- एक ६५ वर्षांचे बाबा! तसे बरोबर आहेत सर्व यांच्या, पण आयुष्याच्या वाटेवर सोबत कुणाचीच नाही. नुसतंच “बरोबर” असणं आणि खरोखर “सोबत” असणं यात फरक असतो!
असो, हे बाबा अशाही परिस्थितीत आपल्या मतिमंद आणि विकलांग बहीणीला सांभाळतात. बहिणीचं वय असावं ६० – ६२ वर्षे..!
हिला आणि स्वतःला जगवण्यासाठी, हे बाबा भिक मागतात..!
या दोघांना कुणाचाच आधार नाही; एकमेकांशिवाय..!
सर्व सख्ख्यांनी साथ सोडलेय यांची, पण बाबांनी या मतिमंद आणि विकलांग बहीणीची साथ नाही सोडली…
“वेड्या बहीणीची वेडी ही माया” हे फक्त गाणं नसुन ते जीवनगाणं झालंय या बाबांसाठी…दोघंही ते गाणं जगताहेत..!
यांच्याविषयी सविस्तर लिहीनच पुन्हा कधीतरी सवडीनं..!
- दुसरे एक अपंग बाबा..! दोन्ही पाय निकामी, पण हातात आणि अंगात रग आहे, आणि मनात जिद्द..! फुटपाथ हेच घर..!
सांगेनच यांच्याही विषयी पुन्हा केव्हातरी..!
तर आयुष्याच्या उतारावर लागलेल्या या दोघांनाही भिक मागणं सोडायचं आवाहन गेल्या वर्षांपासुन करतोय. भिक मागणं सोडुन काम करायला ते तयार आहेत.
दोघांची वयं आणि एकुण परिस्थिती पाहता, यांना आपण ऑटो रिक्षाप्रमाणे मॉडिफाय केलेली प्रत्येकी एक व्हिलचेअर देत आहोत. या व्हिलचेअर ला विक्रीयोग्य वस्तु ठेवण्यासाठी कप्पे, वस्तु अडकवायला हुक्स वैगेरे तयार करुन दिले आहेत, जेणेकरुन शेंगदाणे, फुटाणे, पॅकिंगचे स्नॅक्स, फुगे, सॉक्स, लेडीज रुमाल व तत्सम गोष्टी विकता येतील..!
शिवाय उन पावसापासुन यांचं रक्षण होईल, निवारा मिळेल अशीच बांधणी केल्येय या व्हिलचेअर्सची..!
रॉबिनहुड, पुणे या संस्थेने एक व्हिलचेअर आम्हांस मदत म्हणुन दिली आहे, आम्ही ऋणी आहोत.
या दोन्ही मॉडिफाईड प्रोफेशनल व्हिलचेअर्स माझे स्नेही लोकमत वृत्तपत्र समुहाचे ज्येष्ठ पत्रकार श्री. यश भालेराव यांचे हस्ते या बाबांना “अर्पण” करणार आहोत.
श्री. यश भालेराव हे आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अक्षरशः जगतात! पुण्याबाहेरुन खेड्यापाड्यांतुन शिक्षणांस येणाऱ्या गोरगरीब आणि अनाथ मुलांना ते पुण्यात मोफत निवारा मिळवुन देतात, शिक्षणासाठी मदत करतात. “शिका आणि संघटीत व्हा” हा विचार ते फक्त बोलुन न दाखवता, प्रत्यक्ष अंमलात आणतात.
माझा प्रणाम या माझ्या मित्राला!
गोरगरीबांना मायेचा हात देणा-या या “माणसाच्या” हातुनच या व्हिलचेअर्स माझ्या दोन आजोबांना अर्पण झाल्या तर त्यांचे हात आणखी बळकट होतील, पुढील आयुष्यात त्यांना आणखी “यश” मिळेल अशी माझी प्रामाणिक भावना आहे.
या सर्व कामांत आपणां सर्वांचीच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मदत झाली आहे, आपली उपस्थिती या लोकांना जगण्याचं बळ देईल, आपल्या आशिर्वादाने हे लोक या वयांत भिक्षेकरी ते कष्टकरी हा प्रवास जोमानं करतील, अशी मला आशा आहे.
आपण यावे, यांच्याशी प्रत्यक्ष बोलावं, या बाबांना शुभेच्छा द्याव्यात, ही आपणांस मनोमन प्रार्थना..!
रस्त्यावरच्या लोकांसाठी रस्त्यावरच मांडलेला हा “अर्पण समारंभ”
स्थळ : साईबाबा मंदिर, तोफखाना, शिवाजीनगर कोर्टजवळ, शिवाजीनगर, पुणे.
दिनांक : शुक्रवार, १३ डिसेंबर २०१९
वेळ : सायं ५ वाजता.
“अर्पण” हाच शब्द इथे मला योग्य वाटतो..!
दान देणं, मदत करणं, बहाल करणं, वाहणं, भिक देणं, हस्तांतरीत करणं या पेक्षा वेगळा शब्द आहे हा अर्पण!
दान देणारे, बक्षिस देणारे, मदत करणारे आम्ही कोण? आमची एव्हढी मोठी पात्रताही नाही.
दोन्ही बाबांनी या वयातही भिक मागणं सोडलंय..!
हा जर त्यांनी पेटवलेला यज्ञ असेल तर आम्ही या यज्ञात “अर्पण” केलेल्या समिधा असु..!
वृद्ध भावानं, वृद्ध आणि विकलांग बहिणीची काळजी घेत, मानवतेचं मंदिर बांधलं असेल तर या मंदिरात “अर्पण” केलेली आम्ही फुलं असु..!
आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर दोन्ही आजोबा जर पुन्हा श्रीगणेशा गिरवणार असतील तर, या गणेशाला “अर्पण” झालेल्या आम्ही दुर्वा असु..!
याच भावनेनं, सन्मानानं जगण्यासाठी त्यांना “अर्पण” केलेल्या केवळ या आमच्या भावना आहेत..!!!
बाकी अर्पण करायला आमच्याकडे दुसरं आहेच काय..?
Leave a Reply