चाफा

मंदिर,असंच एक पुण्यातलं!

मंदिराच्या आत कुणी मागतं, मंदिराच्या बाहेर कुणी मागतं, फरक इतकाच, मंदिराच्या आत मागणा-यांना भक्त म्हणतात,तर मंदिराबाहेर मागणा-यांना भिकारी!

फरक फक्त जागेचा आणि दोष फक्त नजरेचा.

रडतांनाही डोळ्यात पाणी येतं आणि जोरजोरात हसतांनाही. इथं डोळ्यातलं पाणी महत्वाचं नसतंच,घडलेला प्रसंग महत्वाचा.

खुप वर्षे जवळ राहणारं आपलं कुणी गेलं तर माणुस रडतो,खुप वर्षे दुर असणारं आपलं कुणी आलं तरी माणुस रडतो,डोळ्यातलं पाणी तेच असतं.

पण रडतांना येतं ते पाणी,दुःखात येतात ते अश्रुआणि आनंदात येतात ते आनंदाश्रु.

दुःखात किंमत नसते,किंमत वाढते ती सुखातच.

दुःखात रडु कोसळतं आणि आनंदात डोळे वाहतात.

कुणी आनंदाने कोसळतात तर कुणी दुःखात वाहुनही जातात.

लहान मुल रडतं ती किरकिर असते, बाई रडते तेव्हा ती पिरपीर, पुरुष रडतो ते दु:ख्.

आपण करतो ती याचना, दुसरा मागतो ती भिक;

आपण चढवतो तो नैवेद्य, दुसरा देतो ती लाच;

संदर्भ फक्त बदलत असतात.

जिथं मी येतो तिथं माणुस वकील बनतो,स्वतःबद्दल सफाई देतो;

जिथं तु येतो तिथं तो डायरेक्ट जज्ज होतो,फट्कन् दुस-याला सजा सुनावुन मोकळा होतो.

मला कळत नाही,हा तु” “मी कधी होणार?

झालेच कधी एकत्र तर तु आणि मी मिळुन आपण तुमी बनु ना..!

माणसाचा मीपणाआड येतो, थोडा मीपणा घेतला तर नाही चालायचं का?

असो…

एक बाबा मला भेटले,अशाच एका मंदिराबाहेर भिक मागायचे.

खुप छान संसार होता पुर्वी. नवरा बायकोनं मिळुन मस्त घर सजवलं होतं,छान चाललं होतं. तीन मुलं झाली. थोरली मुलगी, बाकीची दोन मुलं.

नवरा बायको दोघेही काम करायचे,पोरांचं संगोपन करायचे. मुलांना मोठं केलं.मुलीचं लग्न केलं.जावई आला.

पुढे कशी माशी शिंकली माहीत नाही. रात्री झोपलेली पत्नी सकाळी मृत म्हणुन हाती आली.

“उद्या स्वयंपाक काय करु वो?”,म्हणणारी, ती न सांगता एका रात्रीत देवाघरी निघुन गेली

आणि केलेला स्वयंपाक हा भरवत बसला कावळ्यांना.

“पिंडाला शिवा रे.”,म्हणत कावळ्यांची बसला मनधरणी करत.

पिंडाला शिवेलच कसा कावळा? मागं तीन पोरं टाकुन एक आई गेली होती. कावळ्यांनी शेवटपर्यत घास खाल्लाच नाही.

कावळ्यांनाही आई असेलच ना!

त्यादिवशी त्यांनीही या आईसाठी उपवास केला,त्यांनी घास खाल्लाच नाही.

पिंडाला कावळा शिवलाच नाही आणि हा मात्र घास घेवुन फिरत होता, कावळ्यांमागं, केविलवाणा.

तीला फुलं खुप आवडायची, विशेषतः चाफा’.

जमेल तेव्हा हा चाफ्याचा गजरा घेवुन जायचा.ती डोक्यात तो माळायची;सारा आसमंत सुगंधीत व्हायचा.

आता तो चाफा कधीच देवाघरी गेला आणि त्याचा सुगंधही.

थोडेच दिवस गेले असावेत, धाकटा मुलगा आईला भेटायला देवाघरी गेला.

धाकटं मुल, आईवाचुन राहील कसं?

आई…आई…करत गेलं ते ही आभाळात,परत कधीही न येण्यासाठी.

हा खचला.

जावयाच्या पाया पडला, म्हणाला,”दुसरा मुलगा तुम्ही सांभाळा, पदरात घ्या.”

हा मुलीला म्हणाला,”बाई गं,आता तुच त्याची आई हो.” .

मुलगी म्हणाली,”कुठं जाल तुम्ही बाबा?”.

याच्याकडे उत्तर नव्हतं.

फिरत फिरत पुण्यात आला.

डोक्यात बायकोला आवडणारा चाफा आणि गेलेलं मुल.

आत्महत्येचा प्रयत्न केला, पण नेमकी देवाघरी जागा नसावी म्हणुन हा प्रत्येकवेळी जीवंत, इच्छा नसतांनाही.

कसं असतं ना? जगावसं वाटतं तेव्हा मरण जगु देत नाही आणि मरावसं वाटतं तेव्हा जगणं मरुही देत नाही.

प्रेमाच्या लोकांसाठी झिजत मरणं हे ही जगणं होतं आणि आपल्या लोकांवाचुन जगणं ते ही मरणच होतं.

मध्ये याचा ऍक्सिडेंट झाला,पाय तुटला. याला वाटलं आता तरी आपण मरु आणि देवाघरी चाफा घेवुन जावु.

पण नाही, तुटलेला पाय निसर्गानं जोडला.

असा तुटलेला पाय कोणत्याही उपचाराविना कसा जोडला गेला?

डॉक्टरांकडेही याचं उत्तर नाही.

गुडघ्याच्या खाली पाय मोडुन नडगीचा अक्षरशः त्रिकोण झाला आहे तरी तो “चालतोच” आहे,

कि कुणी चालवतंय त्याला?

कुणासाठी? कशासाठी?

ज्याने त्याला जगवलंय, त्यालाच याचं उत्तर माहित.

जगण्याचे सगळे प्रयत्न झाल्यावर काम मागतांना सगळीकडुन झिडकारुन झाल्यावर लागला भिक मागायला.

लोक दगडाच्या मुर्तीला सोन्याचं सिंहासन वाहतात पण हाडामांसाच्या माणसाला बसायला तुटकी खुर्चीही देत नाहीत.

हजारो लिटर दुधानं अभिषेक घालतील पण आईवाचुन तडफडणा-या पोराच्या तोंडात थेंब घालणार नाहीत.

आपण दगडात देव शोधतो, पण देवालाही दगडाचा कंटाळा येतो आणि शेवटी तो ही माणुसच होवुन जातो.

आणि “माणुस” सोडुन आपण सगळ्याची पुजा करतो.

DIWALI मध्ये अली आहे आणि RAMZAN मध्येही राम.

हे अली आणि राम सध्या माणसाच्या मनात राहतात. मंदिर आणि मस्जिद मध्ये नाही.

असो..!

या बाबांना मी म्हणायचो,”बाबा काम करा ना?”,बाबा प्रत्येकवेळी मला उडवुन लावायचे.

“ह्याट्”.

“बाबा भिक मागण्यापेक्षा हे काम करा ना”,

“ह्याट्.”

“बरं मग ते?”

“ह्याट्.”

सगळी कहाणी समजल्यावर त्यांच्या पत्नीला आवडणा-या चाफ्याला गळ घातली आणि मग, चाफा फुली आला फुलुन.

बाबांना एक दिवस बोललो,तुमच्या पत्नीला चाफा आवडायचा,मी तुम्हाला चाफा विकत घेवुन देतो,तुम्ही तो इतरांना विका. बाबा तुमची बायको पहात असेल. अहो, रोज हा चाफ्याचा सुगंध लोकांना वाटा. त्यांना जे आवडतंय ते तुम्ही केलंत तर त्यांना छान वाटेल. तुम्ही इथं सुगंध वाटलात तर त्यांच्यापर्यंतसुद्धा तो पोचेलच की.

भिक मागण्यापेक्षा चाफा विका,इतर फुलं विका.”.

यावेळी बाबा ‘ह्याट्’ म्हणाले नाहीत,

यावेळी डोळ्यातलं पाणी बोलत होतं.

खरंच का वो डाक्टर? तीला कळंल? तीला आवाडणारा चाफा मी हितं हातात धरला तर तीला वास जाईल?”

असं म्हणत, वरुन राकट वाटणाऱ्या या माणसाच्या डोळ्यातुन घळाघळा अश्रु ओघळु लागले.

हसु कुणा परक्यासमोरही येतं पण आसु आपल्याच माणसासमोर येतात.

ब-याच दिवसांनी बाबांनी मला आपलं मानलं होतं. डोळ्यातल्या आसवांनी मला ते जाणवुन दिलं.

बाबा आजपासुन चाफा विकायला तयार झाले.

बाबांना चाफा विकत आणुन दिला.

बाबा प्रत्येक फुलाला बघुन नवलाईने न्याहाळत होते, जणु एकात त्यांना त्यांची देवाघरी गेलेली सहचारीणी दिसत होती आणि एकात त्यांचा गेलेला मुलगा.

त्यांनी जाताना माझे हात हाती घेतले, कृतज्ञतापुर्वक स्वतःच्या कपाळाला लावले.

नकळतपणे जाणवलं, माझेही हात अजाणतेपणी सुगंधीत झालेत.

 

सहज, जाताजाता आभाळाकडं पाहिलं. ढगांची खुप दाटी झाली होती.

काही ढग तर डोंगर माथ्यावर विसावले होते, जमिनीवर उतरण्याचा ते निष्फळ प्रयत्न करत होते.

उगीचंच मला ते माझ्याचकडे बघताहेत असा भास झाला.

मध्येच ते माझ्याकडे बघुन मायेनं हसताहेत असाही भास झाला.

हे ढग म्हणजे, त्या बाबांची सहचारीणी आणि मुलगा तर नसतील?

मी ढगांकडे बघुन हळुच मनोभावे नमस्कार केला

आणि सहज मागे वळुन पाहिलं,

 

बाबा चाफ्याचा सुगंध लोकांना वाटण्यात व्यस्त होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*