बाळ

सोमवार दिनांक १४ जून २०२१.

संध्याकाळी सहा वाजता फोनची रिंग वाजली. फोन चार्जिंगला लावलेला, पीन काढून हातात घेतला.

“हॅलो…”

“Is it Dr. Abhijit Sonawane there?” पलीकडून अनोळखी आवाज आला.

“Yes sir, speaking, Dr. Abhijit here!”

“Oh great… doctor my name is XXX, I need your help… I am helpless and lying on the road, since very long time…” अत्यंत सफाईदारपणे इंग्लिश मध्ये एक गृहस्थ माझ्याशी संवाद साधत होते.

अर्ध्या तासाच्या संभाषणातून कळलं ते असं…

हे एक गृहस्थ, पॅरालिसीस मुळे डावा हात नीट काम करत नाही आणि त्याच सोबत दोन्ही पायही. उच्चशिक्षित आहेत. एका नामांकित बँक मध्ये काम करणारे हे गृहस्थ परिस्थितीच्या एका फटक्याने रस्त्यावर आले आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून फुटपाथवर पडून आहेत निराधार!

मी त्यांना काय मदत करू शकतो हे ते अजीजीने विचारत होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला विनंती करून त्यांनी मला फोन केला होता.

“उद्या मंगळवारी दुपारी बारा वाजता मी तुम्हाला येऊन भेटतो मला पत्ता द्या” मी म्हणालो.

ते पडून असलेल्या ठिकाणचा पत्ता त्यांनी मला खाणाखुणा सकट दिला. पुण्यातील नामांकित रस्ता… या रस्त्याचा अभिमान नाही असा एकही पुणेकर सापडणार नाही. पत्ता शोधणं अवघड नव्हतं. मंगळवारी १५ जूनला बरोबर बारा वाजता मी दिलेल्या पत्त्यावर गेलो.

पुण्यातला हा रस्ता म्हणजे नटलेल्या नववधूसारखा! आजूबाजूला लाईनशीर असलेली झाडं, म्हणजे तिच्या कपाळापर्यंत आलेल्या बटा जणू… इथली भव्य शोरूम्स आणि हॉटेल्स म्हणजे तिने घातलेले दागिने… सरळ जाणारी, कुठेही वक्र नसलेली ही वाट म्हणजे तीचं सरळ धारदार नाक… इथेच असणारं सांस्कृतिक कला जपणारं एक स्थळ, म्हणजे तीच्या कपाळावर तीनं ल्यालेलं सौभाग्याचं लेणं जणू!

अरे पण हे काय? रस्त्यावर ज्या ठिकाणी मला यायला सांगितलं होतं तिथे तर उकीरडा होता… हा उकिरडा म्हणजे… नटलेल्या या नववधूच्या गालावर उमटलेला बटबटीत काळा चट्टा वाटला मला! रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त विखुरलेल्या बाटल्या, कचरा, विष्ठा आणि आणखीही बरंच काही…

नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे या सर्व कचऱ्याचा अक्षरशः चिखल झाला होता. यामुळे आजूबाजूच्या वातावरणात दुर्गंधी पसरली होती. येणारे जाणारे लोक या ठिकाणाला टाळून वळसा घालून पुढे जात होते.

उकिरड्यापासून दहा फूट अंतरावर मी बुलेट थांबवली. गाडीवरून न उतरताच आजूबाजूला ते गृहस्थ कुठे दिसतात का हे पाहू लागलो. उकिरडयाकडे पुन्हा लक्ष गेलं… याच कचऱ्यावर अर्धवट पसरलेला फाटलेल्या फ्लेक्सचा एक तुकडा कोणीतरी झाकून ठेवला होता. दुर्गंधी येऊ नये म्हणून किंवा हा कचरा दिसू नये म्हणून कुणीतरी ही शक्कल लढवली असावी.

मला हसू आलं… दुर्गंध झाकून लपतो काय? आणि सुगंध… झाकला तरी दरवळायचं सोडतो काय.?

बराचवेळ शोधुनही, त्या गृहस्थांचं नामोनिशाण मात्र कुठेही दिसलं नाही. मनात विचार केला, इथून ते काही कारणासाठी दुसरीकडे कुठेतरी गेले असतील, येतील परत… आपणही येऊ पुन्हा परत कधी तरी… हा विचार करून मी बुलेट स्टार्ट करून गाडी आणि माझ्या अंगाखांद्यावर असणार शंभर-दीडशे किलोचं साहित्य सावरत पुढे निघालो. थोडंसं अंतर पुढे गेलो आणि मनातल्या विचाराने गाडीला कचकन ब्रेक लागला. पॅरालिसीस झालेला माणूस जाईल कुठे.? पत्ताही बरोबर दिला होता. मग तीथंच कुठंतरी असणार ते… मनात शंकेची पाल चुकचुकली…

गाडी वळवून, नो एन्ट्री मधून मी पुन्हा उलट्या दिशेने उकिरड्याकडे निघालो. यावेळी गाडी उभी केली. अंगाखांद्यावरचं सामान रस्त्यावर काढून ठेवलं.

पाऊस भुरभुरत होताच. मी नाक दाबत उकिरड्याजवळ आलो… दुर्गंध आणखी तीव्र झाला होता. डाव्या हाताने नाक दाबत, उजव्या हाताने, उकीरड्यावर अंथरलेला फ्लेक्सचा तुकडा सहज म्हणून मी बाजूला केला. आणि विजेचा धक्का बसावा त्‍याप्रमाणे माझा हात आपोआप मागे फेकला गेला.

मी हादरलो!

फ्लेक्सच्या या तुकड्याखाली, अंगाचं मुटकुळं करून एक व्यक्ती उजव्या कुशीवर, पाय पोटाजवळ दुमडुन शांतपणे झोपली होती, नमस्कारासाठी जोडतात तसे हात जोडुन ते उजव्या गालाखाली दडपून ठेवले होते…

आईच्या पोटात बाळ याच अवस्थेत असतं! परिस्थितीमुळे उकिरडा हिच या बाळाची आई झाली होती इतकंच… अंगावरचा फ्लेक्स काढल्याबरोबर दुर्गंधी मध्ये आणखी वाढ झाली… दुर्गंध सुद्धा इतका दुर्गंधीत असू शकतो हे आज प्रथम जाणवलं.

तो अजूनही शांत झोपला होता. उकिरड्यात असलेल्या दुर्गंधाचा त्याला “गंध” सुद्धा नव्हता, कसलीही किळस चेह-यावर नव्हती! अर्थात जीने पोटात घेतले तिची कसली किळस? आईच ती शेवटी!

मी याच्याकडे नीट पाहिलं. रान माजावं, तसे डोक्यावर केस माजले होते. पिकतं ते शेत, माजतं ते रान! शेताची मशागत केली जाते… माजलेल्या रानाची मशागत करायचीच नसते, त्याला उखडून फेकूनच द्यावं लागतं! गालावर वाढलेली दाढी अशी, जणू कुणीही न पेरता उगवलेल्या काटेरी बाभळी! मान ना मान… म्हणत, ख-या अर्थानं या गळ्यात पडल्या होत्या!

अंगावर कळकट्ट शर्ट… कधीकाळी यालाही कुठलातरी रंग नक्कीच असेल… आज तो “बेरंग” होता!

त्याखाली पॅन्ट. पॅन्ट ला बक्कल नव्हतंच… पण, कमरेपासून खाली येऊ नये म्हणून सुतळीने तीला बांधून ठेवलं होतं. “आपले” म्हणणारे लोक सुद्धा जीथं आपल्याला “नागवं” करायला कमी करत नाहीत, तीथं ही क्षुल्लक अशी सुतळी कोणाची तरी लाज वाचवू पाहत होती!

वाह रे दुनिया! मल – मूत्र – विष्ठा याने ही संपूर्ण पॅन्ट भरून गेली होती. तो उठून चालूच शकत नाही… सर्वकाही जागेवरच! करणार काय? मल – मूत्र – विष्ठा यांची संपुर्ण जबाबदारी या पॅन्टने घेतली होती, बिनबोभाट!

एरव्ही, हे माझं काम नाही, ही माझी जबाबदारी नाही, असं म्हणणारी अनेक मंडळी भेटतात… त्यांच्यापेक्षा हि वास मारणारी, पण जबाबदारीचं भान ठेवणारी पॅन्ट लाखमोलाची! एकुणच, संपूर्ण जगात असलेला दुर्गंध जणू तीथे एकवटला होता… या गृहस्थाला सोबत करण्यासाठी!

याचं वय असावं ४० वर्षे! फोनवरील बोलण्यावरून मला कुणीतरी पोक्त गृहस्थ असावेत असं वाटलं होतं.

तो अजुनही गाढ झोपेत होता. आलिशान घरात गाद्या गिरद्यांवर झोपेवाचून तळमळत पडलेले लोक मी पाहिले आहेत… तीथं हा मनमौजी मात्र या उकिरड्यात गाढ झोप घेत आहे… स्वर्गीय सुख अनुभवत आहे! खरा नशीबवान तो!

मी त्याला खांद्याला धरुन हळूच हलवलं. खरंतर कुणालाही झोपेतून उठवायला मला आवडत नाही. यांच्या आयुष्यातली स्वप्नं भंगलेलीच असतात… किमान झोपेतली स्वप्नं आपण कशाला तोडावीत?

याचवेळी, डोळे चोळत तो जागा झाला.

मी म्हटलं, “काल तुम्ही मला फोन केला होतात.”

“Oh…yes.. yes… I remember. You are Dr. Abhijit, right sir?”

“Yes”

“मित्रा तू मुळचा कुठला?” अहो जाहो चे बांध तोडून आमच्यात मैत्री निर्माण व्हावी यासाठी मी सरळ एकेरी हाक मारली. त्याने गावाचं नाव सांगितलं. कोकण संपून एक राज्य सुरू होतं, त्या राज्यातल्या एका गावाचा तो रहिवासी.

“तुला या घाणीचा त्रास होत नाही?”

“कोणती घाण, कसली घाण?” त्याने आजुबाजुला पहात अत्यंत निरागसपणे विचारले.

त्याच्या या “निरागस” प्रश्नातच उत्तर दडलं होतं!

प्रत्येक शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलत असतो. ताटात असलेलं आजच पक्वान्न दुसऱ्या दिवशी खराब होतं, नासते… तेव्हा त्याला उकिरड्यावर फेकून दिल जातं… फेकणारा ती घाण म्हणून फेकतो. पण उकिरडे धूडाळणाऱ्या कुत्र्या मांजरांना मात्र ही फेकलेली घाण म्हणजे मेजवानी असते… त्यांच्यासाठी ते अन्नच असतं! काल जे पक्वान्न ताटा ची “शान” होतं, आज उकिरड्यावर पडल्याबरोबर ते “घाण” होतं!

प्रत्येक शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलत असतो हेच खरं!

ताटापासून उकिरड्यापर्यन्त चा प्रवास म्हणजेच माणसाचं आयुष्य असावं का?

बोलता बोलता मी त्याच्या भूतकाळामध्ये शिरलो.

आई-वडिलांसह हा एके दिवशी पुण्यात आला. याच शिक्षण बीकॉम. एका बँके मध्ये काम करू लागला. सर्व काही सुरळीत होतं. कालांतराने आई आणि वडील दोघेही वारले. मधल्या काळात याला पॅरालीसीसचा झटका आला त्यात डावा हात आणि दोन्ही पाय निकामी झाले. नोकरी गेली… संसार कधी फुलला नाही.

रेस मधला नामांकित घोडा हि लंगडा झाली की त्याची किंमत त्याक्षणी संपते, याचं ही तसंच झालं. घराचं भाडं द्यायला पैसे नाहीत आणि हा आता कोणतही काम करू शकत नाही… यात ते भाड्याचं घर सुद्धा सुटलं. आणि मग सुरू झाला आयुष्याच्या नाटकाचा दुसरा अंक…

जागा मिळेल तिथे दुकानाबाहेर रस्त्यावर किंवा इतर कोणत्या तरी ठिकाणी येऊन तो झोपायचा… खुरडत चालायचा… कोणी काही देईल ते खायचा. असली घाण दारात नको म्हणून प्रत्येकाने त्याला दारा समोरून हाकलून दिलं. प्रत्येकाच्या दारावर त्याच्या नावाची ठसठशीत पाटी असते… “ओळख” नावानं होत असेलही… “परिचय”, आपल्या वागण्यामुळं होतो!

मोठ्ठं नाव असलेल्या परंतु, परिचय हरवुन बसलेल्या लोकांनी याला सगळीकडुन हाकलुन दिलं. हा आला मग आपलं गाव शोधत… त्याला ध्रुवासारखं अढळ स्थान हवं होतं, जिथून त्याला कुणीही उठवणार नाही… आणि मग त्याला हा उकिरडा सापडला.

हाडामांसाच्या माणसांनी त्याला कधी “हात” दिला नाही, परंतु इथल्या निर्जीव उकिरड्याने त्याला “साथ” दिली…

स्वतःसाठी काही करणं म्हणजे “दागिना”, दुस-यासाठी काही करतो तो “अलंकार”! आज दुस-याला आधार देवुन उकिरडा “अलंकार” झाला! खोटं सुगंध लावून मुखवटे घालून फिरणाऱ्या माणसांपेक्षा, कोणताही मुखवटा न लावणारा हा दुर्गंधीत उकिरडा त्याला जास्त जवळचा वाटला.

आपण एखादी गोष्ट स्वतःसाठी कमावतो, तेव्हा आपलं “वैभव” वाढतं… पण दुस-याला काही कमावण्यासाठी मदत करतो, तेव्हा आपलं “ऐश्वर्य” वाढतं! वैभवात लोळायचं की ऐश्वर्याचा आस्वाद घ्यायचा? लोळतं ते गाढव… अशा लोळणा-या, मुखवटाधारी गाढवांच्या गर्दीपासुन तो दुर आला आणि तेव्हापासून तो इथेच आहे… या उकिरड्यात, ध्रुवबाळासारखा, अढळ!  फ्लेक्स च्या पेपर खाली तो गुपचूप झोपून राहतो… कुणाला कळत ही नाही आणि कळलं तरी कुणाला फरक पडत नाही, आणि म्हणुन मग कोणी उठवायला येतही नाही! पुण्यात राहून तो उत्तम मराठी बोलायला सुद्धा शिकला आहे.

त्याची सर्व कहाणी ऐकली!

त्याला एक हॉटेल काढायचं होतं, ते त्याचं स्वप्न आहे… तो एक उत्तम कुक सुद्धा आहे!

गाढ झोपेत असतांना, तो हेच, स्वप्न पहात असेल का? मी त्याला त्यावेळी झोपेतून उठवलं होतं… त्याचं स्वप्न कदाचित मी मोडलं असेन. पण नाही, मी त्याला समजावुन सांगेन, “दोस्ता, झोपेत पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग जागेपणीच करायचा असतो.”

सध्याच्या अन्नपूर्णा प्रकल्पांमध्ये अनेकांना आम्ही जेवणाचे डबे तयार करण्याचं काम देत आहोत, यालाही डबे तयार करण्याचं काम आपण द्यावं, हे मी मनोमन ठरवलं.

सर्वात प्रथम याला शुचिर्भूत करणे अत्यंत आवश्यक होतं.

बुधवारी दिनांक १६ जूनला याच्यासाठी सर्व कपडे घेतले. दाढी आणि कटिंग साठी माणूस ठरवला. एका जागेवरून दुसर्‍या जागेवर जाण्यासाठी व्हीलचेअरची आवश्यकता होती या व्हीलचेअरची ऑर्डर दिली. आता गुरुवारी याच्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणणं आवश्यक होतं, आंघोळ घालणं महा आवश्यक होतं. यानंतर पुढे मग उदरनिर्वाहाचं साधन!

मी त्याच्यासाठी करणार असलेल्या बाबींची त्याला सर्व कल्पना दिली.

ऐकताना, “Sir… Sir…” म्हणत तो दरवेळी पायाशी झुकण्याचा प्रयत्न करायचा, म्हणायचा, “सर, प्रणाम करु द्या हो!”

दरवेळी मी मात्र अवघडुन जायचो…

एकदा त्याला हसत म्हणालो,  “ओळख टिकावी म्हणुन केला जातो तो नमस्कार… कुणाच्या मिंध्यात आहोत म्हणुन, कमरेत झुकणं, हे झालं अभिवादन… निष्ठा वाहताना केला जातो तो मुजरा… आणि काहीतरी हवंय म्हणुन केलं जातं ते वंदन मित्रा…, तु नको वाकुस… मला अवघडल्यासारखं होतं…”

“अर्धाच अर्थ सांगितलात सर… काहीही नको असतांना, नतमस्तक होणं म्हणजे प्रणाम!”

या त्याच्या वाक्यावर झुकण्याची पाळी माझी होती!

यानंतर गुरुवारी १७ जूनला पुन्हा याला भेटायला गेलो. पूर्वी दाढी आणि कटिंग चे काम करणारा एक कारागीर, परिस्थितीमुळे सध्या भीक मागत आहे, याला सुद्धा भिक्षेक-यांच्या दाढी आणि कटिंगचं काम दिलं आहे. याला आपण राजू म्हणू! राजू स्वतः अपंग आहे. याला व्हीलचेअर आणि दाढी कटिंगचं सर्व साहित्य घेऊन दिलं आहे. रस्त्यावरच तो हा व्यवसाय करतो, आणि आपण आपल्या माध्यमातून सुद्धा त्याला व्यवसाय देत आहोत.

तो माझ्यावर अतिव प्रेम करतो! या भावनेतून बऱ्याच वेळा तो माझ्यावर अधिकार गाजवतो.

“मय डाक्टर का राइट हॅन्ड हय, मेरे परमिशन के बगैर डाक्टर को मिलने का नय, डाक्टर को मिलना हय, तो मेरसे पयले बात करने का”, असा त्याचा प्रेमळ आग्रह असतो.

जे लोक त्याच्या परवानगी(?) वाचून मला “डायरेक्टली” भेटायला येतात, त्यांच्याकडे तो रागाने पाहतो!  मला या सर्व गोष्टींची मजा वाटते आणि कौतुक सुद्धा!

तर या राजुला हक्काने मी दाढी आणि कटिंग करायला लावली “त्याची” राजुचा कुशल हात “त्याच्या” डोक्यावर आणि गालावर नाचत होता… कटिंग करतांना, वाढलेल्या केसातल्या किडे आणि अळ्या रस्त्यावरून दुडूदुडू धावत होत्या… यांच्याकडे पाहून मला असं वाटलं की पुण्यातलं ट्राफिक यांच्यामुळेच जाम होईल का काय.?

दाढी झाली, कटिंग झाली, आता आंघोळीचं काय.? या उच्चभ्रु रस्त्यावर, आम्हां “भिकार” लोकांना बादली आणि पाणी कोण देणार? मी माझ्या “राईट हॅन्ड” राजूभाई कडे सुचक पाहिलं… त्याने माझा प्रश्न अचुक ओळखला आणि म्हणाला, “मय है ना सायेब, कायको टेन्शन लेता हय.?”

थोड्याच वेळात त्याने दहा लिटरचे बिसलेरीचे पाच कॅन आणले, सोबत माझा सहकारी मंगेश वाघमारे होताच… आम्ही बिसलरीच्या पाण्याने मग “त्याला” आंघोळ घातली, रस्त्यावरच…

आंघोळ झाल्यावर थक्क होवुन पहात राहिलो मी त्याच्याकडे! एखाद्या चित्रपट अभिनेत्याला लाजवेल इतका देखणा होता तो! दाढी आणि वाढलेल्या केसांच्या जंजाळात हे जाणवलं नव्हतं! तीन वर्षे तो या उकिरड्यात लपून रहात होता. त्याचं बदललेलं रुप पाहुन मलाही विश्वास बसेना!

दर वेळी अंगावर पाणी पडल्यावर तो डोक्यावर हात नाचवत “शंभोsss” म्हणायचा… मला नंतर जाणवलं… म्हटलं, “यार, राजू, आज आपल्या हातून अभिषेक झाला रे, नकळत…”
“हां सायेब, आपुनको मंदिरमे जानेका जरुरतच नय…” तो हसत म्हणाला. जगातलं त्रिवार सत्य तो नकळतपणे बोलून गेला… “मानवसेवा हिच ईश्वरसेवा!”

साबण लावल्यावर, “त्याच्या” अंगाला सुवास येत होता, म्हटलं, “मंगेश, आपल्याला आता कसलीही अगरबत्ती लावायची गरजच उरली नाही राव…” मंगेश मंद हसला…

आंघोळ झाल्यावर “त्याला” जेवू घातलं… तो तृप्त झाला!
“काय गं मनिषा? आपलं हे ‘जेवण’ म्हणजेच आपण त्याला वाहिलेला ‘नैवेद्य’ असेल का.?”
ती सुद्धा फक्त गालात हसली!

यानंतर, त्याच्या कुडकुडणा-या अंगावर चादर टाकून आम्ही निघालो…
“Sir, I am feeling very nice, I love you sir, I love you!” तो उतावीळपणे , कृतार्थपणे हात जोडत ही वाक्यं म्हणत होता… डोळ्यांतून पाणी ओघळत होतं…,

त्याला कोणत्या भाषेत आमचे उपकार मानावेत तेच कळत नव्हते, काय बोलावं? त्याला हेच कळेना! त्याचे हे हसुमिश्रीत अश्रु, प्रसाद… प्रसाद म्हणतात तो हाच असेल का? पूजा… पूजा म्हणतात ती हिच असेल का.? हिच पूजा असेल तर आमच्या हातुन आणखी एक पूजा झाली होती! मी विचार करत राहिलो… आमी त्याच्यावर चादर पण चढवली होती. इसीको “इबादत” कहते होंगे क्या.? आम्ही “त्याच्या” मनात जगण्याच्या आशेची एक मेणबत्ती पेटवली होती! तो चमकून उठलाय या प्रकाशात! यालाच “Prayer” म्हणत असावेत काय!

आज शुक्रवारी याच्या बाबतीतला सर्व घटनाक्रम पुर्ण झाला… माणसाला माणसांत आणणारा आजचा हा शुक्रवार! Good Friday आजच असेल काय?

तो झोपतो ते ठिकाण – तो उकिरडा आम्ही खराटा-पलटण च्या आज्यांमार्फत उखडुन टाकणार आहोत. नववधु रस्त्यावरच्या गालाचा बट्टा मिटवणार आहोत, हळदीनं तीला माखणार आहोत! मी निघालो, खुरडत खुरडत तो माझ्याकडे यायला लागला… त्याला उठायचं होतं, पण ते शक्य होत नव्हतं…

पुन्हा हात जोडुन म्हणाला, “तुम्ही खुप केलंत माझ्यासाठी…” म्हटलं, “अरे अजुन कुठं काय केलंय… आत्ता तर सुरुवात केलीय… पण, लक्षात ठेव आपण कुणाला दिलेलं आठवायचं नाही, आणि दुस-यानं दिलेलं कधी विसरायचं नाही!” तो हसला आणि म्हणाला, “सर एक विनंती करायची होती, मला आईवडिल नाहीत. तुम्ही आणि मॅडम मला पदरात घ्याल?”

मी पुन्हा त्याच्या जवळ गेलो, त्याला जवळ घेतलं… तो रडायला लागला. त्याला बोलायचं होतं खुप… पण शब्द डोळ्यांतुन ओघळु लागले! ब-याच वेळानं, पालथ्या मुठीनं डोळे पुसत, हुंदका देत, तो म्हणाला, “सर मी आज तुमचं बाळ झालो!”

“बापाला कुणी ‘सर’ म्हणतं का येड्या…” म्हणत त्याच्या पाठीत मी धपाटा घातला… आणि तो खुद्कन हसला.

जोरदार पाऊस कोसळत होता… बाप होण्याच्या खुशीत मग मी चिंब न्हालो!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*