म्हसवड… माण तालुक्यातलं, सिद्धनाथाचं अधिष्ठान असलेलं माझं हे गाव! म्हसवड पासुन शंभरेक किमी वर पंढरपूर! विठ्ठल रखुमाई चे अधिष्ठान असलेलं हे गाव..!
साहजीकच कळायला लागल्यापासुनच विठ्ठल नामाचा जयघोष कानी पडायचा.
विठ्ठल हे नाव तेव्हापासुनच मनात घट्ट बसलं. जनमाणसांचा हा देव! या देवाची भक्ती करणारे अनेक संत, अभंग आणि भारुडाच्या रुपानं मनात घर करुन बसले… ते कायमचेच..!
विठ्ठलापेक्षा माझी भक्ती या चालत्या बोलत्या संतांना मी समर्पित केली.
पुढे डॉक्टर झालो, कालांतरानं भिक्षेक-यांची सेवा करु लागलो. सेवा हीच भक्ती समजुन माणसांतच देव पाहु लागलो. या प्रवासात आदरणीय सिंधुताई सपकाळ अर्थात् माई नावाचा वटवृक्ष भेटला. या वटवृक्षाच्या विसाव्यात रमलो..!
माईंशी अशीच चर्चा करताना पुन्हा एकदा “विठ्ठल” नावाचा संदर्भ आला. माई म्हणाल्या, “लेकरा हा विठ्ठल म्हणजे पंढरीचा नाही, हा मराठवाड्यातला आहे. पोलीसात मोठ्या पदावर आहे, हा देव नाही, पण देवाहुन कमीही नाही रे बाळ.”
पुन्हा एकदा विठ्ठल हे नाव कानी पडलं, माई भरभरून कौतुक करत होत्या या विठ्ठलाचं…
“माज्या पोरांना जगवतो रे बाळ हा विठ्ठल… पंढरीतल्या विठुरायापेक्षा या विठ्ठलाची मी भक्ती करते रे बाळ…” माई भावविवश होवुन बोलतात…
मला आपोआपच या “विठ्ठल” नावाविषयी अनामिक आदर वाटु लागला..!
पुढे एका मेडिकल जर्नल ने सायंटीफिक लेख लिहीला, “विठ्ठल” नाम सतत मुखी घेतल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो… विठ्ठल नाव पुन्हा कानावर पडलं…
माझे नागपुरचे मित्र डॉ. आशिष अटलोये यांच्याशी सहज गप्पा मारताना ते म्हणाले, पुण्यात आहात ना? “विठ्ठल जाधव” साहेबांना भेटलात की नाही..?
मी नाही, म्हणाल्यावर, ते आश्चर्यचकीत झाले… जणु “पंढरीला गेलात, पण विठोबाचे दर्शन नाही घेतले?” असा त्यांचा एकंदर भाव होता..!
मला आता उत्सुकता लागली… कोण असेल हि व्यक्ती “विठ्ठल जाधव?”
मी नंबर मिळवला, आणि डायरेक्ट या “विठ्ठल जाधव” नामक व्यक्तीला मेसेज केला… “सर मी माझं नाव अमुक अमुक आहे, भिक्षेक-यांच्या पुनर्वसनाचं काम करीत आहे, आपलं नाव खुपदा ऐकलंय, आपण वेळ दिल्यास भेटु इच्छित आहे…”
आतापर्यंत च्या संभाषणामध्ये कळलं होतं की विठ्ठल जाधव सर हे महाराष्ट्रातील तुरुंगाचे महानिरिक्षक आहेत. फार म्हणजे फारच मोठं पद आहे हे!
तरीही मी मेसेज पाठवायचं धाडस केलं.
उच्च पदावर असणाऱ्या व्यक्ती आमच्यासारख्या क्षुल्लक माणसांचे फोनही उचलत नाहीत, मेसेजला उत्तर देणं तर त्याहुन दुर…
मला खात्री होती, जाधव सरांसारखे सुपर सुपर क्लासवन ऑफिसर आपल्याला काय भीक घालणार? यांचं वर्तुळ मोठं… यांची उठबस “मोठ्या” लोकांत… आपली काय औकात? असा विचार करुन, त्यांच्या उत्तराची अपेक्षा न ठेवता, माझं मी दैनंदिन काम सुरु ठेवलं…
सहज दोन दिवसांनी मेसेज पाहिल्यावर मी उडालोच… “विठ्ठल जाधव” सरांनी अवघ्या पाच मिनिटांत रिप्लाय दिला होता, “डॉ. अभिजीतजी, आपले कार्य मोठे आहे, आपणांस भेटण्याची संधी हा माझ्यासाठी मोठा योग आहे, आपण अमुक तारखेस अमुक वेळी माझ्या कार्यालयात आलात तर मी स्वतःला धन्य समजेन, आपल्या भेटीच्या प्रतिक्षेत, आपला विठ्ठल जाधव…”
बापरे, या माणसानं पाच मिनीटांत रिप्लाय दिला, मी दोन दिवसांनी हा मेसेज पाहतोय..!
इतक्या नम्रतापुर्वक दिलेलं उत्तर वाचुन कळलं… माई या माणसाचं नाव इतक्या आदराने का घेते? डॉ. अटलोये का आश्चर्यचकीत झाले होते…
इथपासुनच या “माणसाबद्दल” आदर वाटायला लागला, न भेटताही…
ठरलेल्या वेळी, सरांच्या कार्यालयात डॉ. मनिषासह गेलो.
गेल्यागेल्या तिथल्या एका अधिका-यांनी आमचं हसत स्वागत केलं, ते म्हणाले, “तुम्ही डॉ. अभिजीत सोनवणे का? या ना..!”
मी चाचरत त्या साहेबांना विचारलं, “सर आपणांस कसं कळलं, मी डॉ. सोनवणे ते?”
ते हसत म्हणाले, “जाधव सरांनी आपण आज येणार आहात हे आम्हाला आधीच कळवलं होतं…”
“शिवाय आपला चांगला पाहुणचार करण्यास आम्हास सरांनी बजावले आहे, ते येतीलच बसा आपण…”
आता पोलीस आपल्याला “पाहुणचार” करणार! या विचारानेच अंगावर काटे आले…
विठ्ठल जाधव या न पाहिलेल्या व्यक्तीविषयी मी सोफ्यावर बसुन विचार करु लागलो… कोण ही किती मोठी व्यक्ती..? माझ्यासारख्या यःकश्चित माणसाला बोलावतात काय… वर आपल्या ऑफिसमध्ये बजावुन ठेवतात काय..! यांना हजारो लोक भेटत आसतील, मग सर्वांविषयी हे लक्षात ठेवुन प्रत्येकाला VIP ट्रीटमेंट देणं कसं जमत असेल यांना..?
खरंच हा माणुस नाहीच देवमाणुस असावा, असं प्रथमदर्शनी मत झालं माझं… कारण सामान्य माणसाला इतका मोठा रिस्पेक्ट कुठंच मिळत नाही… आणि आम्ही तो चक्कं अनुभवत होतो…
सर येण्याआधी मी विचार करु लागलो, तुरुंगातल्या लोकांबरोबर, मातब्बर गुंडांबरोबर राहुन हा माणुस किती निर्ढावला असेल? इतक्या वर्षात हा माणुस तर पाषाणाचा झाला असेल, मुर्दाड आणि बेरकी बनला असेल… मी मनातल्या मनात या “विठ्ठल जाधव” नावाची प्रतिमा तयार करु लागलो…
सर आले… सर आले… अशी लगबग ऑफिसात सुरु झाली… मनातल्या प्रतिमेप्रमाणे एक डेंजर चेहऱ्याचा, खतरनाक माणुस पोलीस गणवेशात दिसेल अशीच कल्पना होती..!
पण प्रत्यक्षात पोलीशी गणवेशात माया अन् करुणा घेवुन फिरणारा एक अवलिया समोर आला… डोळ्यांत वेगळीच चमक… त्याहुन जास्त माया… चेहऱ्यावर विशिष्ट हास्य.. गौतम बुद्धांसारखं … चालण्यात एक लयबद्धता … त्यांच्यामागे प्रचंड ताफा… अदबीनं चालणारा… देहबोलीत, हाताखालच्या लोकांना मनापासुन देत असलेला आदर दिसत होता..!
काय म्हणु या माणसाला..? डोळे पाहुन साईबाबा म्हणु? की हास्य पाहुन बुद्ध म्हणु? नेतृत्व पाहुन शिवाजी महाराज म्हणु? की विद्वत्ता पाहुन संत तुकाराम म्हणु? डोळ्यातलं तेज पाहुन संभाजी महाराज म्हणु? कि पोलीसाच्या वेशातला हा गाडगेबाबा म्हणु..? काय म्हणु? काय उपमा देवु?
माझ्यासारख्या अतिसंवेदनशील माणसाच्या मनात हे असे शंभर प्रश्न उमटले…
शेवटी मी मनोमन फक्त नमस्कार केला..! फक्त इतकंच शिल्लक होतं माझ्यासाठी!
प्रत्यक्षात भेटलो तेव्हा आपुलकीनं माझ्या कामाविषयी विचारलं… आभाळभर कौतुक केलं… रिटायरमेंटनंतर करणार असलेल्या कामाची आम्हांस कल्पना दिली… यांत कोणताही बडेजाव नव्हता… होतं फक्त सामाजिक बांधिलकीचं ऋण..!
जातांना त्यांनी आम्हांस “विठ्ठल झालासे कळस” हे त्यांचे आत्मचरीत्र सही करुन दिले… आम्ही भारावल्यागत छातीला लावुन ते घरी आणले आणि वाचुन देव्हा-यात ठेवले..!
सर उमरग्याचे आहेत..! उमर – गा… उमरभर गात रहा, असं तर देवाला सांगायचं नसेल?
सरांचा आणि माझा जिव्हाळा इथुनच सुरु झाला.
सर म्हणाले, “अभिजीत, तुम्ही भिक्षेक-यांचं काय काम करताय? मला एकदा यायचंय…”
मी भीक्षेक-यांत उठबस करतो, त्यांच्यातच खातो… एव्हढ्या मोठ्या माणसाला न्यायचं कसं या भीक्षेक-यांत?
पण ते आले, आणि माझ्यासारखीच मांडी घालुन म्हाता-या भीक्षेक-यांत बसले उकीरड्यावर…
पंधरा मिनिटांत त्यांनी या म्हाता-या भिक्षेक-यांचा विश्वास संपादन केला… ही म्हातारी माणसं जाधव सरांना आपल्यातलाच कुणी मायेचं समजुन त्यांना अरे तुरे करुन प्रेमानं बोलावु लागली…
मी या म्हाता-या आज्यांना डोळ्यानं दटावायचा प्रयत्न करत होतो, जाधव सरांच्या हे लक्षात आलं, त्यांनी स्मित हास्य करत मला सांगितलं, “अभिजीतजी मी कोण आहे ते यांना सांगु नका प्लीज, अहो यांच्या निमित्ताने आईवडील परत भेटताहेत, यांनी मला अरेतुरे नाही म्हणायचं तर कुणी?”
मी भारावुन गेलो… खरंच माणसं किती मोठं असतात?
मागे एकदा सरांच्या घरी गेलो होतो… “विद्या विनयेन शोभते” या उक्तीप्रमाणेच या नम्र माणसाच्या घरी सौ. विद्याताई नांदताहेत..!
सौ. विद्याताईंना मी रखुमाईच म्हणतो… या विठ्ठलाच्या मागे साक्षात ही रखुमाई उभी आहे..!
जाधव सरांनी पोलिसांत राहुन “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रिद शब्दशः जगले…
रिटायरमेंटनंतर विश्वात शांती नांदावी या उदात्त हेतुने “शांतीदुत” संकल्पना निर्माण केली..!
या संकल्पनेला सरांवर प्रेम करणा-यांनी ही पालखी उचलली आणि अक्षरशः डोक्यावर घेतली..!
पंढरपुरातल्या विठ्ठलाची मी कधी भक्ती केली नाही… पण माणसांत राहणाऱ्या या देवाचा… “विठ्ठल जाधव” नावाच्या माणसाचा मी भक्त आहे..! आणि अर्थात् त्यांना साथ देणा-या रखुमाई उर्फ सौ. विद्याताई यांचाही..!
चला मुखानं बोलुया… विठ्ठल… विठ्ठल… जय हरी विठ्ठल!
Great Sir
तुमच्यामुळे एक थोर व्यक्तिमत्वाची ओळख झाली.