मुल जन्माला आल्यावर त्याचं किंवा तीचं नाव काय ठेवायचं याची प्रत्येक घरात किती चर्चा होते ना…. !
हेतु हाच असतो, त्यानं किंवा तीनं या नावाप्रमाणेच लौकिक मिळवावा. त्यांचंही आयुष्य या नावाप्रमाणेच उज्वल व्हावं ….इतका साधा विचार असतो यामागं !
काही नावं इतकी अजरामर झालेली आहेत कि हि नावं घेतल्यानंतर दुसरं कुणी डोळ्यासमोर येतच नाही…. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महात्मा फुले, आंबेडकर, सावित्रीबाई, जिजामाता …. बघा, नावं ऐकुन डोळ्यासमोर कोण दिसलं ….?
आईबापही आपल्या मुलामुलींनी असंच उत्तुंग व्हावं असं ठरवुनच अशी नावं ठेवतात लहानपणी …!
किती आशा असते ? जे आपण नाही करु शकलो ते आपली मुलंमुली करतील म्हणुन त्यांच्या मोठं होण्याच्या वाटेकडं डोळे लावुन बसतात, काहीजणांच्या अपेक्षा काही प्रमाणात पुर्ण होतातही….. पण इतरांचं काय ?
कितीतरी वेळा नाव आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांत जमिन अस्मानाचा फरक असतो, भयंकर विसंगती असते आणि हे अनुभवुन काहिवेळा वाटतं कि हा कसला खेळ आहे , कोण खेळतंय असं अघोरी? आणि का?
रस्त्यावर मी जे भिक्षेकरी तपासतो तिथं मला हे जास्त जाणवतं…..
एकाचं नाव असतं बलवान, पण एक हात नाही आणि दोन्ही पाय अधु, कोणी उठवलं तरच उठायचं …..
एखादा असतो बादशहा… प्रेमाने स्वतःचं नाव तो बाश्शा असं सांगतो…. फाटकं मळकं पोतं आणि चादरीत गुंडाळलेली फाटकी कापडं हाच त्याचा बहुमोल खजीना ……
इथं लक्ष्मीबाईही असते …. लाज झाकण्यापुरतं असलेलं फाटकं ठिगळं लावलेलं लुगडं हीच काय ती श्रीमंती …..
एक असते नयना, तीच्या दोन्ही डोळ्यांनी दिलेला असतो दगा आणि हातात असते आंधळ्यांची काठी …
पोरानं घरातनं हाकलुन दिल्यावर चेहऱ्यावरचा आनंद कायमचा लोपलेल्या आनंदीबाई इथंच भेटतात…..
डाक्टर, हिला मेंटलच्या हास्पीटलात आडमीट करा वो, बाडबाड करुन लई तरास देती आमाला हि शांताबाय…. मनःशांती हरवलेली आणि कायम अस्वस्थ असलेली शांताबाई ही इथलीच……
कुष्ठरोगाने विद्रुप झालेल्या सुंदराबाई आणि उपासमारीने हातापायाच्या काड्या झालेला मारुती….
आणि… अमर नावाचा माणुस, त्याला देवाघरी जावुन नुकतेच सहा महिने झालेला असतात….
का हि अशी चेष्टा…. ? कोणाकडे आहे उत्तर…. ???
Leave a Reply