सप्टेंबर महिन्याचा लेखाजोखा सविनय सादर!

सप्रेम नमस्कार!

भिक्षेकरी ते कष्टकरी

  • पूर्वी याचना करणारा माझा एक याचक बंधू! याला तीन वर्षांपूर्वी चर्मकारीचा व्यवसाय टाकून दिला… फाटक्या चपलीला टाके घालता घालता, फाटलेल्या आयुष्याला सुद्धा आपोआप टाके बसत गेले… हळूहळू स्थिरस्थावर होत आहे.मागच्या महिन्यात पावसात भिजत थंडीमध्ये कुडकुडत हा काम करत होता…
    मला याच्या जिद्दीचे कौतुक वाटलं आणि वाईट सुद्धा! १४ सप्टेंबरला याला एक नवीन हातगाडी घेऊन दिली आहे, आता तो या हातगाडीत बसून काम करतो.
    गाडी ताब्यात घेताना मला म्हणाला, “नमस्कार वो सर तुमाला”
    मी म्हटलं, “वेड्या… ही गाडी मी तुला दिली नाही, तर ही गाडी समाजाने तुला दिली आहे! चल, आपण दोघेही समाजाला नमस्कार करू”.
  • दोन जिवलग मित्र… बऱ्यापैकी धडधाकट.भीक मागत नाहीत, परंतु कोणतेही काम नसल्यामुळे अवस्था जवळपास तशीच! दोघांनाही काम हवंय, पण मिळत नाही. त्यातील एकाच्या अंगी शिवण कला आहे.
    मी त्यांना म्हणालो, “तुम्हाला मी शिलाई मशीन घेऊन दिले तर तुम्ही मास्क पिशव्या वगैरे शिवा आणि तुमचा दुसरा हा मित्र मंडई एरियामध्ये हे साहित्य फिरून विकेल.” दोघांचीही याला तयारी आहे… परंतु राहतात फुटपाथवर… मशीन ठेवतील कुठे हा मोठा प्रश्न! माझ्याकडे स्वतःची जागा असती, तर तिथे काही तरी व्यवस्था करता आली असती.
    असो, सध्या या दोघांनाही मी माझे मदतनीस म्हणून तात्पुरते ठेवले आहे, त्या बदल्यात त्यांना दिवसाचा पगार देत आहे, संधी मिळाल्या बरोबर त्यांना स्वतंत्र व्यवसाय टाकून देणार आहोत.

वैद्यकीय

  • पूर्वी केटरिंग व्यवसायात वाढपी म्हणून काम करणारा एक तरुण मुलगा!सध्या नोकरी गेली आहे म्हणून रस्त्यावर आला. एके दिवशी एक्सीडेंट झाला… पायाला जखम झाली… सेप्टीक झाले… अनेकांनी गुडघ्यापासून पाय कट करण्याचा सल्ला दिला! याला दिनांक ४ सप्टेंबर रोजी मॉडर्न हॉस्पिटल येथे ऍडमिट केले, सर्व उपचार केले, आता तो ठणठणीत आहे.
    पाय कट केला असता, तर भविष्यामध्ये कधीही काम करू शकला नसता… भविष्यात तो पक्का भिक्षेकरी झाला असता.
    सुदैवाने याचा पाय वाचला आहे… केटरिंग व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यानंतर हा पुन्हा कामाला लागेल.
    खऱ्या अर्थाने पायावर उभा राहील!
  • एक आजी… पूर्वी हिला बऱ्यापैकी ऐकू येत होतं. पण आता वयोमानाने ठार बहिरी झाली आहे.
    रस्ता क्रॉस करताना हॉर्न ऐकू आला नाही… जीव जाता-जाता वाचला. माझ्यासमोरच घडलेल्या, या एका प्रसंगावरून, सर्व वयोवृद्ध, भीक मागणाऱ्या आजी-आजोबांची कानांची तपासणी सुरू करण्याची कल्पना मनात आली. डोळ्या न बरोबर आता कानाची ही तपासणी सुरू केली आहे.
    ज्यांना खरच गरज आहे, अशांना कानाचे यंत्र देणार आहोत, या यंत्राची किंमत रुपये दहा ते पंधरा हजार प्रत्येकी इतकी असते… बघू कसं जमतंय ते!
    सूर सात आहेत असं म्हटलं जातं… यांच्यासाठी मात्र सारच “बेसूर” आणि “भेसुर”!
  • केटरिंग व्यवसाय बंद पडल्यामुळे, रस्त्यावर आलेला आणखी एक तरुण. गाडीने धक्का दिला… पडला… गुडघा मोडला… पैशाअभावी कुणीही ऍडमिट करून घेईना. यालाही ऍडमिट केलं, पुन्हा चालतं केलं! केटरिंग व्यवसाय सुरू झाल्यानंतर, हा सुद्धा पुन्हा काम सुरू करणार आहे. अन्यथा हा सुद्धा एक “अपंग भिक्षेकरी” म्हणून भविष्यात पुढे आला असता.पंगतीत हजार जणांना या हाताने भरभरून जेवण वाढलं… आणि आज मला त्याच हातांनी मागून खावे लागत आहे, आहे अशी खंत त्याने व्यक्त केली.वाईट वेळ सर्वांवर येत असते… या काळात स्वतःला टिकवून ठेवणं महत्त्वाचं… आणि चांगली वेळ येईपर्यंत प्रयत्न करत राहणं महत्वाचं… सध्या तो याच अवस्थेत आहे!
  • बीपी, डायबेटिस, त्वचारोग, संधिवात यासारख्या आजारांवर ८५० पेक्षा जास्त भीक मागणाऱ्या आणि बेरोजगारीमुळे रस्त्यावर याचना करणाऱ्या व्यक्तींवर या महिन्यात उपचार केले.
  • ३८० गरजुंना व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या, मास्क, सॅनीटाईझर, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे, प्रतिकारशक्ती वाढवणारी औषधे व अत्यंत उच्च प्रतीचा मेडिकेटेड साबण स्वच्छतेसाठी दिला आहे.
  • भीक मागणाऱ्या लोकांमधील ज्येष्ठ नागरिकांचे, डोळ्याला दिसत नसल्यामुळे, रस्ता क्रॉस करताना अपघात होतात. यात त्यांचा जीव तरी जातो किंवा कायमचे अपंगत्व येते… तसे होऊ नये, यासाठी डॉ. समीर रासकर, Eye Surgeon यांच्या हॉस्पिटल मध्ये नियमित नेत्रतपासणी व आवश्यक ते उपचार सुरू आहेत!
    डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर किंवा इतर उपचारांमुळे भिक्षेकऱ्यांच्या रस्त्यावरील अपघातांचे आणि मृत्यूचे प्रमाण घटले ही समाधानाची बाब.

कोव्हीड विरोधी लसीकरण

  • रस्त्यावरील गोरगरीब आणि निराधार यांना लस देणं अत्यंत गरजेचं होतं, परंतु आधार कार्ड अथवा इतर कोणतेही ओळखपत्र नसल्यामुळे लसीकरणात अडचणी येत होत्या. या परिस्थितीत दिनांक १४ ऑगस्ट पासून प्रायव्हेट हॉस्पिटल मधून लसीकरण सुरू केले. यानंतर वेगवेगळ्या दिवशी, वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यातील भीक मागणाऱ्या सर्व लोकांना एकत्र आणून टप्प्याटप्प्याने लसीकरण केले आहे.
    साधारण ८५ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ज्यांना लस दिली आहे अशा सर्वांना शासनाकडून मिळणारे सर्टिफिकेट सुद्धा घेऊन दिले आहे.
    (सौजन्य – आदरणीय अनुश्री ताई भिडे, पुणे महानगरपालिका, रॉबिनहूड आर्मी पुणे, तसेच अनेक संस्था व व्यक्ती)

भोक्ता ते दाता

  • भीक मागणारांतील धडधाकट लोकांनी रक्तदान करावे यासाठी प्रयत्नशील आहोत. मेडिकली फिट असणाऱ्या लोकांकडून आज पावेतो आपण रक्तदान करून घेतले आहे. पुढेही हा प्रयत्न चालूच असेल. भीक मागणाऱ्या माझ्या कुटुंबातील लोकांनी जे रक्तदान केलं आहे त्यामुळे 157 लोकांचे प्राण वाचले आहेत हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. समाजाने भीक मागणाऱ्या लोकांना “भीक” दिली असेल, परंतु या भीक मागणाऱ्या लोकांनी “रक्तदान” करून समाजाला हे “दान” परत करणं सुरू केलं आहे!
    रक्तदान करण्यासाठी अनेक लोक तयार असूनही ते मेडिकली फिट नसल्यामुळे या महिन्यात रक्तदान होऊ शकले नाही.

भीक नको बाई शीक…

  • ५२ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.या सर्व मुलांना यावर्षीचे शैक्षणिक साहित्य देऊन झाले आहे तसेच शाळा व कॉलेजातील फी भरून झाल्या आहेत.

अन्नपूर्णा

  • अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून, जे गरीब लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत, ज्यांना कोणीही नातेवाईक नाहीत, जेवणाचा डबा आणून देणारं त्यांच्या आयुष्यात कोणीही नाही… अशा हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असणाऱ्या सर्व गरीब निराधार रुग्णांना, जेवणाचा एक डबा पोचवत आहोत! याव्यतिरिक्त रस्त्यावर जे वयोवृद्ध लोक पडून आहेत, त्यांना ही डबे देत आहोत.
    हॉस्पिटल मध्ये ज्या प्रमाणात रुग्ण सापडतील त्या प्रमाणे ५० ते ६० डबे रोजचे सुरू आहेत.

 इतर

  • शक्यतोवर आम्ही सरसकट कोणालाही कपडे देत नाही. अन्यथा मोफत घेण्याची वृत्ती कधीच कमी होणार नाही. याशिवाय फुकट मिळते म्हणून इतर अनेक लोक सुद्धा भीक मागण्याच्या या प्रवृत्तीला बळी पडत आहेत. परंतु, या महिन्यात मला चार आज्या अशा दिसल्या ज्यांच्या अंगावर अर्धवट कपडे होते… जे होते, त्यांचा काहीही उपयोग नव्हता. या आज्यांना या महिन्यात नऊवारी साड्या आणून दिल्या आहेत.
    मी शिकत असताना, माझ्या आजीने “मला नऊवारी लुगडं आणून दे!” म्हणून हट्ट धरला होता… मला तेव्हा जमलं नाही! जेव्हा जमलं, तोपर्यंत ती मला सोडून गेली होती…
    बहुतेक माझ्या आजीनेच तीचा लुगड्याचा हट्ट अशा प्रकारे पुरवून घेतला… चला, एक हिशोब पूर्ण झाला!!!
  • डॉ. नंदाताई शिवगुंडे यांचं सोलापूर रोडला असलेलं आधार केअर सेंटर! मला रस्त्यात सापडलेले लोक मी अनेक आश्रमात ठेवत असतो. डॉ. नंदा ताईंच्या या सेंटरलाही, माझे पाच – सहा लोक आहेत.त्यांना तिथे ठेवल्यापासून त्यांची भेट झाली नव्हती. या महिन्यात व्याख्यानानिमित्त सोलापूरला जाण्याचा योग आला, या सर्व लोकांनाही मग या निमित्ताने भेटून आलो.
    आंबा खाऊन रस्त्यावर फेकलेल्या कोयी सारखी ही माणसं होती. आता या कोयींना पुन्हा अंकुर फुटत आहे… फळं येण्याची वाट पाहत आहोत!

मनातलं काही

  • लहानपणापासून ते डॉक्टर होईपर्यंत, आलेले चांगले-वाईट, भले – बुरे अनुभव… यातून माझी झालेली जडण-घडण… चांगला – वाईट म्हणून बसलेले शिक्के… आयुष्यात घडलेले अनेक अकल्पनीय प्रसंग… यानंतर डॉक्टर झाल्यानंतरही बसलेले तडाखे… या सर्वांचं मिळून एक आत्मकथन तयार करावं आणि ते पुस्तक रूपात आणावं, या मित्रांच्या आग्रहावरून, पुस्तक छापण्याचा निर्णय घेतला आहे. जुळणी सुरू आहे… नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुस्तक प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे.
    पुस्तकाचं नाव असेल “भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर अर्थात डॉक्टर फॉर बेगर्स
    याविषयी सविस्तर कळवेनच पुन्हा…

आपण राहतो तो समाज वेगळा आणि याचना करणारा समाज वेगळा. या दोन समाजांमध्ये खूप मोठी दरी आहे. दोन्ही समाजांना एकत्र आणण्यासाठी भिक्षेकऱ्यांना, गावकरी बनवण्यासाठी आम्ही फक्त या दरीवरचे पूल म्हणून काम करीत आहोत.यात “समाज” म्हणून आपलं योगदान खूप मोठं आहे… आणि म्हणून आम्ही आपले ऋणी आहोत! “या” समाजाने, “त्या” समाजासाठी दिलेली मदत, पोचती झाली आहे, त्या बाबतचा सप्टेंबर महिन्याचा हा लेखाजोखा, आपणास सविनय सादर!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*