यांच्या नी माझ्या भावना एकत्र करुन चुलीवर शिजायला ठेवल्या… या चुलीतली धग होती प्रेमाची, विश्वासाची..!
आशेचं मीठ टाकलंय चवीपुरतं..!
भीक मागण्याची प्रवृत्ती चुलीतल्या लाकडाबरोबर जाळुन टाकलीय..!
आणि आता यातुन तयार झालेत आत्मसन्मानानं जगायला तयार असणारी तीन कुटुंबं..!!!
या तीनही कुटुंबांना प्रत्येकी एक – अशी नवी कोरी हातगाडी घेवुन दिलीय..!
या हातगाडीलाच मॉडिफाय करुन, त्यावरच उघडझाप करता येईल असं दुकान तयार करुन घेतलंय. यांचं हे फिरतं दुकान असेल..!
जी व्यक्ती हातीपायी नीट आहे, ती ही गाडी ढकलेल, अपंग व्यक्ती आत बसुन दुकान चालवेल अशी आयडियाची कल्पना केलीय..!
या गाडीला आम्ही नाव दिलंय “शॉप ऑन व्हिल्स”..!
“शनिवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी, सायं ६:०० वाजता सेंट व्हिन्सेन्ट स्कुलजवळ, चार बावडी पोलीस स्टेशनसमोर, कँप, पुणे” येथे या तीनही गाड्यांची पुजा करुन, सन्मानाने या तीनही गाड्या या तीन कुटुंबांना हस्तांतरीत करणार आहोत..!
आपण पुण्यात असाल तर जरुर या… तीनही कुटुंबांचं घडलेलं परिवर्तन पहायला..!
आपल्या येण्यानं त्या तीनही कुटुंबांना बळ मिळेल आणि आम्हांला आशिर्वाद!!!
या परिवर्तनाचे खरे हकदार आपण सारे… आम्ही फक्त माध्यम..! आम्ही तुमच्या हृदयावर फक्त हात ठेवला, तुम्ही हृदयच काढुन आमच्या हातावर ठेवलंत..!!! कसं ऋण फेडायचे आम्ही हे… सांगा बरं..?
Leave a Reply