सप्रेम नमस्कार! आपल्या माध्यमांतुन होत असलेल्या कामाचा एप्रिल महिन्याच्या कामाचा लेखाजोखा थोडक्यात सविनय सादर…
भिक्षेकरी ते कष्टकरी
- मागील महिन्यात एका दृष्टी बाधित जोडप्याविषयी लिहिलं होतं. या जोडप्याला पायावर उभं करण्यासाठी कोणता व्यवसाय टाकून देता येईल याचा विचार करत असताना सध्याच्या परिस्थितीत सॅनिटायझर आणि मास्क्स लोक विकत घेतील, हाच विचार करून या अंध जोडप्याला सॅनिटायझर आणि उत्तम प्रतीचे मास्क्स विकायला दिले आहेत. या बाबी नागरीकांनी यांच्याकडुन विकत घ्याव्यात यासाठी नागरिकांना आवाहन करणारा एक बोर्ड सुद्धा त्यांच्या हातात दिला होता. या सर्वांचा परिणाम म्हणून लोक, सॅनिटायझर आणि मास्क या जोडप्याकडुन विकत घेत आहेत. हे जोडपं सध्या स्वावलंबी झालेलं आहे. संसाराला लागणाऱ्या अनेक बाबी उदा. गॅस, शेगडी, भांडी आपण त्यांना विकत घेऊन दिल्या आहेत.
- चिंचवड येथील भीक मागणा-या दोन मावश्या. या दोघींनाही दिनांक १२ एप्रिल रोजी, गुढीपाडव्याच्या निमित्ताने कडुलिंब विकावयास लावला. सुरुवातीस त्या तयार नव्हत्या, परंतु त्यांच्यासमवेत हा पाला विकायला मी ही बसलो. आणि संपूर्ण दिवसभरातून त्यांनी दोघींत मिळून किमान एक हजार रुपयांचा व्यवसाय केला. यामुळे त्यांचाही उत्साह वाढला. दिनांक १६ एप्रिल पासून या दोघींनाही यानंतर सॅनिटायझर विकावयास दिले आहेत. दोघीही आता भीक मागणे सोडून चिंचवड परिसरात सॅनिटायझर विकत आहेत.
- ढोले पाटील रोड, हॉटेल कपिला शेजारी, एक अंध जोडपं गेल्या कित्येक वर्षापासून भीक मागत आहे. त्यांना काम करण्याविषयी काही महिन्यांपासून सुचवत होतो, त्यांच्यासारखे अनेक लोक काम करत आहेत याचा त्यांना विश्वास देत होतो. शेवटी दिनांक २२ एप्रिल पासून त्यांना सुद्धा रस्त्यावरच सॅनिटायझर आणि मास्क विक्री सुरू करण्यास लावले आहे.
त्यांच्याही हातात खालील प्रमाणे एक बोर्ड तयार करून दिला आहे
डोळ्यातली फक्त ज्योत विझली आहे… मनातला प्रकाश नाही!
फक्त सृष्टी हरवली आहे आमच्यातला आत्मविश्वास नाही!
आम्हाला भिकेचा चंद्र नकोय कष्टाची भाकर हवीय!
भीक न देता आमच्याकडील वस्तू घेऊन आम्हालाही सन्मानाने जगण्याची संधी द्या…
वैद्यकीय
- पदपथावर झोपली असता रिव्हर्स येणारी एक चार चाकी गाडी एका मावशीच्या अंगावरून गेली होती. सध्याच्या परिस्थितीत या मावशीला ऍडमिट करून घेण्यास कुणीही तयार नव्हतं, या मावशीची ट्रीटमेंट रस्त्यावरच चालू आहे.
- शिवाजीनगर परिसरात भीक मागणारी एक आजी, हिला गंभीर स्त्री रोग होता. डॉ सागर राणे यांच्या साई समर्थ हॉस्पिटल मधून २ एप्रिल रोजी या आजीवर उपचार करून घेतले असुन पुढील महिन्यात ऑपरेशन करायचे ठरले आहे.
- नुकतीच कष्टकरी झालेली एक मावशी, हिच्या मुलाला वैद्यकीय तपासणीची व उपचाराची गरज होती. चिंचवड मधील माझे स्नेही डॉक्टर शैलेंद्र कुलकर्णी यांच्या दवाखान्यात या मुलाचे उपचार सुरु आहेत.
- घातवार या शीर्षकाखाली, पाय मोडलेल्या एका आजीविषयी लिहीलं होतं. १७ एप्रिल रोजी, डॉक्टर शोएब शेख यांच्या मॉडर्न ऑर्थोपेडिक हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करून आजीचे ऑपरेशन करून घेतले आहे. आजीची परिस्थिती आता सुधारत आहे.
- नांदेड जिल्ह्यातील गरीब घरातील एक अंध मुलगी शिकण्याच्या निमित्ताने पुण्यात आली आणि पुण्यात अडकली. गंभीर आजारी पडली, इथं कुणीही ओळखीचं नाही, पालक जवळ नाहीत, घरी जायला पैसे नाहीत, अशा अवस्थेत तिला माझा कोणीतरी नंबर दिला. या दृष्टी बाधित मुलीला माणुसकीच्या नात्याने सर्वतोपरी वैद्यकीय सहाय्य पुरवले आहे.
- बीपी, डायबेटिस, त्वचारोग, संधिवात यासारख्या आजारांवर ९९८ भीक मागणाऱ्या व्यक्तींवर या महिन्यात उपचार करून ५०० गरजुंना व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या, मास्क, सॅनिटायझर, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे इत्यादी दिले आहेत. या व्यतिरीक्त त्यांना आपण स्वच्छतेसाठी साबणसुद्धा देत आहोत.
भीक नको बाई शीक…
१. या महिन्यात कोणतीही शैक्षणिक गरज समोर आली नाही.
इतर…
- पुरुषांची खराटा पलटणची पहिली बॅच दिनांक २ एप्रिल रोजी सुरु झाली. शनीपार चौक परिसर या बॅचने संपुर्ण साफ केला.
- गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू असलेली महिलांची खराटा पलटण बॅच दर शुक्रवारी म्हणजे २, ९, १६, २३ आणि ३० एप्रिल रोजी संपन्न झाली. बॅच मधील प्रत्येक महिलेला दरवेळी मानधना बरोबरच शिधा आणि जेवण याव्यतिरिक्त लागणाऱ्या इतर संसारोपयोगी वस्तू दरवेळी घेऊन दिल्या आहेत.
- समाधान चव्हाण नावाचा एक लहान मुलगा. याच्या हृदयाला एक होल आहे. याच्या कुटुंबीयांनी माझ्याकडे मदत मागितली, परंतु भिक्षेकरी गटात नसल्यामुळे मी याला मदत करू शकलो नाही. अशा वेळी एका त्रयस्थ संस्थेमार्फत अनेक लोकांना मदत करण्या विषयी आवाहन केले. या मुलाच्या ऑपरेशनचा खर्च साधारण अडीच ते तीन लाख इतका होता. या मुलाला ऑपरेशन होईल इतका निधी मिळवून दिला आहे. यातही आपणच सर्वांनी मदत केली आहे. सध्याच्या काळात ऑपरेशन होऊ शकणार नाही परंतु सध्याचा महामारी काळ ओसरल्यानंतर या मुलाच्या ऑपरेशन करण्याचे ठरले आहे.
- डॉक्टर फॉर बेगर्स या प्रकल्पांतर्गत, आतापर्यंत जवळपास १०५ जणांनी भीक मागणं सोडलं आहे आणि ते व्यवसाय करत होते. परंतु सध्याच्या काळात त्यांचे हे व्यवसाय ठप्प झाले आहेत! “आम्ही पुन्हा भीक मागावी का?” या विचारांकडे ते झुकू नयेत यासाठी पंधरा दिवस पुरेल इतका शिधा प्रत्येकाला दोन वेळा देऊन झाला आहे. गव्हाचे तयार पीठ, तूरडाळ, तेल, चहा, साखर, रवा, बेसन व इतर किरकोळ साहित्य असे हे किट तीनशे लोकांना वाटप केले आहे.
- श्री. कांतीलालजी बलदोटा, श्री. दानेशजी शहा आणि श्री. कीर्ती भाई ओसवाल या स्नेह्यांनी या संपूर्ण महिन्यात आमच्याकडे जेवणाचे डबे आणून दिले. या तीनही महोदयांमार्फत, एकूण बाराशे डबे आम्हाला महिन्याभरात मिळाले, याचा अर्थ बाराशे वेळा अनेक जणांची भूक या तीन महोदयांच्या माध्यमातून आम्ही भागवु शकलो.
या बाराशे डब्यांचा कोणताही आर्थिक भार सोहम ट्रस्टला उचलावा लागला नाही, स्वखर्चाने इतरांची भुक भागविणा-या या माझ्या स्नेह्यांना प्रणाम!
Leave a Reply